शुक्रवार, १५ जून, २०१८

खाली मुंडक वर पाय

खाली मुंडक वर पाय
*गोष्ट माझ्या शाळा प्रवेशाची,28 वर्षापूर्वीची*

आज सन 2018-19 च्या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली व   6 वर्षांचे चिमुकले आई वडिलांचे बोट धरून शाळेत येऊ लागलेले वातावरण प्रत्येक गावातील ,शहरातील शाळांन मध्ये आज पाहायला मिळाले. कोणी आनंदात तर कोणी रडत रडत आपल्या पालकांसोबत शाळेत येत होते व हे पाहून मला माझ्या *1990-91* शाळाप्रवेशाचा दिवस आठवला व त्यात कांही क्षण या रडणाऱ्या मुलांमध्ये शोधले.
*28 वर्षापूर्वीचा तो दिवस अचानक आठवला व लिहायचा मूड आला.* तसं बालपण म्हटले की मजा मस्तीचे दिवस त्या प्रमाणेच माझं ही इतर मुलांसारखंच. माझ्या घरा पासून जेमतेम 50 मीटर वर बालवाडी होती व तेथे जायला मला आवडायचं कारण आईची आठवण आली की 10 सेकंदात घरी पळून यायला यायचे त्यामुळे मला माझी बालवाडी खूप आवडायची. पण दोन वर्षे बालवाडीत घालवल्या नंतर पहिलीत जायची वेळ आली.
       तशी गावची जि प शाळा घरापासून 1 km लांब यामुळे शाळा मला नको वाटायची त्यामुळं मी बालवाडीतच बसून राहायचो.माझी आई ,बालवाडीतील बाई खूप समजून सांगायच्या की आता तू मोठा झालास, शाळेत गेला पाहिजे पण मी कांही ऐकायचो नाही मग काय  बालवाडीला पण बुट्टी मारायची व खेळायला जायचो.
वडील पोलीस दलात असल्याने त्यांना वेळ देणे शक्य नव्हते त्यामुळे सर्व हक्क आईकडे होते व आईचा लाडका आसल्याने चलती माझीच.पण आई पण कंटाळली होती की हा शाळेत जात नाही म्हणून पण करणार काय वडील ड्युटी मूळ बाहेर गावी त्यामुळे माझं फावायच.
पण त्याच दिवसा दरम्यान माझ्या मोठ्या काकांचा मुलगा म्हणजे *माझे आण्णा प्रा.श्री.अशोकराव जाधव* हे त्या वेळी औरंगाबादला शिक्षण घेत होते व त्यांना सुट्टी असल्याने ते गावी आले होते.ते माझा खूप लाड करायचे आज ही तितकाच करतात. मग ते औरंगबादवरून यायची मी नेहमी वाट पाहायचो व ते आले की मला खाऊ आणायचे व मजा करायची.
नेहमी प्रमाणे ते आले व त्यांनी मला खाऊ आणला पण मध्येच गडबड झाली, आईने त्यांना माझे शाळेत न जाण्याचे  कारनामे सांगितले व तिथेच माझ्या शाळा प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
अण्णांनी मला प्रेमाने समजावून सांगितले की बेटा शाळेत गेलं पाहिजे,शाळा शिकली पाहिजे पण मी कसला ऐकायचो त्यांचं सुरु झालं की जायचो पळून,पण पळणार कुठं पर्यन्त माझी 5 वर्षाची धाव व अण्णा म्हणजे *राष्ट्रीय कबड्डीपट्टू* त्यांच्यापुढ माझं काय चालणार.
अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला म्हणजे माझ्या शाळा प्रवेशाचा. पण माझे रोजचेच नाटक 'मी नाही शाळेत जाणार,इथेच बालवाडीत बसणार मग रडणे आईला इमोशनल करणे हे चालूच होत' पण या नाटकाचा आज शेवट असल्याचं पण जाणवत होतं.कारण आज माझ्यावर 3rd डिग्री चा वापर होणार असल्याची कुणकुण लागत होती व झाले ही तसेच. माझे पाय अण्णांनी दोरीने बांधले व मला छताच्या हलकडीला(मराठवाड्यात धाब्याचे घर असतात व त्याला लोखंडी कडी सोडली जाते काही तरी अडकावयाला) बोकड टांगल्या प्रमाणे लटकवल गेलं व कबूल करून घेतलं की शाळेत जाणार म्हणून(आता वाटतंय तेव्हा RTE कलम का नव्हत😜).त्यावेळी अण्णा म्हणजे माझे😡 जानी दुष्मन झाले होते. सर्वानी मला टॉर्चर करून मला शाळेत घेऊन जायची तयारी केली.सीन तर कसा मी अण्णांच्या पाठीवर माझे पाय दोरीने बांधलेले पळून जाऊ नये म्हणून व माझ्या पाठीमागे गावातील 25 ते 30 मुलं हा सीन पाहायला की आता काय होणार ते😂.
त्यावेळी माझी अवस्था अशी की बोकडाला  कसाईखाण्यात घेऊन जात आहेत अशी. घरा पासून ते शाळेपर्यंत मी अण्णांच्या पाठीवर पाय बांधलेला(बळी चा बकरा) व पाठीमागे शाळेतील पोर. शेवटी शाळा आली व मला बेड्यामुक्त करून त्यावेळी आदरणीय यादव गुरुजी होते त्यांच्या समोर ठेवले व सुरु झाली माझी ऍडमिशन प्रक्रिया. मग मला सांगितलं की उजवा हात डोक्यावरून डाव्या कानाला लाव मग मी लावला व मी पात्र झालो.मग जन्म तारीख विचारली.मग अण्णांनी माझी जन्मतारीख सांगितली 7 सप्टेंबर 1985. गुरुजींनी काय हिशोब केला काय माहित व मला चक्क 3 महिन्यांनी मोठं करून टाकलं म्हणजे शालेय रेकॉडला 7 जून 1985 लावली व वयाच्या 5 व्या वर्षी (गुरुजी कृपा) माझ्या शाळेचा श्रीगणेशा अथक परिश्रमानंतर सुरु झाला.
पण तेंव्हा पासून आज पर्यंत कधी शाळेत जायचा कंटाळा केला नाही.त्या वेळी विध्यार्थी म्हणून व आता गुरुजी म्हणून.
पण एक सांगावं वाटत तो *खाली मुंडक वर पाय* हा सिन आज ही स्मरणात आहे व अण्णांनी आपल्या खांद्यावर 1 km शाळेत घेऊन गेलेले क्षण ही लक्षात आहे.त्यावेळी जर अण्णारूपी गुरु मिळाला नसता तर आज कदाचित गजानन जाधव या ठिकाणी दिसला नसता.
 म्हणून *माझे गुरु,माझे आदर्श कोण असतील तर माझे मोठे बंधू प्रा. श्री अशोकराव जाधव (अण्णा)*. असा होता माझ्या पहिल्या  शाळाप्रवेशाची *खाली मुंडक वर पाय* गोष्ट....
😊😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...