बुधवार, १ डिसेंबर, २०२१

व्यक्तिरेखा :- दादा


दादा म्हणजे माझे वडील. खर तर  दादांच व्यक्तिमत्व माझ्या नजरेतून शब्दात सिमीत करण्यासारखं नाही पण दादांचा जीवनपट नेहमीच मला प्रेरणादायी ठरला आहे. 
वयाच्या 10 वर्षी 4थी मध्ये असताना शाळा सोडून 25 रुपये महिन्याने गुर राखण्याची नोकरी ते पोलीस दलातून सेवानिवृत्ती हा दादांचा जीवनप्रवास खूप भावस्पर्शी व प्रेरणादायी आहे. दादांचा हा प्रवास आपल्यासमोर व्यक्तिरेखा स्वरूपातून मांडत आहे.
 माझे आजोबा यशवंतराव व आजी काशीबाई यांच्या पाच अपत्यापैकी पाचवे अपत्य दादा म्हणजे पुंडलीकराव यशवंतराव जाधव.दादांचा जन्म 1946 मधील.दादा अवघे 6 महिन्यांचे असताना आजोबांचे निधन झाले व नजाणत्या वयात वडिलांचे छत्र हरवले.5 मुलांची जबाबदारी आजीवर आली.घरची परिस्थिती बिकट तेंव्हा दादांच्या मामांनी घराला आधार दिला व आजीने 5 मुलांचा सांभाळ केला. जसे दिवस जात होते तसे पाच भावंड कठीण परिस्थितीत वाढत होते.आपल्या बहिणीला पाच मुलांचा सांभाळ करायला अवघड जात आहे हे पाहून दादांच्या मामांनी आमचे मोठे काका श्री नानासाहेब जाधव(भाऊ) व श्री प्रल्हादराव जाधव(नाना) व आत्या सुंदरबाई यांना आजोळी घेऊन गेले व आजीपाशी श्री उद्धवराव जाधव(आबा) व दादा राहू लागले.
दादांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू झाले पण 4थी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दादांना शाळा सोडावी लागली व कांही काळ घरचे गुरे सांभाळली व नंतर 25 रुपये महिना पगारीवर गुरे संभाळण्यासाठी सालगडी म्हणून 3 ते 4 वर्षे काम केले.
तो पर्यंत दादांचे मोठे भाऊ, भाऊ व नाना आणि बहीण सुंदरबाई यांचे लग्न दादांच्या मामांनी करून दिले व दादांचे तीन नंबर भाऊ आबा हे 1962 साली सैन्य भरतीत गेले व त्यानंतर दादांनाही मोठ्या भावाप्रमाणे सैन्य भरतीचे वेध लागले.
1965 साली दादांनी मिल्ट्री भरतीसाठी प्रयत्न केला पण पहिल्या प्रयत्नांत यश आले नाही तेंव्हा निराश न होता 1 वर्ष शेतात काम केले व 1966 साली जालना येथे राज्य राखीव पोलीस दलातील (SRP) भरती आहे समजल्यावर जालन्याला भरतीला जायचं अस दादांनी ठरवलं पण आजीचा जीव लागत नव्हता,एक मुलगा सैन्यात व एक मुलगा पोलीस खात्यात जाणार म्हणून भावनिक होऊन आजी रडायची पण दादांनी न सांगता त् दुसर्याकडून 20 रुपये तिकीटला घेतले व गावातील 4-5मित्रांसमवेत जालना गाठले.त्यापैकी फक्त दादांची SRP मध्ये भरती झाली व दादांचे स्वप्न पूर्ण झाले.
भरती झालेला आनंद तर मनात होताच त्या आनंदाने घरी आले व पुन्हा 15 दिवसांनी SRP मध्ये रुजू झाले.सुरवातीला 1 वर्ष पुण्यात प्रशिक्षण झाले व नंतर जालना बटालियन 3 मध्ये रुजू झाले.
मुलगा पोलीस दलात नोकरीला लागला व घरी दादांच्या लग्नाची तयारी सुरू झाली.त्यात आईचे स्थळ आले. रेणापूर तालुक्यातील आरजखेड येथील श्यामराव सुर्यवंशी यांची छोटी बहीण सुमन यांचा विवाह दादांशी ठरला व 1971 साली लग्न झाले.
आमचं कुटुंब 1971 ते 1983 पर्यंत जालन्यात वास्तव्यास राहिले त्या दरम्यान दादांना ड्युटी दरम्यान  कधी 15 दिवस ते 3 महिने राज्यात ,पराज्यात  राहावं लागायचं त्यावेळी आई घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची.माझी मोठी ताई सुरेखा व छोटी संगीता या दोघींचा जन्म जालन्यातील व बालपण ही तिथेच गेले.दादा बंदोबस्ताच्या निमित्ताने सतत बाहेर राहायचे तेंव्हा त्यांच्या बालपणाची सर्व जबाबदारी आईने पार पाडली.
1982 साली बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या मुख्यमंत्री काळात लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली व 1983 साली दादा SRP मधून लातूर पोलीस दलात रुजू झाले व आमचं कुटुंब मूळ गावी रोकडा सावरगाव ता.अहमदपूर येथे स्थायिक झाले.
लातूर जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर सुरवातीचा काळ पोलीस मुख्यालयी लातूर व नंतर जिल्ह्यात इतर ठिकाणी बदल्या होत गेल्या.1985 साली माझा जन्म झाला त्यावेळी दादांची बदली उदगीर येथे झाली. पोलीस दलात कार्यरत असताना जिल्ह्यात लातूर,उदगीर, निलंगा,चाकूर येथे सेवा केली.वाढत वय व हृदयाच्या आजारामुळे दादांनी 1999 साली जमादार पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली व गावी राहायला आले.
खर तर पोलीस दलात ज्यांचे वडील असतात त्यांच्या नशिबात वडिलांचा सहवास खूप कमी लाभतो,पोलीस म्हणजे ऑन ड्युटी 24 तास.जनतेच्या संरक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहावं लागतं. लहानपणी दिवाळी, गणपती, दसरा असे सण आले की दादां क्वचितच कुटुंबासोबत राहायचे, लहानपणी वाटायचं की सर्वांचे वडील प्रत्येक सणांना घरी असतात आपलेच नसतात पण आई तेवढ्याच जबाबदारीने आम्हा भावंडाना दादांची कमतरता भासू द्यायची नाही. शाळेतील गुणपत्रिकावर सही असो की काही अडचणी असोत की माझे वाढदिवस असो दादांची कमतरता नेहमी भासायची व माझी आई सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची. आज मोठा झाल्यावर जेंव्हा माझे वाढदिवसाचे जुने अलब्म नजरेखालून जातात तेंव्हा  त्या फोटोत दादांची उणीव जाणवते पण त्यावेळी नाराज होणारे मन आज अभिमानाने भरून येते की जरी आपले वडील आपल्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकले नसले तरी ते इतरांच्या  संरक्षणासाठी कर्तव्य बजावत होते.
आज दादा वयाच्या पंच्याहत्तरी मध्ये आहेत, सेवेतील धावपळीमुळे ह्रदयरोग, मधुमेह,पक्षघात सारख्या आजारावर मात करत दादा त्याच उत्साहाने जीवन जगत आहेत.2010 साली आईच्या अकाली निधनाने दादांना आलेला एकटेपणा आज शेतीत व नातवात मन रमवत आहेत.मोठ्या ताईचे दोन,दुसऱ्या ताईचे तीन व माझे दोन असे 7 नातवंडे दादांना खूप जीव लावतात.
 ज्यावेळी दादांच्या जीवनातील संघर्ष,चढउतार त्यांच्या कडून ऐकतो त्यावेळी मन भरून येत.गुर राखणारा मुलगा ते पोलीस दलातील जमादार पदापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. 
आजही कधी मी चाकूर ,उदगीर भागात जातो तेंव्हा पोलीस म्हणून दादांचा अनुभव घेतलेले अनेक जण दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून बोलतात तेंव्हा मन भरून येत.  माझे वडील पोलीस दलात कार्यरत होते व त्यांनी जनतेसाठी सेवा केली ह्याचा मला खूप अभिमान आहे. 
दादांचे आरोग्य उत्तम राहावे व त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...