आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन,गेल्या 15 वर्षांपासून कातकरी आदिवासी समुदायात राहून त्यांच्या जीवनाचा संघर्ष,त्यांचा प्रेमळ स्वभाव,आपल्या कामाशी असलेली प्रामाणिकता,कसलाही कठीण प्रसंग आला तरी खचून न जाता संकटाचा सामना करत आपल्या वाटा निर्माण करणारा कातकरी समाज आजही पूर्णपणे मुख्य प्रवाहात आला नाही.ज्यावेळी शिक्षक म्हणून आशा वाड्यावस्त्यावर नोकरी करण्याची संधी मिळते तेव्हां प्रत्येक मुलांच्या खडतर परिस्थितीचा अंदाज येतो अनेक मुलांना किती प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण घ्यावं लागतं हे डोळ्यांनी पाहिल्यास मन हळवं होत.आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझ्या दोन विध्यार्थ्यांची आजी बायमा ह्या 60 वर्षाच्या कातकरी आदिवासी महिलेची प्रेरक संघर्ष कहाणी मांडत आहे.
बायमा मारुती पवार ही 60 वर्षाची महिला सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आपले दोन नातवंड शिकावेत म्हणून खडतर जीवन जगत संघर्ष करत आहे.बायमाचे पती कै.मारुती वाघमारे 5 वर्षांपूर्वी अर्धांगवायूने निधन पावले ,बायमला एक मुलगा व चार नातवंडे.नवऱ्याचे अकाली निधनातून सावरते ना सावरते तो पर्यंत चार मुलांना सोडून बायमाची सून सोडून गेली व 4 नातवंडांची जबाबदारी बायमावर आली. बायमाचा मुलगा कोळसा कामासाठी दोन मुलाला घेऊन स्थलांतर झाला व बायमा 8 वर्षाचा विनोद व 7 वर्षाच्या मंजुळा या नातवंडाच्या शिक्षणासाठी वाडीतच राहिली. निरक्षर बायमा आपल्या नातवाना शिक्षण मिळावे म्हणून मिळेल तो रोजगार करून पोट भरत असते रेशनिंगचा तांदूळ हाच बायमाचा सर्वात मोठा आधार आहे.वाडी दुर्गम भागात असल्याने जास्त रोजगार उपलब्ध नाहीत व नातवंडांना घरी सोडून लांब बायमा जाऊ शकत नाही मग असेल त्यात भागवत बायमा व नातवंडे जीवन जगत आहेत.अनेक वर्षे झोपडतीत राहून संघर्ष करणाऱ्या बायमला आत्ता कुठं हक्काच घरकुल मिळालं आहे पण छत मिळालं पण पोटाचा प्रश्न कायम आहे.वाढत्या वयामुळे नातवंडांचे सर्व करून पुन्हा पोटाच्या प्रश्नासाठी धडपड करत सध्या बायमा जगत आहे.तिला विचारल्यास ती एकच म्हणते,'माझे नातवंडे शाळेत आहेत त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं वाटत,त्यांच्यासाठी जमेल तशी मेहनत करून त्यांना शाळा शिकवेल व मुलांसाठी स्थलांतर ही होणार नाही असं बायमा सांगते.बायमाचे नातू कधी शाळेत नाही आले की बायमाच्या झोपडीत जाण व्हायचं तेंव्हा बायमाची मुलांबाबत तळमळ जाणवायची ती नेहमी म्हणत,'गुरुजी ही मंजुळा पोर वर्षाची होती त्यावेळी हिची आई हिला सोडून पळून गेली तेव्हा पासून माझं जगणं ह्या पोरासाठी आहे'. आज बागवाडीतील मुलांना भेटायला गेलो तेंव्हा बायमाच्या नातवांना भेटायला बायमाचा घरी गेलो ,बायमा भाकरी थापत बसली होती थोडं बोलणं झालं,बायमा भाकरी थापत थापत मला सांगू लागली, 'गुरुजी, माझा नवरा नाही,पोरगा कोळसा कामाला जातो,ह्या दोन पोरांना शिकवायचं आहे पण खूप अडचण आहे त्यात मला निराधार पेन्शन मिळत नाही तेवढी पेन्शन मिळाली तर पोरांना सांभाळायला मदत होईल.' बायमाच बोलणं खूप तळमळीतून येत होतं बोलताना बायमाचा डोळ्याला धारा होत्या पण त्या बिचारीला आज हे ही माहीत नव्हतं की आज जागतिक आदिवासी दिन जगात थाटात साजरा होत आहे.व दुसरीकडे बायमाचा डोळ्यातुन येणाऱ्या धारा एकच सांगत होत्या निराधार पेन्शन सुरू होऊन जीवनाच्या खडतर संघर्षला कुठं तरी आधार मिळावा.....
✍️ ... श्री गजानन पुंडलिकराव जाधव
9923313777
अप्रतिम वार्तांकन आणि सादरीकरण
उत्तर द्याहटवासुंदर लेख...
उत्तर द्याहटवाJadhav sir your work is everytime inspirable
उत्तर द्याहटवा