रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

स्वातंत्र्य सैनिकांची भूमी- सावरगाव रोकडा...

मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ-अहमदपूर,जि.लातुर.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष...

17 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण मराठवाडयात मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. *निजामाच्या जुलमी राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला* व एकसंघ भारताचा भाग बनला. देशाला स्वातंत्र प्राप्ती पासून सलग 13 महिने  चाललेल्या हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यात माझ्या गावच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची पर्वा न करता जुलमी निजाम राजवटी विरुद्ध लढा देऊन मराठवाडा मुक्तीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे.या महान शूरवीर देशभक्तांच्या 70 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख..
*माझं गाव रोकडा सावरगाव, मराठवाड्यातील लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात वसलेलं एक खेडेगाव.* तालुक्यापासून साधारण 12 km अंतरावर असलेलं,आज गावची लोकसंख्या पाच ते सहा हजार असेल. प्रत्येक गावची जशी ओळख असते तशी माझ्या गावची हि ओळख आहे. *संत बापदेव महाराज व संत बुआसाहेब महाराजांची* पावनभूमी म्हणून सावरगव सर्व पंचक्रोशीत त्या काळापासून प्रसिद्ध होते.स्वातंत्रोतर काळात सावरगावला एक वेगळी ओळख मिळाली.150 वर्षाच्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र मिळाले होते पण त्या वेळी माझे गाव हैद्राबाद संस्थानात असल्याने भारत स्वातंत्र्याचे सुख गावाला मिळाले नव्हते.त्या वेळी भारतात अनेक स्वायत्त संस्थाने होते व इंग्रजाने जाताजाता संस्थानिकांना एक अधिकार दिला की जर त्यांना एकसंघ भारतात सामील व्हायचं असेल तर व्हा, नाहीतर स्वायत्त राहू शकता.या संधीचा फायदा घेत हैदराबादचा संस्थान निजाम याने हैद्राबाद संस्थानाचे स्वातंत्र भारतात विलीन केले नाही व त्या मुळे संपूर्ण हैद्राबाद संस्थानातील जनता निजाम राजवटीच्या विरोधात जाऊ लागली.गावोगावी लढा उभा राहू लागला व शेवटी 17 सप्टेंबर 1948 ला हैद्राबाद संस्थान निजामाच्या तावडीतून मुक्त झाले व एक स्वातंत्र भारताचा हिस्सा झाले.या *मुक्ती संग्राम लढ्यात माझ्या गावच्या 17 स्वातंत्र सैनिकांनी जीवाची पर्वा न करता सहभाग घेऊन मराठवाडामुक्ती साठी महान कार्य केले.*
गेल्या 70 वर्षांपासून रोकडा सावरगाव ची ओळख स्वातंत्र सैनिकांची भूमी म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत, तालुक्यात, जिल्ह्यात ओळखू लागली आहे.आज 70 वर्षानंतर या महान व्यक्तींच्या लढ्या विषयी जाणून घेऊ या.
🔵 *_हैद्राबाद संस्थान_*:- स्वातंत्र्यपूर्व काळात भारत देश अनेक छोट्या मोठ्या संस्थानात विभागाला गेला होता.त्यात हैद्राबाद  एक स्वायत्त संस्थान होते.ते खूप मोठे व श्रीमंत संस्थान होते. *या संस्थानचे प्रमुख निजाम हे होते 1724 ते1948 तब्बल 224 वर्ष निजाम वंशाने हैद्राबाद संस्थान चालवले.* या संस्थानात सध्याचा मराठवाडा,तेलंगणा,उत्तर कर्नाटक,कांही विदर्भाचा भाग समाविष्ट होता.त्यावेळी या संस्थानात *70% हिंदू,18%दलित,11%मुस्लिम,1%इतर समाज वास्तव्यास होता.* निजाम संस्थान हे भारतातील श्रीमंत संस्थाना पैकी एक होते.त्यावेळी त्यांच्याकडे 22000 हजार सैन्य, स्वतंत्र रेल्वे,डाक विभाग,जहाजे,संचार व्यवस्था तसेच त्यांचे चलन हि वेगळे होते. *अली* हे त्यांचे चलन होते.या चलनाचा वापर फक्त हैद्राबाद संस्थानात चालायचा जर हैद्राबाद संस्थान सोडून बाहेर जायचे असेल तर इंग्रजांचे *कलदार* चलनात त्याचा बदल करून घ्यावा लागत असे. त्यामुळे या भागावर इंग्रजांचे अधिपत्य कधी राहिले नव्हते.अशा या स्वायत्त संस्थानाने भारत स्वातंत्र झाल्या नंतर एकसंघ भारतात सामील व्हायला नकार दिला होता. *शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान* याने भारताला स्पष्ट सांगितले की हैद्राबाद संस्थान स्वायत्त राहील व आमचं राज्य आम्ही चालवू.पण राज्यात राहणाऱ्या जनतेला हा निजामाचा निर्णय पटला नाही व तेलंगणा,मराठवाडा,उत्तर कर्नाटक या भागातून निजाम मुक्ती व  हैद्राबाद संस्थान भारतात सामील व्हावे यासाठी लढा सुरु झाला होता.हा लढा स्वतंत्र भारताच्या लढ्याला प्रेरित होऊन उभा राहिला होता.
🔵 *_हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढा_*:-
150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले होते,देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.तिरंगी झेंडे देशात जागोजागी फडकत होते, देशात नवचैतन्य आले होते पण त्याच वेळी  हैद्राबाद संस्थानात असंतोषाची लाट तयार होत होती ,कारण निजाम कांही केल्या आपले हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यास तयार नव्हता.पण राज्यातील जनतेला स्वतंत्र भारताचा हिस्सा व्हायचं होत.हैद्राबाद राज्यातील जनतेला दडपून टाकण्यासाठी निजामाने सामान्य जनतेवर अन्याय सुरु केले व दडपशाहीचे वातावरण तयार केले.अशा वेळी *स्वामी रामानंद तीर्थ* यांनी पुढाकार घेऊन हैद्राबाद मुक्ती संग्रामसाठी नेतृत्व हातात घेतले व संस्थानातील प्रत्येक विभागातून आंदोलन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.तेलंगणा,मराठवाडा,उत्तर कर्नाटक या भागातून अनेक चळवळीचे कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने या आंदोलनाचा हिस्सा बनत चालले होते.ध्येय एकच की निजाममुक्त हैद्राबाद संस्थान.त्यावेळी निजामाकडे हजारोंचे सैन्य होत्या,आपल्या सैन्याच्या जीवावर हे आंदोलन दडपण्यासाठी निजामाने राज्यात अन्याय,अत्याचार,खून,बलात्कार अशा घटना घडवून आणल्या पण स्वातंत्र्यासाठी प्रेरित झालेली सामान्य जनतेने याला भीक न घालता अधिक जोमाने हे आंदोलन सुरू केले.मराठवाड्यात अनेक ठिकाणी युवक तयार होऊ लागले,लातूर,बीड,उस्मानाबाद, परभणी,औरंगाबाद ,नांदेड,अशा अनेक जिल्ह्यातून ग्रामीण  भागातून हि चळवळ जोर धरू लागली. *तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू,गृहमंत्री  सरदार पटेल*  यांनी वेळोवेळी निजामाला एकसंघ भारतात सामील होण्याचे आहवान केले पण निजाम काही झुकला नाही.उलट निजामाने अधिक दडपशाही करण्यासाठी *रजाकार* नावाच्या फौजेची निर्मिती केली. *निजामाचा सेनापती कासीम रिजवी* यांनी  रजाकरचे संघटन केले व पुन्हा राज्यात धुमाकूळ घातला.
🔵 *_रजाकार फौज_*:-  हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात उभारला गेला होता.गावोगावी क्रांतिकारी वातावरण तयार झाले होते.हे सर्व आंदोलन दडपण्यासाठी निजाम हतबल होत होता.त्याच वेळी *निजामाचा सेनापती कासिम रिजवी हा मूळचा लातुर तालुक्यातील बोरी गावचा होता.* त्याने हे आंदोलन दडपण्यासाठी रजाकार हि फौजेची निर्मित केली.या रजाकारात त्याने जास्तीत जास्त मुस्लिम युवकाची भरती केली व मराठवाड्यात दहशद निर्मितीचे काम सुरु केले. हत्या ,दरोडे,बलात्कार अशा क्रूरपणे रजाकार सैन्याने संस्थांत दहशद निर्माण केली होती.रजाकार मुळे तर अत्याचाराची हद्द पार झाली होती,गावागावात रजाकार म्हटलं की लोकांना घाम फुटायचा ,आबालवृद्ध लपून बसायचे असे भयाण वातावरण त्यावेळी संपूर्ण मराठवाड्यात होते. रिजवी आपल्या सैन्याला चिथावणारे भाषणे द्यायचा,अत्याचार करण्यास प्रेरित करायचा,त्यामुळे रजाकार सैन्य अधिक त्वेषाने अत्याचार करू लागले.त्याच वेळी मराठवाड्यात स्वातंत्र्यासाठी युवक जिद्दीने पेटून उठू लागले. *गोविंदभाई श्रॉफ,रवी नारायण रेड्डी,बाबासाहेब परांजपे, व अनेकांनी* या आंदोलनाचे नेतृत्व केले. रजाकार सैन्य त्यावेळी 2 लाखाच्या जवळ पोहचले होते संपूर्ण हैद्राबाद संस्थानात याची पूर्ण दहशद निर्माण झाली होती. *या रजाकार सैन्याला उत्तर देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी आंध्र हिंदू संघटनेची निर्मिती केली होती.* त्यावेळी रजाकाराच्या सैन्याने हजारो नागरिकांचे प्राण घेतले होते.शेवटी याच्या अन्यायाचा कळस झाला तेंव्हा भारत सरकारने हस्तक्षेप करून ऑपरेशन पोलो राबवले होते.
🔵 *_रोकडा सावरगावचे स्वातंत्र सैनिक_*:-  निजाम मुक्तीचा लढा आता गावोगावी जोर धरू लागला होता,शहरी भागातून हि चळवळ ग्रामीण भागात पोहचली होती.प्रत्येक गावागावातून निजाम राजवट उलथून लावण्यासाठी युवक एकत्रित येत होते.जुलमी रजाकार सैन्यापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करण्यासाठी युवकांनी लढा उभारला होता.लातुर जिल्ह्यात रिजवीचे गाव असल्याने रजाकार सैन्य येथे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होते.लातुर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात अनेक तरुण या लढयात उतरले होते.त्यात माझं गाव *सावरगाव रोकडा* हे हि त्यावेळी अग्रेसर होते.एकट्या सावरगाव मधून 17 शूर वीरांनी आपले घर दार सोडून एक निजाममुक्त लढयात झोकून दिले होते.
त्या वेळी बालपणात असणारे व मुक्ती संग्राम लढा जवळून पाहणारे सध्या हयात असणारे *सावरगावचे श्री हुसेन साहेब शेख  सांगतात त्यावेळी सावरगाव चे श्री.दिगंबर बापू पाटील व जवळच्या उमरगा कोर्ट गावचे श्री.कालिदासराव देशपांडे*  यांनी सावरगाव व पंचक्रोशीत,तालुक्यात एक सक्रिय आंदोलन उभे केले होते.स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ,बाबासाहेब परांजपे अशा अनेक नेत्याच्या प्रेरणेने ग्रामीण भागात आंदोलन जोर धरू लागले होते.
त्या वेळी  रोकडा सावरगाव अहमदपूर तालुक्यात होते व जिल्हा बिदर होता.70 वर्षांपूर्वी कोणत्याही दुरसंचाराचे साधन नसताना,कोणतीही मदत नसताना एकट्या सावरगाव मध्ये 17 क्रांतिकारक तयार झाले होते.सर्वांचा एकच हेतू होता की निजामाच्या जुलमी राजवटी पासून मुक्त होणे यासाठी अनेक तरुण या आंदोलनात जोडले गेले होते.
सावरगाव रोकडा मधून *1)दिगंबर बापू पाटील 2)श्रीपतराव बोडके,3)विश्वनाथ घोटे,4)दत्तात्रय नागपूर्णे,5)उमानाथ बोधनकर,6)मचिंद्र रोकडे,7)भद्रप्पा स्वामी,8)दौलतराव पाटील,9)नारायण बेल्लाळे,10)जळबा मांगकांबळे,11)रामभाऊ आळंदकर,12)मुकुंद मनकुलवार,13)व्यंकटराव घोणसे,14)राम मामडेवार,15)नेमाजी तिरमल,16)पंढरी उगिले,17)विश्वनाथ रोकडे.*
या सतरा जणांनी जीवाची परवा न करता या स्वातंत्र लढ्यात झोकून दिले होते.
🔵 *_सावरगाव रोकडा व मुक्ती संग्राम लढा_*:-  निजामा विरुद्ध संपूर्ण हैद्राबाद संस्थान पेटून उठले होते त्यात सावरगाव हि अपवाद नव्हते जवळपास *हैद्राबाद पासून 300 km अंतरावर असणारे सावरगाव रोकडा* स्वातंत्र्य लढ्यासाठी पेटून उठला होता.गावात त्यावेळी अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहायचे पण या लढ्यासाठी भेदभाव न मानता गरिबी श्रीमंती न पाहता प्रत्येक स्तरातील व्यक्तीने एकमेकांच्या खांद्याला खांद्या लावून काम केले होते. सावरगाव व आसपासच्या गावात या तरुण मंडळीने अनवाणी पायी फिरून निजाम हटाव यासाठी जोरदार मोहीम उघडली होती.गावोगावी जाऊन सभा घेणे,प्रभात फेरी काढणे तरुणांना लढ्यासाठी प्रेरणा देणे हे काम चालू होते.
*गावातील त्यावेळचे साक्षीदार श्री.नारायण मामडेवार* सांगतात त्यावेळी सावरगावमध्ये रजाकार सैन्याची खूप दहशद होती,रजाकारच्या भीतीने अबालवृद्धांत खूप भयावह वातवरण होते.कोठून तरी अफवा यायची की रजाकार चापोली पर्यन्त आलाय,किनगाव पर्यन्त आलाय असा निरोप आला की गावातील सर्व महिला मुलं एकत्रित सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवायच्या व तरुण पिढीनी सशस्त्र  पहारा द्यायचा.त्या वेळी सावरगाव मध्ये दररोज प्रभात फेरी निघायची सकाळी सकाळी सर्व तरुण गावात फेरी काढून निझाम राजवटीच्या विरोधात घोषणा द्यायचे,मुक्ती संग्राम लढ्याच्या घोषणा द्यायचे व दररोज गावातील वातावरण क्रांतिकारी करून सोडायचे.त्यावेळी सध्याच्या मारोती मंदिराच्या वर वस्ती नव्हती त्यामुळे मारोती मंदिरा पर्यन्त प्रभात फेरी काढायची व फेरी झाल्यानंतर सर्व एकत्रित बसून दररोज कोठे कोठे जाऊन आंदोलन करायचे याचे नियोजन करायचे.व ठरल्या प्रमाणे टप्प्या टप्प्यात गावचे तरुण दुसऱ्या गावात जाऊन लढ्याबद्दल जनजागृती करायचे.असा दिनक्रम त्यावेळी रोकडा सावरगाव मध्ये दररोज सुरु असायचा.
🔵 *_गावातील 17 तरुणांना अटक व जेल_*:- रोकडा सावरगाव मध्ये त्यावेळी क्रांतिकारी वातावरण निर्माण झाले होते.प्रत्येकाला स्वतंत्र्याची चाहूल लागली होती,प्रत्येकजन जोशाने काम करीत होता, दररोज प्रभातफेरी,जनजागृतीने वातावरण क्रांतीमय झालं होतं.त्यातच या सावरगावच्या तरुनाणी उभारलेल्या आंदोलनाची कुणकुण निजाम सरकारला लागली व एका दिवशी अचानक निजाम पोलिसांचे पथक अहमदपूरवरून सावरगावात दाखल झाले व धरपकड सुरु केली. पण आपल्या महान क्रांतीवीरांनी  नघाबरता ,घरा दाराची पर्वा नकरता जेलमध्ये जाने पसंद केले.त्यावेळी *दिगंबर बापू,श्रीपतराव बोडके,विश्वनाथ घोटे,उमानाथ बोधनकर,नारायण बेल्लाळे,विश्वनाथ घोटे,दौलतराव पाटील या 25 ते 30 मधील युवका सोबत माचिंद्र रोकडे,राम मामडेवार यांच्या सारखे 12 ते 15 वर्षातील मुलंही जेलमध्ये गेले.सावरगावातील एकूण वर नमूद केलेल्या 17 युवकांना अटक झाली व त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.*
त्यावेळी गावातील वातावरण अगदी हळहळले होते.कारण एकाच गावातील 17 तरुणांना अटक झाली होती व त्यांचं काय होणार,निजाम सरकार काय करणार याची काळजी सावरगाव साहित संपूर्ण पंचक्रोशीला लागली होती.कोणाचे लग्न झाले होते तर कोणाला मुलबाळ होती,तर काहीजण नुकतेच तारुण्यात पदार्पण करत होते अशा परिस्थितीत ही या महान व्यक्तींनी स्वतःला लढ्यात झोकून दिले होते.
*सावरगावचे सर्वात तरुण व्यक्तीला जेल झाली होती ते माचिंद्र रोकडे यांनी नंतर कांही अनुभव लिखित करून ठेवले आहेत ते असे सांगतात की* ज्यावेळी गावातील सर्व 17 तरुणांना अटक झाली त्यांना सर्वाना अहमदपूर येथे घेऊन जाण्यात आले त्यानंतर तालुक्यातील इतर गावातील तरुणांना अटक केली व सर्वांना अहमदपूर वरून  जवळपास 30 ते 35 km लातुर रोड येथे चालवत घेऊन गेले व तेथून निजामाच्या रेल्वेत बिदर या जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवले.तेथून गावातील 17 पैकी *दिगांबर बापुची रवानगी  औरंगाबाद जेलमध्ये* केली व *बाकीच्या 16 जणांना गुलबर्ग्याच्या सेंट्रल जेल मध्ये ठेवलं गेलं.*
गुलबर्गा जेलमध्ये खूप तरुणांना डांबून ठेवलं गेलं होतं.त्या ठिकाणी अनेक तरुणावर अत्याचार केला जायचा,मारलं जायचं,जेवण दिलं जायचं नाही,प्रत्येकाला बेड्या घालून ठेवलं होतं.त्या जेलमध्ये असे अनेक तरुण भुकीमुळे व निजामाच्या अत्याचाराला बळी पडून मरण पावले होते.सावरगावच्या 16 पैकी अनेक युवकांनी अत्याचार सहन केला होता, अनेकांना पोटाचे आजार झाले होते पण कोणीही हार मानली नव्हती संपूर्ण हैद्राबाद निजाममूक्त होईपर्यंत लढा देत राहायचं ठरवलं होतं.
त्यात *राम मामडेवार* हे तरुण गुलबर्गा जेल मध्ये असताना खूप आजारी पडले होते.त्यांना पोटाचीव्याधी झाली होती,अन्न जात नव्हते तरीही त्यांनी सजा पूर्ण केली.
इकडे *दिगंबर बापूंना औरंगाबादच्या जेलमध्ये* हलवण्यात आले होते त्यावेळी बापू एक मुख्य कार्यकर्ता होते.त्यांना सर्वसमवेत गुलबर्गा येथे न ठेवता त्यांना मुख्य नेत्यांसोबत औरंगाबाद जेल मध्ये ठेवण्यात आले होते.तेथे मराठवाड्यातील अनेक नेते,कार्यकर्ते अटक होते. *दिगंबर बापूंचे चिरंजीव श्री.विनायकराव जाधव असे सांगतात की* त्यावेळी माफीनामा देऊन बापूंना शरण येण्यास निजामाने दबाव टाकला होता पण बापूनी ती मागणी मान्य केली नाही. बापू त्यावेळी पोटाच्या आजाराने खूप त्रस्त होते पण निजामाला माफीनामा देणार नाही या मतावर ठाम होते.अशावेळी निजाम सरकाने शेवटी बापूंची तब्यत खूप खालावत आहे असे पाहून त्यांना सावरगावला पाठवून दिले,बापूंनी जवळपास 10 ते 11 महिने तुरुंवास भोगला होता.शेवटच्या टप्प्यात आंदोलन आले होते,बापूंनी पुन्हा गावी येऊन चळवळ उभी केली होती. निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत होणार होता हे निश्चित झाले होते.भारत स्वातंत्र्यानंतर जवळपास 13 महिन्यांचा कालावधी उलटला होता.भारत सरकारने वेळीवेळी निजामाला सांगून हि तो अत्याचार थांबवत नव्हता व हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करत नव्हता.त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थान मुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली व *पोलीस ऍक्शन* ( *ऑपरेशन पोलो*) च्या माध्यमातून हैद्राबाद संस्थानावर आक्रमण केले.
🔵 *_पोलीस ऍक्शन(ऑपरेशन पोलो)_*
भारत स्वातंत्र्यापासून जवळपास 13 महिने उलटून गेले होते.स्वतंत्र भारतात आनंदाचे वातावरण होते पण हैद्राबाद संस्थान खूपच तणावाखाली होते.भारत सरकारने वारंवार विनवणी करून हि निजाम कांही केल्या हैद्राबाद संस्थान विलीन करत नव्हता व उलट राज्यातील जनतेवर अमानुष अत्याचार वाढले होते लाखो जनतेला प्राण गमवावे लागले होते.अशा या असंतोषाच्या वातावरणात हैद्राबाद संस्थांना विरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलत *ऑपरेशन पोलो(पोलीस ऍक्शन)* हि मोहीम राबवली.
*भारताचे गृहमंत्री श्री.सरदार वल्लभभाई पटेल* यांनी *13 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थानात पोलीस ऍक्शन सुरु केले.* आता कोणत्याही परिस्थितीत निजामाला शरण आनायचेच असा चंग बांधून कारवाही चालू झाली.13 सप्टेंबर रोजी प्रत्येक्षात पोलिसांचे आक्रमण सुरु झाले.सोलापूर भागातून व दुसरीकडे चाळीसगाव वरून सैन्य हैद्राबाद संस्थांनात घुसले.सोलापूर वरून आक्रमण करनाऱ्या सैन्याने उमरगा,उस्मानाबाद,लातुर,बिदर जिल्हा,गुलबर्गा काबीज कारायला सुरवात केली.तर चाळीसगाव मार्गे आलेले सैन्य औरंगाबाद विभागात घुसले.मजल दरमजल करत,निजाम सैन्याचा व रजाकार सैन्याचा पराभव करत एक एक पोलीस ठाणे ताब्यात घेत ऑपरेशन पोलो सुरु होते.एवढ्या मोठ्या भारतीय सेनेपुढे निजामाचे सैनिक हतबल होत गेले.अनेक ठिकाणी दंगली उसळल्या,हजारो लोक मारले गेले    होते.15 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैनिकांनी औरंगाबादवर कब्जा केला व निजाम सैन्याला शरणागती घ्यावी लागली. *शेवटी असे करत करत सतत 5 दिवस चाललेल्या पोलीस ऍक्शनमुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबादचा सेनाप्रमुख जन अल ईदीस याने शरणागती पत्करली व खुद्द निजाम शरण आला व तो पुढे चालून पाकिस्तानमध्ये निघून गेला व हैद्राबाद संस्थानात तिरंगा फडकला.*
🔵 *_सुंदरलाल कमिटी_*:- या 5 दिवसाच्या ऑपरेशन पोलो मुळे हैद्राबाद संस्थांनात अनेक दंगली उसळल्या होत्या होत्या हजारो-लाखोच्या घरात माणसे मारली गेली होती व 17 सप्टेंबर 1948 ला हैद्राबाद संस्थान खालसा होऊन एकसंघ भारतात विलीन झाले होते. त्यावेळी *भारताचे पंतप्रधान श्री.पंडित नेहरूने हैद्राबाद राज्यातील हिंसाचाराची चौकशीसाठी सुंदरलाल समिती स्थापन केली.या समितीने संपूर्ण माहिती घेऊन एक अहवाल साजर केला व तो आहवाल 2014 रोजी सरकारने प्रसिद्ध केला.* सुंदरलाल अहवाला अनुसार  *27 ते 40 हजार नागरिक मारले गेले होते तसेच 1863 निजामाचे सैन्य मारले गेले व 32 भारतीय सैनिक शहिद झाले असा अहवाल आहे.* पण जाणकारांच्या मते हा मृत्यूचा आकडा दीड ते दोन लाखापर्यंत आहे.
अशा प्रकारे 13 महिने 2 दिवस चाललेल्या हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याला यश आले व 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.त्यानंतर विविध जेलमध्ये कैदेत असलेल्या आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले व त्यांना पुढे चालून स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर भाषावार प्रांतरचनेत मराठवाडा विभाग मुंबई राज्याला जोडला गेला व 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात  मराठवाडा हा एक प्रशासकीय विभाग म्हणून अस्तित्वात आला.
🔵 *_गावातील 17 स्वातंत्र्य सैनिकांची जेलमधून सुटका_*:- पोलीस ऍक्शन नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले व या लढ्यात ज्या ज्या तरुणांना कारागृहात डांबून ठेवले होते त्यांची मुक्तता करण्यात आली.त्यात माझ्या गावचे 17 वीर होते जे जीवाची पर्वा न करता जेलमध्ये गेले होते. दिगंबर बापू यांना आगोदरच तब्यत बिघडल्यामुळे औरंगाबाद जेलमधून सोडण्यात आले होते उर्वरित 16 जण गुलबर्गा जेलमध्ये होते. त्या सर्वांना जेलमधून मुक्त करण्यात आले व रोकडा सावरगावमध्ये त्यावेळी जल्लोष करण्यात आला होता. या 10 ते 11 महिन्याच्या जेलमध्ये अनेकांना अनेक यातना भोगाव्या लागल्या,अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागले.
*त्यातील एक शूरवीर राम मामडेवार यांना गुलबर्गा जेलमध्ये पोटाचा गंभीर आजार झाला व त्यांनी सजा पूर्ण करून गावी आले व त्यानंतर कांही दिवसात त्याचे ऐन तारुण्यात निधन झाले* त्यानंतरच्या कालावधीत 17 पैकी अनेक स्वातंत्र्य सैनिक कोणी आजारपणाने  तर कोणी वयोमर्यादेने अनंतात विलीन झाले.त्यातील *शेवटचे स्वातंत्र्य सैनिक श्री.मच्छिन्द्र रोकडे यांचे निधन 25/10/2016रोजी झाले व एका क्रांतिकारी पिढीचा शेवट झाला.* 
आज या  *स्वातंत्र्य सैनिकामुळे रोकडा सावगावची ओळख सर्व तालुक्याला,जिल्ह्याला,राज्याला ,देशाला आहे.या शूरवीरांच्या पावन भूमीत माझा जन्म झाला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो* अनेक संकटांना सामोरे जात , घरदार ,संसार सोडून फक्त मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या माझ्या महान 17 स्वातंत्र सैनिकांचे 70 वर्षांपूर्वीच्या महान कार्याला उजाळा देण्याचे भाग्य आज मला मिळाले याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
*आजच्या या 17 सप्टेंबर 2018 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने माझ्या गावातील या महान 17 स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला मनापासून विनम्र अभिवादन करतो.*
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
✍🏻....
*श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*मु.पो. सावरगाव रोकडा*
*ता.अहमदपूर,जि.लातुर.
📱 09923313777
📧 gajanan.jadhav1984@gmail.com

हैद्राबाद संस्थानाचा नकाशा

हैद्राबाद संस्थांनचा निजाम-मीर उस्मान अली खान

हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याचे प्रणेते-स्वामी रामानंद स्वामी

भारताचे तत्कालीन गृहमंत्री श्री.वल्लभभाई पटेल यांना शरण आलेला निजाम.

५ टिप्पण्या:

  1. मला खुप अभिमान आहे की मी सावरगावची सुन आहे श्रीपतराव जी बोडके हे माझे आदरणीय सासरे होते व आपले धन्यवाद या इतिहासाला उजाळा दिल्या बदल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय गजानन,
    खुप धन्यवाद, सावरगावचा दैदिप्यमान,उज्वल इतिहास अभ्यासपूर्ण लिखाण करून सर्वांना उपलब्ध करून दिलात.मला अभिमान आहे की, जगातील सर्वात प्रिय मातृभूमीचे स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्याच्या रणभूमीत स्वतःला झोकुन देणाऱ्या या वंदनीय,आदरणीय 17 स्वातंत्र्यसैनिकांच्या जन्मभूमीत माझ्या जीवणाची प्राथमिक जडणघडण झाली. सावरगावची मातीच एवढी प्रेरणादायी आणि क्रांतिकारक आहे की, या मातीत जन्मणारी,वाढणारे सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यशाच्या शिखरावर पोचत आहेत आणि त्यायोगे देशसेवा करून गावाचे नाव करत आहेत, आणि मातीचे ऋण फेडत आहेत, त्यापाठीमागे निश्चितच हे आदरणीत 17 स्वातंत्र्यसैनिक यांची प्रेरणा व विचार आहेत.
    धन्यवाद तर सुरुवातीलाच दिले आहेत, परत असेच अभ्यासपूर्ण लिखाणासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
    अनेक शुभेच्छांसह
    द.र.लोंढे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद दत्ता,
      नक्कीच हीच वीरांची प्रेरणा उत्तम कार्य करण्यास प्रेरित करते.

      हटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...