शनिवार, २८ मार्च, २०२०

व्यक्तिरेखा- माझी आजी....

माझी आजी कै.काशीबाई यशवंतराव जाधव
                 आजी-आजोबा म्हटलं प्रत्येकला आपलं बालपण आठवत व त्या बालपणात सर्वात जास्त लाड कोण करत असेल तर ते आजी आजोबा करतात. प्रत्येकाला यांचा सहवास लाभतोच असा नाही पण ज्यांना लाभतो त्यांना त्या बालपणाच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहतात.माझी म्हणण्यापेक्षा आमची आजी ही घरातील सर्वात मोठी व्यक्ती कारण माझे वडील सहा महिन्याचे असताना आजोबांचे निधन झाले व पुढील 60 वर्षाच्या हयातिच्या काळात आजी ह्या सर्व कुटुंबाच्या सोबत राहिल्या.4 मुलं 4 सुना ,1 मुलगी-जावई व एकूण 17 नातवंड हा आजीचा परिवार व त्या परिवारातील सर्वात शेवटचा सदस्य म्हणजे मी. माझ्या वयाच्या 22 व्या वर्षा पर्यन्त आजीचा सहवास लाभला व आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले पण आजीने केलेलं संस्कार,शिकवण आजही आचरणात आहे. ऐन तारुण्यात पतीचे निधन सोबत 5 मुलं त्यात अत्यंत गरीब परिस्थिती याचा सामना करत आजीने आमचं कुटुंब कस घडवलं त्या आजीच्या संघर्षमय जीवनावर लिहण्याचा विचार केला व घरातील सर्वात लहानगा नातू या नजरेतून आजीचे जीवनपट मांडण्याचा प्रयत्न करत आहे....
आजीचं नाव काशीबाई, अहमदपूर तालुक्यतील सोरा गावातील श्री कृष्णाजी व अंजनाबाई यांच्या त्या कन्या.तीन भाऊ व दोघी बहिणी असे पाच भावंड, हरीराम,पांडुरंग,विठ्ठल,काशीबाई व प्रयागबाई असे भावंडाचे नावे. काशीबाईचा विवाह अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील श्री एकनाथराव जाधव यांचा मुलगा श्री यशवंतराव जाधव यांच्याशी 1925 ते 30 च्या दरम्यान साली झाला. आजोबांच्या घरची परिस्थिती बेताची थोडीफार शेती व त्याच्यवर कुटुंबाची गुजराण चालायची.त्यात मराठवाडा म्हणजे दुष्काळ पाचवीला पुंजलेला कधी कोरडा तर कधी ओला त्यात निजाम राजवट 1948 पर्यन्त आमचं गाव हैद्राबाद संस्थानात होत त्यामुळे ब्रिटिश सरकारचा कांही सम्पर्क तेथे आला नाही. अशा परिस्थितीत आजी आजोबांचा संसार सुरु होता त्यात कमी जास्ती आजींना माहेरचा खूप आधार होता.जसे वर्ष लोटत गेले तसे कुटुंब पण वाढत गेले 4 मुलं व 1 मुलगी घरात आले. सर्वात मोठे श्री नानासाहेब दोन नंबर श्री प्रल्हादराव,तीन नंबर सुंदरबाई,चार नंबर उद्धवराव व पाचवं अपत्य म्हणजे माझे वडील श्री पुंडलिकराव असा आजी आजोबांचा 7 सदस्य असलेले कुटुंब होते. पण माझे वडील सहा महिन्यांचे असताना आजोबांचे अकाली निधन झाले व आजीच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, 5 मुलं व समोर दिसणाऱ्या अनेक अडचणी यामुळे आजी खचुन गेली अशा अवस्थेत समोर अनेक प्रश्न,अडचणी यांचा सामना कसा करावा हा आजीपुढे मोठा प्रश्न होता.पण त्यावेळी आजीच्या मदतीला धावून आले ते माहेरचे माणसं वडील,भाऊ खम्बीरपणे आजींच्या पाठीमागे उभे राहिले व पुढील कठीण प्रसंगात आजीला साथ दिली.
त्या वेळी मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा जोर धरला होता व रज्जाकार ने मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार सुरु केला होता तेंव्हा खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अशा वेळी आपल्या 5 मुलांना एकत्र ठेऊन आजीला एकटीला संसाराचा गाडा हाकने अवघड होते म्हणून तिने आपले दोन मोठे मुले श्री नानासाहेब व प्रल्हादराव यांना आपल्या वडिलांकडे राहायला पाठवले व सोबत एक मुलगी व दोन छोटे मुले राहू लागले. अशा कठीण परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाची पण खूप मारामार होती अशावेळी आजीचे भाऊ श्री पांडुरंग मामा यांनी आपल्या भाच्यासाठी व बहिणीसाठी जीवाचे रान केले.सर्व धान्य ,तेल,कडधान्य ते सोरा या गावावरून बहिणीला बैलगाडी ने पुरवत व जे दोन मोठे भाचे होते त्यांचा सांभाळ पण आपल्या पोराप्रमाणे करत. दिवस जसे जात होते तसे मुलं मोठे होत होते त्यातील छोटे दोघे गावातील शाळेत जाऊ लागले श्री उध्ववराव व पुंडलिकराव यांनी गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरवात केली व मोठे दोघे मामाकडे राहून मामांना शेतीच्या कामात मदत करू लागले. कांही दिवसानी उपवर झाल्यास श्री नानासाहेब व प्रल्हादराव यांचे दोनाचे चार हात मामांनी करून दिले त्यात थोरले नानासाहेब यांना धानोरा येथील शिंदे घराण्यातील कांता यांच्याशी व प्रल्हादरावला मामाची मुलगी मथुरा यांच्याशी विवाह लावून दिला. लग्नानंतर दोघे मोठे भाऊ आपल्या गावी म्हणजे सावरगावला परत आले तेंव्हा राहायला खूप छोटं घर होत त्यात एवढं मोठं कुटुंब राहणे शक्य नव्हतं तेव्हा विठ्ठल मामांनी पुन्हा स्वतःच्या पैशातून नवीन जागा खरेदी केली तेथे राहण्याची व्यवस्था केली व आपल्या बहिणीचा व भाच्याला मदत म्हणून त्यावेळी बैलजोडी विकत घेऊन दिली व त्यांचा गाडा सुरळीत करून दिला. त्या दरम्यान एकुलती एक बहीण सुंदरबाईचा विवाह बोरगाव येथील विश्वनाथ भदाडे यांच्याशी मामांनी लावून दिला.त्यात जे छोटे दोघे होते उद्धवराव व पुंडलीकराव हे 4 थी पर्यन्त गावच्या शाळेत शिकले व नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे गुराखी म्हणून गावात सालगडी राहिले व आपल्या दोन मोठ्या भावांना शेती कामात मदत करू लागले. पण उद्धवराव यांच शेतीत मन रमत नव्हतं त्यांना काही तरी वेगळं करण्याची धडपड सतत असायची सलग 6 ते 8 वर्ष दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून नोकरी करून ते कंटाळले होते व एक दिवस पळून गेले ते थेट पोहचले लातुर येथील सैन्य भरती ठिकाणावर व आपल्यात असलेल्या जिद्दीच्या बळावर ते सैन्यात भरती झाले पण हे घरच्यांना कोणाला माहित नव्हते इकडे आजी व सर्व कुटुंब काळजीत पडलं नेमकं काय झालं उद्धवराव गेले कुठे ,आजीच काळीज तर आईच पण त्यावेळी कुठलेच सम्पर्काची सुविधा नव्हती अशावेळी तब्बल तीन महिन्यांनी उद्धवरावचे पत्र आले व तेंव्हा समजल की उद्धवराव सुखरूप आहेत व सैन्यात भरती झाले आहेत.आजीला खूप आनंद झाला कारण कठीण परिस्थितीत लोकांच्या घरी सालगडी म्हणून काम केल्यानंतर आपला मुलगा भारतीय सैन्यात भरती आला हि खूप सुखद घटना होती.हा काळ होता 1962 चा. त्यानंतर आपला मोठा भाऊ सैन्यात गेला म्हणून छोट्या पुंडलिकरावनां(माझे वडील) पण उत्साह वाढला व आपण पण आपल्या भावाप्रमाणे देशसेवा करायची व नोकरी करायची अस वाटू लागलं 2 वर्ष सालगडी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी  1965 च्या सैन्य भरतीत गेले पण तेथे यश आले नाही पण हताश न होता प्रयत्न सुरु केले.त्या दरम्यान जालना येथे वडिलांचे सख्खे चुलत भाऊ श्री विठ्ठलराव जाधव हे जालना येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते तेंव्हा गावातील अनेकांना समजल की जालना येथे भरती आहे तेंव्हा वडील भरतीला गेले व 1966 साली SRP मध्ये भरती झाले.
आपला एक मुलगा सैन्यात व एक मुलगा पोलीस खात्यात नोकरीला लागला हे पाहून आजीला आपण केलेल्या संघर्षाचे सार्थक झाले असे वाटले. दरम्यान मोठे दोघे भाऊ शेती करू लागले व त्यांना या दोन नोकरदार भावाचा आधार मिळाला व चांगल्या प्रकारे आजीचे कुटुंब चालू लागले त्यात सैन्यात असलेले श्री उद्धवराव यांचा विवाह 1967 साली घनसरगाव ता रेणापूर येथील शिंदे कुटुंबातील शांता यांच्याशी झाला व पोलीस खात्यात असणारे श्री पुंडलिकराव यांचा विवाह 1971 साली आरजखेड ता.रेणापूर येथील सूर्यवंशी कुटुंबातील सुमन यांच्याशी झाला.आजीचे  मुलं आपापल्या सांसारत लागले होते दोघे शेतीत रमले होते,सैन्य दलातील सम्पूर्ण देशभर आपलं कर्तव्य बजावत होते तर SRP मधील जालना येथे राहत होते.आजींना आता लेका सुनांच्या हातात कुटुंबाची जबाबदारी देऊन नातवंडात दिवस घालवायचे होते. बघता बघता आजीचा वटवृक्ष फुलत होता मोठ्या मुलाला 4 मुलगे झाली दुसऱ्याला 1 मुलगा 3 मुली,मुलगी सुंदरबाई ला 3 मुलगे,तिसरा मुलाला 2 मुलगे 1 मुलगी व चौथ्याला 2 मुली व 1 मुलगा. या 17 नातवंडात सर्वात लहान मी होतो त्यामुळे आपसूकच घरात मीच लाडाचा होतो.पण आजीचा जीव सर्व नातवंडावर सारखाच होता. आमच्या आजीचा स्वभाव म्हणजे खूप करारी बाणा होता त्या सतत आपल्या मतावर ठाम राहायच्या त्यांना कोणाच्या अधिपत्याखाली राहायला कधीच आवडत नव्हतं,स्वाभिमानी होत्या कारण त्यांनी खूप सोसल होत जीवनात अनेक चढ उतार पाहिले होते.पडत्या काळात  वेळोवेळी त्यांना त्यांच्या भावांनी जी साथ दिली ते नेहमी त्याचा उल्लेख करत असत. आम्ही सर्व नातू शिकून मोठे व्हावेत असे आजींना नेहमी वाटायचे व त्या प्रमाणे सर्व नातवांनी चांगले शिक्षण घेतले हि व आज त्यातील कोणी प्राध्यापक,शिक्षक,सैन्यात,क्लर्क,खाजगी आस्थापणेत कार्यरत आहेत.पण आज एक खंत वाटते आमच्या भावंडातील 8 मुलगे व 6 मुली सर्वानी शिक्षण घेतलं पण सामाजिक बंधने व मुलगी शिकून काय करणार या विचाराने माझ्या 6 बहिणी हुशार असून ही त्यांना दहावीच्या पुढे शिकता आलं नाही ,मुलगी 10 वी झाली की तिच्या लग्नाचा विचार केला जायचा पण आज वाटतंय जर घरच्यांनी मुलींना शिकण्याची परवानगी दिली असती तर आज माझ्या बहिणी चांगल्या पदावर असत्या.
आजींना नातवांचं खूप कौतुक वाटायचं माझे नातू नोकरदार आहेत असे ती अभिमानाने सांगायची.जेंव्हा मला 2006 ला रायगड जिल्ह्यात नोकरी लागली तेंव्हा तर आजी खूप रडली कारण सर्वात छोटा नातू नोकरीसाठी घरापासून एवढा लांब जाणार हे तिला वेगळं वाटायचं ,पण जेंव्हा जेंव्हा मी सुट्टीला यायचो तेंव्हा तिला खूप आनंद व्हायचा.जसा तीचा नातवावर जीव होता तसाच नातंसुना नातंजावयावर पण होता.सगळ्यांना आजी म्हणजे आधार वाटायच्या.पण जस जस वय वाढत गेले तशी आजीची तब्यत खालावत गेली व आजींचे निधन 2008 साली झाले. आजी जरी आम्हाला सोडून गेली असली तरी तिचे संस्कार ,शिकवण आजही कामी येतात.आज आजींची पणतूं मंडळी शिक्षण घेत आहेत घरातल्या मुलींना शिक्षणाचे दारे खुले झाले आहेत घरच्या मुली आता इंजिनियर,डॉक्टर ,उच्च शिक्षण घेत आहेत,घरात 3 डॉक्टर होत आहेत,अभियंते होत आहेत,वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.आज आजींचे वटवृक्ष बहरत आहे आज आजीचे कुटुंब 60 ते 70 सदस्यांचे झाले आहे.आज कुटुंबातील सदस्यांना  अभिमानाने सांगावे वाटते की आम्ही काशीबाई आजींचे नातू,पणतूं आहोत. आज माझे मोठे काकानीं जवळपास वयाची 85 गाठली आहे व वडिल त्र्याहत्तरच्या घरात आहेत आज जेंव्हा  सर्व काकांशी वडिलांशी जेव्हा त्यांच्या बालपणा बद्दल विचारतो तर ते खूप आत्मयतेने सांगतात की आमच्या पडत्या काळात आम्हाला सोऱ्याच्या विठ्ठलमामा,हरीराममामा,पांडुरंगमामा यांनी खूप मदत केली व त्यांचे उपकार आम्ही नाही विसरू शकत. आम्ही जे कष्ट केले व तुम्हा मुलांना शिकवलं ,मोठं केलं या परिस्थितीची जान ठेऊन तुम्ही सर्वानी राहील पाहिजे असा सल्ला नेहमी देत असतात.
आजच्या या टप्प्यावर आजी आमच्या सोबत नाही पण आजींने जे संस्काराचे मोती आपल्या मुलांमार्फत आमच्या नातवंडात व पुढच्या पिढीला दिले आहेत हे कायम आमच्या आचरणात असतील.......
✍️...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
09923313777

१० टिप्पण्या:

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...