![]() |
| आबा-माझे काका श्री उद्धवराव यशवंतराव जाधव (माजी सैनिक) |
मागच्या व्यक्तिरेखा मध्ये माझ्या आजीची व्यक्तिरेखा मी लिहली होती आज माझे तीन नंबरचे काका श्री उद्धवराव जाधव (आबा) यांच्याबद्दल लिहणार आहे.
माझ्या आजीला एकूण चार मुलगे व एक मुलगी त्यात मोठे दोन मुलं श्री नानासाहेब जाधव (भाऊ),श्री प्रल्हादराव जाधव(नाना) हे आपल्या शेती व्यवसायात रमले होते तर तीन नंबरचे श्री उद्धवराव जाधव(आबा) व माझे वडील श्री पुंडलीकराव जाधव (दादा) हे चौथी पर्यन्त शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून गुराखी म्हणून कामाला होते.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.
आबांचा जन्म शालेय रेकॉर्ड प्रमाणे 19 नोव्हेंबर 1943 चा. वयाच्या चौथ्या वर्षीच वडिलांचे निधन झाले होते मग मामाच्या मदतीने घरगडा चालत होता. आबांनी गावातल्या शाळेत पहिलीत प्रवेश घेतला व चौथीत असताना शाळा सोडली व त्यानंतर गावात गुर राखण्याची नोकरी धरली हे काम आबांनी 6 वर्ष केले नंतर जस वय वाढत गेलं तसे कष्टाची कामे आबा करू लागले 1962 साली ते शेती मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करायला जायचे.खरं तर त्यावेळी आबांना या गोष्टीचा खूप कंटाळा आला होता काहीतरी करून दाखवायची उर्मी मनात होती पण मार्ग सापडत नव्हता शेवटी कंटाळून आबांनी घरातून पळ काढला.त्याच दरम्यान लातुर येथे सैन्य भरती होणार आहे असे आबांना समजले व आबा त्याठिकाणी आपले नशीब आजमावयला गेले व आपल्या जिद्दीच्या बळावर आबा नोव्हेंबर 1962 साली सैन्यदलात भरती झाले. कठीण परिस्थितीत नोकरी भेटली होती पण याची थोडीही भनक गावी नव्हती इकडे सर्व घरचे चिंतेत होते की हाताला आलेला मुलगा तीन महिन्यापासून बेपत्ता आहे,आजी तर सतत चिंतेत असायची,रडायची पण आबांचा कांही पत्ता लागत नव्हता. एक दिवस पोस्टमनने घरी पत्र आणून दिले व तेंव्हा घरच्यांना दुहेरी आनंद झाला एक तर घरचा मुलगा सापडला होता व त्याला सैन्य दलात नोकरी भेटली होती. त्यावेळी आबांची ट्रेनिंग बेळगाव येथे सुरु होती व सहा महिन्यांची ट्रेंनिग संपवून आबा गावी सुट्टीला आले होते तेव्हा आजीचा व घरच्या मंडळींचा आनंद गगनात मावत नव्हता.
कांही दिवस घरी कुटुंबासोबत घालवल्यानंतर आबांना पहिल्या पोस्टिंगच्या ठिकाणी हजर व्हायचे होते मग घरच्यांचा निरोप घेऊन आबा जलपायगुडी(पश्चिम बंगाल) येथे सैन्यात रुजू झाले व देश सेवेसाठी आपलं योगदान देऊ लागले.त्यानंतरच्या काळात आबांची बदली सिक्कीम मध्ये चीन सीमेवर 3 वर्ष,धारचुला (नागालँड) 3वर्ष असे 6वर्ष पूर्वत्तर राज्यात सेवा बजावली.
दरम्यानच्या काळात आबांच्या लग्नाची धावपळ घरी सुरु झाली होती त्यात मुलगा सैन्यात नोकरीला म्हटल्यावर अनेक स्थळे येत होते त्यात रेणापूर तालुक्यातुल घनसरगाव येथील श्री आत्माराम शिंदे यांची कन्या शांताबाई यांचे स्थळ घरच्यांनी पसंद केले व 1967 साली आबांचे लग्न झाले. त्यानंतर आबांनी ग्वालेर(मध्य प्रदेश) येथे 2 वर्ष,झाशी(उत्तर प्रदेश)2 वर्ष व बेळगाव येथे सैन्य प्रशिक्षण केंद्रात रिक्रुट म्हणून 4 वर्ष सेवा केली. आबा जरी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असले तरी ते आपल्या आईला,भावांना मनीऑर्डरच्या माध्यमातून पैसे पाठवून घराला आधार द्यायचे. सलग 19 वर्ष सैन्यदलात सेवा बजावून आबा 1981 साली नाईक पदावरून सेवानिवृत्त झाले.
🔵 इंडो-चायना बॉर्डरवरील थरारक किस्से:- आबांनी 19 वर्ष सैन्यात काम केले जेंव्हा त्यांच्याशी मी चर्चा केली तेंव्हा ते आवर्जून त्या तीन वर्षाचे इंडो चायना बॉर्डरचे थरारक किस्से सांगतात.
चायना बॉर्डर वरील हारण पोस्टवर आबांची व त्यांच्या साथीदारांची गस्त होती ते दोघे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते संध्याकाळची वेळ होती व अचानक त्याठिकाणी खूप मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी सुरु झाली कांही समजण्याच्या आत खूप हाहाकार झाला होता त्यांना मार्ग सापडत नव्हता रस्ता भेटेल तिकडे हे भटकत होते तेंव्हा दोघांनी एका मोठ्या दगडाचा आधार घेतला व त्या मोठ्या संकटाला तोंड दिले, रात्रभर कमरे एवढ्या बर्फात फसून ती भयाण रात्र काढली होती,रक्त गोठवणारी थँडी, उन्हे तापमानात,कोणाचाही सम्पर्क नाही अशात सकाळ झाली व ते कसेबसे बर्फातून बाहेर आले तेव्हा त्यांना समजले की ते चुकून चीनच्या हद्दीत पोहचले होते पण नशीब बलवत्तर म्हणून चीन बॉर्डरवरील सैन्याना याचा सुगावा लागण्याच्या आत ते आपल्या पोस्ट वर येऊन पोहचले.आजही हा किस्सा सांगताना आबा खूप भारावून जातात.
असाच एक दुसरा थरारक किस्सा आबा सांगतात ,एकवेळ इंडो चायना बॉर्डरवर आबांची ड्युटी लागणार होती व त्याच दरम्यान पूर्वी ड्युटीवर असणारा सैनिक रिलिव्ह झाला व त्यावेळी खूप बर्फवृष्टी व पाऊस सुरु होता,त्याच दरम्यान मशीनगन वरील चेंचवर A होते त्यावेळी आबांचा चुकून हात पडला व बघता बघता चीनच्या बाजूला आबांच्या हातून फायर झाला तेंव्हा दुसऱ्या बाजूला असणारे चिनी सैनिक सतर्क झाले व त्यांनी धोक्याचा बिगुल वाजवला व कांही काळ युद्धजन्य परिस्थिती सारखे तणावाचे वातावरण झाले.ही आबाच्या हातून झालेली अनाहूत चुक होती पण सैन्यात चुकीला माफी नसते याप्रमाणे आबांची चौकशी झाली व आबांना 6 दिवसाची कोटरगँट सजा झाली. असे थरारक किस्से आबांच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारे येतात व अभिमान वाटतो की आपल्या काकांनी देश सेवेसाठी आपले योगदान दिले.
🔵 सैन्यातून निवृत्ती व कौटुंबिक जबाबदारी:- आबा 1981 साली भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. दरम्यानच्या काळात आबांना तीन अपत्य झाले होते दोन मुलगे व 1 मुलगी यांचे शिक्षण गावी म्हणजे रोकडा सावरगाव येथे सुरु होते. सर्वात मोठा मुलगा अशोक,दुसरा मुलगा जगदीश व मुलगी सुनीता हे सर्व गावी राहायचे.आमच्या काकीवर सर्वांच्या शिक्षणाची जबाबदारी होती जरी काकी अशिक्षित असल्या तरी त्यांनी तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले ,आबा जेंव्हा निवृत्त होऊन आले त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली.ते1982 ते 2003 पर्यन्त मानवत परभणी जिल्ह्यात राहिले. त्याच दरम्यान मुलांचे शिक्षण सुरु होते मोठा मुलगा अशोक 10वी नंतर वडिलांसोबत मानवत येथे शिकायला गेला तर दुसरा जगदीश व मुलगी सुनीता आईसोबत गावी राहू लागले.मोठा मुलगा अशोक हा उत्कृष्ट कबड्डीपट्टू होता त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाने ठसा उठवला होता व याच बळावर त्यानी क्रीडा क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवली होती.दुसरा मुलगा जगदीशने ded पूर्ण करून प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेस प्रारंभ केला होता व मुलगी सुनीताचे श्री रामचंद्र ढगे (पोलीस खाते ) यांच्याशी विवाह झाला होता.आबांनी 2003 पर्यंतच्या दुसऱ्या सेवेतील निवृत्तीपर्यंत सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.
🔵गावातील सामाजिक कार्य:- आबा आता दोन्ही सेवेतून निवृत्त होऊन गावावर स्थिरावले होते. 1962 साली घर सोडून गेलेले आबा 2003 साली माजी सैनिक म्हणून कायम गावात रहायला आले होते. सैन्यात असलेली शिस्त,वक्तशीरपणा,देशभक्ती ,समाजसेवा हे त्यांच्या नसानसात भिनली होती त्यामुळे गावातील सामाजिक कार्यक्रमात ,उत्सवात ते आवडीने भाग घेऊ लागले व हळू हळू आबांची प्रतिमा जनसमान्यात लोकप्रिय होऊ लागली.मोकळ्या मनाचा,सत्याची बाजू घेणारा,इतरांना मदतीला येणारा अशी ओळख आबांची होऊ लागली व याच जनतेच्या सेवेसाठी त्यांनी ग्रामस्तरीय राजकारणात प्रवेश करून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. आगोदरच समाजकार्याची आवड होतीच मग आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून आबा आणखी जोमात काम करू लागले फक्त आपल्या वार्डाचा विचार न करता सर्व गावचा ते विचार करायचे स्वछता,पाणी पुरवठा अशा अनेक विषयात ते पुढाकार घायचे. ज्या ज्या वेळी गावाला दुष्काळाची झळा पोहचली त्यावेळी आबांनी आपल्या बोअरिंगचे पाणी गरीब जनतेला वाटप करून एक आदर्श सैनिकाची भूमिका वठवली आहे.
आज आबा जरी वयोमानाने थकले असले तरी त्यांच्यातील उत्साह तोच पाहायला मिळतो.
आबांच्या या संघर्षमय जीवनाच्या प्रवासाचे फळ म्हणजे एक मुलगा प्राध्यापक,एक शिक्षक,मुलगी उत्तम गृहणी व सर्व नातवंड उच्चशिक्षण घेत आहेत व आजोबांच्या संस्काराचे मोती करत आहेत.
आज आबांच्या या प्रवासावर लिहताना त्यांचा व त्यांच्या आईचा,भावांचा संघर्ष समोर आल्याशिवाय राहत नाही. गुराखी,शेतमजूर ते माजी सैनिक,एक प्रतिष्ठित व्यक्ती हा प्रवास पुढील पिढीला निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारा आहे......
✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा