गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

शिक्षणाची वारी 2018-19

आस शिक्षणाच्या वारीची भेट वारकऱ्यांची.....
आषाढ महिना उजाडला की जशी वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची आस लागते तशीच ओढ शिक्षकांना दिवाळी सुट्टी संपली की शिक्षणाच्या वारीची लागते.शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक कार्यक्रमा अंतर्गत 2015-16 पासून शिक्षणाच्या वारीची सुरवात केली आहे.महाराष्ट्रतील वेगवेगळ्या भागात आपआपल्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळा व शिक्षकांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना व्हावी या हेतूने शिक्षणाच्या वारीचे आयोजन केले जात आहे.शिक्षणाच्या वारीमध्ये 50 वेगवेगळ्या विषयाचे स्टॉल असतात व त्या स्टॉलवरील उपक्रमाची माहिती येणाऱ्या शिक्षक,पालक,विध्यार्थी, सेवाभावी संस्था यांना देण्यात येते.2015-16 साली पहिल्या वारीचे आयोजन पुणे येथे बालवाडी क्रीडा संकुलात करण्यात आले होते त्या पहिल्या वारीला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून हजारो शिक्षक वारीतील प्रयोग पाहण्यासाठी तेथे आले होते.2016-17 च्या वारीचे विभाग पातळीवर तीन ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.पुणे,नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी वारी आयोजित करण्यात आली होती व याही वारीला उदंड प्रतिसाद मिळाला होता.2017-18 सालची शिक्षणाची वारी लातुर,अमरावती,रत्नागिरी व नाशिक या चार ठिकाणी संपन्न झाली.या तिसऱ्या वारीत शिक्षकां सोबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ही वारी पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते व प्रत्येक ठिकाणी वारीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.2018-19 हे वारीचे चौथे वर्ष आहे. या वर्षी शिक्षणाच्या वारीचा विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण या वर्षीची वारी पाच ठिकाणी होत आहे.मुंबई,कोल्हापूर,नांदेड,जळगाव आणि वर्धा या ठिकाणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान शिक्षणाची वारी होणार आहे.या वर्षीच्या वारीचे पहिले आयोजन मुंबई विभागात करण्यात आले होते.बांद्रा कुर्ला येथील MMRDA क्रीडा संकुल मैदानावर दि.28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत वारीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दर वर्षीच्या वारी प्रमाणे याही वारीत वारकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.या वारीत खूप दर्जेदार स्टॉलची मांडणी करण्यात आली होती या स्टॉलमध्ये नेमकं काय काय होत ते आता आपण पाहूयात.
*◆स्टॉल क्र.1-* जि प शाळा रानवडे ता.माणगाव जि.रायगड येथील शाळेने शा.व्य.समितीच्या मदतीने शाळेचा कसा कायापालट केला याची मांडणी करण्यात आली होती.iso शाळा,अनेक स्वछता पुरस्कार शाळेला मिळाले आहेत तसेच गुणवत्तेच्या बाबतीत हि शाळा रायगड जिल्ह्यात मॉडेल स्कुल आहे.शाळेने अनेक अनुकरणीय उपक्रम राबवले असून ही शाळा अ श्रेणीत आहे.
*◆स्टॉल क्र.2-* DIECPD अमरावतीच्या या स्टॉलवर झिरो बजेट विज्ञान प्रयोग ही संकल्पना साकारण्यात आली होती.टाकाऊ वस्तू पासून प्रयोग करणे व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा हेतू होता,तसेच पालक व विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हा या स्टॉल मागचा हेतू होता.
*◆स्टॉल क्र.3-* जि प शाळा वडगाव बांडे ता. दौंड,पुणे या स्टॉलवर किशोरवयीन मुलांचे आरोग्यशिक्षण या विषयाच्या स्टॉलवर कंजरभट जमाती मधील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या आरोग्य विषयक असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न येथे मांडण्यात आले होते.मासिकपाळी व्यवस्थापन,लैंगिक शिक्षण तसेच लग्न झालेल्या मुलींचे शिक्षण कशा परिस्थितीत सूरु ठेवले आहे याची माहिती तेथे मांडण्यात आली होती.
*◆स्टॉल क्र.4-* जि प शाळा दोडी ता.सिन्नर,नाशिक या स्टॉलवर शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले याची मांडणी केली होती.स्पोकन इंग्रजी,डिजिटल स्कुल,ई लर्निंग, सेमी इंग्रजी वर्ग असे विविध उपक्रम राबवून शाळेची पटसंख्या तर वाढलीच पण इतर गावावरून हि या शाळेत मुलं शिक्षणासाठी येतात हे या शाळेच्या यशाचे गमक समजले.
*◆स्टॉल क्र.5-* गटशिक्षण अधिकारी पं स पोलादपूर जि रायगड या स्टॉलवर लोकसहभागातून तालुक्यातील शाळांचा कसा कायापालट झाला हे समजले.लोकसहभागातून 4.50 कोटी निधी,75%शाळा डिजिटल,100%शाळा प्रगत तसेच या तालुक्यातील इंग्रजी विषयासाठी BCPT  हा उपक्रम राज्यात लिकप्रिय होत असलेला या स्टॉलवरून समजले.
*◆स्टॉल क्र.6-* लायन्स जुहू सेंटर मुंबई या स्टॉलवर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शाळेने मुलांमधील कलागुण ओळखून व त्यांना वाव देऊन कला कार्यनुभव व क्रीडा क्षेत्रात कशी उतुंग भरारी मारली आहे याची प्रचिती येते.शाळेतील अनेक दिव्यांग मुलांनी राज्य,राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात मेडल मिळवलेले असल्याचे समजले.
*◆स्टॉल क्र 7-* जि प शाळा वेल्दूर ता.गुहागर,रत्नागिरी या स्टॉलवर शाळेतील पालकांचा अध्यापनात व कौशल्यात कशाप्रकारे मदत मिळाली हे समजले पोहणे प्रशिक्षण,संगणक प्रशिक्षण,योगा प्रशिक्षण,कराटे प्रशिक्षण,नृत्य ,स्वछता हे सर्व उपक्रम पालकांच्या मदतीने शाळेत राबवले जातात त्यामुळे शाळेतील अनेक मुलं अनेक स्पर्धेत अग्रेसर असलेले समजले.
*◆स्टॉल क्र.8-* प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या स्टॉलवर भागाकार समजून घेताना या विषयी माहिती मिळाली.मुलांना भागाकार अवघड का जातो? भागाकार म्हणजे काय? अशा विविध संकल्पना या स्टॉलवर मांडल्या होत्या. या स्टॉलवरची माहिती समजून घेतल्यास शाळेतील मुलांची भागाकराची भीती निश्चित कमी होईल याची खात्री पटली.
*◆स्टॉल क्र.9-* रामकृष्ण परमहंस BMC शाळा मुंबई  या शाळेच्या स्टॉलवर मनपा शाळेतील मुलांना तंत्रज्ञानाचे धडे मिळावे म्हणून टॅब उपलब्ध करून दिले आहेत तसेच व्हर्चुअल क्लासरूम च्या माध्यमातून मुलं शिक्षण घेत आहेत.तसेच मुंबई म न पा मधील 400  शाळेतील 1 लाख 12 हजार विध्यार्थी व्हर्चुअल क्लासरूम द्वारे शिक्षण घेत आहेत असे समजले.
*◆स्टॉल क्र.10 -* म न पा शाळा चारकोप मुंबई या स्टॉलवर पाठयपुस्तकाची बदलती भूमिका मांडण्यात आली होती,यात शैक्षणिक धोरणानुसार पाठयपुस्तके कसे असावेत यावर माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र 11-* म.प्रा.शिक्षण परिषदेच्या स्टॉलवर ALP या कार्यक्रमाविषयी मांडणी करण्यात आली होती.इयत्ता 9 वी च्या मुलांसाठी जलद गतीने शिक्षण हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.2016-17 साली राज्यातील 1423 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला होता.2017 18 या वर्षी ssc बोर्डातील 60313 शिक्षकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले होते व 2018 19 या वर्षी ssc बोर्ड अंतर्गत 15:1 या शाळेमध्ये संपर्क शाळा निश्चिती करून शिक्षकांचे सक्षमीकरण केले जाणार आहे याबद्दलची माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र 12-* बीट पुसेगाव ता.खटाव,सातारा या स्टॉलवर शा. व्य.समितीच्या मदतीने बिटातील शाळेचा विकास कसा झाला आहे ते मांडण्यात आले होते.व्हिलेज गो टू स्कूल या संकल्पनेत गावातील सर्व भिंती,कोपरे हे इंग्रजी शब्द, वाक्य यांनी रंगवल्या असून अनेक शाळात टॅबने शिक्षण दिले जाते.41 लाख लोकवाट्यातून शाळेचा विकास करण्यात आला आहे.
*◆स्टॉल क्र.13-* जि प शाळा वजीराबाद जि.नांदेड या स्टॉलवर विविध कल्पक उपक्रम राबवून मुलांचे ब्रेन डेव्हलप कशा प्रकारे केले जाते याची मांडणी केली होती तसेच एका सापसीडीद्वारे चांगल्या सवयी व वाईट सवयी मुलांना अगदी सोप्यापध्द्तीत कशा सांगाव्यात याची मंडणी केली होती.
*◆स्टॉल क्र.14-* जि प शाळा नंदोरी ता.भद्रावती,चंद्रपूर या स्टॉलवर शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने शाळाबाह्य मुलांना कशाप्रकारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले व त्यामुळे मुलं शिक्षणाच्या प्रवाहात कसे आले याची माहिती मिळाली.बालरक्षक चळवळीत या शाळेचे चांगले कार्य पाहायला मिळाले.
*◆स्टॉल क्र.15-* महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान मुंबई या स्टॉलवर संस्कृत भाषेतील साहित्याची मांडणी होती तसेच संस्कृत भाषेचे महत्व त्याचा वापर व वेगवेगळे उपक्रम पाहायला मिळाले.
*◆स्टॉल क्र.16-* शांतीलाल मुत्था फौंडेशनच्या वतीने मूल्यवर्धन स्टॉलवर मुलांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात याचे कार्य बरेच वर्ष सुरु असलेले पाहायला मिळाले.शाळेतील मुलांना चांगल्या विचारांची,मूल्यांची गरज ओळखून या कार्यक्रमाची अमलबजावणी सुरु आहे.
*◆स्टॉल क्र.17-* बावी बीट, ता.सिन्नर,जि.नाशिक या स्टॉलवर बिटातील शाळेंनी लोकसहभागातून शाळेचा विकास कशाप्रकारे साधला आहे याची उत्तम मांडणी या स्टॉलवर करण्यात आली आहे.ग्रामस्थांचे जर सहकार्य लाभले तर शाळेचा विकास होण्यास वेळ लागणार नाही हे या स्टॉलला भेट दिल्यास समजून येते.
*◆स्टॉल क्र.18 -* समता विभागाच्या बालरक्षक चळवळी विषयी या स्टॉलवर मांडणी करण्यात आली होती. राज्यात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कशा प्रकारे आणले जात आहे याची माहिती या स्टॉलवर मिळाली.  राज्य शाळाबाह्य मुक्त मुल करण्यासाठी मुंबई,उर्वरित महाराष्ट्रात किती झपाट्याने बालरक्षकाचे यशस्वी काम चालू आहे याची माहिती स्टॉलवरील बालरक्षकांनी दिली.राज्यातील प्रत्येक शाळाबाह्य मुल शाळेत आलं पाहिजे ,टिकले पाहिजे व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले पाहिजे या हेतूने या बालरक्षक चळवळीची संकल्पना समजली.
*◆स्टॉल क्र.19-* मनपा शाळा वडाळा मुंबई या स्टॉलवर शाळा समितीच्या मदतीने शाळेचा विकास कसा झाला हे मांडण्यात आले होते.पटसंख्या वाढीसाठी ,गुणवत्ता वाढीसाठी पालकांचे सहकार्य खूप लाभले याची माहिती मिळाली तसेच या शाळेतील पालक आपआपल्या कलेचा उपयोग मुलांना शिकवण्यासाठी करतात असे या स्टॉलवर माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र.20-* कुमुद विद्या मंदिर देवनार,मुंबई या शाळेत SMDC च्या मदतीने शाळेचा विकास कसा झपाट्याने झाला ते मांडण्यात आले होते. या शाळेचा आजमितीला पट 2461असून जवळपास 70 शिक्षक कार्यरत आहेत.इंग्रजी माध्यमांच्या शाळेंच्या स्पर्धेत ही शाळा मुंबई सारख्या ठिकाणी स्पर्धेत असल्याचे समजले.
*◆स्टॉल क्र.21-* जि प शाळा चिराडपाडा ता.भिवंडी, ठाणे या शाळेतील शा व्य समिती मुळे शाळेतील मुलांना व्यवसायिक प्रशिक्षण, आपत्कालीन प्रशिक्षण,स्वछता अभियान,पाककला या विषयी नैपुण्य प्राप्त झाले आहे तसेच शाळा समितीच्या सहकार्याने शाळेचा विकास तर झालेला आहेच त्या प्रमाणे गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा अग्रेसर असलेली पाहायला मिळते.
*◆स्टॉल क्र.22-* जि प शाळा फरळेपाडा ता.जव्हार,पालघर या स्टॉलवर शाळा व्यवस्थापन समिती किती जागरूक झाल्या आहेत याची प्रचिती येते. जव्हार सारख्या आदिवासी दुर्गम क्षेत्रात smc च्या मदतीने लाखो रुपये लोकवाटा जमवून शाळा सुसज्ज बनवलेली पाहायला मिळते तसेच  सामाजिक संस्थेकडून शाळेसाठी अनेक प्रकारच्या मदती मिळालेल्या पाहायला मिळाला.
*◆स्टॉल क्र.23-* जि प शाळा हेदवली ता.कर्जत,रायगड, दुर्गम डोंगराळ भागातील ही रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध शाळा, शाळेत कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही.लोकसहभागातून
जवळपास 15 लाखापेक्षा अधिक निधी शाळेने जमा केला असून ही शाळा एक मॉडेल स्कूल स्वरूपात राज्यात ओळखली जाऊ लागली आहे.
*◆स्टॉल क्र.24-* मुंबई विद्या प्राधिकरणाच्या या स्टॉलवर समाजशात्रातील विविध घटकावरील मॉडेलची मांडणी करण्यात आली होती.विध्यार्थ्यांमधील समाजशास्त्र विषयाची भीती कमी व्हावी व अतिशय सोप्या पद्धतीत विषयाची मांडणी कशी असावी हे या स्टॉलवर पहायला मिळाले.
*◆°स्टॉल क्र.25-* ग्यान फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील मानवत व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शाळेचा विकास करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रबोधन केले जात आहे व याचा असर म्हणजे या दोन तालुक्यातील बऱ्याच शाळांचा विकास शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने झालेला पाहायला मिळाला.
*◆स्टॉल क्र.26-* अगस्त्य फाऊंडेशन मुंबई या स्टॉलवर विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग अतिशय कल्पकतेने मांडले होते.मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व विज्ञान विषय सोपा जावा यासाठी या स्टॉलवर माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र.27-* जि.प.शाळा शिवडे ता.सिन्नर,नाशिक या स्टॉलवर किशोरवयीन मुलांशी संवाद कसा साधावा याची माहिती मिळाली.वयात आलेल्या आपल्या पाल्यांना पालकांनी कशाप्रकारे मोकळा संवाद साधावा,त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरणात लैगिंक शिक्षणावर कशी चर्चा करावे याची माहिती या स्टॉलवर मिळाली.
*◆स्टॉल क्र.28-* मनपा उर्दू शाळा सोलापूर या स्टॉलवर शाळेने विविध उपक्रम राबवून कशा प्रकारे गुणवत्ता वाढवून शाळेची पटसंख्या वाढवली याची माहिती मिळाली.ऊर्दू शाळेकडे पालकांचा ओढा कशाप्रकारे वाढत आहे हे समजले.
*◆स्टॉल क्र.29-* जि.प.शाळा गोवणे ता.डहाणू,पालघर या शाळेने सोशेल मीडियाच्या वापरातून लोकसहभग मिळवून शाळेचे रुपडं पालटलं आहे.सोशेल मीडियाचा योग्य वापर केल्यास शाळेचा  कसा विकास करता येऊ शकतो हे या स्टॉलवर समजले.
*◆स्टॉल क्र.30-* लीप फॉर वर्ड मुंबई या स्टॉलवर  मुलांमध्ये इंग्रजी संवाद कौशल्य कशा प्रकारे लवकरात लवकर वाढेल व इंगजीची भीती कमी होऊन ती सुलभ व्हावी यासाठी या कार्यक्रमाची आखणी केली आहे.शिक्षक व विध्यार्थी मार्गदर्शिकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम राज्यात राबविला जात आहे.
*◆स्टॉल क्र.31-* जि प ऊर्दू शाळा कळमनुरी ता.औंढा, हिंगोली या स्टॉलवर ऊर्दू, मराठी,इंग्रजी माध्यमातील मुलांना विविध अँप च्या माध्यमातून सोप्या पद्धतीत शिक्षण कसे घेता येईल याची मांडणी केली होती.
*◆स्टॉल क्र.32-* के.व्ही.के. शाळा घाटकोपर मुंबई  या स्टॉलवर माध्यमिक विभागासाठी राचनावादाची मांडणी केली होती.कृतियुक्त शिक्षण,मेंदूवर आधारित शिक्षण तसेच विविध नवनवीन संकल्पना पहायला मिळाल्या.
*◆स्टॉल क्र.33-* एडलगीव्ह फाऊंडेशनच्या वतीने विदर्भातील गडचिरोली व अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्याचा शाळा विकासासाठी सहभाग वाढावा यासाठी सक्षमीकरनाचे काम या फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
*◆स्टॉल क्र.34-* जि प शाळा अंगणवाडा ता.येवला,जि.नाशिक या स्टॉलवर शाळाबाह्य मुलांना smc च्या माध्यमातून शाळेत कसे दाखल व बालरक्षक चळवळीतून 100% शाळाबाह्य मुलं या ध्येयाकडे वाटचाल कशी सुरु आहे याची माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र.35-*  विद्या प्राधिकरणाच्या शाळा सिद्धी या स्टॉलवर प्रत्येक शाळा अ श्रेणीत आणण्यासाठी कोणत्या निकषांची पुर्तता केली पाहिजे याची सविस्तर माहिती या स्टॉलवर मिळाली.
*◆स्टॉल क्र.36-* जि.प शाळा सावरपडा ता.मोखाडा,पालघर या  शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमामुळे शाळेची गुणवत्ता कशी वाढली व शाळेचा विकास कसा झाला याची माहिती मिळाली.लोकसहभागातून शाळेला टॅब,लाखो रुपये रोख व वस्तूरूपात शाळेंना मदत मिळाली असे समजले.
*◆स्टॉल क्र.37-* पं स साकोली जि.भंडारा दिव्यांग मुलांमधील विविध गुणांचा,कौशल्याचा शोध घेऊन विविध उपक्रम या पंचायत समिती कार्यक्षेत्रात राबवले जात आहेत.703 समावेशीत विध्यार्थ्यां मधील गुण शोधून त्याच्याकडून कला, कार्यनुभव ,शा.शिक्षण विषयाचे विविध उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
*◆स्टॉल क्र.38-* व्यावसायिक ऊर्दू शाळा बांद्रा मुंबई , आजकाल व्यवसायिक शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.मुलांतील कलागुणांना चालना देण्यासाठी या शाळेत लाकूडकामातून नवनिर्मितीस चालना दिली जाते.विध्यार्थी स्वतः लाकडाच्या सुंदर सुंदर वस्तू बनवतात त्यांचे प्रदर्शन स्टॉलवर मांडण्यात आले होते.
*◆स्टॉल क्र 39-* प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद या स्टॉलवर राज्यात शिक्षकांचे इंग्रजी टॅग प्रशिक्षणे व भविष्यात शिक्षक समृद्ध तर विध्यर्थी विकास. या हेतूने इंग्रजी स्पोकन प्रशिक्षणाची गरज ओळखून या कार्यक्रमाची आखणी केलेली समजते.
*◆स्टॉल क्र 40-* नवबुद्ध मुलांची शाळा चाळीसगाव ,जळगाव या स्टॉलवर स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल याची मांडणी केली होती.वयक्तिक स्वच्छता,सार्वजनिक स्वछता कशी राखावी तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाळा स्वच्छतेचे महत्व सांगणारे अनेक घोषवाक्य, मॉडेल इथे पाहायला मिळाले.
*◆स्टॉल क्र.41-* जि प शाळा जरेवाडी ता.पाटोदा,जि.बीड ,ही शाळा म्हणजे महाराष्ट्राची रोलमोडेल शाळा आहे.अथक परिश्रम व मेहनतीच्या बळावर शाळेचा कायापालट कसा झाला हे आपणास पाहावयास मिळतो.24 पट संख्येवरून आज शाळेचा प्ट 654 आहे ,या वरून अंदाजा येईल की या शाळेत काय विषेश आहे ते.शिष्यवृत्ती परीक्षेत उतुंग यश,विविध स्पर्धा परीक्षेतील यश,गुणवत्ता वाढ यामुळे या शाळेची प्रगती दिसते.
*◆स्टॉल क्र.42-* जि प ऊर्दू शाळा असोडा,जि.जळगाव या स्टॉलवर सोप्या पद्धतीत भाषा व गणित विकसन कार्यक्रम असा राबवला आहे याची माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र.43-* म.रा.शै.सं.व प्रशि.परिषद पुणे च्या स्टॉलवर 6 वी ते 8 वीसाठी गणित व भाषा विषयात मागे राहिलेल्या विध्यार्थ्यांसाठी उपक्रम असे राबवावे याची माहिती मिळाली.
*◆स्टॉल क्र.44-* विद्या भारती देवगिरी प्रांत ,औरंगाबाद या स्टॉलवर वैदिक गणित यावर मांडणी केलेली पाहायला मिळाली,200 वर्षाचे केलेंडर वैदिक पद्धतीत कसे ओळखावे याचे प्रात्याक्षिक तेथे मिळाले.
*◆स्टॉल क्र.45-* जि प शाळा भातगाव,ता.गुहागर,रत्नागिरी , नारळाच्या करवंटी पासून विविध कलाकृती बनवून कोकणातीलविध्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी हा स्टॉल लक्षवेधी ठरत होता.
*◆स्टॉल क्र.46-* इकरा ऊर्दू शाळा,जळगाव , टाकाऊ ते शिकाऊ या विषयांतर्गत टाकाऊ वस्तूपासून विविध शैक्षणिक प्रयोगाची अतिशय सुंदर निर्मिती केलेली पाहावयास मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीसाठी हा स्टॉल खूप उपयुक्त ठरला.
*◆स्टॉल क्र.47-* जि प शाळा आडुळ ता.पैठण,जि.औरंगाबाद या स्टॉलवर रचनावादी प्रयोगशाळेच्या मांडणीतून गणितीय संबोध अगदी सोप्या व सहजरित्या समजावून सांगितले जात होते.गणित विषय हा सोपा विषय आहे व याची योग्य मांडणी केली तर तो विद्यार्थ्यांनाही मनोरंजक व सोपा वाटेल हे समजले.
*◆स्टॉल क्र.48-* विद्या प्राधिकरण पुणे च्या या स्टॉलवर जीवन शिक्षण या अंका विषयी माहिती मांडली होती.आपल्या शाळेतील उपक्रम,नाविन्य प्रयोग जर जास्तीजास्त शाळापर्यंत पोहचवण्याचे एकमेव मासिक म्हणजे जीवन शिक्षण. दर महिन्याला 60 हजाराच्या आसपास या मासिकाचे अंक छापले जातात व महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातील शाळेमध्ये पोहचले जाते.
*◆स्टॉल क्र.49-* बालभारती पुणे या स्टॉलवर बालभारती प्रकाशनाच्या सर्व पुस्तकाची मांडणी केली होती व दुर्मिळ व निवडक पुस्तके पण येथे पाहायला मिळाले.
*◆स्टॉल क्र.50-* म.रा.माध्य व उच्च माध्य मंडळ पुणे या स्टॉलवर मंडळाच्या पुस्तकांची मांडणी केली होती व शिक्षकांस आवश्यक साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले होते.
अशा प्रकारे शिक्षणाच्या वारीमध्ये दर्जेदार असे 50 स्टॉलवर विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले आहेत. पुढील काळात कोल्हापूर, नांदेड, जळगाव आणि वर्धा या ठिकाणी होणाऱ्या या शिक्षणाच्या वारीला भेट द्या व आपली शाळा गुणवत्तापूर्ण घडवण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करा......
*✍🏻..श्री गजानन पुंडलिकराव जाधव*
*रा.जि.प.शाळा संतोषनगर*
*ता.रोहा,जि.रायगड*
*9923313777*
gajanan.jadhav1984@gmail.com

१७ टिप्पण्या:

  1. शिक्षणाच्या वारीबाबत छान माहिती मिळाली.
    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. शिक्षणाच्या वारीचे समग्र वर्णन.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय महत्त्वाची व मुद्देसूद माहिती

    उत्तर द्याहटवा
  4. वारी चांगली होती, शिक्षाकना चांगली माहिती मिळाली

    उत्तर द्याहटवा
  5. वारी तीन दिवसात पाहणे व समजून घेणे खूप कमी वेळ मिळाला.आपल्या या ब्लॉगमधून दिलेली माहिती पुन्हा नजरेसमोरून गेली व आपणही काही प्रयत्न करावे ही प्रेरणा देऊन गेली .धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम माहिती मिञा..घरबसल्या शिक्षणवारी घडली

    उत्तर द्याहटवा
  7. शिक्षणाची वारी बाबत विस्तृत माहिती व शिक्षणाच्या वारी मध्ये समाविष्ट घटकांची छान माहिती मिळाली धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...