गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

जयहिंद क्रीडा मंडळाची वाटचाल...


सावरगाव रोकडा ही संतांची भूमी,स्वातंत्र्य सैनिकांची जन्मभूमी व क्रीडा क्षेत्राची पंढरी म्हणून सर्वत्र परिचयाची आहे.मराठवाडा मुक्तीसंग्रामात सावरगावातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तर अजरामर आहेच पण क्रीडा क्षेत्रातील योगदानही गावाच्या अभिमानास्पद आहे.80-90 च्या दशकात गावातील दोन तरुणांनी ध्येयवेडे होऊन गावात खेळाचे वातावरण निर्माण करायला सुरुवात केली व पुढील काळात सावरगाव रोकडाची ओळख क्रीडा क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली. *श्री वसंतदादा पाटील व श्री जयपाल बोडके* या दोन ध्येयवेड्या तरुणांनी गावातील शाळकरी मुलांच्या सोबतीने जयहिंद क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जो इतिहास घडवला तो प्रत्येकाच्या स्मरणात राहील असा आहे.

*🔵 70च्या दशकातील गावातील खेळाचे वातावरण :-* तो काळ होता 1970 चा गावात कबड्डी खेळाचे वातावरण बऱ्यापैकी होते गावात महाशिवरात्रीच्या निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात असत.त्यावेळी गावातील अनेक तरुण उत्सवा निमित्त आपली आवड जोपासत खेळ खेळत असत,पूर्वी पासूनच पंचक्रोशीत कबड्डी खेळाचे वातावरण होते त्यामुळे गावगावच्या जत्रेत कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या व त्यात सावरगावचा संघ ही सहभागी व्हायचा.गावातील त्यावेळची तरुण मंडळी श्री शेषधर पाटील (तात्या),श्री मुकुंद रोकडे,श्री बाबुराव जाधव,श्री यादव गुरुजी व असे गावातील अनेक तरुण कबड्डी खेळायचे.पंचक्रोशीतील हिंप्पळनेर,आनंदवाडी,आंधोरी, अहमदपूर येथील नामांकित संघ कबड्डी खेळण्यासाठी सावरगाव मध्ये महाशिवरात्रीच्या निमीत्त भरवल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हायचे व खेळाचा आनंद घ्यायचे.तेंव्हा कबड्डीला व्यापक स्वरूप लाभले नव्हते.तसेच त्यावेळी गावातील श्री चंदर कोटंबे पहेलवान यांनी आपल्या कुस्तीच्या माध्यमातून पंचक्रोशीत सावरगावचा पहेलवान म्हणून दबदबा निर्माण केला होता,त्यावेळी जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर चंदर पहेलवान कुस्तीच्या स्पर्धा गाजवत व आपल्या गावचे नाव रोशन करत.

*🔵गावात खो-खो खेळाचा श्रीगणेशा :-*

गावात खो खो खेळ आणला तो श्री वसंतदादा पाटील यांनी. श्री वसंतदादा पाटील आपले 10 वी पर्यंतचे (नवीन अभ्यासक्रमाचे) शिक्षण पूर्ण करून घाटनांदूर वरून गावाकडे आले होते.आता पुढील शिक्षण घ्यायचं नाही,गावातच राहायचं ह्या विचाराने दादा गावी आले होते. दादा घाटनांदूरला असताना तेथे त्यांनी खो खो खेळात विषेश प्राविण्य मिळवले होते त्यानंतर गावी आल्यानंतर त्यांच्या अंगातला खो खो खेळाडू गप्प बसू देत नव्हता.त्यांचं मन सतत खो खो च्या मैदानावर असायचं.दादांनी ठरवलं की आता खो खो ची सुरवात आपल्या गावातून करायची पण मार्ग सोपा नव्हता, एक तर गावात खो खो चे वातावरण नव्हतं त्यात मैदानाची व्यवस्था नव्हती,मार्गदर्शक कोणी नव्हतं अशावेळी होती ती फक्त जिद्द व गावातील शाळकरी मुलांची साथ.गावात 1967 साली स्थापन झालेली बापूजी विद्यालय ही शाळा व त्या शाळेत शिक्षण घेत असलेले गावातील विध्यार्थी यांना सोबत घेत दादांनी खो खो खेळाची सुरवात करायचा निश्चय केला. शिवाजी तुरेवाले,आनंद घोटे,विलास रोकडे, सुरेंद्र जाधव,बालाजी तुरेवाले,भुपेंद्र बोधनकर,आनंद गोचडे,भागवत बोडके,दिलीप बेल्लाळे, अशोक बेल्लाळे,अशोक घोटे,तुळशीदास रोकडे आशा मुलांची मोट बांधली. खो खो साठी मैदानाची गरज होती त्यासाठी लागणारी माती,लाकडी ह्या मुलांच्या माध्यमातून जमा केली व गावात खो खो खेळाला सुरवात केली.1977-78च्या काळात गावात खो खो बहरत होता,शाळकरी मुलं वसंतदादाच्या तालमीत वाढत होती व जिद्दीने खेळ खेळत होती.त्याच काळात तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत गावातील संघ आपली चुणूक दाखवू लागला व गावातील खो खो खेळाडू चमकू लागले.कांही खेळाडू तर इतर जिल्ह्यातून व इतर ठिकाणाहून खेळून राज्यस्तरावर नाव लौकिकास आले.1975-80च्या काळात पंचक्रोशीत सावरगावचा खो खो संघ सर्वांना परिचयाचा झाला होता.

*🔵मुहूर्तमेढ जयहिंद क्रीडा मंडळाची :-* 1982 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन झाले व 16 ऑगस्ट 1982 साली लातूर जिल्हा अस्तित्वात आला.जिल्ह्यात आगोदर पासून कबड्डीचे वातावरण होतेच त्यात जिल्हा कबड्डी असोसिएशनचे च्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्पर्धेचे आयोजन  करण्यात येऊ लागले.

कबड्डीच्या बाबतीत गावात श्री जयपाल बोडके नावाच्या ध्येयवेड्या तरुणाने गावच्या कबड्डीच्या बाबतीत खूप स्वप्न बघितले होते.आपलाही गावचा संघ दर्जेदार असावा व गावोगावी जाऊन आपणही कबड्डीत दबदबा निर्माण करावा असे जयपाल आबांना मनोमन वाटायचं.पंचक्रोशीत होणाऱ्या कबड्डी सामने पाहण्यासाठी गावातील शाळकरी मुलांना ते स्वतः स्वखर्चाने घेऊन जात व त्यांच्यामध्ये कबड्डीची आवड निर्माण करत. 1983 साली हिंप्पळनेर येथे कबड्डी असोसिएशनच्या भरलेल्या स्पर्धेत प्रथमच जयपाल आबांनी तुळशीदास रोकडे,अशोक जाधव, भुपेंद्र बोधनकर,प्रभाकर कोटंबे, कैलास जाधव,व दुसरे दोन खेळाडू घेऊन कबड्डी स्पर्धेत भाग घेतला त्यावेळी 4 साखळी सामन्यापैकी 1 विजय मिळवून संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.त्यावेळी खेळाडु व आबा यांच्यामध्ये निराशा आली पण जिद्द खूप वाढली, काहीही केलं तर आत्ता कबड्डीत सावरगावची हुकूमत निर्माण करायचीच असा निश्चय केला व झालेला पराभव विसरून गावी आल्यास पुन्हा जोमाने सराव सुरू केला.गावात आल्यानंतर श्री जयपाल बोडके व श्री वसंतदादा पाटील यांनी पुढाकार घेत व कबड्डीचे गुरू श्री गणपतराव माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात क्रीडा मंडळ स्थापन करायचा निर्णय घेतला.मंडळाला नाव काय द्यावे ह्या विचारातून सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यसाठी जो लढा दिला त्यांना प्रेरणास्थानी ठेऊन सावरगावच्या क्रीडा मंडळाला *जयहिंद क्रीडा मंडळ* असे नाव दिले व श्री जयपाल बोडके अध्यक्ष ,श्री वसंतदादा पाटील सचिव व श्री उमाकांत बेल्लाळे कोषाध्यक्ष व इतर सदस्य मिळून मंडळ कार्यन्वित झाले.पुढील काळात सावरगावचा संघ ह्याच नावाने ओळखला जाऊ लागला.

*🔵 जयहिंद क्रीडा मंडळाचा झंझावात :-* मंडळाच्या स्थापनेनंतर 1984 साली गावात महाशिवरात्रीच्या निमित्त असोसिएशनच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या व या स्पर्धेत चिकाटी,मेहनत,जिद्दीच्या बळावर जयहिंद क्रीडा मंडळच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला व आंधोरी,हिंप्पळनेर,आनंदवाडी अशा संघाची मक्तेदारी मोडत जयहिंद चा झेंडा फडकवला.

तुळशीदास रोकडे,अशोक जाधव, यांच्या जोडीला हणमंत मुरुडकर,उत्तम बेल्लाळे, रामेश्वर बेल्लाळे,अशोक घोटे,संजय काळे  अशा अनेक मुलांनी जयहिंद क्रीडा मंडळला साथ दिली. वाढते खेळाडू व खेळाचा वाढता दर्जा पाहून मंडळाने 1985 साली कबड्डीची B टीम बनवली. बघता बघता पुढील 6 वर्ष सतत जयहिंद क्रीडा मंडळाने पहिला क्रमांक मिळवला.कधी कधी तर फायनलमध्ये दोन्ही जयहिंदचे संघ आमने सामने यायचे व रंगतदार सामना व्हायचा. जिल्ह्यात,जिल्ह्याबाहेर जयहिंद चा दबदबा वाढत चालला होता तसे नवीन मुलं मोठ्यांचे अनुकरण करत मैदानावर सराव करायला यायचे व मोठ्यांचा खेळ पाहत पाहत कबड्डीचे बाळकडू घ्यायचे.

हे जयहिंदचे यश दिसायला जरी सोप्प असलं तरी ह्यामागे खूप खडतर प्रवास होता.श्री जयपाल बोडके शाळेतील मुलांना सकाळी 5 वाजता उठवत व 7 पर्यंत कबड्डीचा सराव घेत असत त्यानंतर सायंकाळी पुन्हा 5 ते 7 मुलं मैदानावर असायची.सरावाला सकाळी जाग   यायचा नाही म्हणून मुलं शाळेतच झोपायची,रात्री अभ्यास करायचा व 5 वाजता मैदानावर हजर राहायचे. त्यावेळी कबड्डीला आजच्या सारखे वैभव नव्हते त्यामुळे गावोगावी स्पर्धेत जायला  खेळाडूंचे घरचे पैसे पण द्यायचे नाहीत व कांही जणांची परिस्थितीही नव्हती अशावेळी जयपाल आबा घरच्यांचे बोलणे खाऊन स्वखर्चातून मुलांना वेगवेगळया स्पर्धेत घेऊन जायचे त्यांच्या येण्याजाण्याचा,जेवणाचा खर्च ते स्वतः करायचे.आशा परिस्थितीतुन मिळालेले यश हे बावन्नकशी सोन्या पेक्षा कमी नव्हतं. जिल्ह्यात कबड्डी म्हटलं की जयहिंदचे नाव अग्रगण्य असायचे. राज्यस्तरीय स्पर्धा,राष्ट्रीय स्पर्धा,विध्यापिठ स्पर्धेचा संघ तर जयहिंद क्रीडा मंडळच्या खेळाडू शिवाय पूर्ण व्हायचा नाही.कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सावरगावच्या खेळाडूने मैदाने गाजवली आहेत.

जयहिंदच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजे 1996 साली बापूजी विध्याल्याच्या मैदानावर भरवलेल्या राज्यस्तरीय खुल्या गटाच्या स्पर्धा.आठवडाभर चाललेल्या ह्या स्पर्धेचे नियोजन म्हणजे गावाच्या एकीचे दर्शन व आबालवृद्धांनी घेतलेली मेहनत आठवणी राहणारी होती.सिकांदराबद,मनमाड,हिंगोली SRP, लातूर पोलीस,दौण्ड SRP व अशा अनेक दिग्गज संघांनी सावरगावच्या मैदानावर खेळ दाखवला. या स्पर्धेचे उदघाटन तत्कालीन महसूलमंत्री मा.ना.विलासराव देशमुख,मा.आ.बाळासाहेब जाधव,मा.आ.भगवानराव नागरगोजे यांच्या उपस्थितीत पार पडले होते.ग्रामीण भागात अशी भव्य स्पर्धा प्रथमच संपन्न झाली होती.

*🔵जयहिंदचे राज्य-राष्ट्रीय खेळाडू :-* 1983 ते 2000 हा जयहिंद क्रीडा मंडळाचा सुवर्णकाळ होता ह्या काळात अनेक खेळाडूने कबड्डीच्या माध्यमातून जिल्हास्तर,राज्यस्तर,राष्ट्रीयस्तर,विध्यापिठस्तरावर आपल्या खेळाने मैदाने गाजवली कोणी कोणी तर सतत 5-6वर्ष राज्यस्तर,राष्ट्रीयस्तरावर खेळून आपली ओळख निर्माण केली.जयहिंदने शंभरच्या घरात खेळाडू तयार केले तर अनेकांना कबड्डीमुळे नोकरी मिळाली.सावरगाव रोकडा मधील जयहिंद क्रीडा मंडळ ज्यांना नावारूपास आणले ते खेळाडू (N-नॅशनल,S-स्टेट,U-विध्यापिठ)

तुळशीदास रोकडे(N),अशोक जाधव(N,S,U),प्रभाकर कोटंबे,हणमंत मुरुडकर(N),उत्तम बेल्लाळे,कैलास जाधव,संजय काळे(N),रामेश्वर बेल्लाळे(N),भीमराव बेल्लाळे(S),बब्रुवान रोकडे(N),शिवाजी तेलंगे(N),देविदास मुरुळे(N),लक्ष्मण बेल्लाळे(S, आंतराष्ट्रीय कबड्डी पंच),व्यंकटी नरगिळे(U),राजू काळे(S),दिलीप पुंडे(N),आनंद जाधव (S,U),शेखर जाधव(S),अरुण जाधव(S),गोरख कोटंबे (S),लक्ष्मण तुरेवाले(S),विनायक काळे,विनोद पप्पू जाधव,रत्नाकर जाधव,शेख शरफुद्दीन,संजय ऐचंवाड,संजय गणपती बेल्लाळे,सोमनाथ गिरी (N,U),चंद्रकांत कांबळे,राहुल रोकडे,विठ्ठल नरगिळे,बळी सूर्यवंशी, सोपान गिजे,संदीप पुंडे.(खेळाडू 1983 ते 2000 पर्यंतचे आहेत,कोणाचे नाव चकून राहिले असेल तर क्षमस्व)

ह्या व्यतिरिक्त एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे सुरेश बेल्लाळे यांचे.सुरेश यांचं कबड्डीप्रेमी प्रेम सर्वांना परिचित आहेच.प्रत्येक खेळाडूंसाठी असणारा हा तात्या.संघ कोणत्याही गावी गेला तरी सावली प्रमाणे सुरेश सोबत राहणार हे नक्की.सुरेशने किती तरी मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले व नवीन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.आजही कबड्डी नाव काढलंकी तेवढ्याच उत्साहाने कामाला लागणार एकमेव अवलिया म्हणजे सुरेश.

*🔵जयहिंद क्रीडा मंडळाला गरज उभारीची :-* 1983 साली खडतर प्रवासातून उदयास आलेल्या जयहिंद क्रीडा मंडळाचा 17 वर्षाचा प्रवास दैदिप्यमान असा राहिला आहे.खेळाच्या माध्यमातून अनेक जणांना नोकरी मिळाली,रोजगार मिळाला,अनेकजण आपआपल्या व्यवसायात रमून गेले व इ.स. 2000 च्या नंतर जयहिंद क्रीडा मंडळाला पाठरवस्था  यायला सुरू झाली व आज 21 वर्षात गावातील कबड्डी लोप वापत चालली आहे.तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळाचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे.गावातील तरुण पिढीला गावच्या कर्तबगार खेळाडूंची माहिती मिळणे आवश्यक आहे,त्यांना पुन्हा कबड्डीच्या मातीत घेऊन जायची गरज आहे,शालेय विद्यार्थ्यांना श्री वसंतदादा व जयपाल आबा सारख्या ध्येयवेड्या कबड्डीप्रेमीची गरज आहे.1983 साली जी खडतर परिस्थिती होती ती आज 40 वर्षात खूप बदलली आहे आत्ता फक्त गरज आहे इच्छाशक्तीची.गावातील पहिले राष्ट्रीय खेळाडू सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तुळशीदास रोकडे यांनी सेवानिवृत्ती नंतर पूर्णवेळ गावातील कबड्डी खेळाच्या उभारणीसाठी देणार असे जाहीर केले आहे.तसेच मंडळाच्या जुन्या खेळाडूंनी परवाच नव्या उमेदीने जयहिंद क्रीडा मंडळाच्या उभारीसाठी कंबर कसली आहे. *पुढील काळात गावातील भावी पिढीला आपल्या भूमीपुत्रांच्या दैदीप्यमान कामगिरीची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक खेळाडूवर लेख लिहून तो सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न राहील.*

 येणाऱ्या काळात जयहिंद क्रीडा मंडळाला निश्चित चांगले दिवस येतील व पुन्हा एकदा जयहिंदचे खेळाडू राज्यात देशात चमकतील याचा विश्वास वाटतो.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

✍🏻...

श्री.गजानन पुंडलिकराव जाधव.

9923313777

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...