गुरुवार, २९ जून, २०२३

सेवागौरव कर्तृत्वाचा

           आमचे मोठे बंधू श्री पद्माकर प्रल्हादराव जाधव तात्या (पदोन्नती मुख्याध्यापक तथा स्वीकृत सदस्य शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद परभणी) आज 37 वर्षांचा प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या बद्दल कितीही लिहल तरी कमीच आहे पण थोडं लिहण्याचा प्रयत्न करत आहे.

तात्या म्हणजे आमच्या  कुटुंबातील 14 भावंडा पैकी सर्वात मोठे.माझे दोन नंबरचे काका श्री प्रल्हादराव जाधव (नाना) यांच्या चार अपत्यापैकी तात्या सर्वात मोठे एकुलते एक चिरंजीव.तात्यांचा जन्म 22 जून 1965 साली झाला.घरची परिस्थिती बेताची होती शेती हाच एकमेव उदरनिर्वाहचे साधन होते त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता.तात्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव रोकडा ता.अहमदपूर,जि.लातूर शाळेत व माध्यमिक शिक्षण गावातच बापूजी विद्यालयात पूर्ण केले.त्यावेळी 10 वी नंतर ded करून लवकर कुटुंबाला आधार द्यायचा ह्या उद्देशाने तात्याने ded चा मार्ग स्वीकारला कारण तात्यां नंतर तीन बहिणी त्यांचे शिक्षण,लग्न अशी खूप मोठी जबाबदारी होती. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे तात्यांचा शासकीय अध्यापक विद्यालयाला नंबर लागला व घरात सर्वांना आनंद झाला.  तात्यांनी आपले D.ed दोन वर्षात पूर्ण केले.आता D.ed पूर्ण झाले होते  कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून नोकरीच्या शोधात तात्या होते तेव्हा जून 1985 ला अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख शाळेत पहिली संधी मिळाली आणि तात्यांचे पाहिले स्वप्न पूर्ण झाले .जेमतेम तिथे 1 वर्षाची सेवा केल्या नंतर 1986 साली तात्यांना परभणी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली तेंव्हा त्यांनी अहमदपूर येथील खाजगी शाळेचा राजीनामा दिला व परभणी जिल्हा परिषदेत रुजू झाले.1986 ते 2023 सलग 37 वर्ष सेवा परभणी जिल्ह्यात करून तात्या आज सेवानिवृत्त होत आहेत.

तात्यांचा जन्म जरी लातूर जिल्ह्यात झाला असला तरी त्यांची कर्मभूमी परभणी जिल्हा राहिली व त्यांना परभणी जिल्ह्याने नवी ओळख दिली.7 जुलै 1986 साली पाथरी तालुक्यातील वलंगवाडी येथून सेवेची सुरवात झाल्यानंतर 12 वर्षे त्या शाळेत सेवा दिल्यानंतर पुढील 13 वर्ष जिल्हा परिषद कन्या शाळा सेलू येथे त्यांनी कार्य केले. त्यानंतर प्रमोशनने 7 वर्ष डासाळा व शेवटची 5 वर्ष देऊळगाव गात येथे अशी एकूण 12 वर्ष केंद्रीय मुख्याध्यापक पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत ते आज सेवानिवृत्त होत आहेत.

खर तर माणूस आपल्या धाडसी कार्यामुळे व संघटन कौशल्यामुळे सदैव आठवणीत राहतो.ह्या 37 वर्षात तात्यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात जे काम उभे केले आहे ते सदैव प्रेरक असे आहे.1998 साली सेलू तालुक्यातील शिक्षकांना एकत्रित करून लोकमंगल नगर गृहनिर्माण संस्था स्थापन करून सुंदर अशी शिक्षकांची वसाहत स्थापन केली व ते संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी शिक्षक पतसंस्था असते अशा सेलू तालुका शिक्षक पतसंस्थेची स्थापना करून ते संस्थापक अध्यक्ष राहिले व सलग 12 वर्ष पतसंस्थेचे चेअरमन पद त्यांनी भूषवले आणि पतसंस्थेला आदर्श शिक्षक पतसंस्था म्हणून नावारूपास आणले .शिक्षक संघाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र ठेवून आपलसं करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे काम त्यानी सदैव केले व आजही करत आहेत.तात्यांच्या या कार्याचा गौरव करत 2007 साली परभणी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने तात्यांना गौरविण्यात आले आहे.आणि त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा विचार करता 2020 साली परभणी जिल्हा परिषदेने त्यांची निवड जिल्हा शिक्षण व क्रीडा समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

आपला पेशा, आपले विध्यार्थी, आपले सहकारी शिक्षक यांना जसे प्रेम,जिव्हाळा तात्यांनी दिला तसाच प्रेम जिव्हाळा कुटुंबालाही दिला.घरात सर्वात मोठे असल्याने निश्चितच त्यांच्यावर सर्व जबाबदारी होती.नोकरी नंतर 1989 साली तात्यांचे लग्न झाले त्यानंतर तीन लहान बहिणींच्या लग्नाची जबाबदारी ही तात्यावर होती आणि अगदी समर्थपणे तीनही बहिणींचे लग्न तात्याने लावून दिली.कुटुंबवत्सल कसे असावे हे तात्याकडे पाहून समजत . तात्यांचा ह्या प्रवासात  आमच्या भाभी सौ राजश्री पद्माकर जाधव यांचा खूप मोठा वाटा आहे. तात्यांचा प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात भाभी खंबीरपणे तात्यासोबत उभ्या राहिल्या आहेत.तात्यांना दोन मुलं आहेत पवन व प्रवीण ह्या दोघांचे शिक्षण,संस्कार,जीवणघडणीत कोणतीही कसर दोघांनी सोडली नाही.आज पवन आपल्या व्यवसायात आहे तर प्रवीण कायदाचे पदवी शिक्षण घेत आहे. आमच्या मोठ्या चार काकांच्या कुटुंबात 14 भावंडांचे आदर्श,मार्गदर्शक तात्या राहिले आहेत.प्रत्येकांशी प्रेमाने,आपुलकीने काळजीने कसं राहावं हे तात्याकडे पाहून शिकता आलं. तात्या सध्या सेलू येथे स्थायिक झाले आहेत आई ,वडील, पत्नी, दोन मुलं, एक सून व एक नात अस सुंदर कुटुंब हेच तात्यांची खरी कमाई आहे. नोकरीतील प्रत्येकला

एक ना एक दिवस ह्या सेवापूर्तीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागतेच.ज्या बालगोपाळात सेवेचे 37 वर्षे घातली त्यांना जड अंतःकरणाने  सोडून जाणं सोपं नसत.प्रत्येकाला कुठे तरी थांबावं लागत त्याप्रमाणे वयाचे 58 गाठले की प्रत्येक कर्मचाऱ्यांना सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते. आज तात्या जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचे विचार,त्यांचे संस्कार त्यांचे मार्गदर्शन आज 37 वर्षातील प्रत्येक बॅचला सदैव मार्गदर्शक ठरणारे आहे.

सेवानिवृत्ती नंतर तात्यांचे आयुष्य  आपल्या कुटुंबासाठी,मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी आनंदी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

✍🏻...

छोटा बंधू

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

(प्राथमिक शिक्षक रायगड  जिल्हा परिषद)

शनिवार, ३ जून, २०२३

शाब्बास सचिन


काल 10 वी चा निकाल लागला व त्या परीक्षेत माझा विद्यार्थी सचिन महेंद्र वाघमारे दिव्यांगत्वावर मात करत 61.80% गुण घेऊन उत्तीर्ण झाला पण त्याचे हे यश सहजपणे मिळाले नाही त्याचा संघर्ष लिहत आहे....

सचिनच्या जन्मापासूनच त्याचा संघर्ष सुरू झाला होता.जन्मतःच एका पायाने दिव्यांग असणाऱ्या सचिनचा प्रवास कसा होईल हे कोणालाही माहीत नव्हतं.ज्या कातकरी आदिवासी कुटुंबात सचिनचा जन्म झाला ते कुटुंब अतिशय गरिबीत राहिलेले.आई वडील दोघे मजुरी करून पोट भरणारे त्यात एक मोठी मुलगी व नंतर सचिनचा जन्म झाला पण तोही दिव्यांग.पण आई वडिलांनी त्याचा पालनपोषणात काहीच कमी केली नाही.

माझी पहिला शाळा रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी मुख्य रस्त्यापासून डोंगरात वसलेली कातकरी जमातीची लोकवस्ती तेथील सचिन हा माझा आवडता विद्यार्थी.

2013-14 साली दिव्यांग सचिनला मी इयत्ता पहिली वर्गात दाखल केले.शाळा वाडीत होती पण त्याच्या घरापासून जेमतेम200 मीटर अंतरावर होती.त्याचे आई किंव्हा वडील दररोज त्याला शाळेत सोडायला यायचे व घेऊन जायचे.जशी इयत्ता वाढत होती तशी सचिनची समजही वाढत होती.लहानपणा पासूनच सचिनला शाळा आवडायची त्याच्या बरोबरचे मुले शाळेत यायला कंटाळा करायचे पण सचिन दररोज न चुकता शाळेत यायचा. इयत्ता वाढू लागली की तो हळू हळू चालत शाळेत येऊ लागला.त्यावेळी त्याची आरोग्य तपासणी केली व त्याला कृत्रीम बूट बसवला पण तेवढा प्रयोग यशस्वी झाला नाही बुटामुळे त्याला चालायला त्रास होऊ लागायचा नंतर कुबड्या मिळाल्या पण कुबड्यावर चालायला त्याला नको वाटायचे तो पाय टेकीत चालायचा पण दोन्ही पायाची उंची कमी जास्त असल्याने त्याचा परिणाम त्याच्या मणक्यावर होऊ लागला व पाठदुखीचा त्रास होऊ लागला.तो रडायचा लागायचा ,वाडीत चौथी पर्यंत शाळा होती पण पाचवीला जायचं म्हटलं तर 2 km डोंगर उतरून पुन्हा 5 km रिक्षाने कोलाडला हायस्कुला जावं लागणार होतं अशा स्थितीत सचिनचा हा त्रास पाहून आम्हाला वाटत नव्हतं सचिन दररोज हायस्कुला जाऊ शकेल व त्याचे पुढले शिक्षण घेऊ शकेल 

पण शिकण्याची जिद्द ही परिस्थिती व विकलांगतेवत मात करते हे सचिनने दाखवून दिले.

दररोज कुबड्यावर डोंगर उतरणे व चढणे असा 2 km चा प्रवास तो करू लागला पण तो प्रवास सोप्पा नव्हता.ज्यावेळी मी 2006 ते 2010 साला पर्यंत चालत शाळेला जायचो त्यावेळी तो डोंगरातील रस्ता चालताना घामेघुम व्हायचो व मध्यवर्ती एक आंब्याचे झाड होते तिथे थोडावेळ थांबून पुन्हा वर चालयचो. तो रस्ता मला माहित होता म्हणून सतत वाटायचं सचिन दररोज असा रस्ता व तेही कुबड्यावर कसा चालत जाईल? पण हार मानेल तो सचिन कसला.त्याने इच्छाशक्तीच्या बळावर 5 वी ते 10 पर्यंत दररोज तो 2 kmडोंगर उतरून चढून  10 वी चा टप्पा पार केला. त्याचा बरोबरच्या मुलांनी शाळा मधेच सोडली पण सचिनने परिस्थितीशी चार हात केले व 10 वी मध्ये 61.80 % गुण घेऊन उत्तीर्ण झाला.

इथे त्याने किती गुण घेतले महत्वाचे नाहीत तर ज्या कातकरी आदिवासी समाजात 10 वी पर्यंत शिक्षण घेणेही विविध कारणाने कठीण आहे,समाजातील मुलांचे शिक्षणाचे 10 वी पास होण्याचे प्रमाण बोटावर मोजण्या इतके आहे ,घरची परिस्थिती बिकट असूनही अपंगत्वावर मात करून सचिनने हा टप्पा गाठणे हे खूप मोठं यश आहे. सचिनच्या जन्मापासून ते 10 वी पास होईपर्यंत चा प्रवास मी समोरून पाहिल्यामुळे हे यश किती मोठे आहे शब्दात नाही सांगू शकत.काल सचिनचा निकाल जेंव्हा समजला तेंव्हा खूप आनंद झाला व सचिनचा तो खडतर प्रवास डोळ्यासमोरून गेला.ऊन पावसाची तमा न बाळगता दररोज चालत येऊन जाऊन हा टप्पा पार करणे खूप कठीण होते पण सचिनने ते करून दाखवले.येणाऱ्या काळात सचिनच्या प्रगतीचा आलेख असाच वर जावो व त्याने जे शिक्षणासाठी मेहनत घेतली त्याचे गोड फळ त्याला मिळो हीच  सदिच्छा.

✍️...

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...