सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

ईटा अन् किटा मध्ये अडकली जिंदगी

             


                            आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करत आहोत.आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत पण आज आदिवासी बांधव ह्या अमृतमहोत्सवात कसा जीवन जगत आहे ते वाड्या-पाड्या पर्यंत जाऊन पाहिल्या शिवाय समजणार नाही.पंचाहत्तर वर्षात देशाने खूप प्रगती केली वायू वेगाने चालणारी बुलेटट्रेन देशात आली,शहरे वाढत गेली गावे ओस पडत गेली पण देशातील आदिवासी बांधव आजही आपल्या वाड्या पाड्यावरच पोटाची घळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहे.आज देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला विराजमान झाल्या त्याची चर्चा गल्ली पासून दिल्ली पर्यंत झाली पण एखाद्या समाजातील एक व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान झाली म्हणजे त्या समुदायाची उन्नती झाला अस होऊ शकत नाही.आज जागतिक आदिवासी दिन सर्वत्र उत्साहात साजरा होईल ही पण वर्षानुवर्षे जीवनाचा संघर्ष करत असलेल्या समाजाच्या शेवटच्या घटकाचा भाकरी साठीचा संघर्ष जो पर्यंत थांबणार नाही तो पर्यंत अशा दिनाला अर्थ राहणार नाही. 

              वर्षानुवर्षे पोटापाण्यासाठी आदिवासी कुटुंबाचे होणारे स्थलांतर हे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खूप घातक परिणाम करत आहे. वीटभट्टी, कोळसा भट्टी,किटा पाडणे (लाकडू तोडणी),ऊस तोडणीसाठी जेंव्हा आदिवासी बांधव स्थलांतर होतात तेंव्हा त्यांच्या सोबत शाळेत असणारे मुलंही स्थलांतर होत असतात.मुलांना शिकण्याची खूप इच्छा असते पण आईवडिलांच्या जीवन जगण्याचा संघर्षात त्यांना शाळा सोडून जावं लागतं.गेल्या 16 वर्षात असे अनेक प्रसंग पाहिले आहेत की मुलांना हातातील वही पेन सोडून रातोरात पालकांसोबत स्थलांतर व्हावं लागतं अशावेळी मनाला खूप वेदना होतात.वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांचे होणारे स्थलांतर हे मुलांच्या शिक्षणाच्या पथ्यावर पडत आहे. डोळ्या समोरून आपलं बिऱ्हाड घेऊन ज्यावेळी पालक मुलांना घेऊन स्थलांतर होत असतात त्यावेळी शाळेकडे पहात पहात पोरांचे व पालकांचे ही डोळे ओले होतात पण पोटाच्या खळगीसाठी काळजावर दगड ठेऊन आदिवासी बांधव स्थलांतरित होत असतात.गेल्या 16 वर्षांपासून आदिवासीवाडीवर शिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येक मुलं शाळेत आलं पाहिजे टिकल पाहिजे व शिकल पाहिजे ह्यासाठी खूप प्रयत्न केले पण अनेकदा निराशा आली. अनेकदा पालकांना हात जोडले,समजावले,विनवण्या केल्या की ,'बाबांनो मुलांच्या शिक्षणासाठी नका होऊ स्थलांतर जर तुम्ही मुलांना घेऊन गेलात तर त्यांचे शिक्षण थांबेल त्यांना वाचता लिहता येणार नाही,त्यांची प्रगती होणार नाही तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी वीटभट्टी,किटा तोडायला नका जाऊ'.अशावेळी पालकांचा एकच सवाल असतो,'गुरुजी आम्हाला पण वाटतं आमची पोर शिकवीत पण आम्हाला धंद्यावर(स्थलांतर) गेल्या शिवाय पर्याय नाही,लग्नसाठी,घरासाठी, इतर कार्यसाठी ठेकेदाराकडून दर वर्षी उचल रक्कम घ्यावी लागते व ती फेडण्यासाठी आम्हला राना वनात ईटा व किटा साठी भटकत जावं लागतं  इथं आम्हाला दररोज काम मिळालं तर आम्ही कशाला गेलो असतो? जर आम्ही नाही गेलो तर आमच्या पोरांचं पोट कस भरायचं, आता तुम्हीच सांगा गुरुजी आम्ही काय करावं?' असे प्रश्नार्थी उत्तरे जेंव्हा पालकांकडून येतात तेंव्हा निःशब्द व्हावं लागतं.जड अंतकरणाने त्यांना निरोप द्यावा लागतो पण त्या लहान पोरांच्या डोळ्यातील शाळेची ओढ पाहून परिस्थिती समोर हतबल व्हावं लागतं.

                    बालवयात ज्या चिमुकल्या डोळ्यांनी शाळेत जायचं स्वप्न पाहिलं होतं शाळा शिकून मोठेपणी डॉक्टर, इंजिनिअर,पोलीस व्हायचं ठरवलं होतं हे मुलांचे स्वप्न परिस्थितीमुळे स्वप्नच राहत आहे. आपल्या प्रत्येकालच वाटत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, नोकरी मिळावी त्याचे जीवन समृद्ध व्हावं पण आदिवासी बांधवांच्या जगण्याच्या संघर्षात ह्या वाटण्याला काहींच अर्थ उरत नाही.ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण?दोष कोणाचं?75 वर्षात आदिवासींच्या उन्नतीसाठी काय बदल झाला? ह्या बाबीवर विचार करून कांहीही साध्य होणार नाही जर  आदिवासी बांधव सक्षम करायचा असेल तर वाड्या पाड्यावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे,वर्षानुवर्षे होणारे स्थलांतरे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत तरचं स्थलांतर रोखले जाईल व प्रत्येक आदिवासी मुलं शाळेत येईल ,गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल व देशाच्या प्रगतीत हातभार लावेल.आज देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात जर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रभावी उपाययोजना आखल्या तर देशाच्या शताब्दी महोत्सवात हाच आजचा आदिवासी बालक उत्साहात व अभिमानाने आदिवासी दिन साजरा करेल. 

✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव(प्रा.शिक्षक,9923313777)

(16 वर्षे आदिवासी वाडीवरील नोकरीच्या अनुभवातून लिहलेला लेख)

८ टिप्पण्या:

  1. प्रा.भानुदास बिरादार८ ऑगस्ट, २०२२ रोजी १०:४८ PM वाजता

    विदारक कटु सत्य...

    उत्तर द्याहटवा
  2. शाळेतील मुले,जेव्हा मधेच स्थलातरित होतात, तेव्हा फार वाईट वाटत असते.अस वाटत अरे आता हा छान रुळला,छान अभ्यास करतोय.हा शिकला तर नक्कीच त्यांच्या जीवनात फरक पडणार.पण....पोटासाठी ..... पालकांना सुध्दा आपण दोष देवू शकत नाही मुळात प्रत्येक जीव पोटासाठी जगत असतो. रोजगार नाही अश्यावेळी पालक तरी काय करणार.
    क्रांती दीन साजरा करून यांच्या आयुष्यात क्रांती होणार नाही.हे आपण गेली 75वर्ष बघतोय.मुळात आदिवासी बांधवांच्या गरजा समजून घेवून प्रामाणिक पणे सुविधा पुरविणे. रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मग क्रांती नक्कीच होईल 🙏👍.

    उत्तर द्याहटवा
  3. वस्तुस्थितीची अनुभावाधारीत मांडणी...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जळजळीत वास्तव मांडले आहे तुम्ही
      या मुलांसाठी तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी ते खूप मोलाचे आहे.तुमच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा💐

      हटवा
  4. गावगाड्यातील शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत या देशात जगण्याचा मूलभूत आधार मिळत नाही पोटापाण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत खर स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत पोहचले च नाही असे समजावे

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...