सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

शाळाबाह्य मंग्या नववीत गेला....



आज श्रावणी सोमवारची सकाळच्या सत्रातील शाळा असल्याने शाळा सुटल्यानंतर 11.30 वाजता शाळेतील एका मुलीचे खाते काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. तेथे फॉर्म भरत असताना मागच्या बाजूने  जाधव सर असा आवाज आला,मागेवळून पाहतो तर चेहरा जरा ओळखीचा वाटला. तो 15-16 वर्षाचा मुलगा जवळ आला व म्हटला, *'सर मी मंग्या',* चार वर्षांनी त्याला पाहिल्याने मला लवकर लक्षात आले नाही.मी म्हटलं इथे काय करतोस,तर तो म्हटला, बँकेत खाते काढले आहे पासबुक घ्यायला आलो होतो.त्याला पुन्हा विचारलं शाळेत दररोज जातो का ? तो म्हटला हो सर दररोज जातो,आता 9 वी मध्ये आहे.हे ऐकून खूप छान वाटले व *2011 साली आपण ज्या शाळाबाह्य मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते तो मंगेश आज दररोज शाळेत जातो व बँकेचे व्यवहार ही करतो हे पाहून खूप आनंद झाला.* आज नवव्या इयत्तेत शिकत असलेला 2011 सालाचा शाळाबाह्य  कु.मंगेश संतोष  जाधव शिक्षणाच्या प्रवाहात कसा आला याविषयी थोडक्यात मांडतो.
*रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पालेखुर्द आदिवासीवाडी* ही कातकरी आदिवासी जमातीची 30 ते 40 घरांची वस्ती ही माझी पहिली शाळा. या शाळेवर *2006 ते 2016 असे 10 वर्ष* शिक्षक म्हणून नोकरी केली. शाळा 4 थी पर्यंतची होती या शाळेतील बरेच मुलं पालकासोबत 9 महिन्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात स्थलांतर होत असत.सप्टेंबर ते जून असा स्थलांतराचा त्यांचा कालावधी असायचा,पावसाळा सुरू झाला की ते बिऱ्हाड परत वाडीवर यायचे व मुलांची 3 महिन्याची शाळा सुरु व्हायची असे वर्षानु वर्ष चालायचे.
*2009 साली केंद्र सरकारने शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा (RTE2009) कायदा लागू केला* व प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे अशी मोहीम सुरू झाली.कायदा 2010 साली आमलात आला व या कायद्यात अनेक तरतुदी केल्या  त्यात आमच्या शाळेसाठी महत्वाचे म्हणजे प्रत्येक विध्यार्थी एक वर्ष एका वर्गात राहील व पुढल्या वर्षी पुढल्या वर्गात जाईल ती तरतूद खूप उपयोगी पडली.या कायद्यामुळे माझ्या शाळेतील अनेक विध्यार्थी प्रत्येक वर्षी फक्त 3 महिने शाळा करून  4थी पास होऊन गेले पण पुढे ते चांगले शिकत गेले.दुसरं म्हणजे *वयानुरूप प्रवेश* शाळाबाह्य मुलांना त्यांच्या वयाच्या समकक्ष
वर्गात प्रवेश देऊन त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे .या मुळे माझ्या वाडीतील अनेक शाळाबाह्य  मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता आले त्यातील *मी पहिला प्रवेश दिलेला  शाळाबाह्य मुलगा* म्हणजे *मंग्या* म्हणजेच *मंगेश संतोष जाधव*
साधारण *एप्रिल 2011* ची गोष्ट असेल मंगेश चे कुटुंब स्थलांतरित होऊन आमच्या शाळेच्या परिसरात आले.मंगेश च्या घरी त्याचे वडील ,आई व 4 वर्षाचा छोटा भाऊ नंदेश. मंगेश चे वय साधारण 7 वर्षाचे होते.मंगेश शाळेतील मुलांसोबत  शाळा सुटल्यावर खेळायचा, जंगलात बेचकी(गलोल) घेऊन पक्षी मारण्यासाठी जायचा,रान कोंबड्या,ससे मारण्यासाठी फास लावायचा पण शाळेत कधी यायचा नाही.मला पाहिला की तो जंगलात पळून जायचा पण हळू हळू इतर मुलांसोबत तो ओळखीचा झाला व एक दिवस शाळेत आला.त्याला पाहिल्यास मला वाटले तो कुठे तरी शाळेत दाखल असावा व स्थलांतरित होऊन येथे आला असावा म्हणून त्याला मी विचारलं, *काय रे मंग्या कुठल्या वर्गात आहेस व तुझी शाळा कोणती?* तो मला म्हटला कातकरी बोलीत, *गुर्जी मा शाळमा कदवा नाही गेहल,आम्ही समंदा जन धंद्यांमा हता.*(म्हणजे मी शाळेत कधीच गेलो नाही आम्ही सर्व कोळसा कामासाठी स्थलांतरित होतो.) *तो शाळाबाह्य होता पण त्याला शाळा आवडते अस जाणवलं .*  दुसऱ्या दिवशी त्याच्या झोपडीत गेलो त्याच्या पालकांना भेटायला तर त्याचे वडील दारूच्या पूर्ण नशेत झोपला होता तेंव्हा त्याच्या आईला विचारलं तर आई म्हटली , *'आम्ही जवळच्या पुई आदिवासीवाडीवरचे पण 4 ते 5 वर्षांपासून कर्नाटक राज्यात स्थलांतरित होतो त्यामुळे मंग्या ला शाळेत घातलं नाही पण आता इथेच राहणार आहोत त्यामुळे त्याला तुम्ही शाळेत घ्या'*  मग मंग्या  एप्रिलच्या शेवटी कांही दिवस शाळेत आला व बसू लागला.सुट्टी 8 दिवसानी लागणार होती म्हणून ठरवलं मंग्या ला जून मध्ये दाखल करायचं. मे 2011 ची सुट्टी लागली तशी संपली हि व शाळा सुरु होणार त्या आगोदर एक दिवस जाऊन मंग्याची झोपडी गाठली व त्याला पहिल्या दिवशी दाखल करायचं ठरवलं तस त्याचा आई व वडिलांना सांगितलं व मंग्याच्या प्रवेशाचा दिवस पक्का झाला. 15 जून 2011 ला पहिल्या दिवशी शाळेत गेलो तर मंग्या आला नव्हता मग मुलांना त्याच्या घरी पाठवलं तर घरी कोणी हि नव्हतं तेंव्हा शेजाऱ्या कडून समजलं ते सर्वजण नदीवर मासे पकडायला गेले म्हणून.शाळा सुटल्या नंतर मंग्याची आई भेटली व तिला सांगितलं उद्या काही करा कामाला उशिरा जा पण मंग्याला शाळेत घेऊन या.ठरल्या प्रमाणे *16 जून 2011* रोजी सकाळी 10 वाजता मंग्या आईसोबत शाळेत हजर झाला व *एकदाचा शाळाबाह्य मंग्याला RTE2009 कायद्याने वयानुरूप समकक्ष वर्गात दुसरी इयत्तेत प्रवेश दिला व 'मंग्या' चा कु.मंगेश संतोष जाधव झाला*
त्या नंतर मंगेश ने कधी शाळा चुकवली नाही तो दररोज शाळेत यायचा,अभ्यास करायचा,शाळेच्या अनेक स्पर्धेत भाग घ्यायचा एका प्रकारे मंगेश सर्व मुलांचा आदर्श होत गेला.
*सर्व सुरळीत चालू असताना 2013-14 ला मंगेश 4थी मध्ये होता व त्याच्या वडिलांच्या वागणुकीमुळे तो शाळाबाह्य होतो की काय याची भीती वाटू लागली.*
त्याचे वडील खूप दारू प्यायचे आईला मारहाण करायचे काम धंदा कांही करायचे नाहीत त्यामुळे कधी कधी मंगेशला शाळा बुडवून आई सोबत जंगलात फाट्याना, मासे पकडायला जावे लागायचे पण मंगेशला शाळेची आवड असल्याने तो शाळेत यायचाच.
*एक घटना अशी घडली की मंगेश च्या वडिलांनी दारूच्या व्यसनासाठी गावात चोरी केली व तो पकडला गेला व गावकीने त्याला वाडीतून हाकलून लावले व मंगेशला वाडी व शाळा सोडून 2 km अंतरावर एका शेतात निर्जळ स्थळी राहावे लागले*   दुसऱ्या दिवशी शाळा भरली व मंगेश का  आला नाही म्हणून मुलांना विचारलं तर शाळेतील मुलाने सर्व हकीगत सांगितली तेंव्हा खुप वाईट वाटले.त्याच्या व्यसनी वडीलामुळे दररोज शाळेत येणाऱ्या,अभ्यासार हुशार असणाऱ्या  मंगेशवर हि वेळ आली होती. *पुढल्या दिवशी सकाळी मी शाळेत आलो व मंगेश आज ही शाळेत आला नव्हता तेंव्हा काय करावं या विचार करत होतो तेंव्हा बाहेरून एक मुलगा ओरडत आला गुर्जी गुर्जी मंग्या शाळेत येत आहे,तो बघा लांब डोंगर चढून वर येत आहे असा तो मुलगा म्हणाला.मग बाहेर येऊन आम्ही सर्वांनी त्याला पाहिलं व सर्व मुले आनंदाने नाचू लागले.मंग्या शाळेत आला होता पण तो कसा व का आला हे महत्वाचे  होते.शाळेपासून दूर  आपल्या झोपडी पासून 2 km चालत  चालत व एक मोठा डोंगर पार करून जवळपास एक ते दीड तास चालत मंग्या शाळेत पोहचला होता.*  त्याला मी  विचारलं काय रे मंग्या काय झालं, तो म्हटला *'सर माझ्या पप्पाने चोरी केली व आम्हला वाडीतून हाकलून दिले आता आम्ही ती झोपडी दिसते का तेथे राहतो व मला शाळा आवडते व मी दररोज शाळेत येईल* त्याने दाखवलेली *झोपडी शाळेपासून पाहिली तर छोट्याशा चेंडू एवढी दिसत होती म्हणजे शाळा डोगराच्या वर व ती झोपडी खड्ड्यात खूप दूर होती*  जवळपास मंगेश तीन ते चार महिने दररोज जंगलातून 2 km चालून शाळेत येऊ लागला व त्याच जोमाने अभ्यास करू लागला.शेवटी तो चांगल्या गुणाने चौथी पास झाला.
माझी शाळा 4थी पर्यन्त ची असल्याने पुढील शिक्षणासाठी तो जवळच कोलाड येथे हायस्कुल ला दाखल झाला. *16 जून 2011 ते 10 मे 2014 या तीन वर्षातील मंगेशच्या शिक्षणाच्या खडतर प्रवासाचा साक्षीदार राहता आले व शिक्षणासाठी संघर्ष काय असतो ते मंग्या च्या रुपात पाहता आले.*
पुढच्या काळात 2016 ला माझी बदली पालेखुर्द आदिवासीवाडी वरून झाली व अनेक आठवणीत मंग्या एक  व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहिला.
आजही मंगेशची घरची परिस्थिती बदलली नाही तीच मोडकी झोपडी,घरी वीज नाही,पाणी नाही ,लादी(फरशी) नाही,कुठल्या सुविधा नाहीत पण मंगेशची शिकण्याची जिद्द तीच कायम आहे.
*आज योगायोग 4 वर्षांनी बँकेत मंगेश अचानक भेटला व त्याला पाहून त्याच्या शिक्षणाचा खडतर प्रवास समोर आला,एक साक्षीदार म्हणून मंगेशने  कोणत्या परिस्थितीतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व आज तो नवव्या इयत्तेत पोहचला त्यामुळे मंगेशचा प्रवास मांडावा वाटला.*
                ......धन्यवाद.
✍🏻 *श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*रा.जि.प.शाळा संतोषनगर*
*ता.रोहा,जि.रायगड.*
*09923313777*
4 वर्षानंतर मंग्या ची भेट

आपल्या झोपडीत अभ्यास करताना मंगेश.
आई ,वडील व छोटा भाऊ नंदेश सोबत.

आपल्या झोपडीपाशी मंगेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...