सोमवार, ३० मार्च, २०२०

असा झालो मी गुरुजी....

असा झालो मी गुरुजी-श्री गजानन जाधव
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव हे माझं गाव, तालुका ठिकाणा पासून 12 km अंतरावरच खेडेगाव.माझा जन्म सावरगावचाच. वडील श्री पुंडलिकराव जाधव पोलीस खात्यात नोकरी व आई सुमनबाई गृहणी दोन मोठ्या बहिणी सुरेखा व संगीता व मी असे आमचे पाच जणांचे कुटुंब.पहिल्या दोन मुली व तिसरा मी ,7 सप्टेंबर 1985 ला माझा जन्म झाला त्या दिवशी श्रीकृष्ण जयंती होती व योगायोगाने आमच्या घरातील म्हणजे सर्व काकांच्या मुलात माझा आठवा क्रमांक त्यामुळे आठवा कृष्ण जन्मला असे बोलले गेले.पण आईने मुलगा व्हावा म्हणून शेगावच्या गजानन महाराजांचे उपवास केल्यामुळे माझं नामकरण झालं 'गजानन'.
तसं माझं बालपण आनंदी गेलं घरात सर्वात लहान व शेंडेफळ म्हणून माझा लाड खूप व्हायचा.वडील पोलीस खात्यात असल्याने ते नोकरी निमीत्त लातूर, उदगीर,चाकूर,निलंगा येथे असायचे आठवड्यातून एक ते दोन दिवस ते गावी असायचे त्यामुळे सर्व गरजा आई पुरवायची.जरी वडील पोलीस खात्यात असले तरी त्यांनी कुटुंब गावीच ठेवलं होतं कारण 1971 ते 1982 आमचं कुटंब जालना येथे होत त्यावेळी वडील राज्य राखीव दलात होते व 1982 साली लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली व वडिलांनी आपली बदली स्वजिल्ह्यात करून घेतली मग आमचं कुटुंब गावी स्थायिक झाले. मोठ्या दोघी बहिणींचे शिक्षण गावातच पूर्ण झाले गावात 10 वी पर्यन्त शाळा होती.
मी पण लहानाचा मोठा होत गेलो तसा घरा जवळील बालवाडीत माझा प्रवेश झाला मग काय घर ते बालवाडी 100 मीटर अंतर मस्त मजेत तेथे 2,3 वर्ष काढले.गावात जिल्हा परिषदची चौथी पर्यंतची शाळा होती.बालवाडीचे शिक्षण झाल्यास मला 1990 साली गावातील जि प शाळेत पहिलीत प्रवेश देण्यात आला पण घरापासून शाळा लांब असल्याने मी शाळेला बुट्टी मारयोचो ,घरचे पण कंटाळले होते की हा शाळेत नाही जात म्हणून मग एके दिवशी माझे मोठे बंधू श्री अशोक जाधव (अण्णा)त्यावेळी औरंगाबाद येथे शिक्षण घेत होते व ते गावी सुट्टीला आले होते तेव्हा घरच्यांनी माझे प्रताप त्यांना सांगितले मग काय त्यांनी मला अशी अद्दल घडवली की माझे हातपाय बांधून गावातून माझी धिंड काढत मला शाळेत दाखल केले.त्यानंतर माराच्या भीतीने मी कधी शाळा चुकवली नाही व इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण आनंदात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले.
प्राथमिक शिक्षणाचा टप्पा अगदी आनंदात पार पडला होता व पुढील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय पण गावातच होती, बापूजी विद्यालय हे 1967 पासून गावात स्थापन झाले होते व पंचक्रोशीतील विध्यार्थ्यांना तेथे  शिक्षणाची चांगली सोय होती.त्याप्रमाणे मी पण पाचवीला बापूजी विद्यालयात प्रवेश घेतला व सुरु झाला वरच्या शाळेतील प्रवास.वरची शाळा म्हणजे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेला खालची शाळा व माध्यमिक शाळेला वरची शाळा म्हटलं जायचं म्हणून वरच्या शाळेतील प्रवास. पाचवी ते दहावी पर्यन्त दोन तुकड्या होत्या एका तुकडीत गावातील सर्व मुलं व दुसऱ्या तुकडीत शेजारच्या 4,5 गावातून शिकायला येणारे मुलं त्यामुळे आमची तुकडी अ होती.1995 ते 2000 हा काळ बापूजी विद्यालयात गेला तेथे अनेक दर्जेदार शिक्षकांचा सहवास लाभला,शिस्त,खेळ,चित्रकला अशा अनेक गोष्टी तेथे शिकायला मिळाल्या शालेय जीवनात जास्त करून कबड्डी खेळात सहभाग घेतला तालुका,जिल्हा,विभागीय पातळी पर्यन्त कबड्डी खेळण्याची संधी मिळाली व जीवनाला एक दिशा देणारे शालेय जीवन लाभले. माझी आई त्यावेळी सातवी शिकलेली आमच्या घरात जुन्या पिढीत तीच शिकलेली त्यामुळे तीच माझा अभ्यास घ्यायची तसा मी मधल्या फळीतील म्हणजे जास्त हुशार ही नाही आणि जास्त ढ ही नाही त्यामुळे अशा वाटचालीत 2000 साली दहावीत 62% मार्क घेऊन उत्तीर्ण झालो व गावपातळीवरील शिक्षणाला येथे पूर्णविराम मिळाला.
दहावी पर्यंतचे शिक्षण म्हणजे समज येण्यापूर्वीचे शिक्षण तो पर्यन्त आपल्याला काय व्हायचंय आपलं ध्येय काय ते ठरवलेलं नसत पण जेव्हा दहावीचा निकाल लागतो व तेंव्हा अचानक पुढे काय करावं हा प्रश्न आ वासून असतो.कोणी म्हणत सायन्स घ्या कोणी म्हणत आर्ट घ्या,कोणी म्हणत कॉमर्स घ्या पण आपल्याल कोणत्या क्षेत्रात जावं हेच कळत नसत त्याप्रमाणे माझी ही तीच अवस्था झालेली.त्यावेळी आमचं अहमदपूरच राज्यात नावाजलेल कॉलेज म्हणजे महात्मा गांधी कॉलेज प्रत्येकाला तेथे प्रवेश घेण्याची इच्छा असायची त्याप्रमाणे माझी ही इच्छा होती पण कोणती शाखा घ्यायची हे ठरलं नव्हतं.आईला वाटायचं सायन्स घेऊन मेडिकल किंव्हा इंजिनियर व्हावं पण सायन्स म्हटलं की इंग्रजी गणिताची भीती मला खूप होती त्यात मला 62% मार्क त्यावेळी जर महात्मा गांधी कॉलेजला सायन्स प्रवेश हवा असेल तर 80% च्या वर मार्क लागायचे त्यामुळे माझा सुंठी वाचुन खोकला गेला असं झालं.मला आर्ट करायचं होत व त्याप्रमाणे खेळाच्या कोठ्यातून मला आर्टला ऍडमिशन भेटलं व एक फायनल झालं की आपण आता डॉक्टर इनिजनियर होऊ शकणार नाहीत,माझी आई नाराज झाली कारण तिला नेहमी वाटायचं मी डॉक्टर किंव्हा इंजिनियर व्हावं. पण तिने सांगितलं आर्ट्स मध्ये चांगला अभ्यास करून कांही तरी हो.मराठवड्यात व आमच्या भागात एकच ध्येय आर्टस् घेतलं की बारावी नंतर एकच ध्येय डीएड प्रवेश, लवकर शिक्षण व लवकर नोकरी हेच ध्येय.पण मला कधीही वाटलं नाही की आपण पण डीएड करावं व त्या प्रमाणे अभ्यास करावा. जसे जमेल त्या पद्धतीने बारावीचा अभ्यास केला व बारावीला 71% गुण मिळाले. त्यावेळी इतर मित्र ded चा अर्ज करायचे त्या प्रमाणे मित्रांसोबत फार्म भरला पण खुल्या गटात 73% पर्यन्त मेरिट लागले व इथेही माझा नंबर डीएड ला लागला नाही.मग जास्त विचार करत नाही बसलो मग ठरवलं आता BA करायचं व शिकत राहायचं त्या प्रमाणे महात्मा गांधी कॉलेजला ऍडमिशन घेतलो व आपल्या पद्धतीने शिक्षण सुरु ठेवलं.2003 साली प्रथमवर्ष पास झालो ,2004 ला द्वितीय वर्षात प्रवेश घेतला व अचानक द्वितीय वर्षाच्या मध्यात असताना शासनाने नवीन नियम काढला की डीएड साठी कांही सीट संस्था चालकाच्या कोट्यातून भरल्या जाव्यात त्याप्रमाणे मग प्रत्येकाची धावपळ ded कडे जाण्याची सुरु झाली मग माझ्या घरच्यांची पण इच्छा होती की ह्याने डीएड कराव पण मला मार्क कमी असल्याने पहिल्या वेळी संधी हुकली होती पण या नवीन नियमामुळे संधी फिरून आली होती.माझे मोठे बंधू प्रा.श्री अशोकराव जाधव यांनी मला समजवल व त्यांनी मॅनेजमेंट कोट्यातून शिरूर ताज येथे मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयात माझे  ऍडमिशन केले व आता पक्क ठरलं की मी गुरुजी होणार म्हणून.
2003 च्या डिसेंम्बर महिन्यात शिरूर ताजबंद येथे ऍडमिशन घेतले व सुरु झाली गुरुजी होण्याची ट्रेनिंग मग काय सेतुपाठ,पाठ,प्रक्टिकल असे करत करत दोन वर्षे कधी संपले कळले नाही.ज्यावेळी डीएड ला ऍडमिशन खूप कठीण प्रसंगातून व स्पर्धेतून झाले होते व आता खूप दडपण होते की आता जर अभ्यास नाही केला व मार्क कमी मिळाले तर शासकीय सेवेत काम करता येणार नाही व घरच्यांनी ,बंधूनी ज्या स्थितीत डीएड ला नंबर लावला त्यांना काय उत्तर द्यायचे या धास्तीने अभ्यास केला व 2005 ला परीक्षा देऊन मार्च 2006 साली 69% मार्क घेऊन डीएड उत्तीर्ण झालो.पण प्रश्न होता पुढे काय करायचे कारण एवढ्या मार्कला नोकरी लागते की नाही याचा पण भरोसा नव्हता.नशीब त्या वर्षी राज्यात जवळपास 12000 ते 15000 हजार शिक्षकांची भरती निघाली व त्यामध्ये लगेच अर्ज केला पण कुठला कॉल येईल का नाही याची पण खात्री नव्हती.माझे जे मित्र जास्त गुणवाले होते त्या एका एकाला दहा दहा जिल्ह्याचे कॉल येऊ लागले तसा माझा जीव खाली वरी होऊ लागला व वाटू लागलं एक तरी आपल्याला कॉल आला पाहिजे व गम्मत काय एक दिवस मला पण कॉल आला तो होता जळगाव जिल्हा परिषदेचा त्या नंतर दोन दिवसांनी रायगड जिल्हा परिषदेचे कॉल लेटर आले. प्रश्न असा होता की दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे 3 मे 2006 ला मुलाखत मग एकाच ठिकाणी जायचं असा नियम होता.जळगाव व रायगड मध्ये निवड करायला मी जास्त वेळ घेतला नाही कारण एक तर रायगड स्वराज्याची राजधानी त्यावर कोकण म्हणजे निसर्ग सौन्दर्याची खाण मग अशा जिल्ह्यात जर नोकरीची संधी मिळाली तर आपलं किती भाग्य ह्या हेतूने पटकन रायगड ची निवड केली व 3 मे च्या मुलाखतीला जायचं ठरवलं.2 तारखेला अलिबागला पोहचलो जिल्हा परिषदेत चौकशी केली तर तेथे समजल 220 जागा रिक्त आहेत व माझा मुलाखत नंबर होता 719.आता म्हटलं आपल्याला कांही नोकरी भेटत नाही तेंव्हा मुलाखत द्यायची न आपला घरचा रस्ता पकडायचा.ठरल्या प्रमाणे 3 मे ला मुलाखत दिली व त्यानंतर अलिबाग बीच फिरून आलो व आता गावी निघावं या तयारीत असताना जिल्हा परिषद मधून निरोप आला की आज ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांची सर्वांची निवड झाली आहे व रात्री उशिरा नियुक्ती पत्र मिळून जातील हे जेंव्हा कानावर शब्द पडले तेंव्हा आनंदाला सीमा राहिली नाही लगेच गावी आईला, भावाला,मित्रांना फोन करून सांगितलं मला रायगडला नोकरी भेटली. रायगड मध्ये 216 जागा व आपला 919 नंबर मग कशी नोकरी मिळेल याच विचारात होतो पण झालं असं की 3 मे ला राज्यात एकाच दिवशी मुलाखती असल्याने प्रत्येक जण एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकत होता त्यामुळे रायगडला खूप कमी उमेदवार आल्याने मला नोकरी भेटली होती. त्या दिवशी रात्री 12 च्या पुढे आम्हला सर्वांना नियुक्ती आदेश देण्यात आले त्यात माझा नंबर आला ,माझा हातात नोकरीची पहिली ऑर्डर हातात पडली. ती ऑर्डर पाहिली त्यात तालुका व शाळा लिहली होती रोहा तालुक्यातील पाले खु आदिवासीवाडी ही शाळा मला भेटली होती.रात्रीचे 1 वाजले होते सोबत असलेले बरेच मित्र आपल्याला भेटलेल्या तालुक्यात उद्या जायचं शाळा पाहायची अशी आखणी करत होते पण मी मात्र आता नोकरी भेटली पहिलं आपलं घर गाठायचं व जो तालुका व शाळा भेटली त्या ठिकाणी 12 जून ला जायचं अस ठरवलं व मनमुराद आनंदात अलिबाग वरून लातुर अहमदपूर रोकडा सावरगाव असा परतीचा प्रवास सुरु केला होता व सतत डोक्यात एकच विचार होता की ,'मी गुरुजी झालो, मी गुरुजी झालो'.......

शनिवार, २८ मार्च, २०२०

व्यक्तिरेखा- माझी आजी....

माझी आजी कै.काशीबाई यशवंतराव जाधव
                 आजी-आजोबा म्हटलं प्रत्येकला आपलं बालपण आठवत व त्या बालपणात सर्वात जास्त लाड कोण करत असेल तर ते आजी आजोबा करतात. प्रत्येकाला यांचा सहवास लाभतोच असा नाही पण ज्यांना लाभतो त्यांना त्या बालपणाच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहतात.माझी म्हणण्यापेक्षा आमची आजी ही घरातील सर्वात मोठी व्यक्ती कारण माझे वडील सहा महिन्याचे असताना आजोबांचे निधन झाले व पुढील 60 वर्षाच्या हयातिच्या काळात आजी ह्या सर्व कुटुंबाच्या सोबत राहिल्या.4 मुलं 4 सुना ,1 मुलगी-जावई व एकूण 17 नातवंड हा आजीचा परिवार व त्या परिवारातील सर्वात शेवटचा सदस्य म्हणजे मी. माझ्या वयाच्या 22 व्या वर्षा पर्यन्त आजीचा सहवास लाभला व आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले पण आजीने केलेलं संस्कार,शिकवण आजही आचरणात आहे. ऐन तारुण्यात पतीचे निधन सोबत 5 मुलं त्यात अत्यंत गरीब परिस्थिती याचा सामना करत आजीने आमचं कुटुंब कस घडवलं त्या आजीच्या संघर्षमय जीवनावर लिहण्याचा विचार केला व घरातील सर्वात लहानगा नातू या नजरेतून आजीचे जीवनपट मांडण्याचा प्रयत्न करत आहे....
आजीचं नाव काशीबाई, अहमदपूर तालुक्यतील सोरा गावातील श्री कृष्णाजी व अंजनाबाई यांच्या त्या कन्या.तीन भाऊ व दोघी बहिणी असे पाच भावंड, हरीराम,पांडुरंग,विठ्ठल,काशीबाई व प्रयागबाई असे भावंडाचे नावे. काशीबाईचा विवाह अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील श्री एकनाथराव जाधव यांचा मुलगा श्री यशवंतराव जाधव यांच्याशी 1925 ते 30 च्या दरम्यान साली झाला. आजोबांच्या घरची परिस्थिती बेताची थोडीफार शेती व त्याच्यवर कुटुंबाची गुजराण चालायची.त्यात मराठवाडा म्हणजे दुष्काळ पाचवीला पुंजलेला कधी कोरडा तर कधी ओला त्यात निजाम राजवट 1948 पर्यन्त आमचं गाव हैद्राबाद संस्थानात होत त्यामुळे ब्रिटिश सरकारचा कांही सम्पर्क तेथे आला नाही. अशा परिस्थितीत आजी आजोबांचा संसार सुरु होता त्यात कमी जास्ती आजींना माहेरचा खूप आधार होता.जसे वर्ष लोटत गेले तसे कुटुंब पण वाढत गेले 4 मुलं व 1 मुलगी घरात आले. सर्वात मोठे श्री नानासाहेब दोन नंबर श्री प्रल्हादराव,तीन नंबर सुंदरबाई,चार नंबर उद्धवराव व पाचवं अपत्य म्हणजे माझे वडील श्री पुंडलिकराव असा आजी आजोबांचा 7 सदस्य असलेले कुटुंब होते. पण माझे वडील सहा महिन्यांचे असताना आजोबांचे अकाली निधन झाले व आजीच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, 5 मुलं व समोर दिसणाऱ्या अनेक अडचणी यामुळे आजी खचुन गेली अशा अवस्थेत समोर अनेक प्रश्न,अडचणी यांचा सामना कसा करावा हा आजीपुढे मोठा प्रश्न होता.पण त्यावेळी आजीच्या मदतीला धावून आले ते माहेरचे माणसं वडील,भाऊ खम्बीरपणे आजींच्या पाठीमागे उभे राहिले व पुढील कठीण प्रसंगात आजीला साथ दिली.
त्या वेळी मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा जोर धरला होता व रज्जाकार ने मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार सुरु केला होता तेंव्हा खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अशा वेळी आपल्या 5 मुलांना एकत्र ठेऊन आजीला एकटीला संसाराचा गाडा हाकने अवघड होते म्हणून तिने आपले दोन मोठे मुले श्री नानासाहेब व प्रल्हादराव यांना आपल्या वडिलांकडे राहायला पाठवले व सोबत एक मुलगी व दोन छोटे मुले राहू लागले. अशा कठीण परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाची पण खूप मारामार होती अशावेळी आजीचे भाऊ श्री पांडुरंग मामा यांनी आपल्या भाच्यासाठी व बहिणीसाठी जीवाचे रान केले.सर्व धान्य ,तेल,कडधान्य ते सोरा या गावावरून बहिणीला बैलगाडी ने पुरवत व जे दोन मोठे भाचे होते त्यांचा सांभाळ पण आपल्या पोराप्रमाणे करत. दिवस जसे जात होते तसे मुलं मोठे होत होते त्यातील छोटे दोघे गावातील शाळेत जाऊ लागले श्री उध्ववराव व पुंडलिकराव यांनी गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरवात केली व मोठे दोघे मामाकडे राहून मामांना शेतीच्या कामात मदत करू लागले. कांही दिवसानी उपवर झाल्यास श्री नानासाहेब व प्रल्हादराव यांचे दोनाचे चार हात मामांनी करून दिले त्यात थोरले नानासाहेब यांना धानोरा येथील शिंदे घराण्यातील कांता यांच्याशी व प्रल्हादरावला मामाची मुलगी मथुरा यांच्याशी विवाह लावून दिला. लग्नानंतर दोघे मोठे भाऊ आपल्या गावी म्हणजे सावरगावला परत आले तेंव्हा राहायला खूप छोटं घर होत त्यात एवढं मोठं कुटुंब राहणे शक्य नव्हतं तेव्हा विठ्ठल मामांनी पुन्हा स्वतःच्या पैशातून नवीन जागा खरेदी केली तेथे राहण्याची व्यवस्था केली व आपल्या बहिणीचा व भाच्याला मदत म्हणून त्यावेळी बैलजोडी विकत घेऊन दिली व त्यांचा गाडा सुरळीत करून दिला. त्या दरम्यान एकुलती एक बहीण सुंदरबाईचा विवाह बोरगाव येथील विश्वनाथ भदाडे यांच्याशी मामांनी लावून दिला.त्यात जे छोटे दोघे होते उद्धवराव व पुंडलीकराव हे 4 थी पर्यन्त गावच्या शाळेत शिकले व नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे गुराखी म्हणून गावात सालगडी राहिले व आपल्या दोन मोठ्या भावांना शेती कामात मदत करू लागले. पण उद्धवराव यांच शेतीत मन रमत नव्हतं त्यांना काही तरी वेगळं करण्याची धडपड सतत असायची सलग 6 ते 8 वर्ष दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून नोकरी करून ते कंटाळले होते व एक दिवस पळून गेले ते थेट पोहचले लातुर येथील सैन्य भरती ठिकाणावर व आपल्यात असलेल्या जिद्दीच्या बळावर ते सैन्यात भरती झाले पण हे घरच्यांना कोणाला माहित नव्हते इकडे आजी व सर्व कुटुंब काळजीत पडलं नेमकं काय झालं उद्धवराव गेले कुठे ,आजीच काळीज तर आईच पण त्यावेळी कुठलेच सम्पर्काची सुविधा नव्हती अशावेळी तब्बल तीन महिन्यांनी उद्धवरावचे पत्र आले व तेंव्हा समजल की उद्धवराव सुखरूप आहेत व सैन्यात भरती झाले आहेत.आजीला खूप आनंद झाला कारण कठीण परिस्थितीत लोकांच्या घरी सालगडी म्हणून काम केल्यानंतर आपला मुलगा भारतीय सैन्यात भरती आला हि खूप सुखद घटना होती.हा काळ होता 1962 चा. त्यानंतर आपला मोठा भाऊ सैन्यात गेला म्हणून छोट्या पुंडलिकरावनां(माझे वडील) पण उत्साह वाढला व आपण पण आपल्या भावाप्रमाणे देशसेवा करायची व नोकरी करायची अस वाटू लागलं 2 वर्ष सालगडी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी  1965 च्या सैन्य भरतीत गेले पण तेथे यश आले नाही पण हताश न होता प्रयत्न सुरु केले.त्या दरम्यान जालना येथे वडिलांचे सख्खे चुलत भाऊ श्री विठ्ठलराव जाधव हे जालना येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते तेंव्हा गावातील अनेकांना समजल की जालना येथे भरती आहे तेंव्हा वडील भरतीला गेले व 1966 साली SRP मध्ये भरती झाले.
आपला एक मुलगा सैन्यात व एक मुलगा पोलीस खात्यात नोकरीला लागला हे पाहून आजीला आपण केलेल्या संघर्षाचे सार्थक झाले असे वाटले. दरम्यान मोठे दोघे भाऊ शेती करू लागले व त्यांना या दोन नोकरदार भावाचा आधार मिळाला व चांगल्या प्रकारे आजीचे कुटुंब चालू लागले त्यात सैन्यात असलेले श्री उद्धवराव यांचा विवाह 1967 साली घनसरगाव ता रेणापूर येथील शिंदे कुटुंबातील शांता यांच्याशी झाला व पोलीस खात्यात असणारे श्री पुंडलिकराव यांचा विवाह 1971 साली आरजखेड ता.रेणापूर येथील सूर्यवंशी कुटुंबातील सुमन यांच्याशी झाला.आजीचे  मुलं आपापल्या सांसारत लागले होते दोघे शेतीत रमले होते,सैन्य दलातील सम्पूर्ण देशभर आपलं कर्तव्य बजावत होते तर SRP मधील जालना येथे राहत होते.आजींना आता लेका सुनांच्या हातात कुटुंबाची जबाबदारी देऊन नातवंडात दिवस घालवायचे होते. बघता बघता आजीचा वटवृक्ष फुलत होता मोठ्या मुलाला 4 मुलगे झाली दुसऱ्याला 1 मुलगा 3 मुली,मुलगी सुंदरबाई ला 3 मुलगे,तिसरा मुलाला 2 मुलगे 1 मुलगी व चौथ्याला 2 मुली व 1 मुलगा. या 17 नातवंडात सर्वात लहान मी होतो त्यामुळे आपसूकच घरात मीच लाडाचा होतो.पण आजीचा जीव सर्व नातवंडावर सारखाच होता. आमच्या आजीचा स्वभाव म्हणजे खूप करारी बाणा होता त्या सतत आपल्या मतावर ठाम राहायच्या त्यांना कोणाच्या अधिपत्याखाली राहायला कधीच आवडत नव्हतं,स्वाभिमानी होत्या कारण त्यांनी खूप सोसल होत जीवनात अनेक चढ उतार पाहिले होते.पडत्या काळात  वेळोवेळी त्यांना त्यांच्या भावांनी जी साथ दिली ते नेहमी त्याचा उल्लेख करत असत. आम्ही सर्व नातू शिकून मोठे व्हावेत असे आजींना नेहमी वाटायचे व त्या प्रमाणे सर्व नातवांनी चांगले शिक्षण घेतले हि व आज त्यातील कोणी प्राध्यापक,शिक्षक,सैन्यात,क्लर्क,खाजगी आस्थापणेत कार्यरत आहेत.पण आज एक खंत वाटते आमच्या भावंडातील 8 मुलगे व 6 मुली सर्वानी शिक्षण घेतलं पण सामाजिक बंधने व मुलगी शिकून काय करणार या विचाराने माझ्या 6 बहिणी हुशार असून ही त्यांना दहावीच्या पुढे शिकता आलं नाही ,मुलगी 10 वी झाली की तिच्या लग्नाचा विचार केला जायचा पण आज वाटतंय जर घरच्यांनी मुलींना शिकण्याची परवानगी दिली असती तर आज माझ्या बहिणी चांगल्या पदावर असत्या.
आजींना नातवांचं खूप कौतुक वाटायचं माझे नातू नोकरदार आहेत असे ती अभिमानाने सांगायची.जेंव्हा मला 2006 ला रायगड जिल्ह्यात नोकरी लागली तेंव्हा तर आजी खूप रडली कारण सर्वात छोटा नातू नोकरीसाठी घरापासून एवढा लांब जाणार हे तिला वेगळं वाटायचं ,पण जेंव्हा जेंव्हा मी सुट्टीला यायचो तेंव्हा तिला खूप आनंद व्हायचा.जसा तीचा नातवावर जीव होता तसाच नातंसुना नातंजावयावर पण होता.सगळ्यांना आजी म्हणजे आधार वाटायच्या.पण जस जस वय वाढत गेले तशी आजीची तब्यत खालावत गेली व आजींचे निधन 2008 साली झाले. आजी जरी आम्हाला सोडून गेली असली तरी तिचे संस्कार ,शिकवण आजही कामी येतात.आज आजींची पणतूं मंडळी शिक्षण घेत आहेत घरातल्या मुलींना शिक्षणाचे दारे खुले झाले आहेत घरच्या मुली आता इंजिनियर,डॉक्टर ,उच्च शिक्षण घेत आहेत,घरात 3 डॉक्टर होत आहेत,अभियंते होत आहेत,वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.आज आजींचे वटवृक्ष बहरत आहे आज आजीचे कुटुंब 60 ते 70 सदस्यांचे झाले आहे.आज कुटुंबातील सदस्यांना  अभिमानाने सांगावे वाटते की आम्ही काशीबाई आजींचे नातू,पणतूं आहोत. आज माझे मोठे काकानीं जवळपास वयाची 85 गाठली आहे व वडिल त्र्याहत्तरच्या घरात आहेत आज जेंव्हा  सर्व काकांशी वडिलांशी जेव्हा त्यांच्या बालपणा बद्दल विचारतो तर ते खूप आत्मयतेने सांगतात की आमच्या पडत्या काळात आम्हाला सोऱ्याच्या विठ्ठलमामा,हरीराममामा,पांडुरंगमामा यांनी खूप मदत केली व त्यांचे उपकार आम्ही नाही विसरू शकत. आम्ही जे कष्ट केले व तुम्हा मुलांना शिकवलं ,मोठं केलं या परिस्थितीची जान ठेऊन तुम्ही सर्वानी राहील पाहिजे असा सल्ला नेहमी देत असतात.
आजच्या या टप्प्यावर आजी आमच्या सोबत नाही पण आजींने जे संस्काराचे मोती आपल्या मुलांमार्फत आमच्या नातवंडात व पुढच्या पिढीला दिले आहेत हे कायम आमच्या आचरणात असतील.......
✍️...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
09923313777

रविवार, २२ मार्च, २०२०

सद्रक्षणाय_खलनिग्रहणाय.... संकल्प_निरोगी_महाराष्ट्राचा...

लढा कोरोना विषाणूशी
कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तायडे साहेब व त्यांची टीम यशस्वी जनता कर्फ्यू पार पडताना
सद्रक्षणाय_खलनिग्रहणाय....
संकल्प_निरोगी_महाराष्ट्राचा...
हे दोन्ही घोषवाक्य ज्या विभागाचे आहेत ते विभाग आजच्या घडीला महाराष्ट्राच्या जनतेला खूप आधार देणारे आहेत,निमीत्त कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाचा राज्यातील फैलावाचा. चीन सारख्या विशाल देशातून हा घातक विषाणू आज जगभरात पसरून लाखो जणांना बाधित करून हजारो जणांचे प्राण या विषाणूने घेतले आहेत.आज चीन,इटली,अमेरिका,जर्मनी,जपान अशा प्रगत राष्ट्रांनी या विषाणू पुढे गुडघे टेकले आहेत.  भारतात गेल्या आठवडा दोन आठवड्या पासून कोरोनाने प्रवेश केला आहे, आज देशात सर्वात जास्त कोरोना बाधीत आपल्या राज्यात आहेत त्यामुळे अधिक सतर्कतेची आपल्याला गरज आहे."पुढच्याला ठेच मागचा शहाणा" या प्रमाणे आपल्या राज्याच्या ,देशाच्या प्रशासनाने सावध व कडक पावले उचलली आहेत.जगात इतर प्रगत राष्ट्रांनी कोरोना बाबत जी हयगय केली त्यातून त्यांना कोरोना च्या 3ऱ्या 4थ्या टप्प्यात कसा फटका पडला हे आपण पाहत आहोत. आपला महाराष्ट्र सध्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहे त्यामुळे अधिक सावधगिरी बळगली पाहिजे त्या दृष्टीने राज्य प्रशासन पूर्ण तयारीत आहे त्याचाच भाग म्हणून आजच्या स्थितीत राज्यात सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी रविवारी जनता कर्फ्यु चे आहवान केले व त्यांच्या आहवानाल साद देत देशात व राज्यात आज कडेकोट बंद पाळण्यात आला.यात महत्वाची भूमिका राहिली ती पोलीस कर्मचाऱ्यांची,जरी आहवान केले असले तरी त्याची अमलबजावणी पोलीस खात्याशिवाय होणे कठीण असते.पण यावेळी अतिशय प्रेमाने,संयमाने पोलीस खात्याने जनतेच्या सहकार्याने 100% जनता कर्फ्यु यशस्वी करून दाखवला.
आपल्या कुटुंबा पासून दूर राहत आपल्या सर्वांच्या कुटुंबाच्या काळजीसाठी व कोरोना पासून बचाव करण्यासाठी जी पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे ते पाहून त्यांच्या कार्याला सलाम करावा वाटतो.काल पासून कोलाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक श्री तायडे साहेब व त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेऊन प्रत्येक व्यापारी,छोटे मोठे दुकानदार,ग्रामस्थ यांना प्रेमाने समजावत जो कोलाड नाका मुंबई गोवा महामार्गावर आहे व सतत लोकांची रेलचेल असलेले ठिकाण 100% यशस्वी बंद करून दाखवले त्यांना जनतेने ही मोलाची साथ दिली,असे चित्र संपूर्ण राज्यात आज पाहायला मिळाले.
त्याच प्रमाणे राज्यातील आरोग्य विभाग जीवाचे रान करत प्रत्येक कोरोना ग्रस्तांची , संशयितांची सेवा करत आहेत ,ध्येय एकच की महाराष्ट्रात कोरोनोचा प्रसार थांबला पाहिजे. आज राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच सर्व प्रशासन आपल्यासाठी जीवाचे रान करत आहेत तर आपली ही जबाबदारी आहे की आपलं रक्षण आपणच केलं पाहिजे व कोरोनो ला आपल्या पासून दूर ठेवले पाहिजे. सध्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आहे व हा गुणकाराचा टप्पा मानला जातो, इटलीत तर तिसऱ्या टप्प्याने थैमान घातला आहे त्यामुळे आपण येणारे 15 दिवस स्वतःला कोरोनो पासून रोखण्यासाठी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे असे वाटते.
वेळ गेल्यास डोक्यावर हात मारून घेण्यापेक्षा वेळवर डोकं चालवल तर आपण कोरोना पासून निश्चित बचाव करू शकतो हे मात्र नक्की.....

मुंबई गोवा महामार्ग 100%बंद

कोलाड बाजारपेठ 100%बंद

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...