नाशिकमध्ये नर्सरी मधील साडेतीन वर्षाच्या मुलाने ऑनलाईन अभ्यास केला नाही म्हणून आईन त्याची गळा दाबून हत्या केली व नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अशी बातमी आज एका वृत्तवाहिनीवर पाहिली. ही बातमी पाहून प्रत्येकाला त्या महिले बद्दल प्रचंड चीड निर्माण झाली असेल किंव्हा त्या तीन वर्षांच्या मुलाबद्दल हळहळ व्यक्त झाली असेल पण आज प्रत्येकांच्या घरी थोड्या जास्त प्रमाणात ऑनलाईन शिक्षण,स्पर्धात्मकता,गुणांच्या रस्सीखेच स्पर्धेत मुलांना फक्त मार्क कमावण्याची मशिन ह्या नजरेतून पाहिलं जातं आहे हे कटू सत्य आहे.अस वाटायला लागलंय की मुलं शाळेत जातात व परीक्षा पालकांची आहे त्यामुळे पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांना साधन म्हणून वापरलं जातं आहे ,त्या मुलांच्या मनाचा कोणी विचारही करत नाही.कोव्हीड काळामुळे तर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांना रोबट बनवलं जात आहे तीन वर्षांच्या मुलांच्या हातात ज्या वयात खेळणी द्यायची त्या वयात त्यांना टॅब,मोबाईल थोपवल जात आहे.तासंनतास डोळ्यासमोर स्क्रीन पाहून मुलांचे बालपण हरवत चालले आहे. नर्सरी पासून जसा जसा वरचा वर्ग वाढत जाईल तसा ऑनलाईन क्लासचा वेळ जास्त वाढतो. सततच्या मोबाईल वापरामुळे 6 ते 14 वयोगटातील मुलं खूप वैतागली आहेत पण नामांकित शाळा,पालकांचा दबाव व ऑनलाईन शिक्षणाचा अट्टहासापायी मुलांना गुपचुप सहन कराव लागत आहे.बऱ्याचवेळी ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या 6 ते 14 वयोगटातील अनेक मुलांशी मी चर्चा केली त्यावेळी त्यांनाही हे ऑनलाईन शिक्षणाचा अतिडोस नको वाटू लागला आहे, सतत 6 ते 8 तास मोबाईल,टॅब,संगणकावर बसून मणक्याच्या त्रास,डोळ्याचा त्रास,डोक्याचा त्रास हे बालमने गुपचुप सहन करत आहेत.सांगायचं तर कोणाला आई वडिलांना सांगावं तर ते आगोदरच आपल्या मुलांकडून उच्च अपेक्षा ठेऊन बसले आहेत,शाळेत सांगावं तर कोणाला सांगावे त्यामुळं हे बालमने कोमेजून जात आहेत. पण ह्याच आज कोणालाच कांही पडलं नाही, प्रत्येकाला आपला मुलगा टॉपर व्हावा ,सगळ्यात अव्वल यावा अस वाटत आहे पण त्या मुलाला काय वाटत ह्याचा किती पालक विचार करतात हे महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो मुलं समजून घेताना- मुलं समजून घेताना म्हणजे काय? आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला समजून घेण्याची वेळ आली आहे,त्याला काय वाटतय ,त्याला काय हवंय,त्याच्या मनात काय विचार चालले आहेत,आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दल त्याच मत काय ह्या गोष्टी जो पर्यंत पालक मंडळी मित्र होऊन मुलांसोबत मोकळ्यात चर्चा करत नाहीत तो पर्यंत मुलं समजून घेता येत नाही.
त्यातच भर आज दुसरी एक बातमी पाहिली नवी मुंबई मध्ये आईच्या अभ्यासाच्या तगद्याला वैतागून 15 वर्षाच्या मुलीने आईचा पट्ट्याने गळा आवळून खून केला. अशा घटना जेंव्हा कानावर येतात तेव्हा अस वाटत की मुलांवर व पालकांवर अशी हिंस्र वागण्याची वेळ का येत आहे? पोटच्या पोराला जन्म दिलेली आई व जिच्या पोटातून जन्म घेतली ती मुलगी आज एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत आले आहेत ते का? असे अनेक प्रश्न मन अस्वस्थ करून सोडत आहेत.जगाच्या पाठीमागे धावत धावत,अपेक्षांचे ओझे वाहत वाहत ,मुलांकडून आपले स्वप्न पाहत पाहत आज आपला प्रवास कोणत्या दिशेला जात आहे ते समजत नाही.
शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आता वेळ आली आहे, फक्त नोकरी मिळवणे,पैसा कमावणे ह्यसाठी शिक्षण नसून मूल्यशिक्षण, जीवनशिक्षण ह्या विचारातून शिक्षणाकडे पाहणे गरजेचे आहे. जसे हाताचे पाच बोटे सारखे नसतात तसेच प्रत्येक मूलं सारखे नसते,प्रत्येकात कांही तरी खास असते त्याच्यात लपलेले अंगभूत गुणांना वाव देऊन त्याला त्या क्षेत्रात करिअर करायची संधी पालकांनी दिली पाहिजे.मुलांना बालपण उपभोगु द्या त्यांना मैदानी खेळ खेळू द्या,मुलांना फुलासारखे फुलं द्या,त्याला फुलपाखरासारखं बागडू द्या. पालकांना जरी वाटत असेल शाळा बंद आहेत त्यामुळं शिक्षण ही बंद आहे व ऑनलाईन शिक्षण हा एकच पर्याय आहे तर तो समज दूर करा कारण चार भिंतीच्या पलीकडेही शिक्षण सुरूच असते, घरी,परिसरात,मैदानावर,मित्रात,कुटुंबात मुलं शिकतच असतो.कोव्हीडचा काळ जसा मुलांना,पालकांना कठीण आहे तसा शिक्षकांनाही कठीण आहे,मुलांची व आमची ताटातूट स्वस्थ बसू देत नाही पण सद्या संयम राखल्या शिवाय दुसरा पर्याय नाही,येणाऱ्या काळात मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान आपण भरून काढू पण सध्या त्याच्या मनाला आपण सांभाळणे खूप गरजेचे आहे,ह्या कठीण काळात लहान मुलांना आपण समजून घेतले तर पुढचा काळ आपलाच आहे. त्यामुळं मुलांना मुलांप्रमाणे जगू द्या असं मनातून वाटतंय.
✍🏻
श्री गजानन पुंडलिकराव जाधव
(शिक्षक/पालक)
9923313777