शनिवार, २९ मार्च, २०२५

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

 

ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक

एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र झाले ही बातमी मागच्या आठवड्यापासून वर्तमानपत्रात,समाजमाध्यमावर वाचायला मिळाली आणि त्या शिक्षकाचे कार्य,मेहनत काय असेल जाणून घायची उत्सुकता लागली;आणि त्याचा योग काल आला.आमचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मधील शिक्षक मित्र श्री सोपान चंदाले सर व ज्यांनी एकाच वर्षात 22 विध्यार्थी नवोदय पात्र केले ते विनोद झनक हे वर्गमित्र निघाले. सोपान सरांमुळे  विनोद सरांना भेटायची नामी संधी मिळाली.

शुक्रवारी सकाळच्या सत्रातील शाळा करून विनोद सरांची भेट घेण्याच्या उत्सुकतेने कळमनुरी वरून आमचे मित्र सोपान चंदाले सर,राम परचंडे सर,सचिन गडपतवार सर व मी वाशीमच्या दिशेने निघालो. जवळपास दीड एक तासाच्या प्रवासात सरांचे कार्य जाणून घेण्याची उत्सुकता लागून गेली होती.आम्ही वाशिमला पोहचण्याआगोदर सकाळी 7 ते 2 शाळा करूनही 3 वाजता भर उन्हात विनोद सर आमची वाट पहात होते. त्यांना पाहिल्यास अजिबात वाटत नव्हतं ते थकून आले आहेत, एकदम प्रसन्न चेहरा व उत्साह दिसत होता. विनोद सरांनी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले व तेथे परिचय झाला . त्यानंतर पुढील 3ते4 तास विनोद सरांच्या सहवासात कसे गेले समजलं नाही.एकदम साधी राहणी, एवढं  यश संपादन केलं तरी अजिबात कुठला गर्व नाही की यशाचा उन्माद दिसला नाही. जे जे आम्ही विचारलं ते ते त्यांनी अगदी मनमोकळे पणाने सांगत होत;आणि 5 वर्षात तब्बल 89 विध्यार्थी नवोदयला पात्र कसे होत गेले त्यांचा प्रवास उलघडत गेला.

विनोद सरांच्या भेटीत एक गोष्ट जाणवली यी म्हणजे हे मिळालेले यश एकट्याचे नसून संपूर्ण शाळेचे आहे व इयत्ता पहिली ते 4थी पर्यंतच्या वर्गशिक्षकाची मेहनत खूप आहे त्यांनी वारंवार सांगितलं.

विनोद सरांच्या वर्गातील ह्यावर्षी 22 विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात नवोदय प्रवेश पात्र झाले, गेल्यावर्षी 19 त्याच्या आगोदर असे पाच वर्षापासून एकूण आकडा आज 89 पर्यंत पोहचला आहे. हे सर्व यश एका वर्षाचे नसून ते ज्या शाळेत शिक्षक आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांचे व सातत्याने घेत असलेल्या मेहनतीचे आहे असं त्यांच्या बोलण्यातून समजले.

विनोद सर पाच वर्षांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाले व तेंव्हा पासून 5 वर्षात त्यांच्याकडे 5 वी वर्ग राहिला व त्यांच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला आणि ह्यावर्षी रेकॉर्डब्रेक कामगिरी करत 22 विध्यार्थी नवोदय पात्र करत त्यांनी इतिहास घडवला. साखरा जिल्हा परिषद शाळा म्हणजे त्या परिसरातील आदर्श शाळा आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा, ता. जि. वाशीम. त्या शाळेत 1ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग असून 929 विध्यार्थी शिक्षण घेतात त्यांना शिकवण्यासाठी 24  शिक्षकांची दर्जेदार टीम आहे.एवढंच नाही तर पूर्व प्राथमिकचे जवळपास 400 विध्यार्थी येथे शिक्षण घेतात. जवळपासच्या 15-16 गावातून ह्या जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थी शिक्षण घ्यायला येतात व एवढंच नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून म्हणजे वाशिम शहरातून जवळपास 10 रिक्षातून मुलं साखरा शाळेत शिकायला येतात. हे तेव्हाच शक्य होत जेंव्हा येथील शिक्षक, पालक, ग्रामस्थ ध्येयवेडे असतात.साखरा ग्रामस्थांनी 37 एकर गायरान जागा शाळेसाठी दिली व माळरानावर ज्ञानाचे विद्यापीठ तयार झाले. तस पाहिलं तर साखरा गावची लोकसंख्या जवळपास 1300 च्या घरात व शाळेत व पूर्वप्राथमिक वर्गात मिळून गावच्या लोकसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या पहायला मिळते.2023-24मध्ये शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे राज्यातील प्रथम बक्षीस मिळाले असून ग्रामस्थ, पालकांनी व शिक्षकांनी ठरवल्यास काय होऊ शकत नाही हे ही शाळा पाहिल्यास समजतं.

ज्यावेळी आम्ही विनोद सरांना विचारलं की एवढे नवोदय पात्र विध्यार्थी मोठ्या संख्येत एकाच शाळेतून लागण्याचे गुपित काय तर सर सांगू लागले की, गुडीपाडाव्या दिवशी पूर्व प्राथमिक वर्गातील नर्सरीचे प्रवेश सुरु होतात आणि जे विधार्थी इथे पूर्वप्राथमिक शिक्षण पूर्ण करतील त्यांनाच साखरा शाळेत पहिलीला प्रवेश मिळतो व त्यानंतर पहिली ते चौथी पर्यंत प्रत्येक वर्गशिक्षक मेहनतीने विध्यार्थी घडवतात. प्रत्येक वर्गाच्या तीन तुकड्या असून चौथी पर्यंत विध्यार्थ्यांचा पूर्ण बेस पक्का केला जातो आणि इयत्ता पाचवीच्या सुरवातीला चाचणी घेऊन जवळपास 40-50 विध्यार्थ्यांची खास बॅच बनवली जाते आणि त्यानंतर वर्षभर विनोद सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होतो त्यांचा मिशन नवोदय प्रवास.मग वर्षभर विनोद सर व त्या मुलांच्या मध्ये असतो फक्त एकच ध्यास तो नवोदय प्रवेशाचा.

विनोद सर सांगतात त्यांच्या वर्गाला कधीच सुट्टी नसते व विनोद सरांनी  5 वर्षात कधीच उन्हाळा, दिवाळी,रविवारची सुट्टी घेतली नाही की रजा घेतली नाही. त्यांचा वर्ग दररोज सकाळी 7 वाजता भरतो व सायंकाळी 5 वाजता सुटतो. विनोद सर सांगतात आमच्या विध्यार्थ्यांची 4 थी पर्यंत एवढी तयारी झालेली असते की त्यांची 5 वी नवोदयसाठी पात्र होणारच या मानसिक तयारीने ते वर्गात येतात. सराव व अभ्यासातील सातत्य ही नवोदयची गुरुकिल्ली आहे असें सर सांगतात. त्यांनी स्वतंत्र नोट्स बनवल्या आहेत व वेगवेगळ्या क्लूप्त्यांच्या मदतीने ते विध्यार्थ्यांना ध्येयाकडे घेऊन जात असतात.आणखी एक महत्वचाही बाब म्हणजे नवोदय परीक्षेला 2-3महिने अवधी असला की त्यांचा रात्रीचा वर्ग सुरु होतो मग काय विनोद सर सकाळी 7 वाजता शाळेत आले की रात्री 9 पर्यंत शाळेत असतात. त्यांचे जीवनच जणू ग्रामीण भागतील मुलांच्या शिक्षणासाठी आहे असं वेळोवेळी जाणवलं. शाळा हेच आपले घर व शाळेतील मुलं हेच आपलं दैवत म्हणुन चालणारे विनोद सरची मेहनत व प्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जाईल. 2007पासून त्यांच्या हातून शिकलेले जवळपास 100 च्यावर विध्यार्थी नवोदयला लागले असून आज ते उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. आज काल जे लोक जिल्हा परिषद शाळेला व शिक्षकला एकाच चष्म्यातून पहात असतात त्यांनी एकदा साखरा शाळा व विनोद सरांची भेट घेऊन जाणून घ्यावं की जिल्हा परिषद शाळा व शिक्षक काय करू शकतात.

साखरा शाळेत आम्हाला पोहचायला सायंकाळ झाल्यामुळे मुलांची भेट होऊ शकली नाही पण  पालक व ग्रामस्थ भेटले त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांच्या शाळेतील सर्व गुरुजीं खूप मेहनत घेतात व सर्व ग्रामस्थांचा त्यांना खूप मोठा आधार आहे.शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक यांच्या मते "गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे समर्पण, शाळेची सुविधा आणि पालकांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे." हे साखरा शाळा पाहून जाणवलं.शालेय व्यवस्थापनात व्यत्यय येऊ नये म्हणुन बाहेरून शाळा भेटीला येणाऱ्यांना 

दर शुक्रवारीच  शाळा पहायला परवानगी आहे असे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणाले. आपण अशी शाळा का पहायची तर आपल्यालाही प्रेरणा मिळते व नवीन काहीतरी शिकायला मिळत ह्या हेतूने साखरा भेट व विनोद झनक यांची भेट घेतली.

ह्यानिमित्ताने विनोद झनक सारखा राज्यात शैक्षणिक चळवळीत जीवापाड काम करणारा मित्र मिळाला ह्याचा मनस्वी आनंद वाटतो. शेवटी रात्री 8 वाजता विनोद सरांचा निरोप घेऊन व त्यांच्या ज्ञानाची खूप मोठी ऊर्जात्मक शिदोरी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.....

✍️..

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

 प्राथमिक शिक्षक,जि.प. शाळा हारवाडी

ता. कळमनुरी, जि. हिंगोली. 







मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

स्थलांतराच्या चक्रव्यूहात अडकले आदिवासी मुलांचे शिक्षण



फोटोतील हा माझ्या शाळेतील 4थी चा विद्यार्थी आहे त्याला मी मुळाक्षरे गिरवायला शिकवत आहे.आपल्याला वाटेल चौथीला मुलगा गेला तरी त्याला मुळाक्षरे गिरवता येत नाही मग शाळा,शिक्षक,पालक काय करत होते? पण कांही वास्तव आपल्या समोर येणे ही गरजेचे आहे म्हणून आज आदिवासी दिनाच्या निमित्ताने हा लेख लिहत आहे.

स्थलांतर हा आदिवासी मुलांच्या शिक्षणाला लागलेला शाप आहे.ह्या स्थलांतररुपी चक्रव्यूहात   मुलांचे शिक्षण असे काही अडकले आहे की त्यातून वर्षानुवर्षे त्यांची सुटका होत नाही.प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा चांगला शिकावा वाटतो तसा शिक्षकांनाही आपले विध्यार्थी चांगले शिक्षण घ्यावेत वाटतं पण ज्यावेळी आपले विद्यार्थी हातातील वही पेन सोडून कुटुंबासमवेत पोटापाण्यासाठी स्थलांतर होतात त्यावेळी मन निराश होतं.

आज जागतिक आदिवासी दिन जगात मोठ्या उत्साहात साजरा होईल,अनेक ठिकाणी कार्यक्रम होतील,आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन होईल ,एक दिवस आदिवासी समाजाचा जयजयकार होईल पण वर्षानुवर्षे स्थलांतराच्या कचाट्यात अडकलेल्या हजारो आदिवासी कुटुंबाची कायम मुक्तता कशी होईल ह्याकडे कोणी पहात नाही.

गेले 17 वर्ष कातकरी आदिवासी जमातीतील विध्यार्थ्यासमवेत काम करत असताना एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे शिक्षण आणि मुलांच्या मध्ये स्थलांतर हा खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे व तो कधी बाजूला होईल. 

दर वर्षी जून महिन्यात शाळा सुरू होतात तेंव्हा स्थलांतरित झालेले पाखरे घरट्यात यावी तसे मुले शाळेत येतात त्यानंतर दोन-तीन महिने शाळेत रमतात. त्यांना शाळा आवडू लागते ते शाळेत गुंतून जातात आदिवासीवाड्या वस्त्यावरील शिक्षक पण मुलांच्या शिक्षणासाठी टप्प्या टप्प्यात प्रयत्न करतात पण एकदा का सप्टेंबर उजाडला की ही पाखरे शाळा सोडून स्थलांतर होतात ते थेट पुढल्या जून महिन्यात अवतरतात.अशावेळी शिक्षक म्हणून मानसिकता स्थिर ठेवणे खूप अवघड होऊन जातं.

ही स्थलांतर समस्या हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरून जाते.

मुलांना शाळा आवडते पण पालकांना पोटापाण्यासाठी स्थलांतर व्हावं लागतं त्यामुळे आपल्या मुलांना ते सोबत घेऊन जातात व मुलांचे शिक्षण थांबून जाते.

ह्या स्थलांतर होणाऱ्या समस्येवर शासन अनेक उपाययोजना करते, विद्यार्थी जेथे कुठे स्थलांतरित होतील तेथे त्यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध आहे पण नेमकं हे स्थलांतरित झालेले विद्यार्थी जेंव्हा इतर राज्यात स्थलांतरित होतात तेंव्हा सगळे मार्ग थांबून जातात.

कांही गोष्टी कटू आहेत पण सत्य स्वीकारावे लागते. आजही चौथी पाचवीच्या स्थलांतरित मुलांना शाळेत आल्यास मुळाक्षरे गिरवल्या शिवाय आम्हला पुढं जाता येत नाही.वर्षातील फक्त 2-3 महिने शाळेत राहिलेला विद्यार्थी Rte कायदयने दर वर्षी वरच्या वर्गात जातो पण त्याची इयत्ता वाढते पण त्या त्या वर्गातील क्षमता प्राप्त करण्यापासून तो दूर राहतो.

सर्वांना वाटत आपला महाराष्ट्र शिक्षणात अव्वल यावा पण जर मुलांना शिकण्याची इच्छा असूनही स्थलांतरामुळे  शाळेत यायलाच नाही भेटत तर तो गुणवत्तापूर्ण शिक्षण कसा घेईल.

वरकरणी ही समस्या खूप छोटी वाटत असली तरी ह्यामुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत.

दर वर्षी स्थलांतरित विद्यार्थ्यांचा सर्व्हे होतो पण स्थलांतरित झालेले विद्यार्थी सापडले जात नाहीत त्यांच्या पालकांचे काम जंगलात,रानावनात,परराज्यात,ऊसाच्या फडात असतात त्यामुळे हे विद्यार्थी सापडणे खूप अवघड होऊन जाते.

जो पर्यंत पालकांचे स्थलांतर थांबत नाही तो पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांचे ह्या चक्रव्यूहातून सुटका होऊ शकत नाही.जर आदिवासी पालकांचे स्थलांतर थांबवायचे असेल तर त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळणे खूप आवश्यक आहे. त्या गरीब आदिवासी पालकांना ही वाटतं आपले मुलं शिकले पाहिजेत पण ज्यावेळी पोटाचा प्रश्न येतो त्यावेळी बाकी काहीही दिसत नाही.......

✍️

श्री गजानन पुंडलिकराव जाधव.

गुरुवार, २९ जून, २०२३

सेवागौरव कर्तृत्वाचा

           आमचे मोठे बंधू श्री पद्माकर प्रल्हादराव जाधव तात्या (पदोन्नती मुख्याध्यापक तथा स्वीकृत सदस्य शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद परभणी) आज 37 वर्षांचा प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या बद्दल कितीही लिहल तरी कमीच आहे पण थोडं लिहण्याचा प्रयत्न करत आहे.

तात्या म्हणजे आमच्या  कुटुंबातील 14 भावंडा पैकी सर्वात मोठे.माझे दोन नंबरचे काका श्री प्रल्हादराव जाधव (नाना) यांच्या चार अपत्यापैकी तात्या सर्वात मोठे एकुलते एक चिरंजीव.तात्यांचा जन्म 22 जून 1965 साली झाला.घरची परिस्थिती बेताची होती शेती हाच एकमेव उदरनिर्वाहचे साधन होते त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता.तात्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव रोकडा ता.अहमदपूर,जि.लातूर शाळेत व माध्यमिक शिक्षण गावातच बापूजी विद्यालयात पूर्ण केले.त्यावेळी 10 वी नंतर ded करून लवकर कुटुंबाला आधार द्यायचा ह्या उद्देशाने तात्याने ded चा मार्ग स्वीकारला कारण तात्यां नंतर तीन बहिणी त्यांचे शिक्षण,लग्न अशी खूप मोठी जबाबदारी होती. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे तात्यांचा शासकीय अध्यापक विद्यालयाला नंबर लागला व घरात सर्वांना आनंद झाला.  तात्यांनी आपले D.ed दोन वर्षात पूर्ण केले.आता D.ed पूर्ण झाले होते  कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून नोकरीच्या शोधात तात्या होते तेव्हा जून 1985 ला अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख शाळेत पहिली संधी मिळाली आणि तात्यांचे पाहिले स्वप्न पूर्ण झाले .जेमतेम तिथे 1 वर्षाची सेवा केल्या नंतर 1986 साली तात्यांना परभणी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली तेंव्हा त्यांनी अहमदपूर येथील खाजगी शाळेचा राजीनामा दिला व परभणी जिल्हा परिषदेत रुजू झाले.1986 ते 2023 सलग 37 वर्ष सेवा परभणी जिल्ह्यात करून तात्या आज सेवानिवृत्त होत आहेत.

तात्यांचा जन्म जरी लातूर जिल्ह्यात झाला असला तरी त्यांची कर्मभूमी परभणी जिल्हा राहिली व त्यांना परभणी जिल्ह्याने नवी ओळख दिली.7 जुलै 1986 साली पाथरी तालुक्यातील वलंगवाडी येथून सेवेची सुरवात झाल्यानंतर 12 वर्षे त्या शाळेत सेवा दिल्यानंतर पुढील 13 वर्ष जिल्हा परिषद कन्या शाळा सेलू येथे त्यांनी कार्य केले. त्यानंतर प्रमोशनने 7 वर्ष डासाळा व शेवटची 5 वर्ष देऊळगाव गात येथे अशी एकूण 12 वर्ष केंद्रीय मुख्याध्यापक पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत ते आज सेवानिवृत्त होत आहेत.

खर तर माणूस आपल्या धाडसी कार्यामुळे व संघटन कौशल्यामुळे सदैव आठवणीत राहतो.ह्या 37 वर्षात तात्यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात जे काम उभे केले आहे ते सदैव प्रेरक असे आहे.1998 साली सेलू तालुक्यातील शिक्षकांना एकत्रित करून लोकमंगल नगर गृहनिर्माण संस्था स्थापन करून सुंदर अशी शिक्षकांची वसाहत स्थापन केली व ते संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी शिक्षक पतसंस्था असते अशा सेलू तालुका शिक्षक पतसंस्थेची स्थापना करून ते संस्थापक अध्यक्ष राहिले व सलग 12 वर्ष पतसंस्थेचे चेअरमन पद त्यांनी भूषवले आणि पतसंस्थेला आदर्श शिक्षक पतसंस्था म्हणून नावारूपास आणले .शिक्षक संघाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र ठेवून आपलसं करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे काम त्यानी सदैव केले व आजही करत आहेत.तात्यांच्या या कार्याचा गौरव करत 2007 साली परभणी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने तात्यांना गौरविण्यात आले आहे.आणि त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा विचार करता 2020 साली परभणी जिल्हा परिषदेने त्यांची निवड जिल्हा शिक्षण व क्रीडा समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

आपला पेशा, आपले विध्यार्थी, आपले सहकारी शिक्षक यांना जसे प्रेम,जिव्हाळा तात्यांनी दिला तसाच प्रेम जिव्हाळा कुटुंबालाही दिला.घरात सर्वात मोठे असल्याने निश्चितच त्यांच्यावर सर्व जबाबदारी होती.नोकरी नंतर 1989 साली तात्यांचे लग्न झाले त्यानंतर तीन लहान बहिणींच्या लग्नाची जबाबदारी ही तात्यावर होती आणि अगदी समर्थपणे तीनही बहिणींचे लग्न तात्याने लावून दिली.कुटुंबवत्सल कसे असावे हे तात्याकडे पाहून समजत . तात्यांचा ह्या प्रवासात  आमच्या भाभी सौ राजश्री पद्माकर जाधव यांचा खूप मोठा वाटा आहे. तात्यांचा प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात भाभी खंबीरपणे तात्यासोबत उभ्या राहिल्या आहेत.तात्यांना दोन मुलं आहेत पवन व प्रवीण ह्या दोघांचे शिक्षण,संस्कार,जीवणघडणीत कोणतीही कसर दोघांनी सोडली नाही.आज पवन आपल्या व्यवसायात आहे तर प्रवीण कायदाचे पदवी शिक्षण घेत आहे. आमच्या मोठ्या चार काकांच्या कुटुंबात 14 भावंडांचे आदर्श,मार्गदर्शक तात्या राहिले आहेत.प्रत्येकांशी प्रेमाने,आपुलकीने काळजीने कसं राहावं हे तात्याकडे पाहून शिकता आलं. तात्या सध्या सेलू येथे स्थायिक झाले आहेत आई ,वडील, पत्नी, दोन मुलं, एक सून व एक नात अस सुंदर कुटुंब हेच तात्यांची खरी कमाई आहे. नोकरीतील प्रत्येकला

एक ना एक दिवस ह्या सेवापूर्तीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागतेच.ज्या बालगोपाळात सेवेचे 37 वर्षे घातली त्यांना जड अंतःकरणाने  सोडून जाणं सोपं नसत.प्रत्येकाला कुठे तरी थांबावं लागत त्याप्रमाणे वयाचे 58 गाठले की प्रत्येक कर्मचाऱ्यांना सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते. आज तात्या जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचे विचार,त्यांचे संस्कार त्यांचे मार्गदर्शन आज 37 वर्षातील प्रत्येक बॅचला सदैव मार्गदर्शक ठरणारे आहे.

सेवानिवृत्ती नंतर तात्यांचे आयुष्य  आपल्या कुटुंबासाठी,मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी आनंदी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

✍🏻...

छोटा बंधू

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

(प्राथमिक शिक्षक रायगड  जिल्हा परिषद)

शनिवार, ३ जून, २०२३

शाब्बास सचिन


काल 10 वी चा निकाल लागला व त्या परीक्षेत माझा विद्यार्थी सचिन महेंद्र वाघमारे दिव्यांगत्वावर मात करत 61.80% गुण घेऊन उत्तीर्ण झाला पण त्याचे हे यश सहजपणे मिळाले नाही त्याचा संघर्ष लिहत आहे....

सचिनच्या जन्मापासूनच त्याचा संघर्ष सुरू झाला होता.जन्मतःच एका पायाने दिव्यांग असणाऱ्या सचिनचा प्रवास कसा होईल हे कोणालाही माहीत नव्हतं.ज्या कातकरी आदिवासी कुटुंबात सचिनचा जन्म झाला ते कुटुंब अतिशय गरिबीत राहिलेले.आई वडील दोघे मजुरी करून पोट भरणारे त्यात एक मोठी मुलगी व नंतर सचिनचा जन्म झाला पण तोही दिव्यांग.पण आई वडिलांनी त्याचा पालनपोषणात काहीच कमी केली नाही.

माझी पहिला शाळा रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी मुख्य रस्त्यापासून डोंगरात वसलेली कातकरी जमातीची लोकवस्ती तेथील सचिन हा माझा आवडता विद्यार्थी.

2013-14 साली दिव्यांग सचिनला मी इयत्ता पहिली वर्गात दाखल केले.शाळा वाडीत होती पण त्याच्या घरापासून जेमतेम200 मीटर अंतरावर होती.त्याचे आई किंव्हा वडील दररोज त्याला शाळेत सोडायला यायचे व घेऊन जायचे.जशी इयत्ता वाढत होती तशी सचिनची समजही वाढत होती.लहानपणा पासूनच सचिनला शाळा आवडायची त्याच्या बरोबरचे मुले शाळेत यायला कंटाळा करायचे पण सचिन दररोज न चुकता शाळेत यायचा. इयत्ता वाढू लागली की तो हळू हळू चालत शाळेत येऊ लागला.त्यावेळी त्याची आरोग्य तपासणी केली व त्याला कृत्रीम बूट बसवला पण तेवढा प्रयोग यशस्वी झाला नाही बुटामुळे त्याला चालायला त्रास होऊ लागायचा नंतर कुबड्या मिळाल्या पण कुबड्यावर चालायला त्याला नको वाटायचे तो पाय टेकीत चालायचा पण दोन्ही पायाची उंची कमी जास्त असल्याने त्याचा परिणाम त्याच्या मणक्यावर होऊ लागला व पाठदुखीचा त्रास होऊ लागला.तो रडायचा लागायचा ,वाडीत चौथी पर्यंत शाळा होती पण पाचवीला जायचं म्हटलं तर 2 km डोंगर उतरून पुन्हा 5 km रिक्षाने कोलाडला हायस्कुला जावं लागणार होतं अशा स्थितीत सचिनचा हा त्रास पाहून आम्हाला वाटत नव्हतं सचिन दररोज हायस्कुला जाऊ शकेल व त्याचे पुढले शिक्षण घेऊ शकेल 

पण शिकण्याची जिद्द ही परिस्थिती व विकलांगतेवत मात करते हे सचिनने दाखवून दिले.

दररोज कुबड्यावर डोंगर उतरणे व चढणे असा 2 km चा प्रवास तो करू लागला पण तो प्रवास सोप्पा नव्हता.ज्यावेळी मी 2006 ते 2010 साला पर्यंत चालत शाळेला जायचो त्यावेळी तो डोंगरातील रस्ता चालताना घामेघुम व्हायचो व मध्यवर्ती एक आंब्याचे झाड होते तिथे थोडावेळ थांबून पुन्हा वर चालयचो. तो रस्ता मला माहित होता म्हणून सतत वाटायचं सचिन दररोज असा रस्ता व तेही कुबड्यावर कसा चालत जाईल? पण हार मानेल तो सचिन कसला.त्याने इच्छाशक्तीच्या बळावर 5 वी ते 10 पर्यंत दररोज तो 2 kmडोंगर उतरून चढून  10 वी चा टप्पा पार केला. त्याचा बरोबरच्या मुलांनी शाळा मधेच सोडली पण सचिनने परिस्थितीशी चार हात केले व 10 वी मध्ये 61.80 % गुण घेऊन उत्तीर्ण झाला.

इथे त्याने किती गुण घेतले महत्वाचे नाहीत तर ज्या कातकरी आदिवासी समाजात 10 वी पर्यंत शिक्षण घेणेही विविध कारणाने कठीण आहे,समाजातील मुलांचे शिक्षणाचे 10 वी पास होण्याचे प्रमाण बोटावर मोजण्या इतके आहे ,घरची परिस्थिती बिकट असूनही अपंगत्वावर मात करून सचिनने हा टप्पा गाठणे हे खूप मोठं यश आहे. सचिनच्या जन्मापासून ते 10 वी पास होईपर्यंत चा प्रवास मी समोरून पाहिल्यामुळे हे यश किती मोठे आहे शब्दात नाही सांगू शकत.काल सचिनचा निकाल जेंव्हा समजला तेंव्हा खूप आनंद झाला व सचिनचा तो खडतर प्रवास डोळ्यासमोरून गेला.ऊन पावसाची तमा न बाळगता दररोज चालत येऊन जाऊन हा टप्पा पार करणे खूप कठीण होते पण सचिनने ते करून दाखवले.येणाऱ्या काळात सचिनच्या प्रगतीचा आलेख असाच वर जावो व त्याने जे शिक्षणासाठी मेहनत घेतली त्याचे गोड फळ त्याला मिळो हीच  सदिच्छा.

✍️...

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

माझी आई

 

                     आज 12 डिसेंबर,आज 12 वर्ष झाले माझ्या आईला जाऊन. ह्या 12 वर्षातील एकही दिवस गेला नाही की त्यादिवशी आईची आठवण आली नाही.ह्या 12 वर्षात खूप प्रयत्न केला आईबद्दल लिहावं पण कधी हिम्मत झाली नाही.नेहमी वाटायचं आईबद्दल लिहावं,नुसता लिहायचा विचार जरी आला तरी हात थरथरायचे व  आठवणीने मन भरून यायचे मग लिहायचे टाळायचो. माझ्या आईचे कर्तृत्व लेखणीत समावणारे निश्चित नाही पण माझ्या मनात गेले अनेक वर्ष आई बद्दलच्या साठून राहिलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी लेखणी हाच आधार आहे. मला माहित नाही  आई बद्दल लिहताना ते पूर्ण करू शकेल की नाही पण खूप धाडसाने माझ्या आईबद्दल लिहण्याचा निर्णय आज घेतला आहे. सुरवात करतानाच मन भरून आलंय पण माझी आई मला प्रत्येक अक्षरात प्रत्येक शब्दात दिसत आहे.आईचा जीवन प्रवास थोडक्यात मांडत आहे.

                         माझ्या आईच नाव सुमन पण आईच्या माहेरी तीच नाव होतं मथुरा. वडील दादाराव सूर्यवंशी व आई कृष्णाबाई यांचे 6 वे अपत्य म्हणजे माझी आई. सर्वात मोठे मामा व त्यानंतर 7 बहिणी असे 8 भावंडाचे कुटुंब होते.आजोबाची थोडी शेती होती ती करत करत बिकट परिस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवायचे.सर्वात मोठे मामा होते त्यांनी शिक्षण पूर्ण करताच लातूरला अडत दुकानावर नोकरी धरली आणि आपल्या 7 बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. सर्व बहिणी प्रमाणे आईही शाळेत जाऊ लागली.1960-65 च्या काळी त्यावेळी गावात 7वी पर्यंत शाळा होती.आईला शाळेची खूप आवड होती म्हणून तर आईने सर्व बहिणीपेक्षा जास्त शिक्षण घेतलं व गावातच सातवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केले.सातवी नंतर गावात शाळा नसल्याने व घरची परिस्थिती बेताची असल्याने नाविलाजने आईला शिक्षण थांबवावे लागले व लग्नाचा विषय सुरू झाला. 1971 साली दादांचे (माझ्या वडिलांचे)स्थळ आले.त्यावेळी दादा राज्य राखीव पोलीस दलात होते. सरकारी नोकरी म्हटलं की खूप मोठी बाब होती.1966 साली दादा SRP मध्ये भरती झाले व जालना बटालियन मध्ये कार्यरत होते.आई दादांचे लग्न 1971 साली झाले व आमचं कुटुंब जालन्यात स्थायिक झाले.इथून पुढल्या काळात आईने जी जबादारी उचलली ती शेवटच्या श्वासा पर्यंत निभावली.

                      दादांची नोकरी म्हणजे राज्य राखीव पोलीस दलातील.Srp चे कॅम्प ज्या वेळी लागायचे त्या वेळी चार-चार महिने तर कधी वर्ष-वर्ष कुटुंबाला सोडून राहावं लागायचं.अशात घरची जबादारी आई खंबीर व हिंमतीने पार पाडायची.मोठ्या बहिणीचा जन्म 1974 चा व छोट्या बहिणीचा जन्म 1977 चा  दोन मुलींना घेऊन आई SRP कोर्टरला राहायची. मुलींचे दवाखाने, शिक्षण त्यांचा अभ्यास, घरच्या छोट्या मोठ्या जबादाऱ्या आई समर्थपणे पार पडायची. दादांना आपल्या कर्तव्यातून कुटुंबाला द्यायला खूप कमी वेळ मिळायचा पण आईने त्याची जाणीव कधीही होऊ दिली नाही.आईचा स्वभाव शांत व संयमी होता आणि व्यवहारज्ञान ही खूप चांगलं होत.1971 ते 1983 चा काळ आमच्या कुटुंबाचा जालन्यात गेला. लातूर जिल्ह्याची निर्मिती नंतर 1983 साली दादांची बदली लातूर पोलीस मध्ये झाली आणि आमचं कुटुंब गावी रोकडा सावरगावला स्थायिक झाले. जरी आमचं कुटुंब सावरगावला स्थायिक झालं असले तरी दादा मात्र नोकरी निमित्ताने निलंगा,उदगीर,लातूर,चाकूर येथे राहू लागले व आठवड्यातून जसे जमेल तसे गावी येऊ लागले.1985 साली माझा जन्म झाला व  आईवर आणखी एका अपत्याची जबाबदारी वाढली. माझ्या दोन्ही बहिणी गावातल्या शाळेत शिक्षण घेऊ लागल्या व माझंही बालपण आईच्या संस्कारात गावात जाऊ लागलं. घरातील कामे,मुलांचे शिक्षण,शेतीकडे लक्ष,नातेवाईकांच्या सुखदुःखात सहभाग अशा जबाबदाऱ्या आईने समर्थपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे आमच्या कुटुंबात तीन चुलते व तीन चुलत्या यांच्यात सर्वात जास्त आईचे शिक्षण झालेले होते त्यामुळे कुटुंबात आईचा विचार सल्ला ही महत्वाचा असायचा. सर्वांना सांभाळून घेणारी आई व शांत स्वभावामुळे सर्व पुतण्याची आवडती होती. सर्व जण आईला आबई नावाने बोलायचे.दादा पोलीसमध्ये असल्याने घरच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आईवर येऊन ठेपायच्या. दळण,पाणी, किराणा,भाजीपाला,दवाखाना,मुलांचा अभ्यास,शेतीकडे लक्ष,त्याचा हिशेब ठेवणे एवढेच नाही तर शेगडीचे कॉईल बसवणे असो की लाईटचे छोटे मोठे काम असो कोणावर विसंबून न राहता आई स्वतः करायची.आईमुळे दादांना खूप आधार होता.

              माझ व आईच नात तर एवढं घट्ट होत की शब्दात व्यक्त करणे ही जमणार नाही. लहानपणापासूनच  आईचा माझ्यावर खूप प्रभाव होता.कारण ही तसेच होते वडील पोलीसांच्या  नोकरीमुळे कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते त्यामुळे आई व वडिलांची जबाबदारी आई एकटी सांभाळायची. मी शाळेत असताना आईच माझा सर्व अभ्यास घ्यायची.आईने सातवी पर्यंत शिक्षण घेतलं होतं पण ते शिक्षण खूप वेगळं सखोल होत.आईला 30 पर्यंतचे पाढे तोंडपाठ होते एवढंच नाही तर निमकी, पावकी असे पाढे पाठ होते.माझा ज्यावेळी अभ्यास घ्यायची त्यावेळी पाढे सलग न घेता वेगळ्या प्रकारे घेऊन डोक्यात बिंबवले होते.जसे-  किती पाचे पन्नास, किती चौक बावन्न असे पाठांतर घ्यायची.आईचे गणित विषयावर खूप प्रभुत्व होत. आमच्या तिन्ही भावंडाच्या प्रथमसत्र निकाल पत्रकावर आईच्याच सह्या राहायच्या.अभ्यासच नाही तर समाजात कसे राहावे, कसे बोलावे,वडीलधाऱ्याचा आदर राखावा, प्रत्येकाशी प्रेमाने राहावे ह्याचे बाळकडू आईने मला दिले.

                 मी एकुलता एक असल्याने लहानपणा पासून माझा खूप लाड व्हायचा. माझा प्रत्येक वाढदिवस आईने खूप उत्साहात साजरा केला.त्यावेळी ग्रामीण भागात वाढदिवस खूप कमी मुलांचा साजरा व्हायचा त्यात माझा वाढदिवस बहुतांशवेळी गणपती उत्सवात यायचा त्यामुळे दादांना माझ्या वाढदिवसाला कधीच सुट्टी मिळायची नाही सतत गणपती बंदोबस्त लागायचे त्यामुळे आईच सर्व नियोजन करायची. त्यावेळी केक नसायचा पण खूप मजा यायची माझे गल्लीतील मित्र ,शाळेतील मित्र माझ्या वाढदिवसाला असायचे. विशेष म्हणजे आईने प्रत्येक वाढदिवसाची आठवण म्हणून दर वाढदिवसाचे माझे फोटो काढायची.त्यावेळी 1985 ते 1993 दरम्यान गावात फोटो कॅमेरा कोणाकडे नव्हता तरी माझा वाढदिवस झाला की दुसऱ्या दिवशी तालुक्याला मला घेऊन जाऊन फोटो काढायचा हे ठरलेलं होत. आईने माझे 10 वी -12 वी पर्यंत असेपर्यंत सर्व वाढदिवस साजरे केले. ज्यावेळी मी जुने अल्बम चाळतो त्या आठवणी पाहून मन भरून येतं.ज्या काळात एक फोटो काढणं किती अवघड होतं अशावेळी माझे वयाच्या 6 महिन्यापासून ते प्रत्येक वाढदिवसाचे फोटो आठवणीने आईने काढून ठेवले होते.2006 ला रायगड जिल्हा परिषदेचेत नोकरी लागली व सहाजिकच घरचे वाढदिवस  कमी झाले.

              2006 साली नोकरी लागली व प्रथमच मी घर सोडून रायगडला गेलो तेंव्हा मला नोकरी लागलेला आईला आनंद तर होताच पण मी तिच्या पासून दूर जातोय ह्याची ही हुरहुर होती. जरी आईपासून दूर गेलो असलो तरी दररोज दोन वेळा फोन वर बोलणं व्हायचच.गणपती उत्सव,दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो की आईच्या हातचे खायला खूप भारी वाटायचं.सकाळी चहा सोबत चपातीचा नास्ता आवडता असायचा सुट्टी संपत आली की मनाला हुरहुर लागायची व जड अंतकरणाने आईचा निरोप घेऊन रायगडला जायचो.असे 2006ते 2010 पर्यंत चाललं होतं.मे 2010 मध्ये माझं लग्न झालं त्यावेळी वाटलं आता आपलं कुटुंब पूर्ण झालं पण नियतीला हे सुख मान्य नसावं जेमतेम लग्नानंतर 7 महिन्यानंतर 12 डिसेंबर 2010 रोजी आईला ह्रदयविकाराचा झटका आला आणि आई कायमची मला सोडून गेली.

             तो दिवस आजही आठवला की अंगाला काटा येतो. 2006 ते 11 डिसेंबर 2010 पर्यंत रायगडला असताना असा माझा एकही दिवस गेला नाही की मी आईला फोन वर बोललो नाही.नेहमी प्रमाणे 11 डिसेंबर 2010 साली शनिवारी सकाळी 11 वाजता आईच बोलणं झालं व नंतर रात्री जेवण करून बोलणं झालं व नेहमी प्रमाणे मी झोपी गेलो. 12 तारखेला सकाळी 6.30 ला गावावरून फोन आला व आईची घटना समजली. रात्री आईला बोलून मी झोपलो व सकाळी अशी बातमी कानावर पडली तेंव्हा विश्वास तर बसला नाही पण डोकं सुन्न झाले होतं.समजत नव्हतं कस झालं. मित्रांनी लगेच गाडीची व्यवस्था केली व सकाळी 7 वाजता कोलाड वरून निघून 12 तास 500किमीचा प्रवास करत रात्री 7 वाजता मी गावी पोहचलो.

             प्रसंग खूप वाईट होता 12 तासाच्या प्रवासात प्रत्येक क्षण गाडी पुढे जात होती तसे माझं मन मागे भूतकाकात जात होतं.आईच्या आठवणींच्या स्पर्धा लागल्या होत्या, लहानपणापासून चा सहवास वयाच्या 25 व्या वर्षी तुटला होता.आईविना माझं पान ही हलत नव्हतं तेंव्हा हा आघात खूप मोठा होता.रस्त्याने प्रवास कटत नव्हता व मला आईची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.आईजवळ दादा,ताई,दीदी,पत्नी पूनम सर्व गावी होते मीच एकटा लांब होतो. अंतविधीसाठी माझी  सर्व मंडळी माझी वाट पहात होते,  मला घरी जायला रात्रीचे सात वाजले घरी गेल्यास आईचे शेवटचे दर्शन घ्यायची सुद्धा हिम्मत होत नव्हती.असा अचानक आघात मनावर झाला होता की सावरण खूप अवघड होतं माझ्यासाठी.

           दुःख खूप गिळल व दादाकडे पाहून मन खंबीर केलं. आईला अस्थमाचा त्रास होता,हिवाळ्यात हा त्रास अधिक उफाळून यायचा आणि नेमकं तेच झालं होतं व 12 तारखेला सकाळी अचानक घटना घडली व होत्याच नव्हतं झालं.

                आईच अचानक निघून जाणं त्यातून सावरण माझ्यासाठी खूप अवघड होतं. आई म्हणजे माझ्या आणि दादामधील दुआ होती.मी आई हयात होती तो पर्यंत कधीही दादाकडे कांही मागितलं नाही की जास्त बोललो नाही कारण लहानपणीपासून आईचा सहवासच एवढा होता की त्याची मला सवय लागली होती.हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता ह्यातून सावरायला अनेक वर्षे गेली पण अजूनही आईची आठवण आली की मन सुन्न होतं.

             आज खूप धाडसाने लिहलं आहे एक एक शब्द लिहताना मन किती भरलं होत नाही सांगू शकत.गेल्या 12 वर्षांपासून आईबद्दल लिहावं वाटत होतं पण नुसतं लिहायचं म्हटलं की डोळे भरून यायचे मग मी सोडून द्यायचो.गेल्या कांही दिवसापासून मनाची तयारी केली आणि मनाला हिम्मत दिली व आई बद्दल लिहायला घेतल. मी आईबद्दल  कितीही लिहल तरी ते कमीच आहे.माझ्या आईचे कर्तृत्व माझ्यासाठी खूप मोठं आहे.मी आज जे कांही आहे ते माझ्या आईच्या संस्कारामुळे व शिकवणीमुळे आहे.माझ्या प्रत्येक कार्यात माझी आई अदृश्य रुपात माझ्या सोबत आहे.आज माझी आई जरी शरीराने सोबत नसली तरी अदृश्य रुपात सदैव माझ्या सोबत आहे.

 शेवटी कवी  फ मु शिंदे यांच्या चारओळी खूप भावतात.


'आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! 

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही

आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही....'

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

ईटा अन् किटा मध्ये अडकली जिंदगी

             


                            आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करत आहोत.आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत पण आज आदिवासी बांधव ह्या अमृतमहोत्सवात कसा जीवन जगत आहे ते वाड्या-पाड्या पर्यंत जाऊन पाहिल्या शिवाय समजणार नाही.पंचाहत्तर वर्षात देशाने खूप प्रगती केली वायू वेगाने चालणारी बुलेटट्रेन देशात आली,शहरे वाढत गेली गावे ओस पडत गेली पण देशातील आदिवासी बांधव आजही आपल्या वाड्या पाड्यावरच पोटाची घळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहे.आज देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला विराजमान झाल्या त्याची चर्चा गल्ली पासून दिल्ली पर्यंत झाली पण एखाद्या समाजातील एक व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान झाली म्हणजे त्या समुदायाची उन्नती झाला अस होऊ शकत नाही.आज जागतिक आदिवासी दिन सर्वत्र उत्साहात साजरा होईल ही पण वर्षानुवर्षे जीवनाचा संघर्ष करत असलेल्या समाजाच्या शेवटच्या घटकाचा भाकरी साठीचा संघर्ष जो पर्यंत थांबणार नाही तो पर्यंत अशा दिनाला अर्थ राहणार नाही. 

              वर्षानुवर्षे पोटापाण्यासाठी आदिवासी कुटुंबाचे होणारे स्थलांतर हे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खूप घातक परिणाम करत आहे. वीटभट्टी, कोळसा भट्टी,किटा पाडणे (लाकडू तोडणी),ऊस तोडणीसाठी जेंव्हा आदिवासी बांधव स्थलांतर होतात तेंव्हा त्यांच्या सोबत शाळेत असणारे मुलंही स्थलांतर होत असतात.मुलांना शिकण्याची खूप इच्छा असते पण आईवडिलांच्या जीवन जगण्याचा संघर्षात त्यांना शाळा सोडून जावं लागतं.गेल्या 16 वर्षात असे अनेक प्रसंग पाहिले आहेत की मुलांना हातातील वही पेन सोडून रातोरात पालकांसोबत स्थलांतर व्हावं लागतं अशावेळी मनाला खूप वेदना होतात.वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांचे होणारे स्थलांतर हे मुलांच्या शिक्षणाच्या पथ्यावर पडत आहे. डोळ्या समोरून आपलं बिऱ्हाड घेऊन ज्यावेळी पालक मुलांना घेऊन स्थलांतर होत असतात त्यावेळी शाळेकडे पहात पहात पोरांचे व पालकांचे ही डोळे ओले होतात पण पोटाच्या खळगीसाठी काळजावर दगड ठेऊन आदिवासी बांधव स्थलांतरित होत असतात.गेल्या 16 वर्षांपासून आदिवासीवाडीवर शिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येक मुलं शाळेत आलं पाहिजे टिकल पाहिजे व शिकल पाहिजे ह्यासाठी खूप प्रयत्न केले पण अनेकदा निराशा आली. अनेकदा पालकांना हात जोडले,समजावले,विनवण्या केल्या की ,'बाबांनो मुलांच्या शिक्षणासाठी नका होऊ स्थलांतर जर तुम्ही मुलांना घेऊन गेलात तर त्यांचे शिक्षण थांबेल त्यांना वाचता लिहता येणार नाही,त्यांची प्रगती होणार नाही तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी वीटभट्टी,किटा तोडायला नका जाऊ'.अशावेळी पालकांचा एकच सवाल असतो,'गुरुजी आम्हाला पण वाटतं आमची पोर शिकवीत पण आम्हाला धंद्यावर(स्थलांतर) गेल्या शिवाय पर्याय नाही,लग्नसाठी,घरासाठी, इतर कार्यसाठी ठेकेदाराकडून दर वर्षी उचल रक्कम घ्यावी लागते व ती फेडण्यासाठी आम्हला राना वनात ईटा व किटा साठी भटकत जावं लागतं  इथं आम्हाला दररोज काम मिळालं तर आम्ही कशाला गेलो असतो? जर आम्ही नाही गेलो तर आमच्या पोरांचं पोट कस भरायचं, आता तुम्हीच सांगा गुरुजी आम्ही काय करावं?' असे प्रश्नार्थी उत्तरे जेंव्हा पालकांकडून येतात तेंव्हा निःशब्द व्हावं लागतं.जड अंतकरणाने त्यांना निरोप द्यावा लागतो पण त्या लहान पोरांच्या डोळ्यातील शाळेची ओढ पाहून परिस्थिती समोर हतबल व्हावं लागतं.

                    बालवयात ज्या चिमुकल्या डोळ्यांनी शाळेत जायचं स्वप्न पाहिलं होतं शाळा शिकून मोठेपणी डॉक्टर, इंजिनिअर,पोलीस व्हायचं ठरवलं होतं हे मुलांचे स्वप्न परिस्थितीमुळे स्वप्नच राहत आहे. आपल्या प्रत्येकालच वाटत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, नोकरी मिळावी त्याचे जीवन समृद्ध व्हावं पण आदिवासी बांधवांच्या जगण्याच्या संघर्षात ह्या वाटण्याला काहींच अर्थ उरत नाही.ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण?दोष कोणाचं?75 वर्षात आदिवासींच्या उन्नतीसाठी काय बदल झाला? ह्या बाबीवर विचार करून कांहीही साध्य होणार नाही जर  आदिवासी बांधव सक्षम करायचा असेल तर वाड्या पाड्यावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे,वर्षानुवर्षे होणारे स्थलांतरे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत तरचं स्थलांतर रोखले जाईल व प्रत्येक आदिवासी मुलं शाळेत येईल ,गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल व देशाच्या प्रगतीत हातभार लावेल.आज देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात जर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रभावी उपाययोजना आखल्या तर देशाच्या शताब्दी महोत्सवात हाच आजचा आदिवासी बालक उत्साहात व अभिमानाने आदिवासी दिन साजरा करेल. 

✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव(प्रा.शिक्षक,9923313777)

(16 वर्षे आदिवासी वाडीवरील नोकरीच्या अनुभवातून लिहलेला लेख)

मंगळवार, १ मार्च, २०२२

माझ्या गावची जत्रा - सावरगाव रोकडा ता.अहमदपूर, जि.लातूर



लहानपणी महाशिवरात्री जशी जशी जवळ येऊ लागली की ओढ राहायची ती गावच्या जत्रेची.आमच्या गावात संत बापदेव महाराजांच्या मंदिरात दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते व बालपणापासूनच जत्रे बद्दल खूप उत्सुकता राहायची. जत्रा जवळ येऊ लागली की पैसे जमवायचे व जत्रेच्या दिवशी मज्जा करायची हे दरवर्षी ठरलेलं असायचं.जत्रेच्या आदल्या दिवशी मस्त कुस्त्याचा फड रंगायचा पंचक्रोशीतील व बाहेरून अनेक कुस्तीपटू फडात यायचे.आमच्या गावचे पैलवान कै.मधुकर कोटंबे (मधु पहेलवान)म्हणून प्रसिद्ध कुस्तीपटू होते ,दर वर्षी कुस्तीत शेवटची  कुस्ती त्यांची असायची व ते दरवर्षी जिंकायचेच.कुस्तीचा फड काळ्या रानात गोल रिंगण करून भरायचा व गावातील अनुभवी माणसे हे पंच म्हणून फडात असायचे व अगदी आनंदी वातावरणात सायंकाळी दिवस मावळून झापड पडेपर्यंत कुस्तीचा डाव हलकीच्या तालावर रंगायचा हे लहानपणी बघायला खूप मजा यायची.दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा असल्याने झोप लागायचीच नाही, कधी सकाळ होते व जत्रेत जातो असं व्हायचं.सकाळी लवकर उठून बापूदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायच व मस्त मित्रांसोबत जत्रेत फिरायच.

त्यावेळी सर्वात जास्त आकर्षण असायचं ते रहाटपाळण्याचे,जत्रा सुरू होणार म्हटलं की चार दिवस आगोदर पासून लाकडी रहाटपाळणा गावात यायचा व शाळा सुटली की तो पाळणा फिटिंग कसा करतो तिथं पासून ते जत्रा झाल्यास दोन दिवसानंतर तो जाईपर्यंत त्याच्या सहवासात राहायचो. पूर्वी लाकडी रहाटपाळणा असायचा पाळणा सुरू झाला की त्याचा विशिष्ठ आवाज ऐकू आला की गावातील लहानमुले तिथे पळत पळत जमा व्हायचे व आनंद घ्यायचे.जत्रेत दुसरं आकर्षण म्हणजे डब्ब्यातील पिक्चरचे आपला एकडोळा बंद करून त्या छिद्रातून बघायचं व त्यात चलचित्र दिसायचं व तो डब्बेवाल त्या सिन प्रमाणे गाणे म्हणायचा हे लहानपणी खूप भारी वाटायचं.दिवसभर मित्रांसोबत जत्रेत फिरायचं घरी उपवास म्हणून साबुदाणा खिचडी,रताळे खायची व जत्रेत कांडे-बत्ताशे, शेव-भजीच्या दुकानासमोरून गेलो की खमंग वासाने तिकडे आकर्षित व्हायचो व  उपवासावर पाणी सोडुन मस्त शेव भज्यावर ताव मारायचा वरून मोसंबी खाऊन मस्त दिवस घालवायचा. आमच्या गावाला बापूदेवाच सावरगाव म्हणून ओळखले जायचं व सावरगावची जत्रा म्हटली की पंचक्रोशीतील लोक बैलगाडी,चालत जत्रेला यायचे व आनंद लुटायचे.पूर्वी गावच्या चोहीबाजूला नुसत्या बैलगाड्या दिसायच्या व त्या मोजण्यात खूप आनंद वाटायचा.सायंकाळ होत आली की जत्रा विरळ होत जायची व लोक आपआपल्या गावी व घरी परत जायचे तेंव्हा मन नाराज व्हायचं व अस वाटायचं की जत्रा आणखी कांही दिवस असावी. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना खूप निराश वाटायचं कारण काल ह्याच रस्त्याने जाताना अलोट माणसांची गर्दी असायची व आज तोच रस्ता मोकळा दिसायचा पण पुढील वर्षी जत्रा लवकर येणारच ह्या आशेने पटापट पावले टाकत शाळा गाठायची.

आज खूप वर्षांनी महाशिवरात्रीला गावी आलो होतो व जत्रेत फिरलो त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.कोरोनाच्या संकटामुळे गावची जत्रा दोन वर्षे भरली नव्हती व ह्यावर्षी अतिशय उत्साहात जत्रा भरलेली पहायला मिळाली.गेल्या 5-6 वर्षात गावी जत्रेला यायला मिळाले नाही पण यावर्षी जत्रा आहे समजली व रायगड वरून लातूरला जन्मगावी जायचं ठरवलं .जसं आपलं बालपण गावच्या जत्रेत गेलं तसं  आपल्या मुलांनाही गावची जत्रा आनंदता यावी म्हणून अर्णव, अमेयला खास गावची जत्रा दाखवाचीही इच्छा होती तोही चांगला योग आला.आज मुलांसोबत जत्रेत फिरताना व त्यांना जत्रा दाखवताना जुन्या आठवणींना उजळा मिळाला पूर्वीच्या लाकडी रहाटपाळण्याची जागा आता इंजन वरच्या पाळण्यानी घेतली आहे,जम्पिंग जपांग,गोल फिरणारे लोखंडी पाळणे हे नवीन खेळणी प्रकार आताच्या मुलांसाठी आलेले दिसले.पूर्वी 25 पैसे,50 पैसेला ग्यारेगार भेटायचे आज त्या ठिकाणी आईस्क्रीमचे गाडे लागले आहेत,पाणीपुरी ,भेळच्या गाड्या लागल्या आहेत,नवनवीन खेळणी दुकाने लागली आहेत असे अनेक बदल जत्रेत जाणवले पण शेव भज्यांची दुकाने आजही त्याच ठिकाणी आहेत व तोच वास आजही खुणावत होता व  मनाला तृप्त करून टाकत होता.अनेक वर्षे बदलली,जत्रेचे स्वरूप बदलले ,अनेक नवनविन तंत्रज्ञान  बदललं पण आजही गावची अस्मिता ,परंपरा गावच्या जत्रेत कायम आहे, आजही पंचक्रोशीतील अनेकजण दर्शनासाठी येत आहेत जरी आज बैलगाड्या नसल्या तरी दुचाकी, चारचाकी गाड्या गावच्या सीमेवर लागलेल्या आहेत.कोरोनाच्या संकटांनंतर अतिशय उत्साही वातावरणात माझ्या गावची जत्रा साजरी होत आहे.

#माझ्या_गावची_जत्रा....

लहानपणी महाशिवरात्री जशी जशी जवळ येऊ लागली की ओढ राहायची ती गावच्या जत्रेची.आमच्या गावात संत बापदेव महाराजांच्या मंदिरात दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते व बालपणापासूनच जत्रे बद्दल खूप उत्सुकता राहायची. जत्रा जवळ येऊ लागली की पैसे जमवायचे व जत्रेच्या दिवशी मज्जा करायची हे दरवर्षी ठरलेलं असायचं.जत्रेच्या आदल्या दिवशी मस्त कुस्त्याचा फड रंगायचा पंचक्रोशीतील व बाहेरून अनेक कुस्तीपटू फडात यायचे.आमच्या गावचे पैलवान कै.मधुकर कोटंबे (मधु पहेलवान)म्हणून प्रसिद्ध कुस्तीपटू होते ,दर वर्षी कुस्तीत शेवटची  कुस्ती त्यांची असायची व ते दरवर्षी जिंकायचेच.कुस्तीचा फड काळ्या रानात गोल रिंगण करून भरायचा व गावातील अनुभवी माणसे हे पंच म्हणून फडात असायचे व अगदी आनंदी वातावरणात सायंकाळी दिवस मावळून झापड पडेपर्यंत कुस्तीचा डाव हलकीच्या तालावर रंगायचा हे लहानपणी बघायला खूप मजा यायची.दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा असल्याने झोप लागायचीच नाही, कधी सकाळ होते व जत्रेत जातो असं व्हायचं.सकाळी लवकर उठून बापूदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायच व मस्त मित्रांसोबत जत्रेत फिरायच.

त्यावेळी सर्वात जास्त आकर्षण असायचं ते रहाटपाळण्याचे,जत्रा सुरू होणार म्हटलं की चार दिवस आगोदर पासून लाकडी रहाटपाळणा गावात यायचा व शाळा सुटली की तो पाळणा फिटिंग कसा करतो तिथं पासून ते जत्रा झाल्यास दोन दिवसानंतर तो जाईपर्यंत त्याच्या सहवासात राहायचो. पूर्वी लाकडी रहाटपाळणा असायचा पाळणा सुरू झाला की त्याचा विशिष्ठ आवाज ऐकू आला की गावातील लहानमुले तिथे पळत पळत जमा व्हायचे व आनंद घ्यायचे.जत्रेत दुसरं आकर्षण म्हणजे डब्ब्यातील पिक्चरचे आपला एकडोळा बंद करून त्या छिद्रातून बघायचं व त्यात चलचित्र दिसायचं व तो डब्बेवाल त्या सिन प्रमाणे गाणे म्हणायचा हे लहानपणी खूप भारी वाटायचं.दिवसभर मित्रांसोबत जत्रेत फिरायचं घरी उपवास म्हणून साबुदाणा खिचडी,रताळे खायची व जत्रेत कांडे-बत्ताशे, शेव-भजीच्या दुकानासमोरून गेलो की खमंग वासाने तिकडे आकर्षित व्हायचो व  उपवासावर पाणी सोडुन मस्त शेव भज्यावर ताव मारायचा वरून मोसंबी खाऊन मस्त दिवस घालवायचा. आमच्या गावाला बापूदेवाच सावरगाव म्हणून ओळखले जायचं व सावरगावची जत्रा म्हटली की पंचक्रोशीतील लोक बैलगाडी,चालत जत्रेला यायचे व आनंद लुटायचे.पूर्वी गावच्या चोहीबाजूला नुसत्या बैलगाड्या दिसायच्या व त्या मोजण्यात खूप आनंद वाटायचा.सायंकाळ होत आली की जत्रा विरळ होत जायची व लोक आपआपल्या गावी व घरी परत जायचे तेंव्हा मन नाराज व्हायचं व अस वाटायचं की जत्रा आणखी कांही दिवस असावी. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना खूप निराश वाटायचं कारण काल ह्याच रस्त्याने जाताना अलोट माणसांची गर्दी असायची व आज तोच रस्ता मोकळा दिसायचा पण पुढील वर्षी जत्रा लवकर येणारच ह्या आशेने पटापट पावले टाकत शाळा गाठायची.

आज खूप वर्षांनी महाशिवरात्रीला गावी आलो होतो व जत्रेत फिरलो त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.कोरोनाच्या संकटामुळे गावची जत्रा दोन वर्षे भरली नव्हती व ह्यावर्षी अतिशय उत्साहात जत्रा भरलेली पहायला मिळाली.गेल्या 5-6 वर्षात गावी जत्रेला यायला मिळाले नाही पण यावर्षी जत्रा आहे समजली व रायगड वरून लातूरला जन्मगावी जायचं ठरवलं .जसं आपलं बालपण गावच्या जत्रेत गेलं तसं  आपल्या मुलांनाही गावची जत्रा आनंदता यावी म्हणून अर्णव, अमेयला खास गावची जत्रा दाखवाचीही इच्छा होती तोही चांगला योग आला.आज मुलांसोबत जत्रेत फिरताना व त्यांना जत्रा दाखवताना जुन्या आठवणींना उजळा मिळाला पूर्वीच्या लाकडी रहाटपाळण्याची जागा आता इंजन वरच्या पाळण्यानी घेतली आहे,जम्पिंग जपांग,गोल फिरणारे लोखंडी पाळणे हे नवीन खेळणी प्रकार आताच्या मुलांसाठी आलेले दिसले.पूर्वी 25 पैसे,50 पैसेला ग्यारेगार भेटायचे आज त्या ठिकाणी आईस्क्रीमचे गाडे लागले आहेत,पाणीपुरी ,भेळच्या गाड्या लागल्या आहेत,नवनवीन खेळणी दुकाने लागली आहेत असे अनेक बदल जत्रेत जाणवले पण शेव भज्यांची दुकाने आजही त्याच ठिकाणी आहेत व तोच वास आजही खुणावत होता व  मनाला तृप्त करून टाकत होता.अनेक वर्षे बदलली,जत्रेचे स्वरूप बदलले ,अनेक नवनविन तंत्रज्ञान  बदललं पण आजही गावची अस्मिता ,परंपरा गावच्या जत्रेत कायम आहे, आजही पंचक्रोशीतील अनेकजण दर्शनासाठी येत आहेत जरी आज बैलगाड्या नसल्या तरी दुचाकी, चारचाकी गाड्या गावच्या सीमेवर लागलेल्या आहेत.कोरोनाच्या संकटांनंतर अतिशय उत्साही वातावरणात माझ्या गावची जत्रा साजरी होत आहे.













🙏🏻🙏🏻

श्री.गजानन पुंडलिकराव जाधव

मु.पो.सावरगाव रोकडा,ता.अहमदपूर, जि.लातूर.



व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...