मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

व्यक्तिरेखा- आबा

आबा-माझे काका श्री उद्धवराव यशवंतराव जाधव (माजी सैनिक)
मागच्या व्यक्तिरेखा मध्ये माझ्या आजीची व्यक्तिरेखा मी लिहली होती आज माझे तीन नंबरचे काका श्री उद्धवराव जाधव (आबा) यांच्याबद्दल लिहणार आहे.
माझ्या आजीला एकूण चार मुलगे व एक मुलगी त्यात मोठे दोन मुलं श्री नानासाहेब जाधव (भाऊ),श्री प्रल्हादराव जाधव(नाना) हे आपल्या शेती व्यवसायात रमले होते तर तीन नंबरचे श्री उद्धवराव जाधव(आबा) व माझे वडील श्री पुंडलीकराव जाधव (दादा) हे चौथी पर्यन्त शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून गुराखी म्हणून कामाला होते.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.
आबांचा जन्म शालेय रेकॉर्ड प्रमाणे 19 नोव्हेंबर 1943 चा. वयाच्या चौथ्या वर्षीच वडिलांचे निधन झाले होते मग मामाच्या मदतीने घरगडा चालत होता. आबांनी गावातल्या शाळेत पहिलीत प्रवेश घेतला व चौथीत असताना शाळा सोडली व त्यानंतर गावात गुर राखण्याची नोकरी धरली हे काम आबांनी 6 वर्ष केले नंतर जस वय वाढत गेलं तसे कष्टाची कामे आबा करू लागले 1962 साली ते शेती मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करायला जायचे.खरं तर त्यावेळी आबांना या गोष्टीचा खूप कंटाळा आला होता  काहीतरी करून दाखवायची उर्मी मनात होती पण मार्ग सापडत नव्हता शेवटी कंटाळून आबांनी घरातून पळ काढला.त्याच दरम्यान लातुर येथे सैन्य भरती होणार आहे असे आबांना समजले व आबा त्याठिकाणी आपले नशीब आजमावयला गेले व आपल्या जिद्दीच्या बळावर आबा नोव्हेंबर 1962 साली सैन्यदलात भरती झाले. कठीण परिस्थितीत नोकरी भेटली होती पण याची थोडीही भनक गावी नव्हती इकडे सर्व घरचे चिंतेत होते की हाताला आलेला मुलगा तीन महिन्यापासून बेपत्ता आहे,आजी तर सतत चिंतेत असायची,रडायची पण आबांचा कांही पत्ता लागत नव्हता. एक दिवस पोस्टमनने घरी पत्र आणून दिले व तेंव्हा घरच्यांना दुहेरी आनंद झाला एक तर घरचा मुलगा सापडला होता व त्याला सैन्य दलात नोकरी भेटली होती. त्यावेळी आबांची ट्रेनिंग बेळगाव येथे सुरु होती व सहा महिन्यांची ट्रेंनिग संपवून आबा गावी सुट्टीला आले होते तेव्हा आजीचा व घरच्या मंडळींचा आनंद गगनात मावत नव्हता.
कांही दिवस घरी कुटुंबासोबत घालवल्यानंतर आबांना पहिल्या पोस्टिंगच्या ठिकाणी हजर व्हायचे होते मग घरच्यांचा निरोप घेऊन आबा जलपायगुडी(पश्चिम बंगाल) येथे सैन्यात रुजू झाले व देश सेवेसाठी आपलं योगदान देऊ लागले.त्यानंतरच्या काळात आबांची बदली सिक्कीम मध्ये चीन सीमेवर 3 वर्ष,धारचुला (नागालँड) 3वर्ष असे 6वर्ष पूर्वत्तर राज्यात सेवा बजावली.
दरम्यानच्या काळात आबांच्या लग्नाची धावपळ घरी सुरु झाली होती त्यात मुलगा सैन्यात नोकरीला म्हटल्यावर अनेक स्थळे येत होते त्यात रेणापूर तालुक्यातुल घनसरगाव येथील श्री आत्माराम शिंदे यांची कन्या शांताबाई यांचे स्थळ घरच्यांनी पसंद केले व 1967 साली आबांचे लग्न झाले. त्यानंतर आबांनी ग्वालेर(मध्य प्रदेश) येथे 2 वर्ष,झाशी(उत्तर प्रदेश)2 वर्ष व बेळगाव येथे सैन्य प्रशिक्षण केंद्रात रिक्रुट म्हणून 4 वर्ष सेवा केली. आबा जरी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असले तरी ते आपल्या आईला,भावांना मनीऑर्डरच्या माध्यमातून पैसे पाठवून घराला आधार द्यायचे. सलग 19 वर्ष सैन्यदलात सेवा बजावून आबा 1981 साली नाईक पदावरून सेवानिवृत्त झाले.
🔵 इंडो-चायना बॉर्डरवरील थरारक किस्से:- आबांनी 19 वर्ष सैन्यात काम केले जेंव्हा त्यांच्याशी मी चर्चा केली तेंव्हा ते आवर्जून त्या तीन वर्षाचे इंडो चायना बॉर्डरचे थरारक किस्से सांगतात.
चायना बॉर्डर वरील हारण पोस्टवर आबांची व त्यांच्या साथीदारांची गस्त होती ते दोघे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते संध्याकाळची वेळ होती व अचानक त्याठिकाणी खूप मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी सुरु झाली कांही समजण्याच्या आत खूप हाहाकार झाला होता त्यांना मार्ग सापडत नव्हता रस्ता भेटेल तिकडे हे भटकत होते तेंव्हा दोघांनी एका मोठ्या दगडाचा आधार घेतला व त्या मोठ्या संकटाला तोंड दिले, रात्रभर कमरे  एवढ्या बर्फात फसून ती भयाण रात्र काढली होती,रक्त गोठवणारी थँडी, उन्हे तापमानात,कोणाचाही सम्पर्क नाही अशात सकाळ झाली व ते कसेबसे बर्फातून बाहेर आले तेव्हा त्यांना समजले की ते चुकून चीनच्या हद्दीत पोहचले होते पण नशीब बलवत्तर म्हणून चीन बॉर्डरवरील सैन्याना याचा सुगावा लागण्याच्या आत ते आपल्या पोस्ट वर येऊन पोहचले.आजही हा किस्सा सांगताना आबा खूप भारावून जातात.
असाच एक दुसरा थरारक किस्सा आबा सांगतात ,एकवेळ इंडो चायना बॉर्डरवर आबांची ड्युटी लागणार होती व त्याच दरम्यान पूर्वी ड्युटीवर असणारा सैनिक रिलिव्ह झाला व त्यावेळी खूप बर्फवृष्टी व पाऊस सुरु होता,त्याच दरम्यान मशीनगन वरील चेंचवर A होते त्यावेळी आबांचा चुकून हात पडला व बघता बघता चीनच्या बाजूला आबांच्या हातून फायर झाला तेंव्हा दुसऱ्या बाजूला असणारे चिनी सैनिक सतर्क झाले व त्यांनी धोक्याचा बिगुल वाजवला व कांही काळ युद्धजन्य परिस्थिती सारखे तणावाचे वातावरण झाले.ही आबाच्या हातून झालेली अनाहूत चुक होती पण सैन्यात चुकीला माफी नसते याप्रमाणे आबांची चौकशी झाली व आबांना 6 दिवसाची कोटरगँट सजा झाली. असे थरारक किस्से आबांच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारे येतात व अभिमान वाटतो की आपल्या काकांनी देश सेवेसाठी आपले योगदान दिले.
🔵 सैन्यातून निवृत्ती व कौटुंबिक जबाबदारी:- आबा 1981 साली भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. दरम्यानच्या काळात आबांना तीन अपत्य झाले होते दोन मुलगे व 1 मुलगी यांचे शिक्षण गावी म्हणजे रोकडा सावरगाव येथे सुरु होते. सर्वात मोठा मुलगा अशोक,दुसरा मुलगा जगदीश व मुलगी सुनीता हे सर्व गावी राहायचे.आमच्या काकीवर सर्वांच्या शिक्षणाची जबाबदारी होती जरी काकी अशिक्षित असल्या तरी त्यांनी तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले ,आबा जेंव्हा निवृत्त होऊन आले त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली.ते1982 ते 2003 पर्यन्त मानवत परभणी जिल्ह्यात राहिले. त्याच दरम्यान मुलांचे शिक्षण सुरु होते मोठा मुलगा अशोक 10वी नंतर वडिलांसोबत मानवत येथे शिकायला गेला तर दुसरा जगदीश व मुलगी सुनीता आईसोबत गावी राहू लागले.मोठा मुलगा अशोक हा उत्कृष्ट कबड्डीपट्टू होता त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाने ठसा उठवला होता व याच बळावर त्यानी क्रीडा क्षेत्रातील उच्च  शिक्षण पूर्ण करून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवली होती.दुसरा मुलगा जगदीशने ded पूर्ण करून प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेस प्रारंभ केला होता व मुलगी सुनीताचे श्री रामचंद्र ढगे (पोलीस खाते ) यांच्याशी विवाह झाला होता.आबांनी 2003 पर्यंतच्या दुसऱ्या सेवेतील निवृत्तीपर्यंत सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.
🔵गावातील सामाजिक कार्य:- आबा आता दोन्ही सेवेतून निवृत्त होऊन गावावर स्थिरावले होते. 1962 साली घर सोडून गेलेले आबा 2003 साली माजी सैनिक म्हणून कायम गावात रहायला आले होते. सैन्यात असलेली शिस्त,वक्तशीरपणा,देशभक्ती ,समाजसेवा हे त्यांच्या नसानसात भिनली होती त्यामुळे गावातील सामाजिक कार्यक्रमात ,उत्सवात ते आवडीने भाग घेऊ लागले व हळू हळू आबांची प्रतिमा जनसमान्यात लोकप्रिय होऊ लागली.मोकळ्या मनाचा,सत्याची बाजू घेणारा,इतरांना मदतीला येणारा अशी ओळख आबांची होऊ लागली व याच जनतेच्या सेवेसाठी त्यांनी ग्रामस्तरीय राजकारणात प्रवेश करून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. आगोदरच समाजकार्याची आवड होतीच मग आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून आबा आणखी जोमात काम करू लागले फक्त आपल्या वार्डाचा विचार न करता सर्व गावचा ते विचार करायचे स्वछता,पाणी पुरवठा अशा अनेक विषयात ते पुढाकार घायचे. ज्या ज्या वेळी गावाला दुष्काळाची झळा पोहचली त्यावेळी आबांनी आपल्या बोअरिंगचे पाणी गरीब जनतेला वाटप करून एक आदर्श सैनिकाची भूमिका वठवली आहे.
आज आबा जरी वयोमानाने थकले असले तरी त्यांच्यातील उत्साह तोच पाहायला मिळतो.
आबांच्या या संघर्षमय जीवनाच्या प्रवासाचे फळ म्हणजे एक मुलगा प्राध्यापक,एक शिक्षक,मुलगी उत्तम गृहणी व सर्व नातवंड उच्चशिक्षण घेत आहेत व आजोबांच्या संस्काराचे मोती करत आहेत.
आज आबांच्या या प्रवासावर लिहताना त्यांचा व त्यांच्या आईचा,भावांचा संघर्ष समोर आल्याशिवाय राहत नाही. गुराखी,शेतमजूर ते माजी सैनिक,एक प्रतिष्ठित व्यक्ती हा प्रवास पुढील पिढीला निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारा आहे......
✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

माझी ओळख निर्माण करून देणारी संतोषनगरची शाळा...

प्रधान सचिव शालेय शिक्षण श्री नंद कुमार साहेबांच्या हस्ते सन्मान ,शिक्षणाची वारी 2016-17
ज्या ठिकाणी 10 वर्षे नोकरी केली त्या शाळेवरून बदली झाली होती व गेल्या 10 वर्षांपासून कातकरी बोलीभाषीक मुलांची गट्टी जमली होती त्यांचा लळा लागला होता ते ठिकाण सोडून जाताना खूप वाईट वाटत होत.मला प्रशासकीय बदलीत मिळालेली शाळा होती रोहा तालुक्यातीलच करंजविरा.बदली झाली त्यावेळी कुठे तरी कातकरी बोलीभाषेतील काम सुरु झालं होतं व पुढेही करायचं ठरवलं होतं पण अडचण अशी होती की जर बोलीभाषेत शैक्षणिक साहित्य निर्मितीचे काम करायचं असेल तर कातकरी बोलीभाषिक विध्यार्थी असणारी शाळा हवी होती पण मला जी बदलीने शाळा भेटली होती तेथे एक ही कातकरी विध्यार्थी नव्हता त्यामुळे निराशा आली होती पण प्रयत्न सुरु होते.ता संदर्भात तालुका प्रशासनाला विनंती केली की मला कातकरी बोलीभाषेत विध्यार्थी, शिक्षकांसाठी साहित्य तयार करायचे आहे व मला कातकरी विध्यार्थी असणारी शाळा मिळाली तर खूप चांगले होईल व ही माझी विनंती प्रशासनाने मान्य केली व मला तूर्त स्वरूपात संतोषनगर च्या शाळेची ऑर्डर दिली व तेथून माझा पुढील प्रवास संतोषनगर शाळेवर सुरु झाला.
संतोषनगरची शाळा ही कोलाड पासून 4 km अंतरावर असलेली 20 ते 25 घरांची छोटी आदिवासीवाडी,शाळेची सुंदर दोन वर्गखोल्याची इमारत शाळेसमोर मोठं झाड,शाळेत जेमतेम 15 ते 20 विध्यार्थी सर्व कातकरी जमातीचे ,शाळेच्या मुख्याध्यापिका मला मोठया बहिणी समान असणाऱ्या सौ अपर्णा कुलकर्णी मॅडम अशा वातावरणात माझ्या पुढील वाटचालीस सुरवात झाली.
🔵 पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकाचे कातकरी भाषेत अनुवाद:- ज्या कामासाठी मी संतोषनगरची शाळा घेतली होती आता त्या कामाला मी सुरवात करणार होतो.या आगोदर कातकरी बोलीभाषेत शब्द संग्रह, गोष्टी बनवल्या होत्या व त्यात आणखी काही तरी नवीन करण्याची गरज वाटत होती व एक डोक्यात विचार आला की जर आपण इयत्ता पहिलच्या बालभारतीच्या पुस्तकातील घटकांचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद केला तर मुलांना लवकर समजेल व मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकतील व त्यांना आवड निर्माण होईल. मग प्रत्येक्ष काम हाती घेतलं, दररोज थोडं थोडं काम करत ,मुलांच्या मदतीने  व माझ्या 10 वर्षाच्या कातकरी बोलीभाषेच्या अनुभवाने भाषांतर करायला सुरुवात केली व ते करत करत पहिलीच्या मुलांना कातकरी भाषेत शिकवू लागलो ते मुलांना खूप आवडतं गेलं व समजत गेलं. कांही दिवसात पहिलीच्या बालभारतीच्या सर्व पुस्तकाचे कच्च्या स्वरूपात कातकरी बोलीत अनुवाद केला व ते टाईप करून त्याचे एक पुस्तक बनवले व त्याचा वापर शाळा स्तरावर सुरु केला.त्याचा मुलांकडून प्रतिसाद पण खूप चांगला येऊ लागला मुलं  मला सतत हट्ट करायचे सर आपल्या भाषेत शिकवा व मला पण मजा यायची कातकरी बोलीत शिकवायला अशा रीतीने आता समांतर द्विभाषिक पुस्तकाच्या माध्यमातून मी कातकरी बोलीभाषिक मुलांना शिकवू लागलो होतो.
🔵उपक्रमाला ओळख मिळवून देणारी शिक्षणाची वारी 2016-17 :- शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 2015-16 पासून शिक्षणाची वारी हा राज्यस्तरीय उपक्रम सुरू केला होता त्यात शाळा स्तरावर जे शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल होत.2016-17 च्या शैक्षणिक वर्षात ऑक्टोबर 2016 ला राज्यस्तरावरून लिंक आली व त्यात मी माझ्या बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे हा उपक्रमाची माहिती भरली व राज्यातील 50 निवडक उपक्रमात माझ्या उपक्रमाला संधी मिळाली. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता कारण ज्या छोट्याशा आदिवासीवाडीवर सुरु केलेल्या उपक्रमाला आज राज्यस्तरावर संधी मिळाली होती व पुढील काळात या वारीच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यभर जाणार होता.
राज्य सरकारच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे शिक्षणाच्या वारीचे नियोजन तीन टप्प्यात होणार होते पहिला टप्पा नोव्हेंबर 2016 मध्ये पुणे ,डिसेंम्बर 2016 मध्ये नागपूर,जानेवारी 2017 मध्ये औरंगाबाद येथे वारी होणार होती त्यासाठी राज्यातून विविध विषयाचे 50 स्टॉल निवडले गेले होते व त्यात आम्हला प्रत्येक ठिकाणी 3-3 दिवस जाऊन आमचा उपक्रम राज्यभरातून येणाऱ्या हजारो शिक्षकापर्यंत पोहचवायचा होता त्याप्रमाणे आम्हला स्टॉलची मांडणी करायची होती व त्या प्रमाणे मी काम सुरु केलं होतं.
प्रत्येक वारीच्या ठिकाणी 12 जिल्ह्यातील हजारो शिक्षक,अधिकारी स्टॉल पाहायला येणार होते व त्या प्रमाणे प्रत्येक स्टॉल धारकाला मदतीला इतर 4 सदस्य घेण्याची परवानगी दिली होती त्या प्रमाणे  मी कर्जत तालुक्यातील माझे बोलीभाषा तज्ञ मित्र श्री श्याम पवार,रोहा तालुक्यातील माझे मित्र श्री राहुल गोरडे,श्री नीलकंठ कदम,श्री समीर पठाण यांची निवड केली व अशी पाच जणांची आमची टीम तयार करून संपूर्ण महाराष्ट्रा दौऱ्यात जवळपास 12000 शिक्षक,अधिकारी,पत्रकार,विध्यार्थी यांच्या पर्यंत कातकरी बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे हा उपक्रम पोहचवला.राज्यात अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यांच्यासाठी व तेथील मुलांच्या बाबतीत अनेक अडचणी येत असल्याचे स्टॉलवर येणारे शिक्षक सांगायचे व आम्ही केलेला उपक्रम पाहून एक सकारात्मक विचाराने ते जायचे. पुढील काळात याचा परिणाम जाणवू पण लागला राज्यातून अनेक बोलीभाषिक  भागात काम करणाऱ्या शिक्षकांनी त्या त्या बोलीभाषेत असे साहित्य तयार केले त्यात वारली बोलीभाषेत पालघरचे माझे मित्र श्री राजन गरुड,बंजारा भाषेत उस्मानाबादचे मित्र श्री उमेश खोसे,लातूरच्या सौ.नीता कदम यांनी आपआपल्या भागातील बोलीभाषेत साहित्य निर्मिती केले व त्याचा वापर सुरू केला.
ही शिक्षणाची वारी माझ्यासाठी व माझ्या कातकरी भाषेच्या उपक्रमासाठी दिशादर्शक ठरली.सम्पूर्ण राज्यात पहिलीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद केलेले हे पहिले पुस्तक ठरले व पुढील काळात pdf च्या माध्यमातून रायगड ,ठाणे,पालघर,पुणे,सातारा,जिल्ह्यात शिक्षक मार्गदर्शिका म्हणून उपयोगात आले.
पुढे जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रांनी,मासिकांनी,मराठी वृत्तवाहिन्यांनी ह्या उपक्रमाची दखल घेतली व प्रसिद्धी दिली तेंव्हा गजानन जाधव हे नाव जिल्ह्यात व राज्यात कातकरी बोलीभाषेमुळं ओळखलं जाऊ लागलं.
🔵बेबी आजीचा संघर्ष व मदत:- संतोषनगर शाळेत आल्यापासून मुख्याध्यापक सौ कुलकर्णी मॅडमच्या मदतीने अनेक उपक्रम राबवत गेलो व त्याला मुलांकडून प्रतिसाद पण मिळत गेला हे करत असताना मुलांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाशी पण जुळवून घेण्याची सवय 10 वर्षापासून लागलेली होती व ती येथेही सुरु होती अधून मधून मुलांच्या घरी जायचो व त्यांच्या घरच्यांशी हितगुज करायचो. अशीच एक बेबी आजी होती तिच्या चार नाती आमच्या शाळेत शिकायच्या, घरी बेबी आजी चार नाती व बेबी आजीची एक विधवा मुलगी होती असे 6 महिलांचे कुटुंब होते.घरात एकही पुरुष नव्हता व अशा स्थितीत बेबी आजी मोल मजुरी करून नातींच्या शिक्षणासाठी संघर्ष करत होती हे मी पाहत होतो व ह्या बेबी आजीची कहाणी मी फेसबुकच्या माध्यमातून मांडली व ती भावस्पर्शी वास्तव स्थिती मीडियाच्या नजरेस पडली व माझे पत्रकार मित्र श्री राजेश भोस्तिकर ,झी 24 तास चे प्रफुल पवार यांनी ही बेबी आजीची संघर्ष कहाणी मीडियात प्रसिद्ध केली.लगेच कांही दिवसानी अलिबाग तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व श्री राजाभाऊ ठाकूर यांनी बेबी आजींच्या पाठीमागे खम्बीरपणे उभे राहून तिच्या चारी नातींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व 100000 (एक लाख)ची मदत केली. आपण एखाद्या बद्दल लिहलेल्या लेखाने एखाद्याचे आयुष्य बदलून गेले याचा खूप आनंद वाटत होता. पुढे कांही दिवसानी याच बातमीचा आधार घेत नाशिक येथील उद्योजक श्री गोविंद चौधरी यांनी संतोषनगरची शाळा दत्तक घेतली 51000 रु देऊन शाळा डिजिटल केली व प्रत्येक मुलाला प्रतिमहा 500 रु शिष्यवृत्ती सुरु केली.समाजात खूप दानशूर व्यक्ती आहेत फक्त आपण तेथे पोहचल पाहिजे ते निश्चित मदत करतात हे सांगावे वाटते. फक्त लेखणीच्या बळावर आज गरीब बेबी आजीला लाखाची मदत व संतोषनगर शाळेसाठी भेटलेली मदत यात दुआ झाल्याचा मनस्वी खूप आनंद होतोय.
🔵शिक्षक मार्गदर्शिकेच्या रुपात  स्वप्नपूर्ती:- कातकरी बोलीभाषेत शैक्षणिक साहित्य निर्मिती करत असताना नेहमी वाटायचं की आपण तयार केलेले साहित्य जिल्ह्यातील कातकरी बोलीभाषिक असणाऱ्या विध्यार्थ्यां पर्यन्त पोहचावे व त्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न केले पण pdf च्या माध्यमातूनच हे शक्य झालं होतं पण मला हे पुस्तक विनामूल्य जिल्ह्यातील इतर शाळेत जावे असे वाटायचे.या संदर्भात पहिला प्रयत्न केला तो रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नार्वेकर साहेबांना भेटून, त्यावेळी साहेबांना उपक्रमाबद्दल सांगितलं व साहेबांनी याचे पुस्तक रुपात छपाई करण्याचे मान्य केले पण श्री नार्वेकर साहेबांची बदली झाली व आता वाटलं हे आपलं स्वप्न अधुर राहील.अनेकांनी सल्ला दिला की हे पुस्तक तू स्वतः छाप व ते जिल्ह्यातील शाळेपर्यंत दे पण त्याचा आर्थिक भार उचलणे मला शक्य नव्हते त्यामुळे तो ही मार्ग बंद झाला होता.मार्च 2018 महिन्यात असेच एका दिवशी मी अलिबागला गेलो होतो तेव्हा तेथे माझे पत्रकार मित्र श्री राजेश भोस्तेकर यांची भेट झाली त्यांना हा विषय सांगितला तेव्हा त्यांनी लगेच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभय यावलकर साहेबांची वेळ घेऊन य माझी भेट घालून दिली तेव्हा मा.यावलकर साहेबांनी या उपक्रमाची गरज ओळखली व तत्काळ हे पुस्तक 2 महिन्यात जि प कडून छापून ते रायगड जिल्ह्यात वितरित करायचा निर्णय घेतला व लागलीच या कामासाठी उपशिक्षणाधिकारी श्री सुनील गवळी साहेबांवर जबाबदारी दिली.मला तर तो दिवस डोळ्यासमोरून जात नव्हता कारण एखाद्या IAS अधिकाऱ्यांची दूरदृष्टी काय असते ते अनुभवायला मिळत होते.मी तयार केलेले पहिलीच्या पुस्तकाचा अनुवाद तो छापायचा असा विचार झाला पण जून 2018 ला अभ्यासक्रम बदलला व हे पुस्तक छापून कांही उपयोग होणार नाही असे जाणवले.दरम्यानच्या काळात मा.CEO साहेबानी स्वदेश फौंडेशनच्या मदतीने कातकरी बोलीभाषा मार्गदर्शिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता.आता प्रश्न होता एवढ्या कमी कालावधीत नवीन पुस्तक कसे बनवायचे ,संकल्पना तर डोक्यात होतीच पण यासाठी मला मदत लागणार होती यासंदर्भात जिल्ह्यातील कातकरी बोलीभाषा तज्ञ श्री श्याम पवार सर कर्जत,श्री एकनाथ वाघे सर पनवेल व श्री रमेश खरिवले रोहा यांची टीम करून आम्ही एक सुंदर अशी मार्गदर्शिका बनवली व याची फायनल तपासणी करून त्याच्या 1200 प्रति स्वदेश च्या मदतीने छापल्या गेल्या. ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस होता 27 जुलै 2018. या दिवशी कातकरी बोलीभाषा शिक्षक मार्गदर्शिकेचे प्रकाशन होणार होते.अलिबाग येथे सकाळी 11 वाजता एका जिल्हास्तरीय कार्यशाळेत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदितीताई तटकरे, उपाध्यक्ष श्री आस्वाद पाटील साहेब व अन्य मान्यवर,अधिकारी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले व पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील 1200 कातकरी आदिवासीवाडी शाळेत हे पुस्तक शिक्षक मार्गदर्शिका स्वरूपात पोहचले.ज्यावेळी शिक्षकांनी याचा वापर सुरू केला तेंव्हा जिल्ह्यातून अनेक सकारात्मक प्रतिक्रिया आल्या की हे पुस्तक खूप गरजेचे व उपयुक्त आहे.जिल्ह्यात या पुस्तकाचा तुटवडा पडला मग पुढील काळात लिंक च्या माध्यमातून पुस्तकाचे वाटप केले.आज या मार्गदर्शिकेमुळे अनेक ठिकाणी कातकरी बोलीभाषिक मुलांशी संवाद साधायला शिक्षकांना सोपं जात आहे हे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे व एक स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान मिळत आहे.
🔵पुन्हा बदली व नवीन वाटचाल:- 2016 ते 2019 हा संतोषनगर शाळेवरील माझा कालावधी खूप कांही देऊन गेला होता.या तीन वर्षात अनेक महत्वाचे कामे पूर्ण झाले होते,पहिलीच्या पुस्तकाचे कातकरी भाषांतर,शिक्षणाची वारी,बेबी आजींना मदत,शाळा डिजिटल,शिक्षक मार्गदर्शिका प्रकाशन यामुळे मला जिल्ह्यात,राज्यात एक ओळख मिळाली होती.याच दरम्यान जून 2018 मध्ये माझ्या मुलाने अर्णवणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न जाता माझ्या जि प शाळेत प्रवेश घेऊन एक माझ्यावर विश्वास दाखवला होता यामुळे आणखी जोमाने काम करण्यासाठी बळ मिळाले होते व 2018-19च्या वर्षात शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवित एक आनंददायी शाळेत रूपांतर झाले होते. या कालावधीत एक नवीन शासन निर्णय आला व त्या निर्णयाने माझी बदली झाली व माझी संतोषनगर शाळेची साथ सुटली होती.ज्या संतोषनगर शाळेत राबिवलेल्या उपक्रमामुळे गजानन जाधव हे नाव सर्वत्र ओळखले जाऊ लागले होते त्या शाळेवरून जड अंतकरणाने मे 2019 ला निरोप घेतला व नवीन शाळेवर नवीन आहवान पेलण्यासाठी पुढील प्रवास सुरु ठेवला.....
✍️...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांचे पत्र

वर्तमानपत्रात अनुवाद पुस्तकाची घेतलेली दखल

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभय यावलकर साहेबांशी भेट

स्वप्नपूर्ती शिक्षक मार्गदर्शिका प्रकाशन मा.कु आदितीताई तटकरे मंत्री महाराष्ट्र राज्य (तत्कालीन जि प अध्यक्ष)

दै लोकसत्ता मधील लेख

विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेली दखल

बेबीआजीच्या कष्टाला मदतीचे फळ

हीच संतोषनगरची शाळा

अर्णवचा पहिली प्रवेश

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

जीवनात बदल घडवणारे नोकरीतील पहिले दहा वर्षे...

पहिली शाळा पालेखुर्द आदिवासीवडी ता.रोहा चे माझे विध्यार्थी
3 मे 2006 च्या मुलाखतीत नोकरी मिळाली होती व त्याच आनंदात घर गाठलं होत. गावाकडे गेल्यानंतर आईला, वडिलांना,भावांना, बहिणीला खूप आनंद झाला होता.बघता बघता मे महिना सरला होता व आता उत्सुकता होती 12 जूनची शाळा सुरु होण्याची , त्याप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात आवरा आवर सुरु होती व 11जून ला रोहा गाठायचा होता. गावावरून 10 जून 2006 रोजी कर्मभूमीची वाट धरली.यायच्या दिवशी घरी खूप भावुक वातावरण झालं होतं कारण जन्मापासून ते वयाच्या 21 व्या वर्षा पर्यन्त घरीच राहून माझं शिक्षण झालं होतं पण नोकरी निमीत्त 600 km दूर जाणार होतो त्यामुळे साहजिकच घरच्यांना काळजी वाटत होती.माझ्या आजीचे ,आईचे डोळे पानावत होते त्यांना खूप काळजी वाटत होती घरातील सर्वात लहान मी व नोकरी निमीत्त सर्वात दूर जाणार होतो त्यामुळे त्या सतत सांगायच्या तिकडे गेला की स्वतःची काळजी घे.
11 जून ला पुणे मार्गे खोपोली- पाली - कोलाड ला पोहचलो(कोलाड म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून मी राहत असलेले ठिकाण).प्रथमच या ठिकाणी आलो होतो त्यामुळे सर्व कांही नवीन होत ,तसा 11 तारखेचा एक दिवस कोलाडला काढला. ज्या दिवसाची उत्सुकता होती तो 12 जून चा दिवस उजाडला सकाळी 11 वाजता रोहा पंचायत समिती येथे हजर होण्यासाठी गेलो तेथे दिवसभर थांबून सर्व कागदपत्रे जमा केली तेथे माझ्या सारखे जवळपास 20 ते 25 जण शिक्षक राज्यातील विविध जिल्ह्यातून हजर व्हायला आले होते तेथे अनेकांचा थोडाफार परिचय झाला व तेथेन सर्व आपआपल्या नेमून दिलेल्या शाळेत उद्या हजर व्हायचं म्हणून मार्गाला लागले.
🔵 शाळेचा पहिला दिवस:- 13 जून 2006 चा दिवस या दिवशी लवकर उठून आवरून दिलेल्या शाळेत जायचं होत त्या प्रमाणे लवकर आवरलं व प्रथम कोलाड केंद्राचे केंद्र प्रमुख श्री द तू शिर्के सरांना रिपोर्टींग करायला गेलो सरांची भेट झाली त्यांना ऑर्डर दाखवली मला दिलेली शाळा होती पाले खुर्द आदिवासीवडी. साहेबांनी ऑर्डर पाहिली व मला म्हटले ती तुमची शाळा ,त्यांनी एका डोंगराकडे बोट दाखवलं व म्हटले ती उंच वाडी दिसते ना तुम्हाला तिथे जायचं आहे. साहेब शाळा दाखवून मोकळे झाले पण मला धक्काच बसला कारण खुप उंचावर एका डोंगराच्या कुशीत वसलेले ती वाडी दिसत होती खालून पाहिलं तर दाट जंगल कुठे तरी घरे दिसायची.वाडीच्या पायथ्याशी रिक्षाने पोहचलो तिथे एकाला विचारलं वाडीवर कसं जायचं त्यांनी सांगितलं हा कच्चा रस्ता वाडीवर जातो पण तेथे वाहन जात नाहीत  तुम्हाला चालत जावे लागेल.जवळपास 1 ते 1.5 km सलग चढण व जंगलातून कच्चा रस्ता होता , मी वाडी चढायला सुरुवात केली दोन्ही बाजूला दाट झाडी होती व सर्व रस्ता फॉरेस्ट हद्दीतून गेला होता. कधी नव्हे तो डोंगर चढत होतो त्यामुळे थकवा येत होता अर्धा रस्ता पार केल्यास एक आंब्याचे झाड होते त्या झाडाखाली थोडं बसलो पाणी पिले व पुढील प्रवास सुरु केला.शेवटी अर्धा ते पाऊण तास चालत वाडीवर पोहचलो तेंव्हा थोडा सपाट भाग लागला व समोर 25 ते 30 घरांची सुंदर वाडी दिसत होती.तेथून एक जण जात होता कमरेला पंचा गुंडलेला अंगात बनियन व कमरेला कोयता असलेला व्यक्ती त्यांना घाबरत घाबरत  विचारलं शाळा कोठे आहे त्यांनी बोट करून दाखवलं वाडीत जे रंगवलेलं ठिकाण आहे ती शाळा.एकदाच वाडीत पोहचलो.शाळा म्हणजे एक वर्गखोली व त्याच्या भोवती सर्व  झोपड्या, शाळेत पोहचलो तेथे आगोदर श्री मधुकर झोरे गुरुजी शिक्षक कार्यरत होते व त्यांना जोडीदार म्हणून मी गेलो होतो.मला पाहून गुरुजी खूप खुश झाले कारण त्यांनी एकट्याने 10 वर्ष त्या शाळेत काढले होते त्यामुळे त्यांना माझ्या रूपात सहकारी मिळाला होता त्यामुळे त्यांना आनंद झाला होता. झोरे गुरुजींनी चौकशी केली,मला हजर करून घेतले मुलांना परिचय करून दिला शाळेत जेमतेम 15 ते 20 विध्यार्थी होते व मला म्हटले आता तुम्ही बसा मी मीटिंग ला जातो म्हणून ते निघाले व जाता जाता गावातल्या एका व्यक्तीला सांगितले की गुरुजी नवीन आहेत शाळेत कोणी दारू  पिऊन आला तर त्याला सांगा,हे एकूण मी थोडा घाबरलोच होतो. पहिला दिवस मुलांचा परिचय करून घेण्यात गेला मुलांना पण दररोज एकच गुरुजी पाहून बहुतेक नवीन गुरुजी  आल्याने खूप भारी वाटत असेल असं जाणवलं.शाळेची वेळ सकाकी 10 ते 5 होती मग मी 5 वाजता शाळा बंद केली व परतीच्या प्रवासाला निघालो.रस्ता सर्व जंगलातून जाणारा व झाडीचा असल्याने थोडी भीती होतीच त्यामुळे कसाबसा वाडी उतरलो व कोलाड गाठलो. मुख्याध्यापकांच्या मदतीने कोलाडला एक रूम घेतली व माझ्या सारखे नवीन लागलेले दोघे शिक्षक असे आम्ही तिघे राहू लागलो.
🔵मुलांशी जुळले भावनिक नाते:- दररोजचा दिनक्रम ठरला होता सकाळी उठायचं मेस चा डब्बा घ्यायचा पण तीन महिन्यात मेस बंद झाली व मग आम्ही तिघे पार्टनर हाताने स्वयंपाक करू लागलो त्यानंतर स्वतः बनवलेला डबा घ्यायचा व शाळेला निघायचं मग रिक्षाने 3km व पुढे वाडीवर 45 मिनिट चालत जायचं त्यात त्या आंब्याच्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घ्यायची,थोडं पाणी प्यायचं व वाडी गाठायची व शाळेत पोहचायचो. शाळेत येणारे मुलं मजूर वर्गातील होते.दररोज त्यांचे पालक सकाळी लवकर मजुरीला जायचे व मुलं शाळेत शिक्षकाच्या विश्वासावर असायची त्यात शाळेत अंगणवाडी पण नव्हती तेव्हा त्यांचे छोटे भावंड पण शाळेत यायची त्यामुळे शाळा म्हणजे मुलांचं हक्काचं ठिकाण होत. सर्व मुले ही कातकरी आदिवासी जमातीची होती,घरचे सर्व वातावरण निरक्षर अनेकांच्या आई वडिलांनी तर शाळेचे तोंड ही पाहिले नव्हते त्यांची पहिली पिढी सध्या शिक्षण घेत होती. मुलं जेव्हा शाळेत यायची तेंव्हा अनेक मुल दररोज आंघोळ करत नव्हते,केस वाढलेले,नखे वाढलेली अस्वच्छ असायची त्यामुळे कधी कधी मुलांमध्ये बसायला पण संकोच वाटायचा.पालक सकाळी लवकर घर सोडायचे व मुलं शाळा भरली की असेल त्या वेशात शाळेत यायची त्यामुळे सुरवातीला मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे ठरवले व आम्ही दोघा शिक्षकांनी तशी सुरवात केली.
त्यावेळी मी मुलांना विचारायचो की दररोज सकाळी दोन नंबरला कोण कोण जात? पाणी कोण कोण वापरत? तेंव्हा मुलं खरं सांगायची गुरुजी आम्ही जातो पण पाणी नाही वापरत झाडाचा पाला,दगड वापरतो मग मी जरा अंदाज घेतला तर घरीच पाण्याचा वापर होत नसल्याने मुलं पण असेच करायची.त्यानंतर सर्वात आगोदर या गोष्टीवर काम करायचं ठरवलं व मुलांना शौचास जाताना पाणी वापरण्याची सवय लावली व कालांतराने ती सवय पालकांना पण लागली.आठवड्याला शाळेत नखे आम्ही काढायचो,जे मुलं दररोज आंघोळ नव्हते करत त्यांना आंघोळीची सवय लावली कधी कधी स्वतः त्यांना आंघोळ घातली जणूं त्यांचं आम्ही पालकत्वच स्वीकारलं होत अस वाटायच.सुरवातीला या गोष्टींचा थोडा त्रास झाला पण 2,3 वर्षांनी आमच्या मुलात एवढा बदल झाला की त्यांना आपलं आरोग्य कस चांगलं ठेवलं पाहिजे हे कळू लागलं. अनेक पालकांची भेट फक्त शनिवारी व्हायची त्यामुळे आढवड्यातून एकदा तरी पालक भेट घ्यायचो त्याच्या घरी जायचो तेंव्हा गरिबी काय असते,दोन वेळच्या जेवणासाठी काय काय करावे लागते हे समजायचे व त्यातून या मुलांची अधिक काळजी वाटायची. त्यात असे कांही मुलं होते की त्याने आई व वडील दोघे दारू पिऊन रहायचे व त्या लहान कोवळ्या मुलांना त्यांचा त्रास व्हायचा अशा वेळी कित्येकदा नवरा बायको चे दारूच्या नशेतील भांडण सोडवले आहेत.हे रान पाखरं म्हणजे राना वनात भटकणारे शिकार करून खाणारे,गलोल ने पक्षी मारणारे कधी कधी उंदीर,घुशी मारून भाजून खाणारे आपल्या धुंदीत मजेत राहणारे त्यामुळे त्यांना जर शिक्षण द्यायचे असेल तर त्यांच्याशी आगोदर दोस्ती करणे महत्वाचे होते व त्या प्रमाणे माझी वाटचाल सुरु होती. ते मुलं मला सुरवातीला नवीन गुरुजी व नंतर छोटा गुरुजी म्हणून हाक मारायचे ,त्यांच्या 'ये गुरुजी' या एकेरी उच्चरात ही खुप आपुलकी होती,पावसाळ्यात काकडी,भाजी,फणस,उन्हाळ्यात ओले काजू,आंबे मुलं आवडीने आणून द्यायची असे करत मुलांचे व माझे खूप भावनिक नाते तयार झाले होते.ते 10 वर्ष व आज त्या ठिकाणा वरून बदली होऊन 4 वर्ष होत आहेत त्यावेळी लहान असणारे माझे विध्यार्थी आजही कुठे भेटले तरी प्रेमाने आवाज देतात व आवडीने ,आपुलकीने बोलतात हे मुलांशी जुळलेले भावनिक नाते पुढील काळात माझ्या जीवनात बदल घडवायला खूप उपयोगी पडले.
🔵अशी जुळली बोलीभाषेशी नाळ:- शाळेत नवीन हजर झाल्यानंतर समजल की ही वाडीतील सर्व कातकरी समुदायातील आहेत ,रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासीवाड्या आहेत त्यात रोहा तालुक्यात जवळपास 150 च्या वर जि प शाळेत कातकरी बोलीभाषिक मुलं शिक्षण घेत आहेत त्या प्रमाणे माझ्या ही शाळेत मला कातकरी बोलीभाषिक मुलांचा सहवास लाभला. सुरवातीला जेंव्हा मी मुलांना बोलायचो तेंव्हा ते खूप लाजत असत व तोडक्या मराठीत संवाद साधत असत पण ते जेंव्हा आपआपसात कातकरी बोलत तेंव्हा मला नुसतं त्यांच्याकडे बघत राहावं लागायचं कारण मला त्यांची बोलीभाषा नवीन होती.आदिवासी समुदाय त्यांची बोलीभाषा,जीवनशैली हे सर्वच या आगोदर फक्त शाळेत असताना पुस्तकात वाचलं होतं पण आता प्रत्येक्षात या मुलांमध्ये मला काम करायचं होत म्हणून एक वेगळीच उत्सुकता होती. दररोज शाळेत यायचो तेव्हा मुलं आपआपसात कातकरी भाषेत कुजबुजत असायचे व माझं लक्ष गेले की ते गप्प बसायचे त्यांचे शब्द कानावर पडायचे पण मला त्याचा अर्थ लागत नसायचा असा तीन चार वर्षे प्रवास सुरु होताच कधी कधी भाषेमुळे खूप अडचण यायची कारण शाळेतील माध्यम भाषा ही मराठी व मुलांची बोली कातकरी तेव्हा एखाद्या ठिकाणी शब्दात अडकून पडाव लागायचं असे बरेचदा घडत जायचं.जसे वर्ष लोटत होते तसे मुलांमध्ये मी मिसळत जात होतो त्यांचे कातकरी बोलीतील संवाद कानावर पडत जायचे ,सतत सहवासात असल्याने मला त्यांच्या बोलण्यातील शब्दांचा अर्थ कळू लागला जसे माना(माझा),तुना(तुझा),पोवणे(घालणे ),ओपने(देणे),साकु (अंडी),भिंगरुट(फुलपाखरू),डवर(म्हातारा),डोसा(म्हातारी) असे दैनंदिन जीवनात वापरणारे अनेक शब्द माझ्या कानावर पडून ते ओळखीचे वाटू लागले व मला मुलांची थोडी थोडी भाषा समजू लागली. त्या दरम्यानच्या काळात मुलांशी मैत्रीचे व भावणीकतेचे नाते तयार होत गेले कधी कधी मी त्यांचे शब्द उच्चार लागले की त्यांना खूप मजा वाटायची जसे- काल कोणी 'साकु' खाल्ला?,आज कोणी नवीन कपडे 'पोवले'? असे प्रश्न विचारू लागलो की मुलं हसायची व त्यांना आनंद वाटायचा त्यामुळं झालं असं की मुलांच्या मनात एक भावना झाली की गुरुजी आपले आहेत,आपली भाषा बोलतात कधी कधी ते घरी जाऊन सांगायचे 'गुरुजी आमनी भाषा बोलह'(गुरुजी आपली भाषा बोलतात).
आता बऱ्यापैकी मला कातकरी समजू लागली होती,शाळेच्या शेजारी असणाऱ्या झोपड्यातून येणारा भांडणाचा आवाज आता मला कळू लागला होता व साहजिकच ते ऐकून वाडीतील एक गुरुजी या नात्याने कधी कधी मी भांडणे पण सोडवायचो लोकांना पण कळत होत हे गुरुजी आपली भाषा बोलतात व ते मुलांना शाळेत कातकरी बोलीत बोलतात. या शिकलेल्या भाषेचा आपण अध्यापनात वापर करायचा ठरवलं त्या प्रमाणे मी प्रथम 100 शब्दाचा द्विभाषिक संग्रह केला त्यात दैनंदिन व्यवहारातील कातकरी शब्द व त्याचा मराठीत अर्थ व तो शब्दसंग्रह जीवन शिक्षण या मासिकला पाठवला व तो जून 2014 च्या अंकात छापून आला त्यावेळी मला जिल्ह्यातून व राज्यातून अनेक प्रतिक्रिया आल्या की हा उपक्रम खूप चांगला आहे,मुलांना त्यांच्या बोलीभाषेत ज्ञान दिले तर ते अधिक समजते काशामुळं मला आणखी प्रेरणा मिळाली  व आपण जे करत आहोत ते योग्य आहे अशी भावना झाली.
दर वर्षी जून मध्ये पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश व्हायचे व पहिलीत येणारे मुलं हे पूर्णपणे घरच्या वातावरणातून शाळेत आलेले असायचे ,घरचे सर्व बोलीभाषेत संवाद साधायचे व शाळेत आलं की प्रथमच ते मराठी भाषेत बोलायला अडखळायचे त्यावर मी एक प्रयोग केला की शाळेत येणाऱ्या पहिलीच्या मुलांशी मी कातकरीत बोलायचो त्यामुळे त्यांना खूप आधार वाटायचा की आपण घरी जे बोलतो तेच गुरुजी बोलतात त्यामुळे त्यांची भीती कमी व्हायची. मी छोटे छोटे प्रश्न त्यांना विचारून त्यांचे मन रमवायचो जसे-1.तुना नाव काय आहा?(तुझं नाव काय आहे),2.तुना घर कठ आहा?(तुझं घर कोठे आहे),3.तू आंगळस का?(तू आंघोळ केला का) असे मी कातकरी बोलीत संवाद साधलो की मुलं आनंदाने पटापट उत्तर द्यायची व शाळेत रमून जायची.
पुढे आणखी एक प्रयोग केला पहिलीच्या पाठ्यक्रमातील कविता ,गोष्टी मी मुलांना कातकरी बोलीभाषेत शिकवू लागलो त्याने तर मुलं खूप आनंदी  व्हायचे व त्यांना स्वभाषेतून शिक्षण मिळू लागल्याने लवकर समजायचे. पहिलीत त्या वेळी एक कविता होती 'पाऊस' ती कविता मी कातकरी बोलीभाषेत अशी शिकवायचो..
'पाणी'(कातकरी बोलीभाषेत)
पाणी पडह सर सर सर,
घर मा चल र भर भर भर...
पाणी वाजह धडाड धूम,
पळह पळह ठोकह धूम...
पळीन पळीन आणाव घर,
पड रह पाणी दिस भर..
पाणी पडह चिडून चिडून,
आईसन्या उंगत बिसह दडून..

अशा पद्धतीने मुलांना त्यांच्याच भाषेत शिककण्याचा नवोपक्रम केला व हाच नवोपक्रम 2015-16 च्या राजस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातून निवडला गेला हि माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती.एका आदिवासीवाडी शाळेत राबवत असलेला  बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे हा उपक्रम जिल्ह्यात पहिल्या पाच क्रमांकात आला व राज्यासाठी त्याची निवड झाली होती.या आगोदरच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत  जीवन शिक्षणाच्या माध्यमातून शब्दसंग्रह पोहचला होताच व या नवोपक्रमामुळे अनेक कातकरी विध्यार्थी असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना याचा फायदा होणार होता.ज्या वेळी एक मनोरंजन म्हणून कातकरी भाषा शिकली ती शिकलेली भाषा आज अध्यापनात काम करत होती हे माझ्यासाठी खूप विशेष होते. एखाद्या नवीन भाषेची गोडी लागणे व ती आत्मसात करणे व त्यातून साहित्य बनवणे हा प्रवास सुखकारक होता,या सर्व प्रवासात विध्यार्थी हे माझे गुरु ठरले होते यांच्या मुळेच मी कातकरी भाषा शिकू शकलो व मला कातकरीची गोडी लागली होती.
🔵शाळेतून बदलीचा भावणीक क्षण:-2006 ते 2016 हे सुरवातीचे 10 वर्ष खूप महत्वपूर्ण होते, तरुण वयात भेटलेली नोकरी,ती पण अशा दुर्गम ठिकाणी तेथे जायला रस्ता पण नव्हता,त्यात कातकरी बोलीभाषिक मुलांशी जुळवून घेणे,त्यांची परिस्थिती पाहून माझं मन परिवर्तित होणे, वंचीत मुलांच्या शिक्षणासाठी मनात एक आस निर्माण होणे,मुलांशी ,ग्रामस्थांशी भावनिक नाते तयार होणे शाळा म्हणजे घर वाटणे अशा परिस्थितीतून जेव्हा बदली होते तेव्हा ते पचवणे खूप अवघड असते. 2016 साली माझे  प्रशासकीय बदलीच्या यादीत नाव आले व या शाळेवरील 10 वर्षाचा प्रवास थांबणार हे निश्चित झाले.ज्या टप्प्यावर कातकरी बोलीभाषेतील काम सुरु होते,त्याला गती येत होती अशात येथून बदली होणार होती व आपण हातात घेतलेलं काम थांबेल की काय याची भीती होती. माझी बदली होणार असे गावकऱ्यांना समजल्यावर ते बदली रद्द करण्यासाठी पुढे सरसावले होते पण बदली हा प्रशासकीय विषय असल्याने मीच ग्रामस्थांना समजवले व जेथे बदली होईल तेथे जायचे ठरवले.या 10 वर्षाच्या कालावधीत मला 3 सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली सुरवातीला श्री मधुकर झोरे हे 3 वर्ष सोबत होते त्यानंतर श्री विलास भगत गुरुजी 1 वर्ष सोबतीला होते व शेवटच्या 6 वर्षाच्या टप्प्यात तरुण व होतकरू शिक्षक श्री गिन्यानी सोलनकर याने खूप साथ दिली. या 10 वर्षात माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला होता, ठरवलं होतं की यापुढे ही फक्त कातकरी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करायचं पण अचानक आलेल्या बदलीमुळे निराशा आली होती पण आशा सोडली नव्हती ,हाती घेतलेला वसा असा सोडणार नव्हतो व पुढील काळात काहीतरी सकारात्मक बदल घडेल या आशेवर पहिल्या व माझं जीवन बदलून टाकणाऱ्या पालेखुर्द आदिवासी शाळेतून जून 2016 साली निरोप घेतला व सकारात्मक दृष्टीकोणातून पुढील प्रवास सूरु ठेवला.....
✍️...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
09923313777
डोंगराच्या कुशीत वसलेली पाले खुर्द आदिवासीवडी

हीच माझी पहिली शाळा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...