शनिवार, २३ मे, २०२०

मामाच्या गावाला जाऊया...

माझे मामा श्री श्यामराव सूर्यवंशी-आराजखेड
बालपाणी उन्हाळी सुट्टीची चाहूल लागली की प्रत्येकाला मामाचे गाव खुणावत असते,वार्षिक परिक्षा झाल्या की आपण आईपाशी हट्ट धरत मामाच्या गावी जाण्याचा बेत आखत असतो व एकदा का वडिलांची परवानगी मिळाली की मग मामाच्या गावाला जाऊन काय काय धमाल  करायची याचे नियोजन मनातल्या मनात सुरु असते. इतर मुलांप्रमाणे ही मला सुट्टीत मामाच्या गावी जाण्याची उत्सुकता असायची पण वडील पोलीस खात्यात असल्याने व त्यांना ड्युटीवर सतत जावे लागत असल्याने दर वर्षी जेमतेम 8 ते 10 दिवस मामाच्या गावी राहण्याचा योग यायचा.
माझ्या मामाचे गाव आराजखेड हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मांजरा नदीकाठी वसलेलं टुमदार खेडेगाव.मामाच्या गावी आजी ,मामा,मामी व त्याचे मुलं राहायचे, तसं माझ्या आजोळी आजींचे खूप मोठं कुटुंब 1 मुलगा 7 मुली यांचे 33 नातवंड आजींना होते,आजीला आम्ही सर्व माय म्हणायचो व या माईचा परिवार हि असा विशाल होता. हे सर्व भावंडे लहान असताना आजोबांचे निधन झाले व सर्वात जेष्ठ मामा असल्याने कमी वयात 7 बहिणी व आईची जबाबदारी मामावर पडली व मामांनी ही अतिशय जबाबदारीने सर्व बहिणींचे लग्न लावून त्यांचा संसार सुरळीत करून दिला.मामा मामींनी आईवडिलांच्या भूमिकेत कर्तव्यपार पाडत सर्व बहिणींची काळजी घेत त्यांना प्रेम दिले. प्रेमापोटी सर्व बहिणी व भाचे मंडळी जसे जमेल तसे मामांना मामींनी भेटायला जात व जिव्हाळा जपत.मामाचे नाव श्री श्यामराव सूर्यवंशी,सडपातळ शरीरयष्टी,रुबाबदार मिशी,अंगात धोतरजोडा सतत घातलेला ,कपाळावर गंध,गळ्यात तुळशीमाळ, डोक्याला टोपी असे मामाचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते. मामांचे जसे आपल्या 5 मुलांवर जीव होता तसाच 28 भाच्यांवर ही तीच माया होती म्हणून जरी सर्व एकत्र आले तरी कधी वाटलं नाही आपल्या मामाच घर छोट आहे व त्यात आपण कसे राहावं.
बालपणी शाळेला उन्हाळी सुट्टी लागली की आई सोबत मामाच्या गावाला जायचो.माझ्या गावावरून तालुक्याला व अहमदपूरवरून लातूरला जावं लागायचं.लातूरला जुने बस स्थानक आहे तेथून खेडेगावला गाड्या लागायच्या मग लालपरीची वाट पाहत पाहत दुपार व्हायची ,पूर्वी त्या बस स्थानकाच्या पाठीमागे लातूरचे रेल्वे स्टेशन होते मग तिथे थांबलेल्या रेल्वे डब्याकडे पाहून वेळ घालवायचा.दुपारी साई स्टॉप ची गाडी आली की गाडीत बसून मस्त खिडकीतून मागे पाळणारे झाडे बघत प्रवास करायला मजा यायची.त्यावेळी बस साई स्टॉप पर्यन्त जायची व तेथून पुढे आराजखेडला एक ते दीड किमी चालत जावं लागायचं.साई स्टॉपला मांजरा नदीवरील जलशुद्धीकरण केंद्र होत व तेथून लातूरला पाणी पुरवठा व्हायचा त्यामुळे तेथे अतिशय थंड वातावरण व उन्हाळ्यात ही हिरवीगार उंचच उंच निलगिरीचे झाडे,आंब्याचे झाडे सतत खुनवत असत.मला तो भाग खूप आवडायचा त्याला 'नळाला' असे नाव होते.नळावर बस मधून उतरल्यास 1km पायी चालत जावं लागायचं त्यावेळी बैलगाडीची वाट व रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी बाभळीचे दाट झुडपे असायची त्याला वेडी बाभळ म्हणतात.तो भाग मांजरा नदीच्या काठीचा असल्याने सर्व गाळाची काळी जमीन व त्यामुळे ह्या काटेरी बाभळीचे झाडे खूप असायची.जसे जसे पाऊल पुढे पडायचे तशी उत्सुकता वाढायची कारण पुढील प्रवास माझ्या नेहमी आवडीचा असायचा.गावाच्या जवळ जवळ आलो की समोर टुमदार आराजखेड दिसायचं व जवळ संथ वाहणारी मांजरा दर्शन द्यायची. गावा पर्यन्त पोहचायला मांजरा नदी ओलांडावी लागायची व हाच नदी पार करायचा प्रवास नेहमी आनंददायी असायचा.त्यावेळी मांजरा दुथडी भरून वाहायची ,तिचे पात्र व पाणी मनाला मोहून टाकायचे. सकाळपासून सुरु असलेला प्रवास दुपारी 4च्या सुमारास मांजरातीरी आल्यास प्रवासाचा थकवा कधी गेला समजायचा नाही.त्यावेळी नदीच्या ह्या टोकावरून गावात जायचं असेल तर कलई(गुळ बनवतात ते पात्र)मधुन जावं लागायचं व तेवढाच प्रवास खूप आवडायचा.मग काय नदीच्या दोन तीरावर दोन झाडांना किंव्हा लाकडी खुंटीला दोर बांधून कलई मधून प्रवास करत मांजरा पार करायची व आरजखेड भूमीत प्रवेश करायचा.कलईतून उतरताना सुंदर दृश्य दिसायचे मुल पाण्यात पोहत असायची,गावातील लोक पाणी भरायचे,महिला धुणे धुवण्यासाठी यायच्या व समोर उंच चढणीवर गाव दिसायचं.गावात प्रवेश करेपर्यंत दुतर्फा झाडी असायची व समोर मारुतीचे मंदिर दिसले की गाव आलं समजायचं व एकदाचे उंचावरील बुरुजावर मामाच घर गाठायचं.घरी माय, मामी स्वागताला आसायच्याच मामा त्यावेळी लातूरला अडतदुकानात कामाला होते त्यामुळे त्यांची भेट संध्याकालीच व्हायची.घरी गेल्यावर आजी कुटका उतरून टाकायची व हात पाय धुऊन मग मामीच्या हातचा गरम गरम दूध चहा घेतला की निवांत वाटायचं. आईच्या मामीच्या आजीच्या गप्पा रंगायच्या त्यात जोडीला जवळ सासर असलेल्या एक दोन मावश्या भेट होईल या हेतूने यायच्या व मेळा जमायचा. रात्री मामा आल्यास गप्पा व्हायच्या जेवण करून मस्त माळवदावर(धब्याच्या घराचे छत) झोपायला जायचो. सुंदर नभागंण बघत ,चांदण्या मोजत व मध्येच नजर फिरवत डावीकडे रेणापूर फाट्यावरचे टीमटीमनारे दिवे व उजवीकडे लातूरच्या दिव्यांची माळ पाहत सोबत असलेल्या मावसभाऊ,मामाच्या मुलांसोबत गप्पा मारत मांजरा तिरावरून येणाऱ्या थंड झुळकेत झोप कधी लागायची हे समजायचं नाही.
पहाटेचा गार वारा झोंबला की हळूच चुळबुळत जाग यायची सकाळी सकाळी उंचारून दिसणारे नदी पलीकडील हिरवीगार शेती पाहून मन प्रसन्न व्हायचं. घरा पासून नदी थोडी दूर असल्याने त्यावेळी पाणी पकालीत आणायची सोय होती म्हणजे रेडयाच्या पाठीवर चामडी पाण्याची मोठी पिशवी टाकायची व त्यात पाणी भरायचं व घरोघरी पोहचवायच. पखाल पहायला मला खूप आवडायचं व त्याची दोरी सोडून पाणी भरायची मजा कुछ औरच असायची.
घरी चहा पाणी घेऊन मग नदीवर पोहायला जायचो ,मामाचे मुलं मोठे होते त्यामुळे त्यांच्या सोबत नदीवर अंगोळीला जायला खूप मजा यायची.मांजरेचे विस्तीर्ण पात्र,संथ वाहणारे पाणी व त्या पाण्यात डुबकी लावायला मिळणे म्हणजे सुट्टीचा खरा आनंद उपभोगल्या सारखं वाटायचा. पोहून घरी आल्यावर मामीच्या हातच्या चुलीवरची गरमगरम भाकरी,दही ठेचा चटणीवर ताव मारायचा व तिखट लागली की मग मामी आडीतील मातीच्या गाडग्यात दूध तापवून खाली राहिलेलं खरडण नदीतील शिंपल्याने खरडून काढून खायला द्यायच्या.त्या खरडणाची मजाचं वेगळी होती आजही ते आठवलं तर तोंडाला पाणी सुटते.मग दुपारी मामाच्या मुलांसोबत शेतात जायचो,आमचं गाव डोंगराळ भागातील पण मामाच्या गावची जमीन नदी काठची असल्याने कसदार व काळीभोर होती.शेजारी मांजरा असल्याने उन्हाळा आहे की हिवाळा याची जाण व्हायची नाही.मामाच्या शेतात आंब्याचे झाडे होते व त्या आंब्याच्या झाडावरील पाड(झाडावर पिकलेले आंबे)दगडाने पाडून खायला खूप मजा यायची व कांही कच्चे आंबे पाडून मग त्याची शेतातच भट्टी लावायची व जसे जमेल तेंव्हा ते आंबे पिकले की फस्त करायचे असा दिनक्रम असायचा.माझ्या मामाला तीन मुलं मोठा मुलगा दिलीप हा शिक्षक म्हणून औरंगाबाद येथे नोकरीला होता व मधवा हणमंत एक उत्कृष्ट चित्रकार हा गावात राहायचा तर शेवटचा आनंद हा औरंगाबाद येथे मोठ्या भावाकडे शिक्षणासाठी असायचा त्यामुळे हणमंत दाजीशी आमची जास्त गट्टी असायची.जेवढे दिवस मामाच्या गावी राहायचो तेंव्हा जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवायचो.
सायंकाळी सूर्य मावळातीला आला की पाय आपोआप गावात असलेल्या अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे ओळायचे ते ठिकाण गावाच्या बाहेर एका उंच भागावर होते,अतिशय रम्य ठिकाण तेथे गेल्यावर मन प्रसन्न वाटायचे, सायंकाळी येणारा गार वारा,समोर नजरेस पडणारी संथ वाहणारी मांजरा,नदीतून घराकडे पोहत येणारे जनावरे,डोक्यावर भारे घेऊन येणारे शेतकरी हे दृश्य मावळतीच्या सुर्यास्तास पाहून त्या ठिकानावरून घरी जायची इच्छा व्हायची नाही पण अंधार पडू लागला की घराची वाट धरायची व घर गाठायचे.
आज 25 ते 30 वर्षानंतर आजही ते बालपणीच्या मामाच्या गावच्या रम्य आठवणी आठवल्या की खूप छान वाटत.या मध्यंतरीच्या काळात मामांनी आपल्या 5 मुलांचे संसार थाटून तर दिलाच पण 28 भाच्यांच्या पाठीमागे खम्बीर उभे राहून त्यांचे लग्न पार पाडले. आज आजी हयात नाही तसेच आई सहीत तीन बहिणींनी मामाची साथ सोडली पण आजची मामा राहिलेल्या चार बहिणी, 28 भाचे यांची सतत आपुलकीनं विचारपूस करतात.मलाही 15 दिवसातून एकदातरी मामांचा फोन असतो व मामाशी बोललो की एक वेगळंच समाधान भेटून जात.आज मामा 90च्या घरात आहेत प्रकृती साथ देत नाही तरी त्यांचा सर्व नातलंगाशी संवाद हा कायम राहतो,त्यांना आपल्या माणसाशी बोलून जो आनंद मिळतो हेच त्यांच्या जीवनाची संजीवनी आहे.मामांने उभ्या आयुष्यात जी प्रेमरूपी माणसे जोडून जी कमाई केली आहे ह्या संपत्तीची बरोबरी कोठेच होऊ शकत नाही.मामांना शतायुष्य लोभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
✍🏻..श्री गजानन पुंडलिकराव जाधव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...