रविवार, ११ डिसेंबर, २०२२

माझी आई

 

                     आज 12 डिसेंबर,आज 12 वर्ष झाले माझ्या आईला जाऊन. ह्या 12 वर्षातील एकही दिवस गेला नाही की त्यादिवशी आईची आठवण आली नाही.ह्या 12 वर्षात खूप प्रयत्न केला आईबद्दल लिहावं पण कधी हिम्मत झाली नाही.नेहमी वाटायचं आईबद्दल लिहावं,नुसता लिहायचा विचार जरी आला तरी हात थरथरायचे व  आठवणीने मन भरून यायचे मग लिहायचे टाळायचो. माझ्या आईचे कर्तृत्व लेखणीत समावणारे निश्चित नाही पण माझ्या मनात गेले अनेक वर्ष आई बद्दलच्या साठून राहिलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी लेखणी हाच आधार आहे. मला माहित नाही  आई बद्दल लिहताना ते पूर्ण करू शकेल की नाही पण खूप धाडसाने माझ्या आईबद्दल लिहण्याचा निर्णय आज घेतला आहे. सुरवात करतानाच मन भरून आलंय पण माझी आई मला प्रत्येक अक्षरात प्रत्येक शब्दात दिसत आहे.आईचा जीवन प्रवास थोडक्यात मांडत आहे.

                         माझ्या आईच नाव सुमन पण आईच्या माहेरी तीच नाव होतं मथुरा. वडील दादाराव सूर्यवंशी व आई कृष्णाबाई यांचे 6 वे अपत्य म्हणजे माझी आई. सर्वात मोठे मामा व त्यानंतर 7 बहिणी असे 8 भावंडाचे कुटुंब होते.आजोबाची थोडी शेती होती ती करत करत बिकट परिस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवायचे.सर्वात मोठे मामा होते त्यांनी शिक्षण पूर्ण करताच लातूरला अडत दुकानावर नोकरी धरली आणि आपल्या 7 बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. सर्व बहिणी प्रमाणे आईही शाळेत जाऊ लागली.1960-65 च्या काळी त्यावेळी गावात 7वी पर्यंत शाळा होती.आईला शाळेची खूप आवड होती म्हणून तर आईने सर्व बहिणीपेक्षा जास्त शिक्षण घेतलं व गावातच सातवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केले.सातवी नंतर गावात शाळा नसल्याने व घरची परिस्थिती बेताची असल्याने नाविलाजने आईला शिक्षण थांबवावे लागले व लग्नाचा विषय सुरू झाला. 1971 साली दादांचे (माझ्या वडिलांचे)स्थळ आले.त्यावेळी दादा राज्य राखीव पोलीस दलात होते. सरकारी नोकरी म्हटलं की खूप मोठी बाब होती.1966 साली दादा SRP मध्ये भरती झाले व जालना बटालियन मध्ये कार्यरत होते.आई दादांचे लग्न 1971 साली झाले व आमचं कुटुंब जालन्यात स्थायिक झाले.इथून पुढल्या काळात आईने जी जबादारी उचलली ती शेवटच्या श्वासा पर्यंत निभावली.

                      दादांची नोकरी म्हणजे राज्य राखीव पोलीस दलातील.Srp चे कॅम्प ज्या वेळी लागायचे त्या वेळी चार-चार महिने तर कधी वर्ष-वर्ष कुटुंबाला सोडून राहावं लागायचं.अशात घरची जबादारी आई खंबीर व हिंमतीने पार पाडायची.मोठ्या बहिणीचा जन्म 1974 चा व छोट्या बहिणीचा जन्म 1977 चा  दोन मुलींना घेऊन आई SRP कोर्टरला राहायची. मुलींचे दवाखाने, शिक्षण त्यांचा अभ्यास, घरच्या छोट्या मोठ्या जबादाऱ्या आई समर्थपणे पार पडायची. दादांना आपल्या कर्तव्यातून कुटुंबाला द्यायला खूप कमी वेळ मिळायचा पण आईने त्याची जाणीव कधीही होऊ दिली नाही.आईचा स्वभाव शांत व संयमी होता आणि व्यवहारज्ञान ही खूप चांगलं होत.1971 ते 1983 चा काळ आमच्या कुटुंबाचा जालन्यात गेला. लातूर जिल्ह्याची निर्मिती नंतर 1983 साली दादांची बदली लातूर पोलीस मध्ये झाली आणि आमचं कुटुंब गावी रोकडा सावरगावला स्थायिक झाले. जरी आमचं कुटुंब सावरगावला स्थायिक झालं असले तरी दादा मात्र नोकरी निमित्ताने निलंगा,उदगीर,लातूर,चाकूर येथे राहू लागले व आठवड्यातून जसे जमेल तसे गावी येऊ लागले.1985 साली माझा जन्म झाला व  आईवर आणखी एका अपत्याची जबाबदारी वाढली. माझ्या दोन्ही बहिणी गावातल्या शाळेत शिक्षण घेऊ लागल्या व माझंही बालपण आईच्या संस्कारात गावात जाऊ लागलं. घरातील कामे,मुलांचे शिक्षण,शेतीकडे लक्ष,नातेवाईकांच्या सुखदुःखात सहभाग अशा जबाबदाऱ्या आईने समर्थपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे आमच्या कुटुंबात तीन चुलते व तीन चुलत्या यांच्यात सर्वात जास्त आईचे शिक्षण झालेले होते त्यामुळे कुटुंबात आईचा विचार सल्ला ही महत्वाचा असायचा. सर्वांना सांभाळून घेणारी आई व शांत स्वभावामुळे सर्व पुतण्याची आवडती होती. सर्व जण आईला आबई नावाने बोलायचे.दादा पोलीसमध्ये असल्याने घरच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आईवर येऊन ठेपायच्या. दळण,पाणी, किराणा,भाजीपाला,दवाखाना,मुलांचा अभ्यास,शेतीकडे लक्ष,त्याचा हिशेब ठेवणे एवढेच नाही तर शेगडीचे कॉईल बसवणे असो की लाईटचे छोटे मोठे काम असो कोणावर विसंबून न राहता आई स्वतः करायची.आईमुळे दादांना खूप आधार होता.

              माझ व आईच नात तर एवढं घट्ट होत की शब्दात व्यक्त करणे ही जमणार नाही. लहानपणापासूनच  आईचा माझ्यावर खूप प्रभाव होता.कारण ही तसेच होते वडील पोलीसांच्या  नोकरीमुळे कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते त्यामुळे आई व वडिलांची जबाबदारी आई एकटी सांभाळायची. मी शाळेत असताना आईच माझा सर्व अभ्यास घ्यायची.आईने सातवी पर्यंत शिक्षण घेतलं होतं पण ते शिक्षण खूप वेगळं सखोल होत.आईला 30 पर्यंतचे पाढे तोंडपाठ होते एवढंच नाही तर निमकी, पावकी असे पाढे पाठ होते.माझा ज्यावेळी अभ्यास घ्यायची त्यावेळी पाढे सलग न घेता वेगळ्या प्रकारे घेऊन डोक्यात बिंबवले होते.जसे-  किती पाचे पन्नास, किती चौक बावन्न असे पाठांतर घ्यायची.आईचे गणित विषयावर खूप प्रभुत्व होत. आमच्या तिन्ही भावंडाच्या प्रथमसत्र निकाल पत्रकावर आईच्याच सह्या राहायच्या.अभ्यासच नाही तर समाजात कसे राहावे, कसे बोलावे,वडीलधाऱ्याचा आदर राखावा, प्रत्येकाशी प्रेमाने राहावे ह्याचे बाळकडू आईने मला दिले.

                 मी एकुलता एक असल्याने लहानपणा पासून माझा खूप लाड व्हायचा. माझा प्रत्येक वाढदिवस आईने खूप उत्साहात साजरा केला.त्यावेळी ग्रामीण भागात वाढदिवस खूप कमी मुलांचा साजरा व्हायचा त्यात माझा वाढदिवस बहुतांशवेळी गणपती उत्सवात यायचा त्यामुळे दादांना माझ्या वाढदिवसाला कधीच सुट्टी मिळायची नाही सतत गणपती बंदोबस्त लागायचे त्यामुळे आईच सर्व नियोजन करायची. त्यावेळी केक नसायचा पण खूप मजा यायची माझे गल्लीतील मित्र ,शाळेतील मित्र माझ्या वाढदिवसाला असायचे. विशेष म्हणजे आईने प्रत्येक वाढदिवसाची आठवण म्हणून दर वाढदिवसाचे माझे फोटो काढायची.त्यावेळी 1985 ते 1993 दरम्यान गावात फोटो कॅमेरा कोणाकडे नव्हता तरी माझा वाढदिवस झाला की दुसऱ्या दिवशी तालुक्याला मला घेऊन जाऊन फोटो काढायचा हे ठरलेलं होत. आईने माझे 10 वी -12 वी पर्यंत असेपर्यंत सर्व वाढदिवस साजरे केले. ज्यावेळी मी जुने अल्बम चाळतो त्या आठवणी पाहून मन भरून येतं.ज्या काळात एक फोटो काढणं किती अवघड होतं अशावेळी माझे वयाच्या 6 महिन्यापासून ते प्रत्येक वाढदिवसाचे फोटो आठवणीने आईने काढून ठेवले होते.2006 ला रायगड जिल्हा परिषदेचेत नोकरी लागली व सहाजिकच घरचे वाढदिवस  कमी झाले.

              2006 साली नोकरी लागली व प्रथमच मी घर सोडून रायगडला गेलो तेंव्हा मला नोकरी लागलेला आईला आनंद तर होताच पण मी तिच्या पासून दूर जातोय ह्याची ही हुरहुर होती. जरी आईपासून दूर गेलो असलो तरी दररोज दोन वेळा फोन वर बोलणं व्हायचच.गणपती उत्सव,दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो की आईच्या हातचे खायला खूप भारी वाटायचं.सकाळी चहा सोबत चपातीचा नास्ता आवडता असायचा सुट्टी संपत आली की मनाला हुरहुर लागायची व जड अंतकरणाने आईचा निरोप घेऊन रायगडला जायचो.असे 2006ते 2010 पर्यंत चाललं होतं.मे 2010 मध्ये माझं लग्न झालं त्यावेळी वाटलं आता आपलं कुटुंब पूर्ण झालं पण नियतीला हे सुख मान्य नसावं जेमतेम लग्नानंतर 7 महिन्यानंतर 12 डिसेंबर 2010 रोजी आईला ह्रदयविकाराचा झटका आला आणि आई कायमची मला सोडून गेली.

             तो दिवस आजही आठवला की अंगाला काटा येतो. 2006 ते 11 डिसेंबर 2010 पर्यंत रायगडला असताना असा माझा एकही दिवस गेला नाही की मी आईला फोन वर बोललो नाही.नेहमी प्रमाणे 11 डिसेंबर 2010 साली शनिवारी सकाळी 11 वाजता आईच बोलणं झालं व नंतर रात्री जेवण करून बोलणं झालं व नेहमी प्रमाणे मी झोपी गेलो. 12 तारखेला सकाळी 6.30 ला गावावरून फोन आला व आईची घटना समजली. रात्री आईला बोलून मी झोपलो व सकाळी अशी बातमी कानावर पडली तेंव्हा विश्वास तर बसला नाही पण डोकं सुन्न झाले होतं.समजत नव्हतं कस झालं. मित्रांनी लगेच गाडीची व्यवस्था केली व सकाळी 7 वाजता कोलाड वरून निघून 12 तास 500किमीचा प्रवास करत रात्री 7 वाजता मी गावी पोहचलो.

             प्रसंग खूप वाईट होता 12 तासाच्या प्रवासात प्रत्येक क्षण गाडी पुढे जात होती तसे माझं मन मागे भूतकाकात जात होतं.आईच्या आठवणींच्या स्पर्धा लागल्या होत्या, लहानपणापासून चा सहवास वयाच्या 25 व्या वर्षी तुटला होता.आईविना माझं पान ही हलत नव्हतं तेंव्हा हा आघात खूप मोठा होता.रस्त्याने प्रवास कटत नव्हता व मला आईची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.आईजवळ दादा,ताई,दीदी,पत्नी पूनम सर्व गावी होते मीच एकटा लांब होतो. अंतविधीसाठी माझी  सर्व मंडळी माझी वाट पहात होते,  मला घरी जायला रात्रीचे सात वाजले घरी गेल्यास आईचे शेवटचे दर्शन घ्यायची सुद्धा हिम्मत होत नव्हती.असा अचानक आघात मनावर झाला होता की सावरण खूप अवघड होतं माझ्यासाठी.

           दुःख खूप गिळल व दादाकडे पाहून मन खंबीर केलं. आईला अस्थमाचा त्रास होता,हिवाळ्यात हा त्रास अधिक उफाळून यायचा आणि नेमकं तेच झालं होतं व 12 तारखेला सकाळी अचानक घटना घडली व होत्याच नव्हतं झालं.

                आईच अचानक निघून जाणं त्यातून सावरण माझ्यासाठी खूप अवघड होतं. आई म्हणजे माझ्या आणि दादामधील दुआ होती.मी आई हयात होती तो पर्यंत कधीही दादाकडे कांही मागितलं नाही की जास्त बोललो नाही कारण लहानपणीपासून आईचा सहवासच एवढा होता की त्याची मला सवय लागली होती.हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता ह्यातून सावरायला अनेक वर्षे गेली पण अजूनही आईची आठवण आली की मन सुन्न होतं.

             आज खूप धाडसाने लिहलं आहे एक एक शब्द लिहताना मन किती भरलं होत नाही सांगू शकत.गेल्या 12 वर्षांपासून आईबद्दल लिहावं वाटत होतं पण नुसतं लिहायचं म्हटलं की डोळे भरून यायचे मग मी सोडून द्यायचो.गेल्या कांही दिवसापासून मनाची तयारी केली आणि मनाला हिम्मत दिली व आई बद्दल लिहायला घेतल. मी आईबद्दल  कितीही लिहल तरी ते कमीच आहे.माझ्या आईचे कर्तृत्व माझ्यासाठी खूप मोठं आहे.मी आज जे कांही आहे ते माझ्या आईच्या संस्कारामुळे व शिकवणीमुळे आहे.माझ्या प्रत्येक कार्यात माझी आई अदृश्य रुपात माझ्या सोबत आहे.आज माझी आई जरी शरीराने सोबत नसली तरी अदृश्य रुपात सदैव माझ्या सोबत आहे.

 शेवटी कवी  फ मु शिंदे यांच्या चारओळी खूप भावतात.


'आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! 

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही

आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही....'

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...