| प्रधान सचिव शालेय शिक्षण श्री नंद कुमार साहेबांच्या हस्ते सन्मान ,शिक्षणाची वारी 2016-17 |
संतोषनगरची शाळा ही कोलाड पासून 4 km अंतरावर असलेली 20 ते 25 घरांची छोटी आदिवासीवाडी,शाळेची सुंदर दोन वर्गखोल्याची इमारत शाळेसमोर मोठं झाड,शाळेत जेमतेम 15 ते 20 विध्यार्थी सर्व कातकरी जमातीचे ,शाळेच्या मुख्याध्यापिका मला मोठया बहिणी समान असणाऱ्या सौ अपर्णा कुलकर्णी मॅडम अशा वातावरणात माझ्या पुढील वाटचालीस सुरवात झाली.
🔵 पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकाचे कातकरी भाषेत अनुवाद:- ज्या कामासाठी मी संतोषनगरची शाळा घेतली होती आता त्या कामाला मी सुरवात करणार होतो.या आगोदर कातकरी बोलीभाषेत शब्द संग्रह, गोष्टी बनवल्या होत्या व त्यात आणखी काही तरी नवीन करण्याची गरज वाटत होती व एक डोक्यात विचार आला की जर आपण इयत्ता पहिलच्या बालभारतीच्या पुस्तकातील घटकांचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद केला तर मुलांना लवकर समजेल व मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकतील व त्यांना आवड निर्माण होईल. मग प्रत्येक्ष काम हाती घेतलं, दररोज थोडं थोडं काम करत ,मुलांच्या मदतीने व माझ्या 10 वर्षाच्या कातकरी बोलीभाषेच्या अनुभवाने भाषांतर करायला सुरुवात केली व ते करत करत पहिलीच्या मुलांना कातकरी भाषेत शिकवू लागलो ते मुलांना खूप आवडतं गेलं व समजत गेलं. कांही दिवसात पहिलीच्या बालभारतीच्या सर्व पुस्तकाचे कच्च्या स्वरूपात कातकरी बोलीत अनुवाद केला व ते टाईप करून त्याचे एक पुस्तक बनवले व त्याचा वापर शाळा स्तरावर सुरु केला.त्याचा मुलांकडून प्रतिसाद पण खूप चांगला येऊ लागला मुलं मला सतत हट्ट करायचे सर आपल्या भाषेत शिकवा व मला पण मजा यायची कातकरी बोलीत शिकवायला अशा रीतीने आता समांतर द्विभाषिक पुस्तकाच्या माध्यमातून मी कातकरी बोलीभाषिक मुलांना शिकवू लागलो होतो.
🔵उपक्रमाला ओळख मिळवून देणारी शिक्षणाची वारी 2016-17 :- शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 2015-16 पासून शिक्षणाची वारी हा राज्यस्तरीय उपक्रम सुरू केला होता त्यात शाळा स्तरावर जे शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल होत.2016-17 च्या शैक्षणिक वर्षात ऑक्टोबर 2016 ला राज्यस्तरावरून लिंक आली व त्यात मी माझ्या बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे हा उपक्रमाची माहिती भरली व राज्यातील 50 निवडक उपक्रमात माझ्या उपक्रमाला संधी मिळाली. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता कारण ज्या छोट्याशा आदिवासीवाडीवर सुरु केलेल्या उपक्रमाला आज राज्यस्तरावर संधी मिळाली होती व पुढील काळात या वारीच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यभर जाणार होता.
राज्य सरकारच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे शिक्षणाच्या वारीचे नियोजन तीन टप्प्यात होणार होते पहिला टप्पा नोव्हेंबर 2016 मध्ये पुणे ,डिसेंम्बर 2016 मध्ये नागपूर,जानेवारी 2017 मध्ये औरंगाबाद येथे वारी होणार होती त्यासाठी राज्यातून विविध विषयाचे 50 स्टॉल निवडले गेले होते व त्यात आम्हला प्रत्येक ठिकाणी 3-3 दिवस जाऊन आमचा उपक्रम राज्यभरातून येणाऱ्या हजारो शिक्षकापर्यंत पोहचवायचा होता त्याप्रमाणे आम्हला स्टॉलची मांडणी करायची होती व त्या प्रमाणे मी काम सुरु केलं होतं.
प्रत्येक वारीच्या ठिकाणी 12 जिल्ह्यातील हजारो शिक्षक,अधिकारी स्टॉल पाहायला येणार होते व त्या प्रमाणे प्रत्येक स्टॉल धारकाला मदतीला इतर 4 सदस्य घेण्याची परवानगी दिली होती त्या प्रमाणे मी कर्जत तालुक्यातील माझे बोलीभाषा तज्ञ मित्र श्री श्याम पवार,रोहा तालुक्यातील माझे मित्र श्री राहुल गोरडे,श्री नीलकंठ कदम,श्री समीर पठाण यांची निवड केली व अशी पाच जणांची आमची टीम तयार करून संपूर्ण महाराष्ट्रा दौऱ्यात जवळपास 12000 शिक्षक,अधिकारी,पत्रकार,विध्यार्थी यांच्या पर्यंत कातकरी बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे हा उपक्रम पोहचवला.राज्यात अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यांच्यासाठी व तेथील मुलांच्या बाबतीत अनेक अडचणी येत असल्याचे स्टॉलवर येणारे शिक्षक सांगायचे व आम्ही केलेला उपक्रम पाहून एक सकारात्मक विचाराने ते जायचे. पुढील काळात याचा परिणाम जाणवू पण लागला राज्यातून अनेक बोलीभाषिक भागात काम करणाऱ्या शिक्षकांनी त्या त्या बोलीभाषेत असे साहित्य तयार केले त्यात वारली बोलीभाषेत पालघरचे माझे मित्र श्री राजन गरुड,बंजारा भाषेत उस्मानाबादचे मित्र श्री उमेश खोसे,लातूरच्या सौ.नीता कदम यांनी आपआपल्या भागातील बोलीभाषेत साहित्य निर्मिती केले व त्याचा वापर सुरू केला.
ही शिक्षणाची वारी माझ्यासाठी व माझ्या कातकरी भाषेच्या उपक्रमासाठी दिशादर्शक ठरली.सम्पूर्ण राज्यात पहिलीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद केलेले हे पहिले पुस्तक ठरले व पुढील काळात pdf च्या माध्यमातून रायगड ,ठाणे,पालघर,पुणे,सातारा,जिल्ह्यात शिक्षक मार्गदर्शिका म्हणून उपयोगात आले.
पुढे जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रांनी,मासिकांनी,मराठी वृत्तवाहिन्यांनी ह्या उपक्रमाची दखल घेतली व प्रसिद्धी दिली तेंव्हा गजानन जाधव हे नाव जिल्ह्यात व राज्यात कातकरी बोलीभाषेमुळं ओळखलं जाऊ लागलं.
🔵बेबी आजीचा संघर्ष व मदत:- संतोषनगर शाळेत आल्यापासून मुख्याध्यापक सौ कुलकर्णी मॅडमच्या मदतीने अनेक उपक्रम राबवत गेलो व त्याला मुलांकडून प्रतिसाद पण मिळत गेला हे करत असताना मुलांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाशी पण जुळवून घेण्याची सवय 10 वर्षापासून लागलेली होती व ती येथेही सुरु होती अधून मधून मुलांच्या घरी जायचो व त्यांच्या घरच्यांशी हितगुज करायचो. अशीच एक बेबी आजी होती तिच्या चार नाती आमच्या शाळेत शिकायच्या, घरी बेबी आजी चार नाती व बेबी आजीची एक विधवा मुलगी होती असे 6 महिलांचे कुटुंब होते.घरात एकही पुरुष नव्हता व अशा स्थितीत बेबी आजी मोल मजुरी करून नातींच्या शिक्षणासाठी संघर्ष करत होती हे मी पाहत होतो व ह्या बेबी आजीची कहाणी मी फेसबुकच्या माध्यमातून मांडली व ती भावस्पर्शी वास्तव स्थिती मीडियाच्या नजरेस पडली व माझे पत्रकार मित्र श्री राजेश भोस्तिकर ,झी 24 तास चे प्रफुल पवार यांनी ही बेबी आजीची संघर्ष कहाणी मीडियात प्रसिद्ध केली.लगेच कांही दिवसानी अलिबाग तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व श्री राजाभाऊ ठाकूर यांनी बेबी आजींच्या पाठीमागे खम्बीरपणे उभे राहून तिच्या चारी नातींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व 100000 (एक लाख)ची मदत केली. आपण एखाद्या बद्दल लिहलेल्या लेखाने एखाद्याचे आयुष्य बदलून गेले याचा खूप आनंद वाटत होता. पुढे कांही दिवसानी याच बातमीचा आधार घेत नाशिक येथील उद्योजक श्री गोविंद चौधरी यांनी संतोषनगरची शाळा दत्तक घेतली 51000 रु देऊन शाळा डिजिटल केली व प्रत्येक मुलाला प्रतिमहा 500 रु शिष्यवृत्ती सुरु केली.समाजात खूप दानशूर व्यक्ती आहेत फक्त आपण तेथे पोहचल पाहिजे ते निश्चित मदत करतात हे सांगावे वाटते. फक्त लेखणीच्या बळावर आज गरीब बेबी आजीला लाखाची मदत व संतोषनगर शाळेसाठी भेटलेली मदत यात दुआ झाल्याचा मनस्वी खूप आनंद होतोय.
🔵शिक्षक मार्गदर्शिकेच्या रुपात स्वप्नपूर्ती:- कातकरी बोलीभाषेत शैक्षणिक साहित्य निर्मिती करत असताना नेहमी वाटायचं की आपण तयार केलेले साहित्य जिल्ह्यातील कातकरी बोलीभाषिक असणाऱ्या विध्यार्थ्यां पर्यन्त पोहचावे व त्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न केले पण pdf च्या माध्यमातूनच हे शक्य झालं होतं पण मला हे पुस्तक विनामूल्य जिल्ह्यातील इतर शाळेत जावे असे वाटायचे.या संदर्भात पहिला प्रयत्न केला तो रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नार्वेकर साहेबांना भेटून, त्यावेळी साहेबांना उपक्रमाबद्दल सांगितलं व साहेबांनी याचे पुस्तक रुपात छपाई करण्याचे मान्य केले पण श्री नार्वेकर साहेबांची बदली झाली व आता वाटलं हे आपलं स्वप्न अधुर राहील.अनेकांनी सल्ला दिला की हे पुस्तक तू स्वतः छाप व ते जिल्ह्यातील शाळेपर्यंत दे पण त्याचा आर्थिक भार उचलणे मला शक्य नव्हते त्यामुळे तो ही मार्ग बंद झाला होता.मार्च 2018 महिन्यात असेच एका दिवशी मी अलिबागला गेलो होतो तेव्हा तेथे माझे पत्रकार मित्र श्री राजेश भोस्तेकर यांची भेट झाली त्यांना हा विषय सांगितला तेव्हा त्यांनी लगेच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभय यावलकर साहेबांची वेळ घेऊन य माझी भेट घालून दिली तेव्हा मा.यावलकर साहेबांनी या उपक्रमाची गरज ओळखली व तत्काळ हे पुस्तक 2 महिन्यात जि प कडून छापून ते रायगड जिल्ह्यात वितरित करायचा निर्णय घेतला व लागलीच या कामासाठी उपशिक्षणाधिकारी श्री सुनील गवळी साहेबांवर जबाबदारी दिली.मला तर तो दिवस डोळ्यासमोरून जात नव्हता कारण एखाद्या IAS अधिकाऱ्यांची दूरदृष्टी काय असते ते अनुभवायला मिळत होते.मी तयार केलेले पहिलीच्या पुस्तकाचा अनुवाद तो छापायचा असा विचार झाला पण जून 2018 ला अभ्यासक्रम बदलला व हे पुस्तक छापून कांही उपयोग होणार नाही असे जाणवले.दरम्यानच्या काळात मा.CEO साहेबानी स्वदेश फौंडेशनच्या मदतीने कातकरी बोलीभाषा मार्गदर्शिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता.आता प्रश्न होता एवढ्या कमी कालावधीत नवीन पुस्तक कसे बनवायचे ,संकल्पना तर डोक्यात होतीच पण यासाठी मला मदत लागणार होती यासंदर्भात जिल्ह्यातील कातकरी बोलीभाषा तज्ञ श्री श्याम पवार सर कर्जत,श्री एकनाथ वाघे सर पनवेल व श्री रमेश खरिवले रोहा यांची टीम करून आम्ही एक सुंदर अशी मार्गदर्शिका बनवली व याची फायनल तपासणी करून त्याच्या 1200 प्रति स्वदेश च्या मदतीने छापल्या गेल्या. ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस होता 27 जुलै 2018. या दिवशी कातकरी बोलीभाषा शिक्षक मार्गदर्शिकेचे प्रकाशन होणार होते.अलिबाग येथे सकाळी 11 वाजता एका जिल्हास्तरीय कार्यशाळेत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदितीताई तटकरे, उपाध्यक्ष श्री आस्वाद पाटील साहेब व अन्य मान्यवर,अधिकारी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले व पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील 1200 कातकरी आदिवासीवाडी शाळेत हे पुस्तक शिक्षक मार्गदर्शिका स्वरूपात पोहचले.ज्यावेळी शिक्षकांनी याचा वापर सुरू केला तेंव्हा जिल्ह्यातून अनेक सकारात्मक प्रतिक्रिया आल्या की हे पुस्तक खूप गरजेचे व उपयुक्त आहे.जिल्ह्यात या पुस्तकाचा तुटवडा पडला मग पुढील काळात लिंक च्या माध्यमातून पुस्तकाचे वाटप केले.आज या मार्गदर्शिकेमुळे अनेक ठिकाणी कातकरी बोलीभाषिक मुलांशी संवाद साधायला शिक्षकांना सोपं जात आहे हे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे व एक स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान मिळत आहे.
🔵पुन्हा बदली व नवीन वाटचाल:- 2016 ते 2019 हा संतोषनगर शाळेवरील माझा कालावधी खूप कांही देऊन गेला होता.या तीन वर्षात अनेक महत्वाचे कामे पूर्ण झाले होते,पहिलीच्या पुस्तकाचे कातकरी भाषांतर,शिक्षणाची वारी,बेबी आजींना मदत,शाळा डिजिटल,शिक्षक मार्गदर्शिका प्रकाशन यामुळे मला जिल्ह्यात,राज्यात एक ओळख मिळाली होती.याच दरम्यान जून 2018 मध्ये माझ्या मुलाने अर्णवणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न जाता माझ्या जि प शाळेत प्रवेश घेऊन एक माझ्यावर विश्वास दाखवला होता यामुळे आणखी जोमाने काम करण्यासाठी बळ मिळाले होते व 2018-19च्या वर्षात शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवित एक आनंददायी शाळेत रूपांतर झाले होते. या कालावधीत एक नवीन शासन निर्णय आला व त्या निर्णयाने माझी बदली झाली व माझी संतोषनगर शाळेची साथ सुटली होती.ज्या संतोषनगर शाळेत राबिवलेल्या उपक्रमामुळे गजानन जाधव हे नाव सर्वत्र ओळखले जाऊ लागले होते त्या शाळेवरून जड अंतकरणाने मे 2019 ला निरोप घेतला व नवीन शाळेवर नवीन आहवान पेलण्यासाठी पुढील प्रवास सुरु ठेवला.....
✍️...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
![]() |
| शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांचे पत्र |
![]() |
| वर्तमानपत्रात अनुवाद पुस्तकाची घेतलेली दखल |
![]() |
| रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभय यावलकर साहेबांशी भेट |
![]() |
| स्वप्नपूर्ती शिक्षक मार्गदर्शिका प्रकाशन मा.कु आदितीताई तटकरे मंत्री महाराष्ट्र राज्य (तत्कालीन जि प अध्यक्ष) |
![]() |
| दै लोकसत्ता मधील लेख |
![]() |
| विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेली दखल |
![]() |
| बेबीआजीच्या कष्टाला मदतीचे फळ |
![]() |
| हीच संतोषनगरची शाळा |
![]() |
| अर्णवचा पहिली प्रवेश |









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा