मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

स्थलांतराच्या चक्रव्यूहात अडकले आदिवासी मुलांचे शिक्षण



फोटोतील हा माझ्या शाळेतील 4थी चा विद्यार्थी आहे त्याला मी मुळाक्षरे गिरवायला शिकवत आहे.आपल्याला वाटेल चौथीला मुलगा गेला तरी त्याला मुळाक्षरे गिरवता येत नाही मग शाळा,शिक्षक,पालक काय करत होते? पण कांही वास्तव आपल्या समोर येणे ही गरजेचे आहे म्हणून आज आदिवासी दिनाच्या निमित्ताने हा लेख लिहत आहे.

स्थलांतर हा आदिवासी मुलांच्या शिक्षणाला लागलेला शाप आहे.ह्या स्थलांतररुपी चक्रव्यूहात   मुलांचे शिक्षण असे काही अडकले आहे की त्यातून वर्षानुवर्षे त्यांची सुटका होत नाही.प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा चांगला शिकावा वाटतो तसा शिक्षकांनाही आपले विध्यार्थी चांगले शिक्षण घ्यावेत वाटतं पण ज्यावेळी आपले विद्यार्थी हातातील वही पेन सोडून कुटुंबासमवेत पोटापाण्यासाठी स्थलांतर होतात त्यावेळी मन निराश होतं.

आज जागतिक आदिवासी दिन जगात मोठ्या उत्साहात साजरा होईल,अनेक ठिकाणी कार्यक्रम होतील,आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन होईल ,एक दिवस आदिवासी समाजाचा जयजयकार होईल पण वर्षानुवर्षे स्थलांतराच्या कचाट्यात अडकलेल्या हजारो आदिवासी कुटुंबाची कायम मुक्तता कशी होईल ह्याकडे कोणी पहात नाही.

गेले 17 वर्ष कातकरी आदिवासी जमातीतील विध्यार्थ्यासमवेत काम करत असताना एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे शिक्षण आणि मुलांच्या मध्ये स्थलांतर हा खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे व तो कधी बाजूला होईल. 

दर वर्षी जून महिन्यात शाळा सुरू होतात तेंव्हा स्थलांतरित झालेले पाखरे घरट्यात यावी तसे मुले शाळेत येतात त्यानंतर दोन-तीन महिने शाळेत रमतात. त्यांना शाळा आवडू लागते ते शाळेत गुंतून जातात आदिवासीवाड्या वस्त्यावरील शिक्षक पण मुलांच्या शिक्षणासाठी टप्प्या टप्प्यात प्रयत्न करतात पण एकदा का सप्टेंबर उजाडला की ही पाखरे शाळा सोडून स्थलांतर होतात ते थेट पुढल्या जून महिन्यात अवतरतात.अशावेळी शिक्षक म्हणून मानसिकता स्थिर ठेवणे खूप अवघड होऊन जातं.

ही स्थलांतर समस्या हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरून जाते.

मुलांना शाळा आवडते पण पालकांना पोटापाण्यासाठी स्थलांतर व्हावं लागतं त्यामुळे आपल्या मुलांना ते सोबत घेऊन जातात व मुलांचे शिक्षण थांबून जाते.

ह्या स्थलांतर होणाऱ्या समस्येवर शासन अनेक उपाययोजना करते, विद्यार्थी जेथे कुठे स्थलांतरित होतील तेथे त्यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध आहे पण नेमकं हे स्थलांतरित झालेले विद्यार्थी जेंव्हा इतर राज्यात स्थलांतरित होतात तेंव्हा सगळे मार्ग थांबून जातात.

कांही गोष्टी कटू आहेत पण सत्य स्वीकारावे लागते. आजही चौथी पाचवीच्या स्थलांतरित मुलांना शाळेत आल्यास मुळाक्षरे गिरवल्या शिवाय आम्हला पुढं जाता येत नाही.वर्षातील फक्त 2-3 महिने शाळेत राहिलेला विद्यार्थी Rte कायदयने दर वर्षी वरच्या वर्गात जातो पण त्याची इयत्ता वाढते पण त्या त्या वर्गातील क्षमता प्राप्त करण्यापासून तो दूर राहतो.

सर्वांना वाटत आपला महाराष्ट्र शिक्षणात अव्वल यावा पण जर मुलांना शिकण्याची इच्छा असूनही स्थलांतरामुळे  शाळेत यायलाच नाही भेटत तर तो गुणवत्तापूर्ण शिक्षण कसा घेईल.

वरकरणी ही समस्या खूप छोटी वाटत असली तरी ह्यामुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत.

दर वर्षी स्थलांतरित विद्यार्थ्यांचा सर्व्हे होतो पण स्थलांतरित झालेले विद्यार्थी सापडले जात नाहीत त्यांच्या पालकांचे काम जंगलात,रानावनात,परराज्यात,ऊसाच्या फडात असतात त्यामुळे हे विद्यार्थी सापडणे खूप अवघड होऊन जाते.

जो पर्यंत पालकांचे स्थलांतर थांबत नाही तो पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांचे ह्या चक्रव्यूहातून सुटका होऊ शकत नाही.जर आदिवासी पालकांचे स्थलांतर थांबवायचे असेल तर त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळणे खूप आवश्यक आहे. त्या गरीब आदिवासी पालकांना ही वाटतं आपले मुलं शिकले पाहिजेत पण ज्यावेळी पोटाचा प्रश्न येतो त्यावेळी बाकी काहीही दिसत नाही.......

✍️

श्री गजानन पुंडलिकराव जाधव.

४ टिप्पण्या:

  1. अतिशय समर्पक शब्दात सत्य वास्तव मांडला त सर....सर शिक्षक तर सगळे होतात पण तुमच्या सारख विद्यार्थ्याशी एकरूप होणं तेवढं कोणाला जमत नाही....आपले कार्य सदैव अतुलनीय आहे...याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला

    उत्तर द्याहटवा
  2. खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिलात.तुमचं काम खूपच अतुलनीय आहे.जे काही काम तुम्ही तळमळीने करत आहात ,या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...