![]() |
| माझी शाळा ह्याच समाज मंदिरात भरते. |
पहिली शाळा पाले खुर्द आदिवासीवडी येथे 10 वर्ष,दुसरी शाळा संतोषनगर येथे 3 वर्ष सेवा केल्यानंतर 2019 साली शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे बदली होणार होती मग मी विनंती बदलीसाठी अर्ज केला व सर्वसाधारण क्षेत्र सोडून दुर्गम क्षेत्रातील शाळा निवडल्या त्यात मला सध्याची चिंचवली तर्फे आतोणे शाळा मिळाली.
रोहा तालुक्यात सुगम, दुर्गम व अति दुर्गम क्षेत्रात शाळेची विभागणी केली आहे. रोहा तालुका ठिकाणापासून 23 km अंतरावरील अति दुर्गम क्षेत्रातील चिंचवली तर्फे आतोणे जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 मे 2019 रोजी हजर झालो. या शाळेची पूर्व परिस्थिती सांगायची तर ही शाळा अति दुर्गम क्षेत्रात तर आहेच परंतु गेल्या 4 वर्षांपासून या शाळेला इमारत नाही ही शाळा एका आदिवासी वाडीतील समाज मंदिरात भरते.ना तेथे शौचालय आहे ना किचन सेड ना मुलांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था.कोकणात 4 महिने पावसाळा असतो अशा स्थितीत या छतगळक्या मंदिरात,बिन खिडक्यांच्या मंदिरात मुलं अनेक अडचणींनाचा सामना करत शिक्षण घेत होते व आहेत.पावसाचा जोर वाढला तर मुलांना दुपारचे जेवण ही उभे उभे घ्यावे लागते ,संपूर्ण विध्यार्थी संख्या ही कातकरी आदिवासी समुदायाची व स्थलांतराचे प्रमाण खूप अशा परिस्थितीत एका छोट्या समाजमंदिरात 59 मुलं शिक्षण घेत होते. अशा शाळेत विनंती बदलीच्या माध्यमातून एका नवीन आव्हान पेलण्यासाठी शाळेत रुजू झालो.
17 जून 2019 ला नवीन सत्राची सुरवात झाली व एका नवीन प्रवासास सुरवात झाली गेल्या 14 वर्षांपासून कातकरी बोलीभाषिक मुलांना अध्यापनाचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे बराच अंशी नवीन ठिकाणी याचा उपयोग होईल याची खात्री होती.जून पासून माझ्या सोबत शाळेवर श्रीम हर्षा काळे या नवीन बदली होऊन आलेल्या शिक्षिका सोबत होत्या. शाळा एका वाडीवरील समाज मंदिरात भरणारी त्याच मंदिरात हनुमानाची मूर्ती,तेथेच 59 विध्यार्थी,2 शिक्षक, वरून पडणारा पाऊस ,खिडक्यांना झापडे नव्हती अशा परिस्थितीत कामाची सुरुवात केली.पण कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने महिला शिक्षकाला तेथे काम करणे सोयीचे नसल्याने प्रशासनाने त्यांना केंद्रीय शाळेत तूर्त व्यवस्थापन केले व तेथील शिक्षक श्री जगन्नाथ अब्दागिरे यांनी स्वतःहून अशा परिस्थितीत काम करण्याची तयारी दर्शवली व ते माझ्या सोबत काम करू लागले. मग माझा व त्यांच्या प्रयत्नाने आमच्या मंदिरातील शाळेचा प्रवास सुरु झाला.
🔵 *परिस्थितीशी चारहात*:- शाळेला इमारत नाही,एक छोटे गळके मंदिर, शौचालय नाही,माध्यम भोजन शिजवण्यासाठी खोली नाही,एकाच मंदिरात 59 मुलं,2 शिक्षक त्यात मारुतीच्या दर्शनासाठी येणारे भक्त,कोसळणारा मुसळधार पाऊस ,गळणारे मंदिर अशा स्थितीत मुलांना शाळेत टिकवणे आमच्यासाठी खूप मोठे आव्हान होते. पण आम्ही ठरवलं होतं प्रत्येक मुलं शाळेत आलं पाहिजे व टिकले पाहिजे यासाठी 100% योगदान देण्याचे ठरवले होते. जमेल तसे मंदिराची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला उघड्या खिडक्यांना,दरवाज्याला प्लास्टिक लावले,शेजारच्या घरातून लाईट घेतली व शाळेतील जुने प्रोजक्टर सुरु केले व मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण कसे देता येईल याचे नियोजन केले.
🔵 *शाळाबाह्य मुलांसाठी प्रयत्न :-* गेल्या 14 वर्षांपासून अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले,त्यांची उपस्थिती वाढवली व प्रत्येक मुल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सवय लागली. या ठिकाणी ही अनेक समस्या होत्या सतत गैरहजर,स्थलांतर,शिक्षणाबद्दल पालकांची उदासीनता,बोलीभाषा,शाळा इमारत नसणे अशा अनेक कारणांमुळे मुलं शाळेत येत नव्हते पण मी व माझे सहकारी शिक्षक आम्ही बदल घडवायचा या हेतूने काम सुरवात केली दररोज पालकांच्या भेटी घेणे,घरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन येणे, पालक सभा घेऊन शिक्षणाचे महत्व पटवून देणे,शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सतत गैरहजर मुलांच्या घरी भेटी देणे,स्थलांतरित होऊन जाणाऱ्या पालकांचे समुपदेशन करणे अशा वेगवेगळ्या मार्गाने जाऊन प्रत्येक मुलं शाळेत कसा येईल यासाठी प्रयत्न सुरु केले.कधी कधी मुलांना नदीवर जाऊन घेऊन आलोत तर कधी घरच्या छोट्या भावंडाची सोय शाळेत करून त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. अशा प्रकारे विविध प्रयत्नाने मुलांना आहे त्या परिस्थितीत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला व मुलांना प्रवाहात टिकवले. या वर्षी 10 कुटुंबाचे प्रबोधन करून 10 ते 12 मुलांचे स्थलांतर रोखण्यात यश आले व ते मुलं आज दररोज न चुकता शाळेत येतात.जे मुलं शाळेत यायच कंटाळा करायचे तेच मुलं आज शिक्षक शाळेत येण्याच्या आगोदर शाळेत हजर असतात.
🔵 *कलात्मक शिक्षणावर भर :-* छोट्याशा ममंदिरात 59 मुलं 2 शिक्षक अशात अध्यापन करताना खूप गोंधळ उडून जायचा अशावेळी एक नवीन प्रयोग सुरू केला. प्रत्येक मुलं वेगळा असतो प्रत्येक मुलात वेगवेगळी कला दडलेली असते याला बालवयात प्रोत्सहान दिले तर ते अधिक बहरत जात असते त्या प्रमाणे माझ्या शाळेतील रांनपाखरामध्ये अनेक उपजत कला होत्या त्यांना वाव देण्याचे काम केले जेणेकरून शाळेत फक्त अभ्यास नसून आपल्यातील विविध गुणांना संधी दिले जाते हे मुलांच्या मनात रुजल होत. त्या दृष्टिकोनातून दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवून त्यांना आठवड्यातील शनिवार फनीवर वाटू लागेल असे वातावरण बनवले.कधी मातीकाम,कधी चित्रकला,कधी ठसेकाम,कधी टाकाऊ पासून कलाकृती तर कधी नृत्य,गायन,कसरतीचे व्यायाम,गलोल स्पर्धा आयोजित करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे शाळेची उपस्थिती वाढली व मुलांना शाळेची आवड निर्माण झाली व जे मुलं दर वर्षी स्थलांतर होऊन जात होते ते आपोआप रोखले गेले.
🔵 *संपर्क ची साथ व समाजमंदिराचे ज्ञानमंदिरात रूपांतर:-* शाळेचे भौतिक वातावरण आनंददायी असेल तर मुलांना त्या ठिकाणी रमायला आनंद वाटतो पण ज्या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही अशा ठिकाणी इच्छा असून ही मुलं यायला कंटाळा करतात अशामुळे मुलांना शाळेत टिकवणे अवघड असते. अशीच स्तिथी माझ्या शाळेची होती गळके मंदिर,खिडक्यानां झापडं नाहीत अशा स्थितीत समाज मंदिरात बदल करायचं ठरवलं. सोशियल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दाद मिळत गेली कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मुलांची शिकण्याची जिद्द,त्यांच्यातील कला,वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा असलेला सहभाग पाहून नवी उमेद पेज ने आमच्या शाळेची स्टोरी केली व त्यावरून मुंबई मधील सम्पर्क संस्थेने मदतीचा हात पुढे केला व आमची चिंचवलीच्या समाज मंदिरात भरणाऱ्या शाळेला ज्ञानमंदिरात रूपांतर करण्यासाठी मदत सुरु केली.ज्या मंदिराच्या समोर एक पाऊल ठेवायला ही जागा नव्हती आज तेथे सुसज्ज असे 20×10 चे सेड उभारले गेले आहे,मंदिराला रंगरंगोटी केली आहे,मंदिरासमोर ओटी बांधली व तेथे आज दररोज मुलं शिक्षण घेतात,दुपारचे जेवण करतात एक हक्काचे छत मुलांना मिळाले आहे तसेच स्वच्छता किट जेणेकरून मुलांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत यासाठी साहित्य पुरवठा केला आहे.याच संस्थेच्या मदतीने मुलांसाठी पूरक आहार योजना लागू केली आहे.आठवड्यातून 3 दिवस मुलांना वेगवेगळी फळे,अंडी कधी चिकन,बिस्किटे,राजगिरा लाडू,खारीक असा पूरक आहार उपलब्ध करून देऊन मुलांमध्ये आनंददायी वातावरण तयार केले गेले आहे.आज या मंदिराचे पालटलेले रूप पाहून हे समाज मंदिर नसून ज्ञानमंदिर आहे असे वाटू लागले आहे.पूर्वी समाजमंदिरातील शाळेत दररोज यायला कंटाळा करणारी तेच मुलं या ज्ञानमंदिरात शाळा भरण्याच्या आगोदर येऊ लागली आहेत व मनसोक्त आनंददायी पद्धतीने शिक्षण घेत आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न वर्षभरात केला,या वर्षात कठीण परिस्थितीत काम करण्याचा अनुभव तर मिळालाच पण परिस्थितीत कितीही बिकट असली तरीही मुलांची शिकण्याची ओढ पाहून कौतुक हि वाटत गेले व उत्साह वाढत गेला. एक वर्ष तर सरले आहे आता येणाऱ्या वर्षात एकच आशा की आमच्या मुलांना हक्काची शाळा मिळावी व त्यांनाही इतर मुलांप्रमाणे भौतिक सुविधायुक्त शाळेत शिकायला मिळावे. आमचा हाच प्रवास सकारात्मक दृष्टिकोनातून पुढेही सुरूच राहील व अनेक अडथळ्यांना सामोरे जात आमची रांनपाखर पुढील काळात असेच बहरत राहतील...
✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव

सर तुमची शाळा मी पाहिली आहे. अतिशय खडतर परिस्थितीत आपण कार्य करत आहात. तुमच्या कार्याला सलाम...! डाइड परिवाराकडून अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा....!!!
उत्तर द्याहटवातुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर .......
धन्यवाद सर,आपले वेळोवेळी मार्गदर्शन भेटले आहे तसेच पुढील काळात हि मिळो
हटवाखूप छान , उत्तम कार्य शुभेच्छा💐
उत्तर द्याहटवा