शनिवार, ४ एप्रिल, २०२०

जीवनात बदल घडवणारे नोकरीतील पहिले दहा वर्षे...

पहिली शाळा पालेखुर्द आदिवासीवडी ता.रोहा चे माझे विध्यार्थी
3 मे 2006 च्या मुलाखतीत नोकरी मिळाली होती व त्याच आनंदात घर गाठलं होत. गावाकडे गेल्यानंतर आईला, वडिलांना,भावांना, बहिणीला खूप आनंद झाला होता.बघता बघता मे महिना सरला होता व आता उत्सुकता होती 12 जूनची शाळा सुरु होण्याची , त्याप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात आवरा आवर सुरु होती व 11जून ला रोहा गाठायचा होता. गावावरून 10 जून 2006 रोजी कर्मभूमीची वाट धरली.यायच्या दिवशी घरी खूप भावुक वातावरण झालं होतं कारण जन्मापासून ते वयाच्या 21 व्या वर्षा पर्यन्त घरीच राहून माझं शिक्षण झालं होतं पण नोकरी निमीत्त 600 km दूर जाणार होतो त्यामुळे साहजिकच घरच्यांना काळजी वाटत होती.माझ्या आजीचे ,आईचे डोळे पानावत होते त्यांना खूप काळजी वाटत होती घरातील सर्वात लहान मी व नोकरी निमीत्त सर्वात दूर जाणार होतो त्यामुळे त्या सतत सांगायच्या तिकडे गेला की स्वतःची काळजी घे.
11 जून ला पुणे मार्गे खोपोली- पाली - कोलाड ला पोहचलो(कोलाड म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून मी राहत असलेले ठिकाण).प्रथमच या ठिकाणी आलो होतो त्यामुळे सर्व कांही नवीन होत ,तसा 11 तारखेचा एक दिवस कोलाडला काढला. ज्या दिवसाची उत्सुकता होती तो 12 जून चा दिवस उजाडला सकाळी 11 वाजता रोहा पंचायत समिती येथे हजर होण्यासाठी गेलो तेथे दिवसभर थांबून सर्व कागदपत्रे जमा केली तेथे माझ्या सारखे जवळपास 20 ते 25 जण शिक्षक राज्यातील विविध जिल्ह्यातून हजर व्हायला आले होते तेथे अनेकांचा थोडाफार परिचय झाला व तेथेन सर्व आपआपल्या नेमून दिलेल्या शाळेत उद्या हजर व्हायचं म्हणून मार्गाला लागले.
🔵 शाळेचा पहिला दिवस:- 13 जून 2006 चा दिवस या दिवशी लवकर उठून आवरून दिलेल्या शाळेत जायचं होत त्या प्रमाणे लवकर आवरलं व प्रथम कोलाड केंद्राचे केंद्र प्रमुख श्री द तू शिर्के सरांना रिपोर्टींग करायला गेलो सरांची भेट झाली त्यांना ऑर्डर दाखवली मला दिलेली शाळा होती पाले खुर्द आदिवासीवडी. साहेबांनी ऑर्डर पाहिली व मला म्हटले ती तुमची शाळा ,त्यांनी एका डोंगराकडे बोट दाखवलं व म्हटले ती उंच वाडी दिसते ना तुम्हाला तिथे जायचं आहे. साहेब शाळा दाखवून मोकळे झाले पण मला धक्काच बसला कारण खुप उंचावर एका डोंगराच्या कुशीत वसलेले ती वाडी दिसत होती खालून पाहिलं तर दाट जंगल कुठे तरी घरे दिसायची.वाडीच्या पायथ्याशी रिक्षाने पोहचलो तिथे एकाला विचारलं वाडीवर कसं जायचं त्यांनी सांगितलं हा कच्चा रस्ता वाडीवर जातो पण तेथे वाहन जात नाहीत  तुम्हाला चालत जावे लागेल.जवळपास 1 ते 1.5 km सलग चढण व जंगलातून कच्चा रस्ता होता , मी वाडी चढायला सुरुवात केली दोन्ही बाजूला दाट झाडी होती व सर्व रस्ता फॉरेस्ट हद्दीतून गेला होता. कधी नव्हे तो डोंगर चढत होतो त्यामुळे थकवा येत होता अर्धा रस्ता पार केल्यास एक आंब्याचे झाड होते त्या झाडाखाली थोडं बसलो पाणी पिले व पुढील प्रवास सुरु केला.शेवटी अर्धा ते पाऊण तास चालत वाडीवर पोहचलो तेंव्हा थोडा सपाट भाग लागला व समोर 25 ते 30 घरांची सुंदर वाडी दिसत होती.तेथून एक जण जात होता कमरेला पंचा गुंडलेला अंगात बनियन व कमरेला कोयता असलेला व्यक्ती त्यांना घाबरत घाबरत  विचारलं शाळा कोठे आहे त्यांनी बोट करून दाखवलं वाडीत जे रंगवलेलं ठिकाण आहे ती शाळा.एकदाच वाडीत पोहचलो.शाळा म्हणजे एक वर्गखोली व त्याच्या भोवती सर्व  झोपड्या, शाळेत पोहचलो तेथे आगोदर श्री मधुकर झोरे गुरुजी शिक्षक कार्यरत होते व त्यांना जोडीदार म्हणून मी गेलो होतो.मला पाहून गुरुजी खूप खुश झाले कारण त्यांनी एकट्याने 10 वर्ष त्या शाळेत काढले होते त्यामुळे त्यांना माझ्या रूपात सहकारी मिळाला होता त्यामुळे त्यांना आनंद झाला होता. झोरे गुरुजींनी चौकशी केली,मला हजर करून घेतले मुलांना परिचय करून दिला शाळेत जेमतेम 15 ते 20 विध्यार्थी होते व मला म्हटले आता तुम्ही बसा मी मीटिंग ला जातो म्हणून ते निघाले व जाता जाता गावातल्या एका व्यक्तीला सांगितले की गुरुजी नवीन आहेत शाळेत कोणी दारू  पिऊन आला तर त्याला सांगा,हे एकूण मी थोडा घाबरलोच होतो. पहिला दिवस मुलांचा परिचय करून घेण्यात गेला मुलांना पण दररोज एकच गुरुजी पाहून बहुतेक नवीन गुरुजी  आल्याने खूप भारी वाटत असेल असं जाणवलं.शाळेची वेळ सकाकी 10 ते 5 होती मग मी 5 वाजता शाळा बंद केली व परतीच्या प्रवासाला निघालो.रस्ता सर्व जंगलातून जाणारा व झाडीचा असल्याने थोडी भीती होतीच त्यामुळे कसाबसा वाडी उतरलो व कोलाड गाठलो. मुख्याध्यापकांच्या मदतीने कोलाडला एक रूम घेतली व माझ्या सारखे नवीन लागलेले दोघे शिक्षक असे आम्ही तिघे राहू लागलो.
🔵मुलांशी जुळले भावनिक नाते:- दररोजचा दिनक्रम ठरला होता सकाळी उठायचं मेस चा डब्बा घ्यायचा पण तीन महिन्यात मेस बंद झाली व मग आम्ही तिघे पार्टनर हाताने स्वयंपाक करू लागलो त्यानंतर स्वतः बनवलेला डबा घ्यायचा व शाळेला निघायचं मग रिक्षाने 3km व पुढे वाडीवर 45 मिनिट चालत जायचं त्यात त्या आंब्याच्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घ्यायची,थोडं पाणी प्यायचं व वाडी गाठायची व शाळेत पोहचायचो. शाळेत येणारे मुलं मजूर वर्गातील होते.दररोज त्यांचे पालक सकाळी लवकर मजुरीला जायचे व मुलं शाळेत शिक्षकाच्या विश्वासावर असायची त्यात शाळेत अंगणवाडी पण नव्हती तेव्हा त्यांचे छोटे भावंड पण शाळेत यायची त्यामुळे शाळा म्हणजे मुलांचं हक्काचं ठिकाण होत. सर्व मुले ही कातकरी आदिवासी जमातीची होती,घरचे सर्व वातावरण निरक्षर अनेकांच्या आई वडिलांनी तर शाळेचे तोंड ही पाहिले नव्हते त्यांची पहिली पिढी सध्या शिक्षण घेत होती. मुलं जेव्हा शाळेत यायची तेंव्हा अनेक मुल दररोज आंघोळ करत नव्हते,केस वाढलेले,नखे वाढलेली अस्वच्छ असायची त्यामुळे कधी कधी मुलांमध्ये बसायला पण संकोच वाटायचा.पालक सकाळी लवकर घर सोडायचे व मुलं शाळा भरली की असेल त्या वेशात शाळेत यायची त्यामुळे सुरवातीला मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे ठरवले व आम्ही दोघा शिक्षकांनी तशी सुरवात केली.
त्यावेळी मी मुलांना विचारायचो की दररोज सकाळी दोन नंबरला कोण कोण जात? पाणी कोण कोण वापरत? तेंव्हा मुलं खरं सांगायची गुरुजी आम्ही जातो पण पाणी नाही वापरत झाडाचा पाला,दगड वापरतो मग मी जरा अंदाज घेतला तर घरीच पाण्याचा वापर होत नसल्याने मुलं पण असेच करायची.त्यानंतर सर्वात आगोदर या गोष्टीवर काम करायचं ठरवलं व मुलांना शौचास जाताना पाणी वापरण्याची सवय लावली व कालांतराने ती सवय पालकांना पण लागली.आठवड्याला शाळेत नखे आम्ही काढायचो,जे मुलं दररोज आंघोळ नव्हते करत त्यांना आंघोळीची सवय लावली कधी कधी स्वतः त्यांना आंघोळ घातली जणूं त्यांचं आम्ही पालकत्वच स्वीकारलं होत अस वाटायच.सुरवातीला या गोष्टींचा थोडा त्रास झाला पण 2,3 वर्षांनी आमच्या मुलात एवढा बदल झाला की त्यांना आपलं आरोग्य कस चांगलं ठेवलं पाहिजे हे कळू लागलं. अनेक पालकांची भेट फक्त शनिवारी व्हायची त्यामुळे आढवड्यातून एकदा तरी पालक भेट घ्यायचो त्याच्या घरी जायचो तेंव्हा गरिबी काय असते,दोन वेळच्या जेवणासाठी काय काय करावे लागते हे समजायचे व त्यातून या मुलांची अधिक काळजी वाटायची. त्यात असे कांही मुलं होते की त्याने आई व वडील दोघे दारू पिऊन रहायचे व त्या लहान कोवळ्या मुलांना त्यांचा त्रास व्हायचा अशा वेळी कित्येकदा नवरा बायको चे दारूच्या नशेतील भांडण सोडवले आहेत.हे रान पाखरं म्हणजे राना वनात भटकणारे शिकार करून खाणारे,गलोल ने पक्षी मारणारे कधी कधी उंदीर,घुशी मारून भाजून खाणारे आपल्या धुंदीत मजेत राहणारे त्यामुळे त्यांना जर शिक्षण द्यायचे असेल तर त्यांच्याशी आगोदर दोस्ती करणे महत्वाचे होते व त्या प्रमाणे माझी वाटचाल सुरु होती. ते मुलं मला सुरवातीला नवीन गुरुजी व नंतर छोटा गुरुजी म्हणून हाक मारायचे ,त्यांच्या 'ये गुरुजी' या एकेरी उच्चरात ही खुप आपुलकी होती,पावसाळ्यात काकडी,भाजी,फणस,उन्हाळ्यात ओले काजू,आंबे मुलं आवडीने आणून द्यायची असे करत मुलांचे व माझे खूप भावनिक नाते तयार झाले होते.ते 10 वर्ष व आज त्या ठिकाणा वरून बदली होऊन 4 वर्ष होत आहेत त्यावेळी लहान असणारे माझे विध्यार्थी आजही कुठे भेटले तरी प्रेमाने आवाज देतात व आवडीने ,आपुलकीने बोलतात हे मुलांशी जुळलेले भावनिक नाते पुढील काळात माझ्या जीवनात बदल घडवायला खूप उपयोगी पडले.
🔵अशी जुळली बोलीभाषेशी नाळ:- शाळेत नवीन हजर झाल्यानंतर समजल की ही वाडीतील सर्व कातकरी समुदायातील आहेत ,रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासीवाड्या आहेत त्यात रोहा तालुक्यात जवळपास 150 च्या वर जि प शाळेत कातकरी बोलीभाषिक मुलं शिक्षण घेत आहेत त्या प्रमाणे माझ्या ही शाळेत मला कातकरी बोलीभाषिक मुलांचा सहवास लाभला. सुरवातीला जेंव्हा मी मुलांना बोलायचो तेंव्हा ते खूप लाजत असत व तोडक्या मराठीत संवाद साधत असत पण ते जेंव्हा आपआपसात कातकरी बोलत तेंव्हा मला नुसतं त्यांच्याकडे बघत राहावं लागायचं कारण मला त्यांची बोलीभाषा नवीन होती.आदिवासी समुदाय त्यांची बोलीभाषा,जीवनशैली हे सर्वच या आगोदर फक्त शाळेत असताना पुस्तकात वाचलं होतं पण आता प्रत्येक्षात या मुलांमध्ये मला काम करायचं होत म्हणून एक वेगळीच उत्सुकता होती. दररोज शाळेत यायचो तेव्हा मुलं आपआपसात कातकरी भाषेत कुजबुजत असायचे व माझं लक्ष गेले की ते गप्प बसायचे त्यांचे शब्द कानावर पडायचे पण मला त्याचा अर्थ लागत नसायचा असा तीन चार वर्षे प्रवास सुरु होताच कधी कधी भाषेमुळे खूप अडचण यायची कारण शाळेतील माध्यम भाषा ही मराठी व मुलांची बोली कातकरी तेव्हा एखाद्या ठिकाणी शब्दात अडकून पडाव लागायचं असे बरेचदा घडत जायचं.जसे वर्ष लोटत होते तसे मुलांमध्ये मी मिसळत जात होतो त्यांचे कातकरी बोलीतील संवाद कानावर पडत जायचे ,सतत सहवासात असल्याने मला त्यांच्या बोलण्यातील शब्दांचा अर्थ कळू लागला जसे माना(माझा),तुना(तुझा),पोवणे(घालणे ),ओपने(देणे),साकु (अंडी),भिंगरुट(फुलपाखरू),डवर(म्हातारा),डोसा(म्हातारी) असे दैनंदिन जीवनात वापरणारे अनेक शब्द माझ्या कानावर पडून ते ओळखीचे वाटू लागले व मला मुलांची थोडी थोडी भाषा समजू लागली. त्या दरम्यानच्या काळात मुलांशी मैत्रीचे व भावणीकतेचे नाते तयार होत गेले कधी कधी मी त्यांचे शब्द उच्चार लागले की त्यांना खूप मजा वाटायची जसे- काल कोणी 'साकु' खाल्ला?,आज कोणी नवीन कपडे 'पोवले'? असे प्रश्न विचारू लागलो की मुलं हसायची व त्यांना आनंद वाटायचा त्यामुळं झालं असं की मुलांच्या मनात एक भावना झाली की गुरुजी आपले आहेत,आपली भाषा बोलतात कधी कधी ते घरी जाऊन सांगायचे 'गुरुजी आमनी भाषा बोलह'(गुरुजी आपली भाषा बोलतात).
आता बऱ्यापैकी मला कातकरी समजू लागली होती,शाळेच्या शेजारी असणाऱ्या झोपड्यातून येणारा भांडणाचा आवाज आता मला कळू लागला होता व साहजिकच ते ऐकून वाडीतील एक गुरुजी या नात्याने कधी कधी मी भांडणे पण सोडवायचो लोकांना पण कळत होत हे गुरुजी आपली भाषा बोलतात व ते मुलांना शाळेत कातकरी बोलीत बोलतात. या शिकलेल्या भाषेचा आपण अध्यापनात वापर करायचा ठरवलं त्या प्रमाणे मी प्रथम 100 शब्दाचा द्विभाषिक संग्रह केला त्यात दैनंदिन व्यवहारातील कातकरी शब्द व त्याचा मराठीत अर्थ व तो शब्दसंग्रह जीवन शिक्षण या मासिकला पाठवला व तो जून 2014 च्या अंकात छापून आला त्यावेळी मला जिल्ह्यातून व राज्यातून अनेक प्रतिक्रिया आल्या की हा उपक्रम खूप चांगला आहे,मुलांना त्यांच्या बोलीभाषेत ज्ञान दिले तर ते अधिक समजते काशामुळं मला आणखी प्रेरणा मिळाली  व आपण जे करत आहोत ते योग्य आहे अशी भावना झाली.
दर वर्षी जून मध्ये पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश व्हायचे व पहिलीत येणारे मुलं हे पूर्णपणे घरच्या वातावरणातून शाळेत आलेले असायचे ,घरचे सर्व बोलीभाषेत संवाद साधायचे व शाळेत आलं की प्रथमच ते मराठी भाषेत बोलायला अडखळायचे त्यावर मी एक प्रयोग केला की शाळेत येणाऱ्या पहिलीच्या मुलांशी मी कातकरीत बोलायचो त्यामुळे त्यांना खूप आधार वाटायचा की आपण घरी जे बोलतो तेच गुरुजी बोलतात त्यामुळे त्यांची भीती कमी व्हायची. मी छोटे छोटे प्रश्न त्यांना विचारून त्यांचे मन रमवायचो जसे-1.तुना नाव काय आहा?(तुझं नाव काय आहे),2.तुना घर कठ आहा?(तुझं घर कोठे आहे),3.तू आंगळस का?(तू आंघोळ केला का) असे मी कातकरी बोलीत संवाद साधलो की मुलं आनंदाने पटापट उत्तर द्यायची व शाळेत रमून जायची.
पुढे आणखी एक प्रयोग केला पहिलीच्या पाठ्यक्रमातील कविता ,गोष्टी मी मुलांना कातकरी बोलीभाषेत शिकवू लागलो त्याने तर मुलं खूप आनंदी  व्हायचे व त्यांना स्वभाषेतून शिक्षण मिळू लागल्याने लवकर समजायचे. पहिलीत त्या वेळी एक कविता होती 'पाऊस' ती कविता मी कातकरी बोलीभाषेत अशी शिकवायचो..
'पाणी'(कातकरी बोलीभाषेत)
पाणी पडह सर सर सर,
घर मा चल र भर भर भर...
पाणी वाजह धडाड धूम,
पळह पळह ठोकह धूम...
पळीन पळीन आणाव घर,
पड रह पाणी दिस भर..
पाणी पडह चिडून चिडून,
आईसन्या उंगत बिसह दडून..

अशा पद्धतीने मुलांना त्यांच्याच भाषेत शिककण्याचा नवोपक्रम केला व हाच नवोपक्रम 2015-16 च्या राजस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातून निवडला गेला हि माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती.एका आदिवासीवाडी शाळेत राबवत असलेला  बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे हा उपक्रम जिल्ह्यात पहिल्या पाच क्रमांकात आला व राज्यासाठी त्याची निवड झाली होती.या आगोदरच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत  जीवन शिक्षणाच्या माध्यमातून शब्दसंग्रह पोहचला होताच व या नवोपक्रमामुळे अनेक कातकरी विध्यार्थी असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना याचा फायदा होणार होता.ज्या वेळी एक मनोरंजन म्हणून कातकरी भाषा शिकली ती शिकलेली भाषा आज अध्यापनात काम करत होती हे माझ्यासाठी खूप विशेष होते. एखाद्या नवीन भाषेची गोडी लागणे व ती आत्मसात करणे व त्यातून साहित्य बनवणे हा प्रवास सुखकारक होता,या सर्व प्रवासात विध्यार्थी हे माझे गुरु ठरले होते यांच्या मुळेच मी कातकरी भाषा शिकू शकलो व मला कातकरीची गोडी लागली होती.
🔵शाळेतून बदलीचा भावणीक क्षण:-2006 ते 2016 हे सुरवातीचे 10 वर्ष खूप महत्वपूर्ण होते, तरुण वयात भेटलेली नोकरी,ती पण अशा दुर्गम ठिकाणी तेथे जायला रस्ता पण नव्हता,त्यात कातकरी बोलीभाषिक मुलांशी जुळवून घेणे,त्यांची परिस्थिती पाहून माझं मन परिवर्तित होणे, वंचीत मुलांच्या शिक्षणासाठी मनात एक आस निर्माण होणे,मुलांशी ,ग्रामस्थांशी भावनिक नाते तयार होणे शाळा म्हणजे घर वाटणे अशा परिस्थितीतून जेव्हा बदली होते तेव्हा ते पचवणे खूप अवघड असते. 2016 साली माझे  प्रशासकीय बदलीच्या यादीत नाव आले व या शाळेवरील 10 वर्षाचा प्रवास थांबणार हे निश्चित झाले.ज्या टप्प्यावर कातकरी बोलीभाषेतील काम सुरु होते,त्याला गती येत होती अशात येथून बदली होणार होती व आपण हातात घेतलेलं काम थांबेल की काय याची भीती होती. माझी बदली होणार असे गावकऱ्यांना समजल्यावर ते बदली रद्द करण्यासाठी पुढे सरसावले होते पण बदली हा प्रशासकीय विषय असल्याने मीच ग्रामस्थांना समजवले व जेथे बदली होईल तेथे जायचे ठरवले.या 10 वर्षाच्या कालावधीत मला 3 सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली सुरवातीला श्री मधुकर झोरे हे 3 वर्ष सोबत होते त्यानंतर श्री विलास भगत गुरुजी 1 वर्ष सोबतीला होते व शेवटच्या 6 वर्षाच्या टप्प्यात तरुण व होतकरू शिक्षक श्री गिन्यानी सोलनकर याने खूप साथ दिली. या 10 वर्षात माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला होता, ठरवलं होतं की यापुढे ही फक्त कातकरी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करायचं पण अचानक आलेल्या बदलीमुळे निराशा आली होती पण आशा सोडली नव्हती ,हाती घेतलेला वसा असा सोडणार नव्हतो व पुढील काळात काहीतरी सकारात्मक बदल घडेल या आशेवर पहिल्या व माझं जीवन बदलून टाकणाऱ्या पालेखुर्द आदिवासी शाळेतून जून 2016 साली निरोप घेतला व सकारात्मक दृष्टीकोणातून पुढील प्रवास सूरु ठेवला.....
✍️...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
09923313777
डोंगराच्या कुशीत वसलेली पाले खुर्द आदिवासीवडी

हीच माझी पहिली शाळा

३ टिप्पण्या:

  1. खुप खुप अभिनंदन सर ... खरचं सर, प्रत्येक व्यक्तीला स्वतः च्या बोलीभाषेचा अभिमान असतो तुम्ही त्यात विद्यार्थ्यानंच हित जोपासले आणि त्यांचा उत्साह वाढविला...

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...