शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

जागतिक आदिवासी दिना निमीत्त एक वास्तव....

तिमिरातुनी तेजाकडे....
आज जागतिक आदिवासी दिन,संपूर्ण जगात हा दिवस साजरा केला जात आहे.पण स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरी मध्ये खरचं देशातील ,राज्यातील आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला आहे का ही विचार करण्याची बाब आहे. शिक्षक म्हणून सेवेत लागलो व गेल्या 14 वर्षांपासून आदिवासी समाजातील लोकांशी ओळख झाली व 14 वर्षात एक अतूट नातं तयार झालं.त्यांचा दररोजचा जीवन जगण्याचा संघर्ष,अनंत अडचणीतून आपल्या वाटा काढण्याचा गुणधर्म,कोणावर ही अवलंबुन न राहता आपलं जीवन आपल्या पद्धतीत आनंदाने जगण्याची जीवनशैली हे जवळून पाहण्यात आले.
रोजगाराच्या शोधात सतत भटकंती,स्थलांतर त्यामुळे कित्येक मुलांचे शिक्षण अर्धवट सुटले आहे. कित्येक वेळी या विषयी मी अनेक पालकांशी चर्चा केली की तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता नाही का वाटत?तुमचे मुलं शिकून मोठे अधिकारी व्हावे नाहीत का वाटत? अशा अनेक प्रशांचे उत्तरे त्यांना सकारात्मक देवी वाटतात व ते बोलतात ही की गुरुजी,'आम्ही नाही शिकलो तरी आमचे मुलं शिकावी ,मोठी व्हावी अस आम्हला वाटत पण प्रश्न पोटाचा आला की आम्हाला स्थलांतर होऊन गेल्याशिवाय पर्याय राहत नाही व त्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.' जेंव्हा असे उत्तर ऐकताना त्या पालकांचा चेहरा समोर येतो तेव्हां हाच का आपला 21 व्या शतकातील भारत देश याचा प्रश्न पडतो.आज आपण एक पाऊल मंगळावर ठेवत आहोत व एक पाऊल आणखी घट्ट चिखलात रुतून बसला आहे पण पुढल्या पावलांच्या नादात आपण चिखलात रुतून बसलेल्या पावलाकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना? असा प्रश्न नेहमी पडतो. देशात जे दोन वर्ग आहेत आहे रे व नाही रे याची दरी काळ बदलत आहे तशी वाढत असलेली जाणवत आहे.आज श्रीमंतांचे पोर बर्गर ,पिझ्झा च्या तुकड्यासाठी शेकडो खर्चित आहे व आजही आदिवासी मुलं कुपोषणाचे शिकार होत आहेत. आज अनेकांचे घरे हजारो करोडोंचे आहेत व हजारो आदिवाशीना छत मिळत नाही,अनेक ठिकाणी वीज आली आहे पण अनेक आदिवासी कुटुंबाना छत्रच नसल्याने वीज लांबच आहे, मग आपण जे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत आहोत त्याचा काय उपयोग? अनेक मुला मुलींचे शिक्षण सामाजिक प्रथा,बालविवाह यामुळे अर्धवट सुटत आहेत, कमी वयात लग्न व मग मुलं झाल्याने त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत,कुपोषणाचे गंभीर प्रश्न आजही आदिवासी क्षेत्रात आ वासून उभे आहेत.शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज प्रत्येक वाडी वस्तीवर शाळा झाल्या आहेत पण अशा कित्येक मुली व मुलं आहेत की घरचे छोटे भावंड संभाळण्यासाठी  त्यांचे बालपण हरवत चालले आहे.इच्छा असूनही त्यांना कधी कधी शाळेपासून वंचीत राहावे लागते.कधी कधी पालकांच्या स्थलांतरामुळे त्यांना नाविलाजाने शाळा अर्धवट सोडून जावे लागत आहे. अनेक शासकीय योजना आल्या त्या राबिवल्या पण गेल्या तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र विभागाची निर्मितीही केली गेली तरीही अजूनही बहुसंख्य आदिवाशीचे जीवन खडतर स्वरूपात आहे.अशा अनेक समस्यांना तोंड देत 21 व्या शतकात आजही आदिवासी समाज जीवन जगत आहे.आदिवासी समाजातील बोटावर मोजता येतील एवढे लोक आज शासकीय ,निमशासकीय सेवेत नोकरीस आहेत ,त्यातील माझे कांही परिचयाचे आहेत ते पण त्यांच्या पद्धतीतने आपल्या समाजातील भावी पिढीने शिकावे  म्हणून त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत व थोड्याफार प्रमाणात यश येत ही आहे पण मंजिल खूप दूर आहे.आजच्या दिनी ही जी मांडणी करत आहे ते 14 वर्ष जे आदिवासी जमातीत राहून जवळून पाहिलं आहे व त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते पाहून लिहीत आहे.आजही कितीही संकटे आले,समस्या आल्या तरी विना तक्रार आदिवासी जमातीमधील अनेक कुटुंबे आपलं जीवन आपल्या पद्धतीत जगत आहेत.आज सम्पूर्ण जगात आदिवासी दिन उत्साहात साजरा केला जात आहे पण ज्यांच्यासाठी हा दिन आहे त्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवाना हेच माहित नाही की हा दिन त्यांच्यासाठी आहे म्हणून.दीन आदिवासी बांधवाना जो पर्यंत चांगले दिन येत नाहीत ,त्यांची उन्नती होत नाही तोपर्यंत या दिनाचे महत्व वाटणार नाही.....
✍🏻...
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
09923313777
📧-gajanan.jadhav1984@gmail.com

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...