![]() |
| आस पावसाची.... |
दुष्काळ आणि मराठवाडा हे नाते वर्षानुवर्षे अगदी घट्ट बनले आहे. मराठवाड्यातील जनतेला दुष्काळ जणू आता घरचा एक सदस्यच वाटू लागला आहे. पूर्वी म्हटले जायचे सुल्तानी व आस्मानी संकटाने मराठवाड्यातील शेतकरी खचून जायचे काळ बदलला सुल्तानी संकटापासून सुटका झाली पण आस्मानी संकट पाचवीला पुंजल्या सारखे सतत पाठीमागे आहे. आषाढी आली की वारकर्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते तशीच आस मृग नक्षत्र सुरु झाला की शेतकऱ्यांना पावसाची लागते.मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा जून महिना पावसाच्या आशेने उगवतो व ऑक्टोबर संपता संपता या आशेची निराशा कधी होते ते कळतच नाही. दुष्काळ व मराठवाडा हे समीकरण कायम आहे.
दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्त गावी आलो आहे.पण शेतकऱ्यांच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे.चिंता आजची नाही पण नोव्हेंबर ते जून हे 8 महिने कशी जातेल या चिंतेत आज प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत आहे. ज्या जून ते सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असते पण यावर्षी सरासरी पेक्षा 50% पेक्षा कमी पाऊस झाला आहे.नद्या नाले कोरडे ते कोरडेच राहिले आहेत. आगोदरच डोंगराळभाग जमिनीची प्रत हलकी त्यात पावसाने दिलेला दगा,सावकारी पाषा,सरकारी कर्ज,मुलींच्या लग्नाचा ताण अशा अनेक मानसिक तानात जर पाऊसच नाही पडला तर विचार करणेही कठीण होऊन जाते की त्या शेतकऱ्यांच्या मनात काय चालत असेल ते. या वर्षी खरिप हंगाम जेमतेम कसातरी पोटापाण्यापुरता आलेला त्यामुळे निदान दोन वेळच्या जेवणाचा तरी आधार शेतकऱ्याला मिळाला आहे.खरिप हंगामाचे वांदे,रब्बी ची तर बातच सोडा.आजच पुढील 8 महिन्यांचे भविष्य समोर दिसत आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तोंड आ वासून बसला आहे.आज गावात शेतकऱ्याच्या तोंडी एकच विषय जून पर्यन्त काय स्थिती होईल व निदान पुढल्या वर्षी तरी चागला पाऊस पडेल की नाही. मराठवाड्याला दुष्काळाची जणू सवय लागावी अस झालं आहे.गावातील वडीलधारी माणसं सांगतात 1982 ला तर खूप भयाण स्थिती होती दोन वेळच्या अन्नाची मारामारी होती.पण पंढरपूरचे तनपुरे मठाचे अधिपती श्री बद्रीनाथ महाराजांचे वडील श्री तनपुरे महाराजांनी गावाला सावरलं व 2 ते 3 महिने अन्नछत्र सुरु करून सावरगावला खूप मोठ्या संकटातून वाचवलं होत. पण जुने जाणते लोक सांगतात त्या वर्षीपेक्षा हि या वर्षी पाऊस कमी आहे.अशी स्थिती पुन्हा गावावर येऊ नये अशी प्रार्थना लोक करू लागले आहेत. माझं गाव लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ भाग,पाऊस जेमतेम गरजेपुरता त्यामुळे दुष्काळ म्हणजे पाहुण्यासारखाच वाटतो.इतर व्यवसायाला संधी नाही . उद्योगधंदे पट्टा हा पुणे तो ही400 कि.मी. लांब.अशा स्थितीत येथील मुलांना लहान पणापासूनच मनावर बिंबवलं जात की शिक्षणा शिवाय पर्याय नाही म्हणून की काय आज घडीला 400 ते 500 गावातील व्यक्ती नोकरदार आहेत तर काही पुणे,औरंगाबाद,मुंबई या ठिकाणी उद्योगधंद्यात आहेत ही सर्व दुष्काळी परिस्थितीने दिलेली देणं म्हणावी लागेल.
लातुर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्य 600 ते 800 मी मी च्या आसपास असते.पण हा आकडा कायम राहील याची शाश्वती कमीच.दर दोन वर्षांनी दुष्काळाचा फेरा असतोच.जरी पाऊस सरासरी पडला तरी उपलब्ध धरणांतून ऊस या पिकासाठी पाण्याचा उपसा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो तसेच बरेच पाणी बाष्पाच्या माध्यमातून कमी होते त्यामुळे उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण होतात.
माझ्या गावच्या ग्रामपंचायतीच्या पर्जन्यमापक यंत्राच्याआकडीवरीवरून अंदाज येईल की 2017 पेक्षा 2018 ची पावसाची स्थिती कीती गंभीर आहे. *2017 साली सावरगाव रोकडा येथे 6 जून 2017 ते 12 ऑक्टोबर 2017 या दरम्यान पाऊस पडला त्याची आकडेवारी एकूण 710 मी मी होती.* म्हणजे सरासरी पेक्षा थोडा कमी पाऊस पडला होता पण या मुळे गावच्या साठवण तलावात,पाझर तलावात, नदीला एक दोन पूर येऊन गेले तसा चांगल्या प्रकारे पाऊस झाला होता व त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपा प्रमाणे रब्बी हंगाम ही चांगल्या प्रकारे घेता आला होता.पण आपण 2018 च्या आकडेवारीचा विचार केला तर भयाण वास्तवाची समज येईल. *2018 साली सावरगाव रोकडा पर्जन्यमापी यंत्रातील नोंदी अशा जून 2018 -175.03 मी.मी.,जुलै 2018- 49.07 मी.मी., ऑगस्ट 2018 - 91.09 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.* विशेष म्हणजे या वर्षीच्या पहिला पाऊस 1 जून 2018 ला व शेवटचा पाऊस 21 ऑगस्ट 2018 झाला आहे. 21 ऑगस्ट नंतर आज पर्यंत पाऊस पडलाच नाही. *2018 ची पावसाची नोंद ही 310 मी.मी. आहे.* म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा 50% ही पाऊस झाला नाही तेंव्हा आपल्याला अंदाज येईल की शेतकऱ्यांची काय परिस्थिती असेल. या वर्षी एकाही पावसात ओढा वाहिला नाही की नदीला पाणी आले नाही,धरणे तर कोरडेच.खरीपातील सोयाबीन कसेबसे आले पण तूर,कापूस तसेच रब्बीच्या पिकाचे काहीच खरे वाटत नाही. आजच दिवाळी सणामध्ये पुढील काळ कसा असेल याची चिंता बळीराजाला सतावत आहे.
आस्मानी संकटांनी दगा दिला तर आहेच पण सरकार ही दुष्काळ जाहीर करायला तयार नाही.लातुर जिल्ह्यात सर्वत्र हीच स्थिती आहे तरी जिल्ह्यातील 10 तालुक्यापैकी फक्त शिरूर अनंतपाळ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. उरलेल्या 9 तालुक्यातील शेतकरी दुष्काळ जाहीर होण्याची वाट पाहत आहेत, विविध राजकीय पक्ष ,संघटना सरकारशी दुष्काळ जाहीर करण्यासाठी संघर्ष करत आहेत पण शेतकऱ्यांनी आज ही हार मानलेली नाही. *शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील तेव्हा येतील पण दीन परिस्थितीतही बळीराजा दुष्काळाशी दोन हात करायला तयार आहे.*
आजही प्रत्येकाची एकच आशा आहे ,कोठून तरी नभात काळे ढग यावेत व वरूनराजाने मनसोक्त बरसात करून धरणीमातेला व बळीराजाला तृप्त करून संकटातून वाचवावे.....
![]() |
| अतृप्त धरणीमाय |
![]() |
| पाण्याअभावी पिकांचे हाल |
![]() |
| आसुसलेल्या वनस्पती |
![]() |
| ही माझ्या गावची नदी जून 2018 पासून कोरडीच.... |





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा