रक्षाबंधन हा प्रत्येकाच्या आवडीचा सण.बहीण भावाच्या अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा सण.बालपणी सर्वांप्रमाणे मलाही या सणाची खूप उत्सुकता असायची ती आज ही आहे पण घरापासून नोकरीच्या निमित्ताने 500 km दूर असल्याने कांही वर्षात रक्षाबंधन मनाप्रमाणे साजरा करू शकलो नाही.
आमचं कुटुंब खूप मोठं वडिलांसंहित 4 काकांचे कुटुंब ,त्याप्रमाणे आम्ही भावंड हि खूप 8 मुलं व 6 मुली घरात असे एकूण 14 भावंड त्यात माझा 14 वा नंबर म्हणजे सर्वात शेवटचा पण लाडाचा असा मी.
वयाच्या 5 ते 6 वर्षांपासून रक्षाबंधन सण समजू लागला तेंव्हा पासून श्रावण महिना सुरु झाला की आईला सतत विचारायचं की रक्षाबंधन कधी येणार, मग अस करत करत तो दिवस उजाडला की खूप आनंद व्हायचा.आमच्या घरी तेंव्हा सामूहिक रक्षाबंधन व्हायचं, सर्व सहा बहिणी आम्हा आठ भावंडाना एकत्रित राख्या बांधायच्या तेंव्हा खूप मजा वाटायची.
रक्षाबंधनाच्या दोन दिवस आगोदर माझी एकच लगबग असायची ती म्हणजे ओवाळणीला पैसे टाकण्यासाठी चिल्लर जमा करणे,त्यावेळी मला आठवतंय खाऊच्या पैशातून दोन दोन रुपयांचे नाणे जमा करायचे व ती ओवाळणी बहिणींना द्यायची.सर्वात मोठी ताई विजयमाला अक्का नंतर सुरेखा ताई नंतर मुन्नी ताई,उज्वला ताई,पपा ताई व संगीता दिदि अशा सहा बहिणींनी बांधलेल्या राख्यांने छोटासा हात भरून जायचा व खूप छान वाटायचं.मग काय नंतर दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना हात भरून राख्या बांधून घेऊन जायचो व शाळेत मित्रांसोबत कोणाच्या हातात जास्त राख्या असा खेळ खेळायचो असे करून 4 ते 5 दिवस रक्षाबंधन सण साजरा करायला खूप मजा यायची.जसे जसे वर्ष उलटत गेले तसे बहिणींचे लग्न होत गेले व त्या सासरी रमत गेल्या. त्यानंतर ज्या प्रमाणे एकत्रित रक्षाबंधन साजरा केला जायचा तसे क्षण दुर्मिळ होत गेले. कालांतराने मग कधी एका ताईकडे एक वर्ष तर दुसरं वर्ष दुसऱ्या ताईकडे तर तिसर वर्ष तिसऱ्या ताईकडे असं चालू राहील.पुढे शाळा, कॉलेजचा व्याप वाढला व येणे जाणे ही कमी होत गेले पण रक्षाबंधनाची ओढ कायम तशीच राहिली. जेंव्हा नोकरीच्या निमित्ताने गावापासून 500 km दूर कोकणात आलो तेव्हां पासून 13 वर्षात फक्त 4 ते 5 वर्ष बहिणींकडे जाता आले पण या सणाची ओढ,आवड,त्यातील जिव्हाळा प्रेम कांही कमी झालं नाही. आज तर प्रत्येक जण आपापल्या संसारात ,नोकरीत,व्यवसायात रमून गेले आहेत 6 बहिणी वेगवेगळ्या गावी व आम्ही सर्व भाऊ नोकरी निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आहोत पण एकमेकांचा एकमेकांबद्दल जिव्हाळा मात्र कायम आहे. रक्षाबंधन सण आला की ते बालपणीचे रक्षाबंधन आठवते,सर्व एकत्रित येणे,गप्पा, गोष्टी,हसी मजाक ,त्या मोठ्या मोठ्या चित्राच्या राख्या,ते दोन दोन रुपयांचे ओवाळणीचे नाणे,शाळेला जाताना हात भरून बांधलेल्या राख्या हे सर्व आता आठवणींच्या हिंदोळ्यात राहिले आहेत.कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं व बालपणीच्या रक्षाबंधनाचा मनमुरादआनंद घ्यावा........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा