शनिवार, ३० मे, २०२०

कोरोना काळात दुर्गम, आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणाचे काय...?

  15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल पण कोरोनामुळे शाळा सुरु होतील याची शाश्वती नाही.मागच्या सत्रातील 1 महिना कोरोनाचा सुट्टीत गेला त्यामुळे आहे त्या परिस्थितीत वर्ष संपवावे लागले.  जवळपास शैक्षणिक वर्षाच्या शेवटी हे संकट देशावर व राज्यावर आले व 17 मार्च नंतर शाळेंना सुट्टी दिली.वाटत होत 3 महिन्यात कोरोनाचा कहर कमी होईल पण उलट कोरोना आता शहरी भागातून ग्रामीण भागात पसरत आहे त्यामुळे जेथे जायला रस्ता नाही अशा दुर्गम वाड्या वस्त्यांवर कोरोना पोहचला आहे. अशा स्थितीत येणारे शैक्षणिक वर्ष कसे असावे,मुलांचे शिक्षण कसे सुरु ठेवावे या बाबत सरकार,शिक्षणतज्ज्ञ आप आपले मत व्यक्त करून त्यावर उपाय काढत आहेत.15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु होईल व यापुढील शिक्षण ऑनलाईन कसे असेल किंव्हा ऑफलाईन कसे देता येईल ते सरकार ठरवेल ,किंबहुना  मोबाईल ,टी.व्ही,याद्वारे शिक्षण देता येईल का? याची पडताळणी ही सुरु झाली आहे.केंद्र सरकाने तर शैक्षणिक चॅनल्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच राज्य सरकार पण याविषयी पाऊले उचलत आहे. याबाबतीत राज्यातील सर्वत्र परिस्थिती सारखी नाही गेल्या 14 वर्षांपासून आदिवासी क्षेत्रात शिक्षक म्हणून काम करत असताना नेहमी येणाऱ्या अडचणी व या कोरोना काळात पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करताना  येणाऱ्या समस्या काय असतील याबाबत मत मांडणार आहे.
 राज्यात खूप मोठ्या प्रमाणत दुर्गम भागात आदिवासी  जमाती वास्तव्यास आहेत,विदर्भ,खान्देश,कोकण,मराठवाड्यातील कांही भागात विविध आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत.राज्यातील जवळपास 27% मुलं हे बोलीभाषिक आहेत व ते डोंगर दऱ्यात वास्तव्यास आहेत. नेहमीच्या काळात या मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे पार करत शिक्षण घ्यावे लागते. पालकांची शिक्षणाबाबत असणारी उदासीनता,स्थलांतर,लहान मुलांचा सांभाळ,आर्थिक परिस्थिती अशा अनेक अडचणींचा सामना करत हे मुलं शिक्षण घेत आहेत. त्या त्या ठिकाणी काम करणारा आमचा शिक्षक बांधव दररोज शाळेत गेल्यावर त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन येतो,त्यांना आंघोळ घालतो, मोठ्या मुलांचे शिक्षण सुरु राहावे म्हणून त्यांच्या लहान भावंडाची सोय शाळेत करतो,स्थलांतर रोखतो,स्थलांतर होऊन आलेल्याना प्रवेश देतो व अशा अनेक अडचणीतून जाऊन तेंव्हा कुठे मुलांच्या औपचारिक शिक्षणाला सुरवात होते. ही परिस्थिती जर कोरोना काळापूर्वीची असेल तर यापुढील शिक्षण कसे होईल ही खरी चिंता आहे.टी व्ही ,मोबाईल तर दूरची गोष्ट पण दोन वेळच्या जेवणाची चिंता असणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. शाळेत दुपारचे जेवण भेटते या आशेने लाखो दुर्गम,आदिवासी भागातील मुलं शाळेत येतात व त्यानिमित्त शिक्षण घेतात पण आता शाळा बंद व शिक्षण सुरु अशा मोहिमेत हे मुलं कसं शिक्षण घेतील हा ही एक प्रश्न आहे. आदिवासी ,दुर्गम भागात स्थलांतर तर खूप मोठा प्रश्न दर वर्षी लाखो कटुंबे हंगामी स्थलांतर करतात व त्यांचे मुलं ही सोबत असतात तर शाळा गावात असेल तर ते मुलांना घरातील जेष्ठ मंडळीपाशी ठेऊन जातात व त्यांचे शिक्षण सुरु राहते पण पुढील काळात शाळाच बंद व online शिक्षण म्हटलं तर या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे.
ज्या मुलांच्या शिक्षणासाठी पावलो पावली समस्या नेहमी असतात अशा मुलांच्या पुढील काळातील शिक्षणासाठी खालील कांही प्रश्न उपस्थित होतात त्याबाबत विचार करणे खूप गरजेचे आहे.
1. 90 ते 95% आदिवासी,दुर्गम भागातील,गरीब,मजूर,  पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल,टी व्ही नाहीत अशा वेळी शाळा सुरु न करता शिक्षण कसे सुरु करता येईल?
2.राज्यातील दुर्गम,अतिदुर्गम भागात जिथे मोबाईल रेंज नाही की कुठले डिजिटल साधने नाहीत तेथील मुलांचे शिक्षण कसे होईल?
3.नेहमी दररोज मुलांना शोधून शाळेत आणावे लागते,त्यांना टिकवावे लागते अशा मुलांचे शाळा बंद असल्यास शिक्षण कसे सुरु करता येईल?
4.शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दर वर्षी आणलं जात पण यावर्षी सुरवातीला शाळा बंद असल्या तर ह्या मुलांचे शिक्षण कसे होणार?
5.ज्या पालकांकडे tv आहे,मोबाईल आहे हे साधन मनोरंजन म्हणून पहिले जाते व जेंव्हा त्यावरून शिक्षण सुरु होईल त्यावेळी ते मुलं खरंच शिक्षण घेतील का?
6.शिक्षण म्हणजे शिक्षक विध्यार्थी यांची आंतरक्रिया मग कोरोना काळात एकतर्फी पद्धतीत खरच मुलांचे शिक्षण होईल का?
7.दुपारचे माध्यान भोजन शाळेत मिळते व आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत आपल्या लहान मुलांना ही बिनधास्त शाळेत सोडून मजुरीला जाणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शिक्षण शाळा बंद असल्यास कसे होणार?
असे अनेक प्रश्न पावलो पावली पडत असतात.ज्या ठिकाणी दररोज शिक्षण घेण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात अशा ठिकाणी जो पर्यंत वर्गात शाळा भरवल्या जात नाहीत तो पर्यंत मुलांचे शिक्षण सुरळीत होणार नाही. सध्या शिक्षणासाठी प्रस्तावित online, tv, app हे साधने ठराविक मुलांच्या शिक्षणासाठी मर्यादित आहेत याचा वापर सर्वत्र करणे अशक्य आहे.
दुर्गम,ग्रामीण,आदिवासी क्षेत्रात जो पर्यन्त शाळेत वर्ग भरणार नाहीत, शिक्षक विध्यार्थी समोरासमोर बसून आंतरक्रिया घडणार नाहीत,शिक्षक दररोज वाड्या वस्त्यांवर घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन येऊन शिक्षण देणे सुरु होणार नाही तो पर्यंत इतर कुठल्याही माध्यमातून दिलेले शिक्षण प्रभावी ठरणार नाही हे मात्र तेवढेच कटू सत्य आहे…

शनिवार, २३ मे, २०२०

मामाच्या गावाला जाऊया...

माझे मामा श्री श्यामराव सूर्यवंशी-आराजखेड
बालपाणी उन्हाळी सुट्टीची चाहूल लागली की प्रत्येकाला मामाचे गाव खुणावत असते,वार्षिक परिक्षा झाल्या की आपण आईपाशी हट्ट धरत मामाच्या गावी जाण्याचा बेत आखत असतो व एकदा का वडिलांची परवानगी मिळाली की मग मामाच्या गावाला जाऊन काय काय धमाल  करायची याचे नियोजन मनातल्या मनात सुरु असते. इतर मुलांप्रमाणे ही मला सुट्टीत मामाच्या गावी जाण्याची उत्सुकता असायची पण वडील पोलीस खात्यात असल्याने व त्यांना ड्युटीवर सतत जावे लागत असल्याने दर वर्षी जेमतेम 8 ते 10 दिवस मामाच्या गावी राहण्याचा योग यायचा.
माझ्या मामाचे गाव आराजखेड हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मांजरा नदीकाठी वसलेलं टुमदार खेडेगाव.मामाच्या गावी आजी ,मामा,मामी व त्याचे मुलं राहायचे, तसं माझ्या आजोळी आजींचे खूप मोठं कुटुंब 1 मुलगा 7 मुली यांचे 33 नातवंड आजींना होते,आजीला आम्ही सर्व माय म्हणायचो व या माईचा परिवार हि असा विशाल होता. हे सर्व भावंडे लहान असताना आजोबांचे निधन झाले व सर्वात जेष्ठ मामा असल्याने कमी वयात 7 बहिणी व आईची जबाबदारी मामावर पडली व मामांनी ही अतिशय जबाबदारीने सर्व बहिणींचे लग्न लावून त्यांचा संसार सुरळीत करून दिला.मामा मामींनी आईवडिलांच्या भूमिकेत कर्तव्यपार पाडत सर्व बहिणींची काळजी घेत त्यांना प्रेम दिले. प्रेमापोटी सर्व बहिणी व भाचे मंडळी जसे जमेल तसे मामांना मामींनी भेटायला जात व जिव्हाळा जपत.मामाचे नाव श्री श्यामराव सूर्यवंशी,सडपातळ शरीरयष्टी,रुबाबदार मिशी,अंगात धोतरजोडा सतत घातलेला ,कपाळावर गंध,गळ्यात तुळशीमाळ, डोक्याला टोपी असे मामाचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते. मामांचे जसे आपल्या 5 मुलांवर जीव होता तसाच 28 भाच्यांवर ही तीच माया होती म्हणून जरी सर्व एकत्र आले तरी कधी वाटलं नाही आपल्या मामाच घर छोट आहे व त्यात आपण कसे राहावं.
बालपणी शाळेला उन्हाळी सुट्टी लागली की आई सोबत मामाच्या गावाला जायचो.माझ्या गावावरून तालुक्याला व अहमदपूरवरून लातूरला जावं लागायचं.लातूरला जुने बस स्थानक आहे तेथून खेडेगावला गाड्या लागायच्या मग लालपरीची वाट पाहत पाहत दुपार व्हायची ,पूर्वी त्या बस स्थानकाच्या पाठीमागे लातूरचे रेल्वे स्टेशन होते मग तिथे थांबलेल्या रेल्वे डब्याकडे पाहून वेळ घालवायचा.दुपारी साई स्टॉप ची गाडी आली की गाडीत बसून मस्त खिडकीतून मागे पाळणारे झाडे बघत प्रवास करायला मजा यायची.त्यावेळी बस साई स्टॉप पर्यन्त जायची व तेथून पुढे आराजखेडला एक ते दीड किमी चालत जावं लागायचं.साई स्टॉपला मांजरा नदीवरील जलशुद्धीकरण केंद्र होत व तेथून लातूरला पाणी पुरवठा व्हायचा त्यामुळे तेथे अतिशय थंड वातावरण व उन्हाळ्यात ही हिरवीगार उंचच उंच निलगिरीचे झाडे,आंब्याचे झाडे सतत खुनवत असत.मला तो भाग खूप आवडायचा त्याला 'नळाला' असे नाव होते.नळावर बस मधून उतरल्यास 1km पायी चालत जावं लागायचं त्यावेळी बैलगाडीची वाट व रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी बाभळीचे दाट झुडपे असायची त्याला वेडी बाभळ म्हणतात.तो भाग मांजरा नदीच्या काठीचा असल्याने सर्व गाळाची काळी जमीन व त्यामुळे ह्या काटेरी बाभळीचे झाडे खूप असायची.जसे जसे पाऊल पुढे पडायचे तशी उत्सुकता वाढायची कारण पुढील प्रवास माझ्या नेहमी आवडीचा असायचा.गावाच्या जवळ जवळ आलो की समोर टुमदार आराजखेड दिसायचं व जवळ संथ वाहणारी मांजरा दर्शन द्यायची. गावा पर्यन्त पोहचायला मांजरा नदी ओलांडावी लागायची व हाच नदी पार करायचा प्रवास नेहमी आनंददायी असायचा.त्यावेळी मांजरा दुथडी भरून वाहायची ,तिचे पात्र व पाणी मनाला मोहून टाकायचे. सकाळपासून सुरु असलेला प्रवास दुपारी 4च्या सुमारास मांजरातीरी आल्यास प्रवासाचा थकवा कधी गेला समजायचा नाही.त्यावेळी नदीच्या ह्या टोकावरून गावात जायचं असेल तर कलई(गुळ बनवतात ते पात्र)मधुन जावं लागायचं व तेवढाच प्रवास खूप आवडायचा.मग काय नदीच्या दोन तीरावर दोन झाडांना किंव्हा लाकडी खुंटीला दोर बांधून कलई मधून प्रवास करत मांजरा पार करायची व आरजखेड भूमीत प्रवेश करायचा.कलईतून उतरताना सुंदर दृश्य दिसायचे मुल पाण्यात पोहत असायची,गावातील लोक पाणी भरायचे,महिला धुणे धुवण्यासाठी यायच्या व समोर उंच चढणीवर गाव दिसायचं.गावात प्रवेश करेपर्यंत दुतर्फा झाडी असायची व समोर मारुतीचे मंदिर दिसले की गाव आलं समजायचं व एकदाचे उंचावरील बुरुजावर मामाच घर गाठायचं.घरी माय, मामी स्वागताला आसायच्याच मामा त्यावेळी लातूरला अडतदुकानात कामाला होते त्यामुळे त्यांची भेट संध्याकालीच व्हायची.घरी गेल्यावर आजी कुटका उतरून टाकायची व हात पाय धुऊन मग मामीच्या हातचा गरम गरम दूध चहा घेतला की निवांत वाटायचं. आईच्या मामीच्या आजीच्या गप्पा रंगायच्या त्यात जोडीला जवळ सासर असलेल्या एक दोन मावश्या भेट होईल या हेतूने यायच्या व मेळा जमायचा. रात्री मामा आल्यास गप्पा व्हायच्या जेवण करून मस्त माळवदावर(धब्याच्या घराचे छत) झोपायला जायचो. सुंदर नभागंण बघत ,चांदण्या मोजत व मध्येच नजर फिरवत डावीकडे रेणापूर फाट्यावरचे टीमटीमनारे दिवे व उजवीकडे लातूरच्या दिव्यांची माळ पाहत सोबत असलेल्या मावसभाऊ,मामाच्या मुलांसोबत गप्पा मारत मांजरा तिरावरून येणाऱ्या थंड झुळकेत झोप कधी लागायची हे समजायचं नाही.
पहाटेचा गार वारा झोंबला की हळूच चुळबुळत जाग यायची सकाळी सकाळी उंचारून दिसणारे नदी पलीकडील हिरवीगार शेती पाहून मन प्रसन्न व्हायचं. घरा पासून नदी थोडी दूर असल्याने त्यावेळी पाणी पकालीत आणायची सोय होती म्हणजे रेडयाच्या पाठीवर चामडी पाण्याची मोठी पिशवी टाकायची व त्यात पाणी भरायचं व घरोघरी पोहचवायच. पखाल पहायला मला खूप आवडायचं व त्याची दोरी सोडून पाणी भरायची मजा कुछ औरच असायची.
घरी चहा पाणी घेऊन मग नदीवर पोहायला जायचो ,मामाचे मुलं मोठे होते त्यामुळे त्यांच्या सोबत नदीवर अंगोळीला जायला खूप मजा यायची.मांजरेचे विस्तीर्ण पात्र,संथ वाहणारे पाणी व त्या पाण्यात डुबकी लावायला मिळणे म्हणजे सुट्टीचा खरा आनंद उपभोगल्या सारखं वाटायचा. पोहून घरी आल्यावर मामीच्या हातच्या चुलीवरची गरमगरम भाकरी,दही ठेचा चटणीवर ताव मारायचा व तिखट लागली की मग मामी आडीतील मातीच्या गाडग्यात दूध तापवून खाली राहिलेलं खरडण नदीतील शिंपल्याने खरडून काढून खायला द्यायच्या.त्या खरडणाची मजाचं वेगळी होती आजही ते आठवलं तर तोंडाला पाणी सुटते.मग दुपारी मामाच्या मुलांसोबत शेतात जायचो,आमचं गाव डोंगराळ भागातील पण मामाच्या गावची जमीन नदी काठची असल्याने कसदार व काळीभोर होती.शेजारी मांजरा असल्याने उन्हाळा आहे की हिवाळा याची जाण व्हायची नाही.मामाच्या शेतात आंब्याचे झाडे होते व त्या आंब्याच्या झाडावरील पाड(झाडावर पिकलेले आंबे)दगडाने पाडून खायला खूप मजा यायची व कांही कच्चे आंबे पाडून मग त्याची शेतातच भट्टी लावायची व जसे जमेल तेंव्हा ते आंबे पिकले की फस्त करायचे असा दिनक्रम असायचा.माझ्या मामाला तीन मुलं मोठा मुलगा दिलीप हा शिक्षक म्हणून औरंगाबाद येथे नोकरीला होता व मधवा हणमंत एक उत्कृष्ट चित्रकार हा गावात राहायचा तर शेवटचा आनंद हा औरंगाबाद येथे मोठ्या भावाकडे शिक्षणासाठी असायचा त्यामुळे हणमंत दाजीशी आमची जास्त गट्टी असायची.जेवढे दिवस मामाच्या गावी राहायचो तेंव्हा जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवायचो.
सायंकाळी सूर्य मावळातीला आला की पाय आपोआप गावात असलेल्या अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे ओळायचे ते ठिकाण गावाच्या बाहेर एका उंच भागावर होते,अतिशय रम्य ठिकाण तेथे गेल्यावर मन प्रसन्न वाटायचे, सायंकाळी येणारा गार वारा,समोर नजरेस पडणारी संथ वाहणारी मांजरा,नदीतून घराकडे पोहत येणारे जनावरे,डोक्यावर भारे घेऊन येणारे शेतकरी हे दृश्य मावळतीच्या सुर्यास्तास पाहून त्या ठिकानावरून घरी जायची इच्छा व्हायची नाही पण अंधार पडू लागला की घराची वाट धरायची व घर गाठायचे.
आज 25 ते 30 वर्षानंतर आजही ते बालपणीच्या मामाच्या गावच्या रम्य आठवणी आठवल्या की खूप छान वाटत.या मध्यंतरीच्या काळात मामांनी आपल्या 5 मुलांचे संसार थाटून तर दिलाच पण 28 भाच्यांच्या पाठीमागे खम्बीर उभे राहून त्यांचे लग्न पार पाडले. आज आजी हयात नाही तसेच आई सहीत तीन बहिणींनी मामाची साथ सोडली पण आजची मामा राहिलेल्या चार बहिणी, 28 भाचे यांची सतत आपुलकीनं विचारपूस करतात.मलाही 15 दिवसातून एकदातरी मामांचा फोन असतो व मामाशी बोललो की एक वेगळंच समाधान भेटून जात.आज मामा 90च्या घरात आहेत प्रकृती साथ देत नाही तरी त्यांचा सर्व नातलंगाशी संवाद हा कायम राहतो,त्यांना आपल्या माणसाशी बोलून जो आनंद मिळतो हेच त्यांच्या जीवनाची संजीवनी आहे.मामांने उभ्या आयुष्यात जी प्रेमरूपी माणसे जोडून जी कमाई केली आहे ह्या संपत्तीची बरोबरी कोठेच होऊ शकत नाही.मामांना शतायुष्य लोभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
✍🏻..श्री गजानन पुंडलिकराव जाधव

रविवार, १७ मे, २०२०

जिथे कमी तेथे आम्ही....

शिक्षकांची कोरोना विरोधी लढ्यात भूमिका...
राज्यात शिक्षकांची भूमिका आज घडीला जिथे कमी तेथे आम्ही याप्रमाणे संकटकाळी राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर अशी झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना काळात खडू डस्टर सोडून हातात काठी, टोपी, इन्फ्रारेड थर्मोमीटर गन, शिक्के घेऊन डॉक्टर,पोलीस,आरोग्य कर्मचारी यांच्यावर येत असलेल्या तान लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला आमचा शिक्षक बांधव खांद्याला खांदा लावून 24×7 वेळेत कार्य करत आहे. राज्यातील पोलिसांसोबत चेक पोस्टवर बंदोबस्त असो की आरोग्य खात्यासोबत आरोग्य तपासण्या असो की ग्रामस्तरावर home quarantine करणे असो की जनतेत कोरोना संसर्गाबाबत जनजागृती असो आमचे शिक्षक बांधव सदैव सेवेशी तत्पर आहेत. अशा स्थितीत अनेक ठिकाणी चेक पोस्टवर शिक्षकांवर प्रवाश्यांचे हल्ले झाले,खालच्या पातळीवर बोलणे ऐकून झाले,वार्डा वार्डात माहिती घेताना वेगळ्या खोचक नजरेने पहिले गेले,गावा गावात रोशाला सामोरे जावे लागले तरी गेल्या दोन महिन्यांपासून आमचे बांधव विनातक्रार कार्य करत आहेत.अनेक शिक्षकांनी पन्नाशी ओलांडली आहे तर अनेक तरुणांना हक्काची पेन्शनही नाही तरी आपल्या जीवाची पर्वा न करता या कोरोना काळात लढत आहेत.मागच्या आठवड्यात सांगलीचा तरुण शिक्षक श्री कोरे यांचा चेकपोस्टवर ऑन ड्युटी असताना कर्तव्य बजावत असताना ट्रकने चिरडले व त्यात त्याचा मृत्यू झाला तर एक मुंबई मधील शिक्षक कोरोना ड्युटी करून घरी जाताना अपघातात मृत्यू पावला. आज राज्यातील आमचा शिक्षक कोणत्याही अपेक्षे शिवाय राष्ट्रकार्य करत आहे फक्त शासनास एकच माफक मागणी आहे की या कोरोना योध्याचा किमान विमा तरी सरकारनी उतरवावा.आज कुठलेही विमा संरक्षण नसताना शिक्षक काम करत आहे,त्याच्या बाबतीत कांही घडल तर त्याच्या कुटुंबाला कुठल्याच बाबतीत शासनाकडून संरक्षण नाही.कांही दिवसापूर्वी दिल्लीत कोरोना ऑन ड्युटी मध्ये कार्य करत असलेल्या शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर दिल्ली सरकारने त्याला 1 कोटी रुपयांची मदत केली. आपल्या राज्यात कांही दिवसापूर्वी श्री कोरे यांचा ऑन ड्युटी मृत्यू झाला तो प्राथमिक शिक्षक 2005 नंतर सेवेत रुजू झालेला त्याला  तर पेन्शन ही नव्हती व कोरोना काळातील कसल्याच प्रकारचे विमा संरक्षण ही नव्हते अशावेळी घरातील कमवता व्यक्ती निघून गेल्यास त्याच्या कुटुंबावर काय संकट ओढवले असेल याचा विचार शासनाने केला पाहिजे.आज पोलीस,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांना सरकारने विमा संरक्षण दिले आहे मग शिक्षकालाच का वगळले हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.राज्यात आज मुंबई ,कोकणातील रेड झोन असो की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील ऑरेंज झोन असो अथवा खान्देश,विदर्भातील ग्रीन झोन असो चांदया पासून बांद्या पर्यन्त प्रत्येक जिल्ह्यात आमचा शिक्षक बांधव कोरोना युद्धात तत्परतेने कार्य करत आहे व आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे.राज्यातील पोलीस यंत्रणा,आरोग्य यंत्रणा,महसूल यंत्रणा यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना विरुद्ध लढा देत  मदत करत आहे. राज्यात 3 मे नंतर मुंबई पुण्यातील शहरी भागातील लोक आप आपल्या गावी परतत आहेत व अशा स्थितीत कोकणात,पश्चिम महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्याने चाकरमानी गावी येत आहेत त्यामुळे आज गावोगावी चिंतेचे व भीतीचे वातावरण तयार झाले आहे,अनेक ठिकाणी ग्रामस्थांमध्ये जुने व नवे असे वाद होऊ लागले आहेत अशा स्थितीत पोलीस यंत्रनेवर खूप मोठा ताण येत आहे हे पाहून आमचे शिक्षक बांधव आपआपल्या नोकरीच्या गावी तळ ठोकून लोकांमध्ये समनव्य घडवून आणत आहेत व एकोपा कसा टिकेल यासाठीही प्रयत्न करत आहेत,अशा असंख्य पडद्यामागच्या भूमिका पार पाडत *जिथे कमी तेथे आम्ही* या ब्रिदवाक्य प्रमाणे देशसेवा करून माझा शिक्षक बांधव आज आपले कर्तव्य पार पाडत आहेत...
✍🏻...
श्री गजानन पुंडलिकराव जाधव
प्राथमिक शिक्षक,
रोहा,जि.रायगड
9923313777
कल्याण डोंबिवली महानगरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतील शिक्षक बांधव

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चेक पोस्टवर शिक्षक बांधव

गावा गावात home quarantine करताना शिक्षक

बुधवार, १३ मे, २०२०

कोरोनाचा केरळ पटर्न...

लढा कोरोनाशी...
केरळ राज्यातील थ्रीसुर येथे 30 जानेवारी 2020 रोजी देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला व भारतात थेट वुहान वरून हवाईमार्गे कोव्हिड19 व्हायरसने प्रवेश केला.वुहान येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली व तिच्या माध्यमातून भारतात कोरोना नावाच्या वादळाने प्रवेश केला. साडेतीन महिन्यांपूर्वी पहिला रुग्ण सापडला व आज देशात कोरोनाने धुमाकूळ घालत 74281 जणांना बाधित केले आहे.ज्या केरळ राज्यात देशातील पहिला रुग्ण सापडला त्या केरळ राज्यात आज स्थितीला 524 जणांना कोरोनाची लागण झाली व त्यातील 489 रुग्ण बरे होऊन घरी गेले व यात  4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे पाहता आपण निश्चित विचार करू की केरळने असे काय केले की आज केरळ देशात काय जगात कोरोना विरोधी लढ्यात अग्रेसर झाला आहे व आज देशात फक्त कोरोना विरोधी केरळ मॉडेल बद्दल बोलले जात आहे. या केरळ मॉडेल बद्दल 13 मे 2020 पर्यंतच्या माहितीच्या आधारे केलेले विश्लेषण आपल्या समोर मांडत आहे.
चीन देशातील वुहान शहरात नोव्हेंबर-डिसेंबर 2019 च्या सुमारास या कोरोना विषाणूने डोकं वर काढलं व बघता बघता आज जगातील 229 देशाला बाधित करत 43 लाखाच्या घरात रुग्णाची भर पडली आहे व 3 लाखाच्या जवळ मृत्यू झाले आहेत.हा संसर्ग एवढ्या वेगात पसरला की भल्या भल्या महासत्ता देशाला याची खबर लागे प्रयत्न होत्याचे नव्हतं झालं.अमेरिका सारख्या देशाने तर कोरोनापुढे नांगी टाकली व आज ते फक्त  परिणाम भोगत आहेत.कोरोनाने जगाला जसे बाधित केले तसे भारतात ही हवाई मार्गे 30 जानेवारी 2020 रोजी केरळ राज्यात थ्रीसुर येथे वुहान वरून आलेल्या मुलीला याची लागण झाली व देशात या महाभयानक संसर्गाची सुरवात झाली.ज्या केरळ राज्यात  देशातील सुरवातीचे 3 रुग्ण आढळले त्या केरळ राज्याने कोरोनाचा धोका ओळखत सुरुवातीपासूनच उपयोजनेचे पाऊले टाकत या रोगाचा कसा मुकाबला करायचा याची आखणी सुरु केली व त्याचा असर म्हणजे पहिले तीन पैकी 3 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तेव्हापासून देशात केरळ पॅटर्नची चर्चा सुरु झाली व आजही आहे. केरळ प्रशासनाने अगदी उत्तम परीस्थित हाताळत राज्यात गावोगावी कोरोना बद्दल जनजगृती केली त्यात प्रशासकीय यंत्रणा,राजकीय  पदाधिकारी यांनी राज्यातील जनतेला कोरोना बद्दल माहिती देत जनजागृती केली.सुरवाती पासूनच केरळ सरकारनने देशाच्या पुढे जात कांही निर्णय घेतले. देशात 14 दिवसाचा quarantine कालावधी असताना केरळमध्ये 29 दिवसाचा केला व आजही तेथे हाच नियम सुरु आहे. ज्या व्यक्तीला  quarantine केले त्या व्यक्तीची सतत माहिती प्रसाशनाने ठेवली व त्यांची काळजी घेतली तर दुसऱ्या बाजूला जनसमान्यात जनजागृतीचे काम तेवढ्याच जोमाने सुरु होते. 15 मार्च पासून जागो जागी हँड वॉश स्टेशन उभारून ब्रेक द चैन हे घोषवाक्य देऊन सुरवात केली. केरळमध्ये प्रति 10000 व्यक्तिमागे ज्युनियर पब्लिक हेल्थ नर्स व 15000 हजार व्यक्तिमागे ज्युनियर हेल्थ इन्स्पेक्टर ची नेमणूक करत आरोग्य यंत्रणा सक्रिय केली.केरळ सरकारने भरपूर चाचण्या केल्या व हजारो जणांना quarantine करत 29 दिवस एकांतात ठेवले. या काळात जनतेला व रुग्णांना मानसिक आधारची गरज असते हे ओळखून रुग्णांच्या समोपदेशनावर केरळने भर दिला. मुळात केरळमध्ये आरोग्याच्या बाबतीत वर्षानुवर्षे काळजी घेतलीच जाते व तेथे सतत येणारे नैसर्गिक संकटामुळे केरळचे आपत्तीव्यवस्थापन सक्षम असल्याने कोरोना काळात या अनुभवाचा चांगलाच फायदा झाला. केरळ मधील असलेले नैसर्गिक वातावरण,लोकांचे आहार,आयुर्वेदिकचा वापर यामुळे तेथील लोकांची प्रतिकारशक्ती मुळातच चांगली आहे.आज आपण कोरोना होऊ नये म्हणून गरम व कोमट पाणी पीत आहोत पण केरळमध्ये वर्षानुवर्षे बहुतांश लोक थंड पाणी पीत नाहीत व तेथील लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे अशा अनेक कारणाने केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखला जात आहे.
केरळमध्ये पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला तर पहिला मृत्यू 22 मार्च 2020 ला झाला यावरून आपण समजु शकतो केरळमध्ये कशा प्रकारे परिस्थिती हाताळली जात आहे.या साडेतीन महिन्यात केरळमध्ये फक्त 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 524 पैकी 489 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.म्हणजे केरळमध्ये रुग्ण बरे होऊन जाण्याची टक्केवारी 93.32% एवढी तर मृत्यू टक्केवारी 0.76% एवढी आहे.केरळ राज्यातील 2 जिल्हे रेड झोन,10 जिल्हे ऑरेंज झोन व 3 जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत तर 9 मे नंतर परदेशातून आलेल्या प्रवाश्यापैकी 32 जणांना कोरोनाचा लागण झाली असून त्यांना quarantine करण्यात आले आहे. कोरोना विरुद्ध अशी लढाई देशात कुठल्याही राज्याने अथवा जगात कुठल्याही देशाने दिली नाही म्हणून आज सर्वत्र कोरोनाच्या केरळ पटर्नची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे.
आता आपण कांही आकडेवारी पाहूयात. जग,भारत,महाराष्ट्र व केरळ यांच्यातील विश्लेषणात्मक आकडेवारी पाहून आपल्याला नक्की अंदाज येईल की केरळ राज्य कोरोना लढ्यात किती अग्रेसर आहे.
13 मे 2020 पर्यन्त जगात 43,08,055 एवढे लोक कोरोना बाधित झाले आहेत त्यातील 15,18,424 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 24,95,476 रुग्ण आजही ऍक्टिव्ह आहेत यात 2,94,155 जणांचा मृत्यू झाला आहे.जगाची रुग्णाची बरे होण्याची टक्केवारी 35.24%तर मृत्यूचे प्रमाण 6.82% एवढे आहे.आता आपण भारतातील आकडेवारी पाहूया 13 मे पर्यंत देशात 74281लोकांना लागण झाली 24386 बरे झाले,47480 ऍक्टिव्ह आहेत तर 2425 जणांचा मृत्यू झाला.म्हणजे भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 32.82% तर मृत्यूचे प्रमाण 3.26% एवढे आहे.
आपल्या महाराष्ट्रात 9मार्च 2020 ला पहिला रुग्ण सापडला व 13 मे पर्यन्त हा आकडा तब्बल 24427 इथपर्यंत पोहोचला. राज्यात 5125 लोक बरे झाले तर 18381 रुग्ण आजही ऍक्टिव्ह आहेत तर 921 जणांनाचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला मृत्यू 17 मार्च 2020 ला झाला होता तर यावरून लक्षात येईल जवळपास दोन महिन्यात हजाराच्या घरात बळींची संख्या पोहचली आहे.आपण महाराष्ट्राची टक्केवारी पाहिली तर रुग्ण बरे होण्याचा दर 20.98% तर मृत्यूचा दर 3.77% आहे म्हणजे देशाच्या सरासरीचा विचार केल्यास आपलं राज्य देशाच्या पुढे आहे त्यामुळे पुढील काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे व मीच माझा रक्षक या प्रमाणे वागलं पाहिजे.
आता आपण कोरोना विरुध्द यशस्वी लढा देत असलेल्या केरळ राज्याची आकडेवारी पाहूया. 13 मे पर्यन्त केरळमध्ये 524 जणांना कोरोना झाला त्यापैकी 489 रुग्ण बरे झाले तर फक्त 4 जणांचा मृत्यू झाला.आपण केरळच्या सरासरीचा विचार केला तर देशात काय जगात अव्वल कामगिरी ठरावी अशी आकडेवारी आहे, केरळमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 93.32% एवढा जबरदस्त आहे.तर मृत्यू दर 0.76% एवढा आहे. वरील सर्व विश्लेषण पाहिल्यास आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षात येईल की केरळसारख्या राज्याने जो कोरोना विरुद्ध लढा दिला आहे तो देशासाठी व जगासाठी निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय ठरणारा आहे....
✍🏻..
*श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*प्राथमिक शिक्षक,ता.रोहा* *जि.रायगड.*
*09923313777*

सोमवार, ११ मे, २०२०

हेच आमचं ऑनलाईन शिक्षण...

निसर्ग शिक्षणाचा आनंद घेताना आमचे मुलं
17 मार्च पासून कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा बंद झाल्या व ऐन वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मुलांना अघोषित सुट्टी मिळाली.त्यानंतरच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी online वर्ग भरवले जाऊ लागले व त्याचा परिणाम सकारात्मक येऊ लागला.ज्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत अशा पालकांचे व्हाट्स अँप  ग्रुप सुरु केले गेले त्यावर दररोज अभ्यास देऊन शिक्षण सुरु राहू लागले.शाळा बंद अभ्यास सुरू या घोषवाक्यखाली राज्यात मोहीम सुरू झाली व कालांतराने शिक्षण विभागाने ही पुढाकार घेत परिपत्रक काढत मुलांना online शिक्षण देत त्यांचा राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्याचे सुचवले व त्याप्रमाणे राज्यात वर्गावर्गाचे whatsapp ग्रुप तयार होऊ लागले व शिक्षण सुरु झाले.दीक्षा अँप व इतर तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून शाळा बंद शिक्षण सुरु मोहीम सुरू झाली.पण यात अपवाद राहिल्या दुर्गम,डोंगराळ,आदिवासी क्षेत्रातील शाळा,गरीब विध्यार्थी, ज्यांच्या घरी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल याची चिंता तेव्हा त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल दूरच साधा मोबाईल पण नाही अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे काय त्यासाठी अनेक चर्चा झाल्या सर्वे झाले त्यात ATF या शिक्षक समूहाच्या माध्यमातून राज्यात सर्वे केला व राज्यातील फक्त 20% मुलांपर्यत online शिक्षण पोहचते याचा निष्कर्ष निघाला व यावर अनेक चर्चा ही झाल्या की पुढील काळात प्रत्येक मुलांपर्यत कसे शिक्षण पोहचेल व सर्व मुलांना कशा प्रकारे अध्ययन-अध्यापन करता येईल व त्यावर भविष्यात मार्गही निघतील.पण अशाच अँड्रॉईडच्या online जगापासून  पासून वंचीत शाळेतील शिक्षक या नात्याने कांही गोष्टी मांडाव्या वाटतात.
माझी शाळा डोंगर भागातील शाळा, शाळेत 59 विध्यार्थी सर्व पालक मजुरी करून गुजराण करणारे व दोन वेळच्या जेवणाच्या शोधात राहणारे,अँड्रॉईड सोडा जेमतेम 3 ते 4 पालकांकडे साधे मोबाईल आहेत,95% पालक निरक्षर, 58 विध्यार्थी कातकरी बोलीभाषिक,अनेक पालक झोपडीत राहतात,आदिवासीवाडीत 4G,3G सोडा साध्या रेंजची ही मारामार अशा स्थितीत कोरोनाने देशाला,राज्याला गाठले व शाळेला अघोषित सुट्टी पडली, इकडे राज्यात शाळा बंद पण शिक्षण सुरु ही मोहीम जोरदार सुरु झाली घरोघरी पालकांच्या मोबाईलवर मुलं आपल्या गुरुजींनी दिलेला अभ्यास करत होते,यूट्यूब वर व्हिडीओ बघत होते,online टेस्ट सोडवत होते तर दुसऱ्या बाजूला माझ्या शाळेतील मुलांचा दिनक्रम सकाळी उठणे, जंगलात भटकणे,नदीवर पोहायला जाणे,गलोल घेऊन पक्षी,प्राण्यांची शिकार करणे,झाडावर चढणे, रानंमेव्याचा आस्वाद घेणे, चुलीत जाळण्यासाठी लाकडं गोळा करणे,पक्षासारखं बागडने असा रानंपाखरांचा online अभ्यास सुरू होता. एका बाजूला अँड्रॉईडवाले मुलं भराभर मोबाईलवर गणिते सोडावीत होते बेरीज ,वजाबाकी करत होते तर आमचे मुलं गलोलने किती दगडात किती आंबे पाडले हे शिकत होते.अँड्रॉईडवाले मुलं यूट्यूबवर निसर्ग,जंगल,पाणी,नद्या,फुलपाखरू,रानफळ,जंगली पशुपक्षी पाहत होते तर तेच आमचे मुलं रानावनात भटकून त्याचा प्रत्येक्ष अनुभव घेऊन शिक्षण घेत होते. Online अभ्यास करणारे मुलं दिवसभराचा अभ्यास  गुरुजी कडून दररोज संध्याकाळी whatsapp ग्रुप वर तपासून घेत होते तर आमचे मुलं दररोज संध्याकाळी घरकामात आई वडिलांना त्यांच्या मदत करत,आजीआजोबा सोबत गप्पा मारत आकाशातील चांदण्या मोजत, दुकानातील वस्तू आणून त्याचा हिशेब करत आपल्या ज्ञानाचे उपयोजन करत होते.
सांगायचं एवढंच की शिक्षण हे कधीच थांबत नाही ते सतत चालूच असते फक्त त्याचे माध्यम वेगवेगळे असते.शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे नसून ते आपण दररोज जीवनात कशा प्रकारे जगतो ते शिक्षण अभिप्रेत आहे. आज जरी माझ्या शाळेतील मुलांना अँड्रॉईड मोबाईलवर online शिक्षण घेता येत नसले तरी ते निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन शिक्षण घेत आहेत.या लॉकडाऊन काळातील मुक्त शिक्षणातून आमची मुलं जलतरण,नेमबाजी,धावणे,हस्तकला,चित्रकला,नृत्यकला,यात पारंगत होऊन भविष्यात आपले करियर घडवू शकतील. आमच्या मुलांसाठी कोरोना काळात हेच अनुभवातून मिळालेले निसर्गशिक्षण त्यांच्या पुढील वाटचालीस गती देणारे ठरेल...

✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
प्राथमिक शिक्षक,जि प रायगड.
09923313777
gajanan.jadhav1984@gmai.com

मंगळवार, ५ मे, २०२०

घरातील पहिला डॉक्टर बळीराजाच्या सेवेत रुजू....

डॉ.रजनीकांत मेघालय राज्यातील राष्ट्रीय कृषि चर्चासत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना. 
म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते तसेच माझ्या पुतण्याच्या बाबतीत झाले, आईवडिलांची खूप इच्छा होती मुलगा डॉक्टर व्हावा व गोरगरिबांची सेवा करावी पण महाविद्यालयीन वयात असलेला अल्लडपणा व स्वप्नाची नसलेली जाण यामुळे त्याचा मेडिकलचा नंबर हुकला व आईवडिलांनी पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न भंगले. हे अपयश त्याच्या मनाला एवढं झोंबल की त्याने ठरवलं आपण डॉक्टर व्हायचंच व गोरगरिबांची सेवा करायची व  आज अथक परिश्रमाने तो जरी माणसांचा डॉक्टर झाला नसला तरी बळीराजाचा शेतकी डॉक्टर झाला व आज तो एका कृषी संशोधन संस्थेत रुजू झाला.
माझा पुतण्या म्हणजे माझ्या सर्वात मोठ्या काकांच्या मोठ्या मुलाचा म्हणजे रमाकांत जाधव यांचा मुलगा रजनीकांत. त्याला आम्ही सर्व लाडाने शहाजी म्हणतो.शहाजीचा जन्म 23 मे 1992 चा. त्याचे प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले व माध्यमिक शिक्षणासाठी तो काकांकडे उदगीरला गेला. काका काकी पाशी राहून त्याने आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण उदगीर येथील लाल बहाद्दूर शाळेतून पूर्ण केले.आई वडिलांची इच्छा होती रजनीकांत डॉक्टर व्हावा म्हणून त्याला लातूर येथील सोनवणे कॉलेजला प्रवेश दिला पण जेंव्हा मुलं महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतात तेंव्हा नवीन वातावरणात रुळताना ध्येयाकडे दुलक्ष होत व वेळ गेल्यास समजत की आपण कुठे चुकलो.रजनिकांतच्या बाबतीत हि तेच झालं आम्हला अपेक्षा होती तो चांगले मार्क मिळवेल व डॉक्टरकीला नंबर लागेल पण त्याला कमी मार्क मिळाले व त्याच्या सहीत आईवडिलांचे स्वप्न भंगले हेच त्याचे पहिले अपयश होते व  त्याला खूप मोठा धडा देऊन गेला.
आता बारावी नंतर काय करायचं यांच विचारात असताना त्याने bsc agri करायची ठरवली व चार वर्षासाठी तो बारामती येथील कृषी महाविद्यालयात गेला.तेंव्हा बारामतीचे वातावरण,पश्चिम महाराष्ट्रातील शेतीसाठी होत असलेले प्रयत्न हे पाहून त्याला अधिक आवड निर्माण झाली व तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला.या चार वर्षाच्या काळात त्याने खूप काही नवीन गोष्टी शिकल्या व त्याच्या टीमने त्या दरम्यान एक यशस्वी प्रयोग केला व त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री मा.श्री शरदचंद्र पवार साहेबांनी यांच्या टीमची भेट घेतली व मार्गदर्शन केले हा त्याच्यासाठी खूप प्रेरणादायी क्षण होता.चार वर्षे डिग्री पूर्ण केल्यानंतर त्याने Msc agri करायचं ठरवलं पण ते सोप्प नव्हतं त्याने खूप अभ्यास केला व देशातून घेतली जाणारी indian council of agricultural research ICAER च्या इंटर्न्स मध्ये यश मिळवले व लातूर येथील कृषी महाविद्यालयात वनस्पती रोगशास्त्र विषयात प्रवेश मिळवला.या दोन वर्षात आपल्या ज्ञानात भरपूर भर टाकत वेगवेगळे प्रयोग करत कृषी क्षेत्रात  कार्य सुरू केले.इकडे वडील मुलगा शिकत आहे म्हणून परिस्थितीशी झुंझ देत त्याच्या शिक्षणाच्या खर्चासाठी कष्ट करत होते व याची जाण ठेवत रजनीकांत ही आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी जीवाचे रान करत अभ्यास करत होता.msc agri करत असताना रजनीकांतला 12 वी नंतर हुकलेले डॉक्टरीची संधी स्वस्त बसू देत नव्हती व त्याला नेहमी ही गोष्ट स्वस्त बसू देत नव्हती.त्याने ठरवलं होतं आपण जरी माणसांचा डॉक्टर झालो नसलो तरी कृषी क्षेत्रात संशोधन करून शेतकरी राजासाठी सेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचं व याच जिद्दीने त्याने msc agri केल्यानंतर नोकरी नकरता PhD करण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी त्याला खडतर प्रवास करावा लागणार होता त्यासाठी त्याने अभ्यास केला व MCAER-  maharashtra council of agricultural research द्वारा घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत यश मिळवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे प्रवेश मिळवला. 2016 ते 2019 या तीन वर्षात वनस्पती रोगशास्त्र या मुख्य विषयात PhD करत असताना अनेक संशोधने केले. त्यात studies on kagzi lime bacterial canker caused by xanthomonas axonopodis pvcitri ( कागदी लिंबू वरील झ्यान्थोमोनास अक्सनोपोडिस या जिवाणू मूळे होणाऱ्या खैऱ्या रोगाचा अभ्यास) यावर यशस्वी संशोधन केले.phd च्या शेवटच्या वर्षात जैविक कीटकनाशक तयार करणाऱ्या प्रोजेक्टवर त्याने यशस्वी काम केले.तीन वर्षांच्या काळात हे संशोधन करत असताना शिक्षणासाठी लागणार खर्च त्याने बँकेत कर्ज काढून पूर्ण केले व शिक्षण घेत घेत काम ही केले.PhD पूर्ण झाल्यावर याच प्रोजक्टवर 8 महिने सहायक संशोधक म्हणून काम केले.वयाच्या 28 व्या वर्षी कृषी क्षेत्रातील डॉक्टरेट त्यांनी पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला आहे.याच दरम्यान त्याने केलेले संशोधन पेपर सात राष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहेत व 5 पेपर प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत.आतापर्यंत रजनीकांत ने 4 राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग नोंदवला आहे. नोव्हेंबर 2019 साली मेघालय राज्यात झालेल्या राष्ट्रीय कृषि चर्चासत्रात सहभाग नोंदवून त्याने महाराष्ट्राचे कृषिक्षेत्रातील नाव उज्जल केले आहे. हा खडरत प्रवास करून आज तो एक बळीराजासाठी डॉक्टर रुपात कार्याला सुरवर करत आहे. त्याला नुकतीच आंतराष्ट्रीय कृषी क्षेत्रात काम करणारी MNC Bayer crop science या जर्मन कंपनीत Executive Field quality या पदावर नेमणूक मिळाली आहे.शेतकऱ्याच्या बियाणे उत्पादन क्षेत्रावरील रोग व कीड नियंत्रण करणेसाठी मार्गदर्शन करणे,ट्रेनिंग घेणे अशा स्वरूपातील फिल्डवरील जॉब मिळाला आहे.4 मे 2020 रोजी रजनीकांत देऊळगाव राजा जि.बुलढाणा येथील कंपनीच्या कार्यक्षेत्रात तो रुजू झाला आहे.
आई वडिलांनी व घरच्यांनी राजनिकांतच्या रुपात पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न आज त्याने पूर्ण केले आहे व जरी माणसांचा डॉक्टर होऊ शकला नाही तरी माणसं जगवणाऱ्या बळीराजाच्या  सेवेतील डॉक्टर होऊन त्याने कार्याला सुरवात केली आहे. पुढील काळात रजनीकांत ने म्हणजे आमच्या शहाजीने आपल्या कुशल बुद्धिमतेतून कृषिप्रधान देशातील शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी उत्तम कार्य करावे  व आईवडिलांचे कुटुंबाचे,गावाचे,जिल्ह्याचे,राज्याचे तसेच देशाचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर उज्जल करावे हीच मनपूर्वक सद्धीचा....
💐💐💐💐💐
✍️ श्री गजानन पुंडलिकराव जाधव
9923313777





शनिवार, २ मे, २०२०

ज्ञानमंदिरातील खडतर वर्षपूर्ती

माझी शाळा ह्याच समाज मंदिरात भरते.
आज 3 मे चिंचवली तर्फे आतोणे शाळेत बदली करून येऊन वर्ष पूर्ण झाले.खरं तर हे वर्ष माझ्याशाळेसाठी संघर्षाचे होते अनेक समस्यांचा सामना करत हे वर्ष लोटले पण या वर्षाने कठीण परिस्थितीचा कसा सामना करावा हे शिकवले.
पहिली शाळा पाले खुर्द आदिवासीवडी येथे 10 वर्ष,दुसरी शाळा संतोषनगर येथे 3 वर्ष सेवा केल्यानंतर 2019 साली शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे बदली होणार होती मग मी विनंती बदलीसाठी अर्ज केला व सर्वसाधारण क्षेत्र सोडून दुर्गम क्षेत्रातील शाळा निवडल्या त्यात मला सध्याची चिंचवली तर्फे आतोणे शाळा मिळाली.
 रोहा तालुक्यात  सुगम, दुर्गम व अति दुर्गम क्षेत्रात शाळेची विभागणी केली आहे. रोहा तालुका ठिकाणापासून 23 km अंतरावरील अति दुर्गम क्षेत्रातील चिंचवली तर्फे आतोणे जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 मे 2019 रोजी हजर झालो. या शाळेची पूर्व परिस्थिती सांगायची तर ही शाळा अति दुर्गम क्षेत्रात तर आहेच परंतु गेल्या 4 वर्षांपासून या शाळेला इमारत नाही ही शाळा एका आदिवासी वाडीतील समाज मंदिरात भरते.ना तेथे शौचालय आहे ना किचन सेड ना मुलांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था.कोकणात 4 महिने पावसाळा असतो अशा स्थितीत या छतगळक्या मंदिरात,बिन खिडक्यांच्या मंदिरात मुलं अनेक अडचणींनाचा सामना करत शिक्षण घेत होते व आहेत.पावसाचा जोर वाढला तर मुलांना दुपारचे जेवण ही उभे उभे घ्यावे लागते ,संपूर्ण विध्यार्थी संख्या ही कातकरी आदिवासी समुदायाची व स्थलांतराचे प्रमाण खूप अशा परिस्थितीत एका छोट्या समाजमंदिरात 59 मुलं शिक्षण घेत होते. अशा शाळेत विनंती बदलीच्या माध्यमातून एका नवीन आव्हान पेलण्यासाठी शाळेत रुजू झालो.
17 जून 2019 ला नवीन सत्राची सुरवात झाली व एका नवीन प्रवासास सुरवात झाली गेल्या 14 वर्षांपासून कातकरी बोलीभाषिक मुलांना अध्यापनाचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे बराच अंशी नवीन ठिकाणी याचा उपयोग होईल याची खात्री होती.जून पासून माझ्या सोबत शाळेवर श्रीम हर्षा काळे या नवीन बदली होऊन आलेल्या शिक्षिका सोबत होत्या. शाळा एका वाडीवरील समाज मंदिरात भरणारी त्याच मंदिरात हनुमानाची मूर्ती,तेथेच 59 विध्यार्थी,2 शिक्षक, वरून पडणारा पाऊस ,खिडक्यांना झापडे नव्हती अशा परिस्थितीत कामाची सुरुवात केली.पण कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने महिला शिक्षकाला तेथे काम करणे सोयीचे नसल्याने प्रशासनाने त्यांना केंद्रीय शाळेत तूर्त व्यवस्थापन केले व तेथील शिक्षक श्री जगन्नाथ अब्दागिरे यांनी स्वतःहून अशा परिस्थितीत काम करण्याची तयारी दर्शवली व ते माझ्या सोबत काम करू लागले. मग माझा व त्यांच्या प्रयत्नाने आमच्या मंदिरातील शाळेचा प्रवास सुरु झाला.
🔵 *परिस्थितीशी चारहात*:- शाळेला इमारत नाही,एक छोटे गळके मंदिर, शौचालय नाही,माध्यम भोजन शिजवण्यासाठी खोली नाही,एकाच मंदिरात 59 मुलं,2 शिक्षक त्यात मारुतीच्या दर्शनासाठी येणारे भक्त,कोसळणारा मुसळधार पाऊस ,गळणारे मंदिर अशा स्थितीत मुलांना शाळेत टिकवणे आमच्यासाठी खूप मोठे आव्हान होते. पण आम्ही ठरवलं होतं प्रत्येक मुलं शाळेत आलं पाहिजे व टिकले पाहिजे यासाठी 100% योगदान देण्याचे ठरवले होते. जमेल तसे मंदिराची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला उघड्या खिडक्यांना,दरवाज्याला प्लास्टिक लावले,शेजारच्या घरातून लाईट घेतली व शाळेतील जुने प्रोजक्टर सुरु केले व मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण कसे देता येईल याचे नियोजन केले.
🔵 *शाळाबाह्य मुलांसाठी प्रयत्न :-* गेल्या 14 वर्षांपासून अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले,त्यांची उपस्थिती वाढवली व प्रत्येक मुल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सवय लागली. या ठिकाणी ही अनेक समस्या होत्या सतत गैरहजर,स्थलांतर,शिक्षणाबद्दल पालकांची उदासीनता,बोलीभाषा,शाळा इमारत नसणे अशा अनेक कारणांमुळे मुलं शाळेत येत नव्हते पण मी व माझे सहकारी शिक्षक आम्ही बदल घडवायचा या हेतूने काम सुरवात केली दररोज पालकांच्या भेटी घेणे,घरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन येणे, पालक सभा घेऊन शिक्षणाचे महत्व पटवून देणे,शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सतत गैरहजर मुलांच्या घरी भेटी देणे,स्थलांतरित होऊन जाणाऱ्या पालकांचे समुपदेशन करणे अशा वेगवेगळ्या मार्गाने जाऊन प्रत्येक मुलं शाळेत कसा येईल यासाठी प्रयत्न सुरु केले.कधी कधी मुलांना नदीवर जाऊन घेऊन आलोत तर कधी घरच्या छोट्या भावंडाची सोय शाळेत करून त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. अशा प्रकारे विविध प्रयत्नाने मुलांना आहे त्या परिस्थितीत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला व मुलांना प्रवाहात टिकवले. या वर्षी 10 कुटुंबाचे प्रबोधन करून 10 ते 12 मुलांचे स्थलांतर रोखण्यात यश आले व ते मुलं आज दररोज न चुकता शाळेत येतात.जे मुलं शाळेत यायच कंटाळा करायचे तेच मुलं आज शिक्षक शाळेत येण्याच्या आगोदर शाळेत हजर असतात.
🔵 *कलात्मक शिक्षणावर भर :-* छोट्याशा ममंदिरात 59 मुलं 2 शिक्षक अशात अध्यापन करताना खूप गोंधळ उडून जायचा अशावेळी एक नवीन प्रयोग सुरू केला. प्रत्येक मुलं वेगळा असतो प्रत्येक मुलात वेगवेगळी कला दडलेली असते याला बालवयात प्रोत्सहान दिले तर ते अधिक बहरत जात असते त्या प्रमाणे माझ्या शाळेतील रांनपाखरामध्ये अनेक उपजत कला होत्या त्यांना वाव देण्याचे काम केले जेणेकरून शाळेत फक्त अभ्यास नसून आपल्यातील विविध गुणांना संधी दिले जाते हे मुलांच्या मनात रुजल होत. त्या दृष्टिकोनातून दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवून त्यांना आठवड्यातील शनिवार फनीवर वाटू लागेल असे वातावरण बनवले.कधी मातीकाम,कधी चित्रकला,कधी ठसेकाम,कधी टाकाऊ पासून कलाकृती तर कधी नृत्य,गायन,कसरतीचे व्यायाम,गलोल स्पर्धा आयोजित करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे शाळेची उपस्थिती वाढली व मुलांना शाळेची आवड निर्माण झाली व जे मुलं दर वर्षी स्थलांतर होऊन जात होते ते आपोआप रोखले गेले.
🔵 *संपर्क ची साथ व समाजमंदिराचे ज्ञानमंदिरात रूपांतर:-* शाळेचे भौतिक वातावरण आनंददायी असेल तर मुलांना त्या ठिकाणी रमायला आनंद वाटतो पण ज्या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही अशा ठिकाणी इच्छा असून ही मुलं यायला कंटाळा करतात अशामुळे मुलांना शाळेत टिकवणे अवघड असते. अशीच स्तिथी माझ्या शाळेची होती गळके मंदिर,खिडक्यानां झापडं नाहीत अशा स्थितीत समाज मंदिरात बदल करायचं ठरवलं. सोशियल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दाद मिळत गेली कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मुलांची शिकण्याची जिद्द,त्यांच्यातील कला,वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा असलेला सहभाग पाहून नवी उमेद पेज ने आमच्या शाळेची स्टोरी केली व त्यावरून मुंबई मधील सम्पर्क संस्थेने मदतीचा हात पुढे केला व आमची चिंचवलीच्या समाज मंदिरात भरणाऱ्या  शाळेला ज्ञानमंदिरात रूपांतर करण्यासाठी मदत सुरु केली.ज्या मंदिराच्या समोर एक पाऊल ठेवायला ही जागा नव्हती आज तेथे सुसज्ज असे 20×10 चे सेड उभारले गेले आहे,मंदिराला रंगरंगोटी केली आहे,मंदिरासमोर ओटी बांधली व तेथे आज दररोज मुलं शिक्षण घेतात,दुपारचे जेवण करतात एक हक्काचे छत मुलांना मिळाले आहे तसेच स्वच्छता किट जेणेकरून मुलांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत यासाठी साहित्य पुरवठा केला आहे.याच संस्थेच्या मदतीने मुलांसाठी पूरक आहार योजना लागू केली आहे.आठवड्यातून 3 दिवस मुलांना वेगवेगळी फळे,अंडी कधी चिकन,बिस्किटे,राजगिरा लाडू,खारीक असा पूरक आहार उपलब्ध करून देऊन मुलांमध्ये आनंददायी वातावरण तयार केले गेले आहे.आज या मंदिराचे पालटलेले रूप पाहून हे समाज मंदिर नसून ज्ञानमंदिर आहे असे वाटू लागले आहे.पूर्वी समाजमंदिरातील शाळेत दररोज यायला कंटाळा करणारी तेच मुलं या ज्ञानमंदिरात शाळा भरण्याच्या आगोदर येऊ लागली आहेत व मनसोक्त आनंददायी पद्धतीने शिक्षण घेत आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न वर्षभरात केला,या वर्षात कठीण परिस्थितीत काम करण्याचा अनुभव तर मिळालाच पण परिस्थितीत कितीही बिकट असली तरीही मुलांची शिकण्याची ओढ पाहून कौतुक हि वाटत गेले व उत्साह वाढत गेला. एक वर्ष तर सरले आहे आता येणाऱ्या वर्षात एकच आशा की आमच्या मुलांना हक्काची शाळा मिळावी व त्यांनाही इतर मुलांप्रमाणे भौतिक सुविधायुक्त शाळेत शिकायला मिळावे. आमचा हाच प्रवास सकारात्मक दृष्टिकोनातून पुढेही सुरूच राहील व अनेक अडथळ्यांना सामोरे जात आमची रांनपाखर पुढील काळात असेच बहरत राहतील...
✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...