शनिवार, २९ मार्च, २०२५

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

 

ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक

एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र झाले ही बातमी मागच्या आठवड्यापासून वर्तमानपत्रात,समाजमाध्यमावर वाचायला मिळाली आणि त्या शिक्षकाचे कार्य,मेहनत काय असेल जाणून घायची उत्सुकता लागली;आणि त्याचा योग काल आला.आमचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मधील शिक्षक मित्र श्री सोपान चंदाले सर व ज्यांनी एकाच वर्षात 22 विध्यार्थी नवोदय पात्र केले ते विनोद झनक हे वर्गमित्र निघाले. सोपान सरांमुळे  विनोद सरांना भेटायची नामी संधी मिळाली.

शुक्रवारी सकाळच्या सत्रातील शाळा करून विनोद सरांची भेट घेण्याच्या उत्सुकतेने कळमनुरी वरून आमचे मित्र सोपान चंदाले सर,राम परचंडे सर,सचिन गडपतवार सर व मी वाशीमच्या दिशेने निघालो. जवळपास दीड एक तासाच्या प्रवासात सरांचे कार्य जाणून घेण्याची उत्सुकता लागून गेली होती.आम्ही वाशिमला पोहचण्याआगोदर सकाळी 7 ते 2 शाळा करूनही 3 वाजता भर उन्हात विनोद सर आमची वाट पहात होते. त्यांना पाहिल्यास अजिबात वाटत नव्हतं ते थकून आले आहेत, एकदम प्रसन्न चेहरा व उत्साह दिसत होता. विनोद सरांनी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले व तेथे परिचय झाला . त्यानंतर पुढील 3ते4 तास विनोद सरांच्या सहवासात कसे गेले समजलं नाही.एकदम साधी राहणी, एवढं  यश संपादन केलं तरी अजिबात कुठला गर्व नाही की यशाचा उन्माद दिसला नाही. जे जे आम्ही विचारलं ते ते त्यांनी अगदी मनमोकळे पणाने सांगत होत;आणि 5 वर्षात तब्बल 89 विध्यार्थी नवोदयला पात्र कसे होत गेले त्यांचा प्रवास उलघडत गेला.

विनोद सरांच्या भेटीत एक गोष्ट जाणवली यी म्हणजे हे मिळालेले यश एकट्याचे नसून संपूर्ण शाळेचे आहे व इयत्ता पहिली ते 4थी पर्यंतच्या वर्गशिक्षकाची मेहनत खूप आहे त्यांनी वारंवार सांगितलं.

विनोद सरांच्या वर्गातील ह्यावर्षी 22 विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात नवोदय प्रवेश पात्र झाले, गेल्यावर्षी 19 त्याच्या आगोदर असे पाच वर्षापासून एकूण आकडा आज 89 पर्यंत पोहचला आहे. हे सर्व यश एका वर्षाचे नसून ते ज्या शाळेत शिक्षक आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांचे व सातत्याने घेत असलेल्या मेहनतीचे आहे असं त्यांच्या बोलण्यातून समजले.

विनोद सर पाच वर्षांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाले व तेंव्हा पासून 5 वर्षात त्यांच्याकडे 5 वी वर्ग राहिला व त्यांच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला आणि ह्यावर्षी रेकॉर्डब्रेक कामगिरी करत 22 विध्यार्थी नवोदय पात्र करत त्यांनी इतिहास घडवला. साखरा जिल्हा परिषद शाळा म्हणजे त्या परिसरातील आदर्श शाळा आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा, ता. जि. वाशीम. त्या शाळेत 1ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग असून 929 विध्यार्थी शिक्षण घेतात त्यांना शिकवण्यासाठी 24  शिक्षकांची दर्जेदार टीम आहे.एवढंच नाही तर पूर्व प्राथमिकचे जवळपास 400 विध्यार्थी येथे शिक्षण घेतात. जवळपासच्या 15-16 गावातून ह्या जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थी शिक्षण घ्यायला येतात व एवढंच नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून म्हणजे वाशिम शहरातून जवळपास 10 रिक्षातून मुलं साखरा शाळेत शिकायला येतात. हे तेव्हाच शक्य होत जेंव्हा येथील शिक्षक, पालक, ग्रामस्थ ध्येयवेडे असतात.साखरा ग्रामस्थांनी 37 एकर गायरान जागा शाळेसाठी दिली व माळरानावर ज्ञानाचे विद्यापीठ तयार झाले. तस पाहिलं तर साखरा गावची लोकसंख्या जवळपास 1300 च्या घरात व शाळेत व पूर्वप्राथमिक वर्गात मिळून गावच्या लोकसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या पहायला मिळते.2023-24मध्ये शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे राज्यातील प्रथम बक्षीस मिळाले असून ग्रामस्थ, पालकांनी व शिक्षकांनी ठरवल्यास काय होऊ शकत नाही हे ही शाळा पाहिल्यास समजतं.

ज्यावेळी आम्ही विनोद सरांना विचारलं की एवढे नवोदय पात्र विध्यार्थी मोठ्या संख्येत एकाच शाळेतून लागण्याचे गुपित काय तर सर सांगू लागले की, गुडीपाडाव्या दिवशी पूर्व प्राथमिक वर्गातील नर्सरीचे प्रवेश सुरु होतात आणि जे विधार्थी इथे पूर्वप्राथमिक शिक्षण पूर्ण करतील त्यांनाच साखरा शाळेत पहिलीला प्रवेश मिळतो व त्यानंतर पहिली ते चौथी पर्यंत प्रत्येक वर्गशिक्षक मेहनतीने विध्यार्थी घडवतात. प्रत्येक वर्गाच्या तीन तुकड्या असून चौथी पर्यंत विध्यार्थ्यांचा पूर्ण बेस पक्का केला जातो आणि इयत्ता पाचवीच्या सुरवातीला चाचणी घेऊन जवळपास 40-50 विध्यार्थ्यांची खास बॅच बनवली जाते आणि त्यानंतर वर्षभर विनोद सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होतो त्यांचा मिशन नवोदय प्रवास.मग वर्षभर विनोद सर व त्या मुलांच्या मध्ये असतो फक्त एकच ध्यास तो नवोदय प्रवेशाचा.

विनोद सर सांगतात त्यांच्या वर्गाला कधीच सुट्टी नसते व विनोद सरांनी  5 वर्षात कधीच उन्हाळा, दिवाळी,रविवारची सुट्टी घेतली नाही की रजा घेतली नाही. त्यांचा वर्ग दररोज सकाळी 7 वाजता भरतो व सायंकाळी 5 वाजता सुटतो. विनोद सर सांगतात आमच्या विध्यार्थ्यांची 4 थी पर्यंत एवढी तयारी झालेली असते की त्यांची 5 वी नवोदयसाठी पात्र होणारच या मानसिक तयारीने ते वर्गात येतात. सराव व अभ्यासातील सातत्य ही नवोदयची गुरुकिल्ली आहे असें सर सांगतात. त्यांनी स्वतंत्र नोट्स बनवल्या आहेत व वेगवेगळ्या क्लूप्त्यांच्या मदतीने ते विध्यार्थ्यांना ध्येयाकडे घेऊन जात असतात.आणखी एक महत्वचाही बाब म्हणजे नवोदय परीक्षेला 2-3महिने अवधी असला की त्यांचा रात्रीचा वर्ग सुरु होतो मग काय विनोद सर सकाळी 7 वाजता शाळेत आले की रात्री 9 पर्यंत शाळेत असतात. त्यांचे जीवनच जणू ग्रामीण भागतील मुलांच्या शिक्षणासाठी आहे असं वेळोवेळी जाणवलं. शाळा हेच आपले घर व शाळेतील मुलं हेच आपलं दैवत म्हणुन चालणारे विनोद सरची मेहनत व प्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जाईल. 2007पासून त्यांच्या हातून शिकलेले जवळपास 100 च्यावर विध्यार्थी नवोदयला लागले असून आज ते उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. आज काल जे लोक जिल्हा परिषद शाळेला व शिक्षकला एकाच चष्म्यातून पहात असतात त्यांनी एकदा साखरा शाळा व विनोद सरांची भेट घेऊन जाणून घ्यावं की जिल्हा परिषद शाळा व शिक्षक काय करू शकतात.

साखरा शाळेत आम्हाला पोहचायला सायंकाळ झाल्यामुळे मुलांची भेट होऊ शकली नाही पण  पालक व ग्रामस्थ भेटले त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांच्या शाळेतील सर्व गुरुजीं खूप मेहनत घेतात व सर्व ग्रामस्थांचा त्यांना खूप मोठा आधार आहे.शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक यांच्या मते "गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे समर्पण, शाळेची सुविधा आणि पालकांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे." हे साखरा शाळा पाहून जाणवलं.शालेय व्यवस्थापनात व्यत्यय येऊ नये म्हणुन बाहेरून शाळा भेटीला येणाऱ्यांना 

दर शुक्रवारीच  शाळा पहायला परवानगी आहे असे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणाले. आपण अशी शाळा का पहायची तर आपल्यालाही प्रेरणा मिळते व नवीन काहीतरी शिकायला मिळत ह्या हेतूने साखरा भेट व विनोद झनक यांची भेट घेतली.

ह्यानिमित्ताने विनोद झनक सारखा राज्यात शैक्षणिक चळवळीत जीवापाड काम करणारा मित्र मिळाला ह्याचा मनस्वी आनंद वाटतो. शेवटी रात्री 8 वाजता विनोद सरांचा निरोप घेऊन व त्यांच्या ज्ञानाची खूप मोठी ऊर्जात्मक शिदोरी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.....

✍️..

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

 प्राथमिक शिक्षक,जि.प. शाळा हारवाडी

ता. कळमनुरी, जि. हिंगोली. 







1 टिप्पणी:

  1. विनोद सरांचे खूप खूप अभिनंदन त्यांच्या कार्याला माझा मुजरा .टीम वर्क अत्यंत महत्त्वाचे आहे.

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...