सोमवार, ३ मे, २०२१

3 मे 2006 ला मी असा गुरुजी झालो.....

आज 3 मे 2021 मागे वळून पाहताना 15 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिक्षक म्हणून शासकीय सेवेत लागलो व त्यानिमित्ताने 15 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

2003-05 साली लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयातून डी एड पूर्ण केले व मार्च 2006 साली निकाल लागला व त्यात पास झालो.त्यानंतर लागलीच कांही दिवसात राज्य शासनाने 10 ते 12 हजार जागा काढल्या मग काय त्यावेळी ऑनलाईन अर्ज करायची सुविधा नव्हती मग काय दररोज अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी यायचो कुठल्या जाहिराती आल्या त्या शोधायच्या व अर्ज भरायचा व कुरियरने पाठवून द्यायचा.असा 10 ते 12 दिवस नित्याचा कार्यक्रम,जवळपास 15 ते 20 जिल्ह्यात फॉर्म भरले म्हटलं बघू कुठं लागला तर लागला नंबर.त्यानंतर 15 दिवस असेच गेले एप्रिल महिन्यात प्रत्येक जिल्ह्यांच्या चेक लिस्ट लागल्या समजलं पण त्यावेळी प्रत्येक्ष जाऊन पाहावं लागायचं त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं जिल्हा परिषदेला लावलेली चेक लिस्ट पहायची कांही त्रुटी असतील तर पूर्ण करून द्यायच्या अस असायचं.मग काय 15 ते 20 ठिकाणी अर्ज भरला म्हटल्यावर संपूर्ण महाराष्ट्र फिरायांचा म्हटल्यावर आम्ही तीन मित्रांनी म नियोजन केलं व एस टी महामंडळाचा 8 दिवसाचा पास काढला व सुरू झाल महाराष्ट्र दर्शन. वयाच्या 20-21व्या वर्षी फिरण्याची आगोदरच हौस व घरच्यांना चेक लिस्टचे कारण सांगितल्याने प्रत्येकाच्या घरुन हिरवा कंदील भेटला.मी,राजू खंदाडे, सुधीर चामे असे तिघांचा प्रवास सुरु झाला.अहमदपूर- परभणी-हिंगोली-वर्धा-अमरावती-जळगाव-औरंगाबाद-पुणे-सातारा-कोल्हापूर-सांगली-सिंधुदुर्ग  असा आठ दिवसांचा प्रवास करत पुन्हा अहमदपूर गाठलं. ह्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी जायचं जिल्हा परिषदेची चेकलिस्ट पहायचं आपली त्रुटी असेल तर दुरुस्त करायची व पुढला प्रवास चालू करायचा.दिवसभर फिरायचं,रात्रीचा बसचा प्रवास सकाळी बसस्टॅडला उतरून अंगोळी करायच्या मिळेल ते खायचं व पुढला प्रवास सुरु करायचा,कधी रात्रीची लांब पल्ल्याची बस नसली की बसस्टँड मधील खुर्च्यांवर मुक्काम पडायचा व पहाटेच्या बसने दुसऱ्या जिल्हा परिषदेकडे वाटचाल करायची.तिघेही जिवलग असल्याने सतत आठ दिवस महामंडळातून प्रवास,बसमध्ये मुक्काम,मिळेल ते जेवण ह्याच काहीच वाटलं नाही.

आता उत्सुकता होती कॉल लेटरची इतर मित्रांना झटपट पत्र येऊ लागले तशी माझी धाकधूक वाढली कारण मला इतरांपेक्षा कमी मार्क वाटायचं आपल्याला कुठलं तरी एक पत्र यावं निदान घरच्यांना दाखवता तर येईल की मला पण कॉल आला.मग मी दररोज पोस्टातील माझ्या मित्राच्या वडिलांना विचारायचो पण दररोज नाही हे उत्तर यायचं. इतरांना मात्र दहा दहा कॉल यायचे व मला एकही नाही हे पाहून निराशा यायची.एक दिवस पोस्टमन काकांनी आनंदाची बातमी दिलीच पहिला मुलाखतीचा कॉल लेटर आला जळगाव जिल्हा परिषदेचा मग काय आनंदच आनंद.त्यानंतर कांही दिवसांनी रायगड जिल्हा परिषदेचा कॉल आला.त्यावेळी केंद्रीय पद्धत होती, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी मुलाखत.मग काय 1 कॉल आला काय अन 10 कॉल आले काय जायचं एकाच ठिकाणी. जळगांव व रायगड मधून मला एक जिल्हा निवडायचा होता.रायगड किल्ला,समुद्र किनारा,कोकणची भूमी ह्या मनातील ओढीने आपोआप रायगडाकडे ओढ लागली व ठरवलं नोकरी मिळो न मिळो रायगडला मुलाखतीला जायचं.3 मे 2006 ला मुलाखतीचा दिवस होता व मी 1 मे ला पुन्हा महामंडळाने अहमदपूर -लातूर-पुणे-खोपोली-पेण मार्गे 2 तारखेला अलिबाग गाठलं.

अलिबाग येथे 2 मे दुपारी पोहचलो सोबत 3,4 मित्र होते त्यांनाही रायगडचा कॉल आलेला.नवीन ठिकाण कोठे थांबावं माहीत नव्हतं,मग 3-4 जणांनी लॉज केली व राहिलो.अलिबागला शिरूर ताजबंदचे डॉ.तिवारी साहेब आहेत असं समजलं मग त्यांची भेट घ्यायला सायंकाळी आम्ही मित्र गेलो,डॉ साहेबांची भेट घेतली त्यांना आमचा परिचय दिला तेंव्हा आपल्या गावचे मुलं रायगडला मुलाखतीला आले आहेत समजताच त्यांनाही खूप आनंद झाला व आम्हला ही आधार मिळाला.

2 तारखेच्या रात्री झोप कांही लागली नाही कारण उद्या काय होईल?आपल्याला नोकरी लागेल का? रायगडच्या जागा 216 दाखवल्या होत्या व माझा मुलाखत नंबर 919 होता त्यामुळं नोकरीची शाश्वती तर मला बिलकुल वाटतं नव्हती, पुढचे 918 आले व त्यांनी सर्वच जागा भरल्या तर आपल्याला नोकरी नाही भेटणार ह्या विचारात रात्र गेली.

3 मे 2006 च्या सकाळी शिवतीर्थवर (रायगड जिल्हा परिषदचे नाव) गेलो.इमारतीकडे पाहिल्यास समोरच्या भागावर शिवचरित्र देखावा पाहून मन एकदम प्रसन्न झाले.त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पानिपतकार श्री विश्वास पाटील साहेब होते त्यांच्या नियंत्रणाखाली मुलाखती पार पडणार होत्या.

शेवटी तो क्षण आला मी मुलाखतीच्या पॅनल समोर बसलो, त्यांनी प्रश्न विचारायला सुरवात केली त्यांच्या प्रश्नाला समर्पक व आत्मविश्वासाने उत्तरे दिले त्यानंतर मुलाखत झाली व पॅनलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की सायंकाळी सहा वाजता कोणाला नोकरी मिळाली याची यादी जाहीर होईल.

मनात धाकधूक वाढली होती,6 कधी वाजतील याची वाट पाहत होतो  जेवण करण्याची इच्छा राहिली नव्हती नुसती 6 वाजताची वाट पाहत होतो.शेवटी 6 वाजता शिवतीर्थाच्या पायथ्याशी येऊन एका अधिकाऱ्यांनी घोषणा केली की, 'आज ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या त्या सर्वांची निवड शिक्षण सेवक म्हणून झाली असून रात्री उशिरा तुम्हाला नेमणुकीचा आदेश मिळतील.'हे बोल कानी पडताच एवढा आनंद झाला की व्यक्त करता येत नव्हता कारण 216 मध्ये आपली निवड झाली होती. उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वातावरण आनंदी झालं होतं.लगेच घरच्यांना ,मित्रांना फोन करून आनंदाची बातमी दिली, विश्वास बसत नव्हता की आपल्याला शिक्षकाची नोकरी लागली आहे.आता प्रतीक्षा होती ती आदेशाच्या प्रतीची.शेवटी 4 तारखेच्या पहाटे 3च्या सुमारास माझ्या हातात रोहा तालुक्यातील पालखुर्द आदिवासीवाडी शाळेची ऑर्डर पडली ऑर्डर पाहून खूप आनंद झाला. वयाच्या 21 व्या वर्षी चिमुरड्या मुलांना घडवण्याची जबाबदारी मिळणार होती व प्रशिक्षण विद्यालयात जे दोन वर्षे शिक्षण घेतलं होतं ते उपयोगात आणण्याची संधी मिळनार होती. भेटलेली ऑर्डर घेऊन पुढील प्रवासासाठी मी निघालो.12 जून2006 रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीस शाळेवर हजर झालो व आज ह्या 15 वर्षाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या,माणसाकडे माणुसकीने पाहण्याची शक्ती मिळाली, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वासाने, संयमाने,चिकाटीने त्याचा सामना कसा करावा ह्याची हिम्मत मिळाली......

✍🏻....

श्री गजानन पुंडलिकराव जाधव

9923313777

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...