गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

आगळा वेगळा प्रेम दिवस 14 फेब्रुवारी 2018






आज सकाळी 10 वाजता नेहमी प्रमाणे शाळा भरली व मुलं ही आपआपल्या अभ्यासात मग्न होते,दररोज सारखा दिनक्रम चालू होता.दुपारी 2 वाजता शाळेच्या समोर एक गाडी येऊन थांबली व त्या गाडीतून 7 ते 8 महाविद्यालयीन मुली उतरल्या व आमच्या शाळेत आल्या.आमच्या मुलांना कोण ते प्रश्नच पडला.नंतर त्यांची विचारपूस केल्यास समजलं की मुंबई येथील निर्मल निकेतन कॉलेजच्या त्या मुली होत्या व त्यांच्या उपक्रमां अंतर्गत आदिवासी मुलांमध्ये जाऊन त्या वेगवेगळे उपक्रम घेतात व मुलांना कांही तरी नवीन शिकवतात व आनंद देतात.
त्या नंतरचे दोन तास आमचे मुलं व त्या मुलींचे उपक्रमात सहभागी झाले व रमून गेले.चित्रकला स्पर्धा, थंम्ब पेंटिंग,मास्क पेंटिंग, पपेट शो, अशा वेगवेगळ्या कृती घेऊन त्यांनी आमच्या शाळेतील मुलांना खुप बोलकं केलं व आपलंसं करून  जाता जाता प्रेमाचं नातं जोडून गेल्या.मुंबई सारख्या शहरी भागातील कॉलेज विद्यार्थिनींनी आदिवासी भागातील मुलांशी भेटून आपला आनंद त्यांच्या आनंदात व्यक्त करून एक आगळा वेगळा #VALENTINE_DAY साजरा केला व आमच्या शाळेतील मुलांना एक वेगळ्या प्रेमाची आठवण ठेऊन गेल्या.

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

गरज बोलीभाषेतून शिक्षणाची..........

🔵 गरज बोलीभाषेतून शिक्षणाची....🔵




भाषा हे संवादाचे माध्यम आहे.आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा माध्यम म्हणून वापर करत असतो. आपल्या महाराष्ट्रात मराठी ही प्रमाणभाषा असली तरी महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात.सर्व शासकीय व्यवहारासाठी महाराष्ट्रात मराठीचा माध्यम भाषा म्हणून वापर केला जातो. महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहिली तर पश्चिमेला सह्याद्री ,उत्तरेला सातपुडा,पूर्वेला बालघटच्या रांगा अशा भौगोलिक परिस्थितीत महाराष्ट्राची रचना आहे.या पर्वत रांगेत डोंगर दऱ्यात शेकडो वर्षांपासून आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे व त्या आपल्या समूह बोलीच्या माध्यमातून आजतागायत आपले व्यवहार करत असलेले आपण पाहतो,जरी त्यांच्या भाषेला लिपी नसली तरी पिढ्यान पिढ्या ते संवादातून बोलीभाषेची जपवणूक ते करत असतात.त्यांना आपल्या भावना,प्रश्न,विचार व्यक्त करण्यासाठी कधी ही प्रमाणभाषेच्या आधार घ्यावासा वाटत नाही ,ते आपल्या बोलीच्या माध्यमातून आजतागायत सुंदर जीवन जगत आहेत व त्यांची भावी पिढीही याला अपवाद नाही.ज्या महाराष्ट्रात 27%मुले आदिवासी बोलीभाषेतील आहेत व शालेय अभ्यासक्रम हा संपूर्ण प्रमाण मराठीत आहे अशा 27% मुलांच्या बाबतीत भाषेच्या संदर्भात काय घडत असेल याच्यावर 12 वर्षाच्या अनुभवातून थोडस लिहावंसं वाटलं. आदिवासी क्षेत्रातील बोलीभाषेतील मुलांना औपचारिक शिक्षणाची पहिले दोन वर्षे त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण का हवे याचा आलेला अनुभव विशद करावासा वाटतो.
* महाराष्ट्रात विविध विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत.रायगड जिल्ह्यात कातकरी आदिवासी जमातीच्या खुप मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत.रोहा तालुक्यातील अशाच एका वस्तीवर गेल्या 12 वर्षांपासून जि प च्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे.त्यामुळे 12 वर्षात कातकरी आदिवासी समूहाचे जीवनमान ,चालीरीती,त्यांच्या समस्या ,बोलीभाषेचा वापर,शैक्षणिक मागासलेपण याचा जवळून अनुभव घेता आला. सुरवातीच्या काळात माझ्यात व मुलांमध्ये संवाद घडण्यासाठी भाषा हा सर्वात मोठा अडथळा होता ,कारण मुलांची बोली ही कातकरी व माझी मराठी,त्यामुळे संवाद साधताना, बालवयातील मुलांना समजून घेताना खूप समस्या आल्या. शाळेचे माध्यम मराठी व पाहिलीमध्ये दाखल होणारा प्रतेक मूल कातकरी बोलीभाषेतील.अशा वेळी या मुलांना शाळेची गोडी लावणे,शाळेत टिकवणे हे एक आव्हान बनले होते.ज्या मुलांचे आई,वडील,भाऊ,बहीण मित्र परिवार सर्व कातकरी बोलीभाषिक त्या मुलाने वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत कधी मराठी जास्त प्रमाणात ऐकली नाही व बोलली नाही अशा परिस्थितीत तो पहिली इयत्तेत दाखल होतो व त्याला नवीन वातावरणात नवीन शिक्षक नवीन भाषा आत्मसात करायची याचा त्या बालमनावर काय परिणाम होत असेल याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.अशी परिस्थिती एका वाडीवरची, एका मुलाची नव्हती तर ती हजारो ,लाखो बोलीभाषिक मुलांची होती,त्यासाठी त्या त्या पातळीवर काम करण्याची खुप गरज जाणवली. मुलांमध्ये जर शाळेविषयी आपल्या विषयी आवड निर्माण करायची तर त्यांच्या बोलीभाषेत आपण त्यांच्याशी संवाद साधावयाचा प्रयत्न केला पाहिजे असे जाणवले व त्यांच्या बोलीतून निघणारे शब्द व त्यांचा मराठीतील अर्थ असा सुरवातीला 100 शब्दांचा संग्रह बनवला व त्या संग्रहाच्या माध्यमातून व  मुलांमध्ये सतत राहून थोड्या प्रमाणात त्यांच्या भाषेचे ज्ञान होत गेले व हळूहळू त्यांच्याशी त्यांच्याच बोलीत संवाद होऊ लागला .ते मला खुप छान वाटले व मुलांनाही एक आनंददायी वाटतं गेले की आमचे गुरुजी आमच्याशी आमच्या भाषेत बोलतात ते त्या मुळे साहजिकच मुलांची व माझे भावनिक नाते वाढत गेले . त्यांना गुरुजी म्हणजे घरातील सदस्य आणि शाळा घर वाटू लागली .कालांतराने त्यांच्या बोलीत मराठीच्या बालगोष्टी अनुवाद केल्या.संवाद,चित्रकथा तयार करून त्यांना आपल्या घरच्या वातावरणासारखे शाळेचे वातावरण बनवले.नंतर हळूहळू मला जाणवू लागले की भाषेच्या माध्यमात किती ताकद असते ते.
कंटाळा करणारे मुलं शाळेत आनंदाने येऊ लागली शिकू लागली व मजेत शाळेचा आनंद घेऊ लागली.
कांही दिवसांनी एक विचार आला की जर आपण पाठयक्रमातील
कविता,संवाद,चित्रकथा त्यांच्या बोलीत शिकवल्या तर? मग इयत्ता पहिलीच्या बालभारती पाठयपुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवादाला सुरवात केली व कविता,चित्रकथा,संवाद आगोदर मुलांना कातकरी बोलीभाषेत व नंतर मराठी माध्यम भाषेत शिकवायला सुरवात केली.यामुळे मुलांना त्यांच्या भाषेत शिकवल्याने आनंद तर मिळालंच तसेच चांगल्याप्रकारे समजू पण लागले.मी तयार केलेले हे साहित्ये pdf स्वरूपात बनवून रायगड,ठाणे, पालघर,रत्नागिरी,पुणे, सातारा जिल्ह्यातील कातकरी आदिवासी वाडीवर काम करणाऱ्या शिक्षकापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचवले कारण जशी मला समस्या आली तशी इतर कातकरी आदिवासी शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांना ही होती.या बोलीभाषेतील साहित्यामुळे शिक्षकांना मुलांना आपलंसं करण्यात खुप चांगली मदत झाली असे अभिप्राय येऊ लागले.
#बोलीभाषेतून साहित्य निर्मितीचा प्रयोग जरी मी माझ्या पातळीवर राबवला असला तरी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 1975 साली आदिवासी बोलीभाषा कक्षाची स्थापना केली गेली होती.त्यावेळी मडिया,गोंडी,कोलामी वारली व भिल्ली या भाषेत अध्ययन साहित्य निर्मिती झाली आहे.तसेच त्यानंतर च्या कालावधीत ही प्रतेक डायट कॉलेजच्या माध्यमातून त्या त्या बोलीभाषेतील शिक्षकांच्या मदतीने साहित्य बनवले गेले.2015-16 साली scert पुणे व टाटा ट्रस्ट च्या माध्यमातून व  कातकरी,भिलोरी,पावरी,वारली, कोलामी,गोंडी, कोरकू,परिधान,मावची व निहाली या 10 भाषेत गोष्टीचे पुस्तक रुपी साहित्य निर्मिती केली गेली.या गटात कातकरी बोलीभाषेसाठी मला काम करण्याची संधी मिळाली.या साहित्यनिर्मितीचा हेतू एकच की प्रतेक बोलीभाषेतील मुलांना औपचारिक शिक्षणाचे दोन वर्ष त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे.
*शालेय शिक्षणात स्वभाषा हे माध्यम असावे याला एक कारण आहे.त्या शैक्षणिक अवस्थेत अमुक इतके ज्ञान मुलांना द्यायचे तेवढेच नसते तर ज्ञान घ्यायची ओढ मुलात उत्पन करणे आणि ज्ञान ग्रहण करण्याचा सराव होणे या गोष्टीही साधायचा असतात.*
महाराष्ट्र सरकाने शालेय शिक्षणातील दर्जा वाढवण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हा कार्यक्रम सुरु केला.यात प्रत्येक वाड्या, वस्त्यावरील प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे व प्रगत झाले पाहिजे या हेतूने या कार्यक्रमाची आखणी झाली.त्यायला एक उपक्रम म्हणजे शिक्षणाची वारी.2015-16पासून या वारीची सुरवात झाली.विविध विषयासह बोलीभाषेला शिक्षणाच्या वारीत स्थान देण्यात आले. महाराष्ट्रतील आदिवासी  बोली बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन व त्या बोलीभाषेवर काम करणाऱ्या शिक्षकांसाठी आपले उपक्रम महाराष्ट्रा समोर आणण्याची एक चांगली संधी मिळाली.2016 मध्ये झालेल्या पहिल्या शिक्षणाच्या वारीत कोलामी बोलीभाषा साहित्याला संधी मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील श्री.प्रदीप जाधव या शिक्षकाने कोलामी मराठी साहित्य वारीत मांडले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

 कातकरी  शब्दसंग्रह



कातकरी वर्णमाला



      2016-17च्या शिक्षणाच्या दुसऱ्या वारीत माझ्या कातकरी बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे या उपक्रमाला संधी मिळाली व पुणे-नागपूर - औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या वारीत महाराष्ट्रतील 36 जिल्ह्यातील जवळपास 15000 शिक्षकापर्यंत बोलीभाषेतून शिक्षणाची गरज का आहे हे या उपक्रमाच्या माध्यमातून पोहचविता आले.या वारीत महाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यातील आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या भेटी झाल्या,त्यांच्याशी चर्चा झाल्या व सर्वांचे एकच मत आले की आदिवासी बोलीभाषेतील मुलांना त्यांच्याच बोलीत शिकवलं तर लवकर समजते व मुल शाळेत रमते.त्यात कांही असे शिक्षक भेटले की ते महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले.तेथे जि प शाळेत तेलगू भाषिक मुल आहेत.त्यांची समस्या अशी होती की सर्व मुले तेलगू भाषिक व आपला अभ्यासक्रम मराठी मध्ये अशा वेळी आम्ही मुलांना शिकवायचं कसं?मुलांना गोडी लावायची कशी? असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते.मुळात संपूर्ण महाराष्टासाठी शालेय अभ्यासक्रमासाठी  मराठी भाषा  माध्यमभाषा म्हणून वापरली जाते तेंव्हा प्रत्येक बोलीभाषेत राज्यस्तरावरून बोलीभाषेतील पुस्तके बनवणे शक्य नाही.अशा वेळी ज्या क्षेत्रात जी बोलीभाषा आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्या मदतीने त्या त्या बोलीभाषेत द्विभाषिक साहित्य तयार करून त्या त्या बोलीतील मुलांशी संवाद साधला पाहिजे व तसे प्रयत्न होत ही आहेत.
2017-18 च्या शिक्षणाच्या वारीत पालघरचे शिक्षक श्री राजन गरुड यांनी वारली बोलीभाषेत,उस्मानाबाद चे शिक्षक श्री उमेश खोसे व लातूरच्या शिक्षिका सौ.नीता कदम यांनी बंजारा बोलीभाषेत अतिशय चांगले अध्ययन साहित्य तयार केलेले पाहायला मिळाले तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून बोलीभाषेतील गीते,गोष्टी यांचे विडिओ साहित्य बनवलेले पाहायला मिळाले.
तसेच सर्व बोलीभाषेतील साहित्य शिक्षण विभागाच्या मित्रा अँप वर उपलब्ध होणार आहे.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रतेक मूल 100%प्रगत झाले पाहिजे या हेतूने प्रतेक आदिवासी  बोलीभाषेतील मुलं शाळेत आले पाहिजे, टिकले पाहिजे व शिकले पाहिजे याचे प्रयत्न त्या त्या आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक प्रामाणिकपणे तळमळीने करत आहेत.
बोलीभाषेतील मुलांना त्यांच्या बोलीत औपचारिक शिक्षणाचे पहिले दोन वर्षे जर संवाद साधला तर ते मूल 100% टिकते व शिकते हे 12 वर्षाच्या अनुभवावरून सांगावे वाटते. यासाठी आदिवासी बोलीभाषिक मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिकवण्याची गरज का? या विषयावर मत व्यक्त करावसं वाटलं.....


पाठ्यपुस्तक अनुवाद इयत्ता १ ली

तीस लागनेल कावळा ( तहानलेला कावळा )


टोपीवाला अन केल्या (टोपीवाला आणि माकडे) 


✍🏻..
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
प्राथमिक शिक्षक
रा.जि.प.शाळा संतोषनगर
ता.रोहा,जि.रायगड
📱- 09923313777

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...