शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी लावणारा-श्री.गजानन जाधव(शिक्षणाचे बेट, संतोष मुसळे दै.पुण्य नगरी.)

#शिक्षणाची_बेट

* दि.२२जुलै २०१८ रोजीच्या #दै_पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या '#प्रवाह' या पुरवणीतील शिक्षणाची बेट शैक्षणिक कार्याविषयीचा 'बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी या लेखातून #श्री_संतोष_मुसळे(जालना) सरांनी माझ्या 12 वर्ष शैक्षणिक कार्याचा घेतलेला आढावा

बोलीभाषेतून शिक्षणाची गोडी लावणारा!
निसर्गान भरभरुन सौंदर्य दिलेला कोकणचा परिसर सर्वांनाच आवडतो.उंच उंच सह्याद्रीच्या डोंगररांगा,सतत रिमझिम पडणारा पाऊस,दुधासारखे फेसाळणारे धबधबे,कौलारु घरे,धानाची शेती,आंबे,काजुची झाडे हे निसर्गरम्य व मनमोहक दृश्य पाहिले की मन प्रसन्न होते.मात्र उंचसखल भागात मोठ्या जिकरीने व हिरीरीने निसर्गासारख्याच शाळा उभारुन छोटी छोटी शिक्षणाची बेट तयार करतायेत यापैकीच एक पाले खुर्द ता.रोहा जि.रायगड येथील गजानन जाधव यांना आज भेटूयात.
                   *लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव* येथील राहणारा गजानन लहानपणापासून मराठवाड्यात पडणारा सततचा दुष्काळ तो बघत आलाय.याच दुष्काळाच्या  सावटाखाली  शिक्षणाशिवाय दुसरा  पर्यायच नव्हता.कारण पावसाअभावी शेतीत काहीच पिकायचे नाही.आयुष्यात शिकून खुप मोठे व्हायचे होते मात्र परिस्थितीने त्याला डी.एड. करायला लावले.त्याची आई नेहमी सांगायची गजानन जे काही काम करशील ते मनापासून व अपेक्षाविरहीत कर.
         डी.एड.झाल्यानंतर २००६ साली रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नौकरीस तो रुजू झाला.मनात खुप सारी स्वप्नांची खुणगाठ बांधून तो शाळेवर जाण्यास उत्सुक होता.त्याला रोहा  तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी ही शाळा त्याला मिळाली.समुद्रसपाटीपासून साधारण २ किलोमीटर डोंगराच्या कडेला वसलेला छोटासा आदिवासी पाडा व तेथील छोटीशी टुमदार शाळा एकदाची त्याच्या नजरेस पडली.पाड्यावर  जायला कच्चा रस्ता असल्याने पायीच चालत जावे लागायचे.पाड्यावर गेल्यावर निदर्शनास आले की येथील संपूर्ण वस्ती ही कातकरी आदिवासी समुदायाची . सुरवातीच्या कळात गजाननला त्यांची भाषा व त्यांना गजाननची भाषा समजतच नव्हती म्हणून गजाननला  भीती वाटायची. कारण या आगोदर फक्त पुस्तकात कातकरी आदिवासी जमाती विषयी ऐकले होते त्यांचे राहणीमान,जीवनशैली अगदी वेगळी ,गरजे पुरते कपडे व कमरेला सतत एक कोयता असतो हे चित्र पुस्तकातून पाहिले होते.मात्र जसेजसे दिवस लोटले जावू लागले  नंतर हळू हळू या समुदायाविषयीची भीती कमी झाली.
        आपली नेमणूक येथील मुलांना शिकविण्यासाठी झालेली आहे हे गजू जाणून होता.आता त्याने मोर्चा आदिवासीच्या मुलांना गुणवत्तापूर्ण  शिक्षण कसे देता येईल याकडे वळवला.घरोघरी भेटी घेवून पालकांची मानसिकता बदलली.  सुरवातीच्या काळात म्हणजेच  २००६ते २००९या कालावधीत मुलांसोबत राहून,पालका सोबत मिसळून कातकरी समुदायबद्दल बरीच माहिती त्याने मिळवली होती.पण मूळ प्रश्न होता भाषेचा कारण सर्व वस्तीत कातकरी बोलीभाषा बोलली जायची व तोस मराठी बोलीभाषिक असल्यामुळे शाळेतील विध्यार्थी व त्याच्यात संवाद साधताना गोंधळ उडून जायचा.कारण ते जास्तीतजास्त कातकरी भाषेत संवाद साधायचे व ते त्याला समजायचे नाही.
      आता मुलासोबत राहून आपन त्यांची भाषा शिकायला हवी असे गजूने ठरविले.कालांतराने मुलांमध्ये राहुन त्याचे ऐकून कांही शब्द समजू लागले जसे मुलगा-सोहरा,मुलगी-सोहरी,वडील-बाहस, आई-बय अशा प्रकारे त्यांचे हे शब्द ऐकून थोडी कातकरी बोलिभाषा तो समजू लागला व कालांतराने मुलांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागला.गुरुजी आपल्या भाषेत बोलतात हे बघून मुलांनाही छान वाटू लागले त्यामुळे मुलं माझ्या अधिक जवळ येऊ लागली.सामान्यपणे राज्याच्या शिक्षणाची विभागणी करावयाची झाल्यास शहरी,ग्रामीण व आदिवासी अशी करावी लागेल.प्रमाण मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके शहरी भागातील व ग्रामीण भागातील मुलांना सहज समजतात मात्र आदिवासी भागात प्रमाण भाषा अजिबातच समजत नाही व यातूनच ती मूले शाळेच्या प्रवाहाबाहेर जातात.यामागील कारण म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ती मुल नक्कीच शिक्षणप्रवाहात कायम राहतील आणि हेच गजाननने कातकरी बोलीभाषेत साहित्य निर्मिती करुन साध्य केलेय.
उपक्रम:
१)कातकरी-मराठी शब्दसंग्रह :-
      आदिवासी पाड्यावरील  मुलांंमध्ये राहून बऱ्यापैकी कातकरी भाषेची ओळख त्यांना झाली होती.मग मुलांच्या भावविश्वातील ,परिसरातील,कुटुंबातील तसेच प्राण्यांचे ,पक्षांचे कातकरी बोलीभाषेतील शब्द व त्याचा मराठीत अर्थ अशा १०० शब्दाचा संग्रहत्याने  बनवला. जसे फुलपाखरू-भिंगरूट,अंडी-साकु, म्हातारा-डवर, म्हातारी-डोसी अशा दररोज बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा यात समावेश होता.आता मुलेही सरांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागली व एकूणच शिक्षणाची गाडी रुळावर यायला लागली.या शब्दसंग्रहाचा फायदा म रायगड जिल्ह्यातील अनेक कातकरी वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांना झाला.कारण ज्याप्रकारे भाषेची अडचण  गजाननला येत होती तशीच इतरांनाही येत होती .यामुळे कातकरी बोलीभाषेत साहित्य निर्मितीची अधिक गरज ओळखुन पुढील प्रवास सुरु ठेवला.

२)बालगोष्टी कातकरी-मराठी:-
     कातकरी भाषेतील शबादसंग्रहाचा साठा गजाननकडे बऱ्यापैकी झाला होता.पाड्यावरील मुले व तो योग्यरितीने शैक्षणिक संवाद साधत होते.आता मात्र या मुलांना अजून वाचनाची गोडी कशी लावावी यासाठी कातकरी भाषेत एक पुढचं पाऊल टाकत बालगोष्टीचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद करण्याचे मोलाचे काम त्याने हाती घेतले.आणि तो कामालाही लागला यामागचे कारण म्हणजे एखादी गोष्ट मुलांना त्यांच्या भाषेत सांगितली तर खूप मनोरंजक वाटते व पक्की लक्षात राहते.त्या वप्रमाणे  म्हातारीचा भोपळा,टोपीवाला आणि माकड,ससा कासव अशा गोष्टी कातकरी भाषेत अनुवाद केल्या व त्या मुलांसोबत सादर केल्या.त्यामुळे मूल एवढी खुश होऊ लागली व घरी जाऊन पालकांना सांगू लागली की सर आपल्या भाषेत बोलतात व गोष्टी सांगतात .यामुळे मुलांची उपस्तिथी वाढू लागली व गैरहजर राहणारे मुलं दररोज शाळेत येऊ लागले.मुलांना सतांबद्दल आवड निर्माण होऊ लागली व  सरांनाही मुलांचा लळा लागला हे सर्व शक्य झाले फक्त भाषेमुळे.अशा पद्धतीने मुलं शाळेत येऊ लागली व टिकू लागली.
३)मुळाक्षरे कातकरी- मराठी:-
      बोलीभाषा गोष्टी संवाद मुळे पहिलीच्या मुलांना शाळेत रमवन्यात यश आले होते आता त्यांना अध्ययनाची गोडी लावायची होती त्यासाठी त्यांना मुळाक्षरे शिकवताना त्यांच्याच परिसरातील प्राण्यांचे,वस्तूंचे नावे त्यांच्याच भाषेत सांगून त्या त्या मुळाक्षरांची ओळख दिली.जसे
क- केल्या(माकड),कोहळ(भोपळा)
ख- खुबे(गोगलगाय)
ग-गोड(गुळ)
अशा प्रकारे ओळख दिल्याने मुलांना जास्त लवकर समजू लागले व याचा प्रवास सोपा होऊ लागला व मुले वाचन लेखन प्रक्रियेत चागला प्रतिसाद देऊ लागले.

४)शाळाबाह्य ते शिष्यवृत्तीधारक:-
     सुरवातीच्या काळात मुलांना शाळेत आणण्यासाठी धडपड करावी लागली व कालांतराने बोलीभाषेच्या वापरामुळे मुलांशी जुळवून घेऊन त्यांना शाळेची आवड निर्माण झाला व जे मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते,कोणी शाळाबाहय होते ते शाळेत येऊ लागले टिकू लागले व शिकू लागले,चांगल्याप्रकारे वाचन लेखन करू लागले व व्यक्त होऊ लागले.त्याच प्रमाणे 2012-13,2013-14,2014-15 या कालावधीत तर 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत मुलं चमकू लागले व100% शाळेचा निकाल लागू लागला व काही मुलं शिष्यवृत्ती धारक झाली.हा सर्व बदल एकदम झाला नाही याला सतत सुरु असलेले प्रयत्न होतेच त्याप्रमाणे मुलांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण केल्याने हे सर्व शक्य होत गेले.2006 ते 2016 या कालावधीत खूप शिकायला मिळालं व साहित्य निर्मितीत वेगवेगळे प्रयोग करता आले.

५)इयत्ता पहिलीच्या मराठी पुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद:-
      जून 2016 ला प्रशासकीय बदली झाली व नवीन जी शाळा मिळाली त्यात एकही कातकरी बोलीभाषिक मुलं नव्हतं त्यामुळे आपण साहित्य निर्मितीचा घेतलेला वसा थांबण्याची भीती होती पण जिद्द सोडली नव्हती.शेवटी प्रशासनाला विनंती केली व सध्याची शाळा संतोषनगर आदिवासीवाडी ही मिळाली .यापुढे एक पाऊल टाकत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकाचे कातकरी बोलीभाषेत अनुवाद करण्याचे ठरवले जेणेकरून पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना त्यांच्या भाषेत अध्ययन अनुभव देता येतील.या प्रमाणे पाहिलच्या कविता,गोष्टी,चित्रकथा,संवाद कातकरी भाषेत बनवल्या व त्याची pdf बनवुन whats app च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील शिक्षकापर्यंत पोहचवल्या जेणेकरून त्यांना पहिलीच्या मुलांना शाळेत आनंददायी पद्धतीने रमवता येईल.

६)शिक्षणाची वारी:-
      2016 17 च्या शिक्षणाच्या वारीसाठी महाराष्ट्रातील 50 उपक्रमामध्ये त्याच्या या कातकरी बोलीभाषेच्या   उपक्रमाची निवड झाली व एका आदिवासी वाडीवरील उपक्रम राज्यस्तरावर पोहचला.या वारीच्या माध्यमातून पुणे,नागपूर,औरंगाबाद येथे जाऊन महाराष्ट्रतील हजारो शिक्षकांना या उपक्रमची गरज का आहे याची माहिती दिली व मुलं कशाप्रकारे स्वभाषेत चांगल्या प्रकारे शिकते याची माहिती दिली. महाराष्ट्रतील विविध आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला व त्या प्रमाणे काही शिक्षकाने पुढील कालावधीत वारली,लमान भाषेत साहित्य बनवले.
कातकरी भाषा ही रायगड,ठाणे,पालघर,पुणे,सातारा जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी असल्याने या बनवलेल्या पुस्तकाची pdf सर्वत्र सोसेल मिडियाच्या माध्यमातून पोहचवली व त्याचा तिथे एक शिक्षक मार्गदर्शिका म्हणून वापर होत असलेचा अभिप्राय येऊ लागले.
अशा प्रकारे  प्रत्येक मुलं शिकले पाहिजे यासाठी एक बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे उपक्रम सर्वत्र पोहचला व याचा उपयोग मूल शाळेत येण्यासाठी व टिकण्यासाठी,शिकण्यासाठी होत  आहे याचा आनंद वाटत आहे.
स्वतः च्या सहा वर्षाच्या मुलाला गजुने आपल्याच शाळेत शिकायला टाकलेय.आदिवासीच्या मुलांसमवेत तोही त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण घेतोय.
संतोष मुसळे,जालना
मो.नं.९७६३५२१०९४

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

शाळाबाह्य मंग्या नववीत गेला....



आज श्रावणी सोमवारची सकाळच्या सत्रातील शाळा असल्याने शाळा सुटल्यानंतर 11.30 वाजता शाळेतील एका मुलीचे खाते काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. तेथे फॉर्म भरत असताना मागच्या बाजूने  जाधव सर असा आवाज आला,मागेवळून पाहतो तर चेहरा जरा ओळखीचा वाटला. तो 15-16 वर्षाचा मुलगा जवळ आला व म्हटला, *'सर मी मंग्या',* चार वर्षांनी त्याला पाहिल्याने मला लवकर लक्षात आले नाही.मी म्हटलं इथे काय करतोस,तर तो म्हटला, बँकेत खाते काढले आहे पासबुक घ्यायला आलो होतो.त्याला पुन्हा विचारलं शाळेत दररोज जातो का ? तो म्हटला हो सर दररोज जातो,आता 9 वी मध्ये आहे.हे ऐकून खूप छान वाटले व *2011 साली आपण ज्या शाळाबाह्य मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते तो मंगेश आज दररोज शाळेत जातो व बँकेचे व्यवहार ही करतो हे पाहून खूप आनंद झाला.* आज नवव्या इयत्तेत शिकत असलेला 2011 सालाचा शाळाबाह्य  कु.मंगेश संतोष  जाधव शिक्षणाच्या प्रवाहात कसा आला याविषयी थोडक्यात मांडतो.
*रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पालेखुर्द आदिवासीवाडी* ही कातकरी आदिवासी जमातीची 30 ते 40 घरांची वस्ती ही माझी पहिली शाळा. या शाळेवर *2006 ते 2016 असे 10 वर्ष* शिक्षक म्हणून नोकरी केली. शाळा 4 थी पर्यंतची होती या शाळेतील बरेच मुलं पालकासोबत 9 महिन्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात स्थलांतर होत असत.सप्टेंबर ते जून असा स्थलांतराचा त्यांचा कालावधी असायचा,पावसाळा सुरू झाला की ते बिऱ्हाड परत वाडीवर यायचे व मुलांची 3 महिन्याची शाळा सुरु व्हायची असे वर्षानु वर्ष चालायचे.
*2009 साली केंद्र सरकारने शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा (RTE2009) कायदा लागू केला* व प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे अशी मोहीम सुरू झाली.कायदा 2010 साली आमलात आला व या कायद्यात अनेक तरतुदी केल्या  त्यात आमच्या शाळेसाठी महत्वाचे म्हणजे प्रत्येक विध्यार्थी एक वर्ष एका वर्गात राहील व पुढल्या वर्षी पुढल्या वर्गात जाईल ती तरतूद खूप उपयोगी पडली.या कायद्यामुळे माझ्या शाळेतील अनेक विध्यार्थी प्रत्येक वर्षी फक्त 3 महिने शाळा करून  4थी पास होऊन गेले पण पुढे ते चांगले शिकत गेले.दुसरं म्हणजे *वयानुरूप प्रवेश* शाळाबाह्य मुलांना त्यांच्या वयाच्या समकक्ष
वर्गात प्रवेश देऊन त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे .या मुळे माझ्या वाडीतील अनेक शाळाबाह्य  मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता आले त्यातील *मी पहिला प्रवेश दिलेला  शाळाबाह्य मुलगा* म्हणजे *मंग्या* म्हणजेच *मंगेश संतोष जाधव*
साधारण *एप्रिल 2011* ची गोष्ट असेल मंगेश चे कुटुंब स्थलांतरित होऊन आमच्या शाळेच्या परिसरात आले.मंगेश च्या घरी त्याचे वडील ,आई व 4 वर्षाचा छोटा भाऊ नंदेश. मंगेश चे वय साधारण 7 वर्षाचे होते.मंगेश शाळेतील मुलांसोबत  शाळा सुटल्यावर खेळायचा, जंगलात बेचकी(गलोल) घेऊन पक्षी मारण्यासाठी जायचा,रान कोंबड्या,ससे मारण्यासाठी फास लावायचा पण शाळेत कधी यायचा नाही.मला पाहिला की तो जंगलात पळून जायचा पण हळू हळू इतर मुलांसोबत तो ओळखीचा झाला व एक दिवस शाळेत आला.त्याला पाहिल्यास मला वाटले तो कुठे तरी शाळेत दाखल असावा व स्थलांतरित होऊन येथे आला असावा म्हणून त्याला मी विचारलं, *काय रे मंग्या कुठल्या वर्गात आहेस व तुझी शाळा कोणती?* तो मला म्हटला कातकरी बोलीत, *गुर्जी मा शाळमा कदवा नाही गेहल,आम्ही समंदा जन धंद्यांमा हता.*(म्हणजे मी शाळेत कधीच गेलो नाही आम्ही सर्व कोळसा कामासाठी स्थलांतरित होतो.) *तो शाळाबाह्य होता पण त्याला शाळा आवडते अस जाणवलं .*  दुसऱ्या दिवशी त्याच्या झोपडीत गेलो त्याच्या पालकांना भेटायला तर त्याचे वडील दारूच्या पूर्ण नशेत झोपला होता तेंव्हा त्याच्या आईला विचारलं तर आई म्हटली , *'आम्ही जवळच्या पुई आदिवासीवाडीवरचे पण 4 ते 5 वर्षांपासून कर्नाटक राज्यात स्थलांतरित होतो त्यामुळे मंग्या ला शाळेत घातलं नाही पण आता इथेच राहणार आहोत त्यामुळे त्याला तुम्ही शाळेत घ्या'*  मग मंग्या  एप्रिलच्या शेवटी कांही दिवस शाळेत आला व बसू लागला.सुट्टी 8 दिवसानी लागणार होती म्हणून ठरवलं मंग्या ला जून मध्ये दाखल करायचं. मे 2011 ची सुट्टी लागली तशी संपली हि व शाळा सुरु होणार त्या आगोदर एक दिवस जाऊन मंग्याची झोपडी गाठली व त्याला पहिल्या दिवशी दाखल करायचं ठरवलं तस त्याचा आई व वडिलांना सांगितलं व मंग्याच्या प्रवेशाचा दिवस पक्का झाला. 15 जून 2011 ला पहिल्या दिवशी शाळेत गेलो तर मंग्या आला नव्हता मग मुलांना त्याच्या घरी पाठवलं तर घरी कोणी हि नव्हतं तेंव्हा शेजाऱ्या कडून समजलं ते सर्वजण नदीवर मासे पकडायला गेले म्हणून.शाळा सुटल्या नंतर मंग्याची आई भेटली व तिला सांगितलं उद्या काही करा कामाला उशिरा जा पण मंग्याला शाळेत घेऊन या.ठरल्या प्रमाणे *16 जून 2011* रोजी सकाळी 10 वाजता मंग्या आईसोबत शाळेत हजर झाला व *एकदाचा शाळाबाह्य मंग्याला RTE2009 कायद्याने वयानुरूप समकक्ष वर्गात दुसरी इयत्तेत प्रवेश दिला व 'मंग्या' चा कु.मंगेश संतोष जाधव झाला*
त्या नंतर मंगेश ने कधी शाळा चुकवली नाही तो दररोज शाळेत यायचा,अभ्यास करायचा,शाळेच्या अनेक स्पर्धेत भाग घ्यायचा एका प्रकारे मंगेश सर्व मुलांचा आदर्श होत गेला.
*सर्व सुरळीत चालू असताना 2013-14 ला मंगेश 4थी मध्ये होता व त्याच्या वडिलांच्या वागणुकीमुळे तो शाळाबाह्य होतो की काय याची भीती वाटू लागली.*
त्याचे वडील खूप दारू प्यायचे आईला मारहाण करायचे काम धंदा कांही करायचे नाहीत त्यामुळे कधी कधी मंगेशला शाळा बुडवून आई सोबत जंगलात फाट्याना, मासे पकडायला जावे लागायचे पण मंगेशला शाळेची आवड असल्याने तो शाळेत यायचाच.
*एक घटना अशी घडली की मंगेश च्या वडिलांनी दारूच्या व्यसनासाठी गावात चोरी केली व तो पकडला गेला व गावकीने त्याला वाडीतून हाकलून लावले व मंगेशला वाडी व शाळा सोडून 2 km अंतरावर एका शेतात निर्जळ स्थळी राहावे लागले*   दुसऱ्या दिवशी शाळा भरली व मंगेश का  आला नाही म्हणून मुलांना विचारलं तर शाळेतील मुलाने सर्व हकीगत सांगितली तेंव्हा खुप वाईट वाटले.त्याच्या व्यसनी वडीलामुळे दररोज शाळेत येणाऱ्या,अभ्यासार हुशार असणाऱ्या  मंगेशवर हि वेळ आली होती. *पुढल्या दिवशी सकाळी मी शाळेत आलो व मंगेश आज ही शाळेत आला नव्हता तेंव्हा काय करावं या विचार करत होतो तेंव्हा बाहेरून एक मुलगा ओरडत आला गुर्जी गुर्जी मंग्या शाळेत येत आहे,तो बघा लांब डोंगर चढून वर येत आहे असा तो मुलगा म्हणाला.मग बाहेर येऊन आम्ही सर्वांनी त्याला पाहिलं व सर्व मुले आनंदाने नाचू लागले.मंग्या शाळेत आला होता पण तो कसा व का आला हे महत्वाचे  होते.शाळेपासून दूर  आपल्या झोपडी पासून 2 km चालत  चालत व एक मोठा डोंगर पार करून जवळपास एक ते दीड तास चालत मंग्या शाळेत पोहचला होता.*  त्याला मी  विचारलं काय रे मंग्या काय झालं, तो म्हटला *'सर माझ्या पप्पाने चोरी केली व आम्हला वाडीतून हाकलून दिले आता आम्ही ती झोपडी दिसते का तेथे राहतो व मला शाळा आवडते व मी दररोज शाळेत येईल* त्याने दाखवलेली *झोपडी शाळेपासून पाहिली तर छोट्याशा चेंडू एवढी दिसत होती म्हणजे शाळा डोगराच्या वर व ती झोपडी खड्ड्यात खूप दूर होती*  जवळपास मंगेश तीन ते चार महिने दररोज जंगलातून 2 km चालून शाळेत येऊ लागला व त्याच जोमाने अभ्यास करू लागला.शेवटी तो चांगल्या गुणाने चौथी पास झाला.
माझी शाळा 4थी पर्यन्त ची असल्याने पुढील शिक्षणासाठी तो जवळच कोलाड येथे हायस्कुल ला दाखल झाला. *16 जून 2011 ते 10 मे 2014 या तीन वर्षातील मंगेशच्या शिक्षणाच्या खडतर प्रवासाचा साक्षीदार राहता आले व शिक्षणासाठी संघर्ष काय असतो ते मंग्या च्या रुपात पाहता आले.*
पुढच्या काळात 2016 ला माझी बदली पालेखुर्द आदिवासीवाडी वरून झाली व अनेक आठवणीत मंग्या एक  व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहिला.
आजही मंगेशची घरची परिस्थिती बदलली नाही तीच मोडकी झोपडी,घरी वीज नाही,पाणी नाही ,लादी(फरशी) नाही,कुठल्या सुविधा नाहीत पण मंगेशची शिकण्याची जिद्द तीच कायम आहे.
*आज योगायोग 4 वर्षांनी बँकेत मंगेश अचानक भेटला व त्याला पाहून त्याच्या शिक्षणाचा खडतर प्रवास समोर आला,एक साक्षीदार म्हणून मंगेशने  कोणत्या परिस्थितीतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व आज तो नवव्या इयत्तेत पोहचला त्यामुळे मंगेशचा प्रवास मांडावा वाटला.*
                ......धन्यवाद.
✍🏻 *श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*रा.जि.प.शाळा संतोषनगर*
*ता.रोहा,जि.रायगड.*
*09923313777*
4 वर्षानंतर मंग्या ची भेट

आपल्या झोपडीत अभ्यास करताना मंगेश.
आई ,वडील व छोटा भाऊ नंदेश सोबत.

आपल्या झोपडीपाशी मंगेश

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

बालपणीचे रक्षाबंधन - श्री गजानन जाधव


रक्षाबंधन हा प्रत्येकाच्या आवडीचा सण.बहीण भावाच्या अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा सण.बालपणी सर्वांप्रमाणे मलाही या सणाची खूप उत्सुकता असायची ती आज ही आहे पण घरापासून नोकरीच्या निमित्ताने 500 km दूर असल्याने  कांही वर्षात रक्षाबंधन मनाप्रमाणे साजरा करू शकलो नाही.
आमचं कुटुंब खूप मोठं वडिलांसंहित 4 काकांचे  कुटुंब ,त्याप्रमाणे आम्ही भावंड हि खूप 8 मुलं व 6 मुली घरात असे एकूण 14 भावंड त्यात माझा 14 वा नंबर म्हणजे सर्वात शेवटचा पण लाडाचा असा मी.
वयाच्या 5 ते 6 वर्षांपासून रक्षाबंधन सण समजू लागला तेंव्हा पासून श्रावण महिना सुरु झाला की आईला सतत विचारायचं की रक्षाबंधन कधी येणार, मग अस करत करत तो दिवस उजाडला की खूप आनंद व्हायचा.आमच्या घरी तेंव्हा सामूहिक रक्षाबंधन व्हायचं, सर्व सहा बहिणी आम्हा आठ भावंडाना एकत्रित राख्या बांधायच्या तेंव्हा खूप मजा वाटायची.
रक्षाबंधनाच्या दोन दिवस आगोदर माझी एकच लगबग असायची ती म्हणजे ओवाळणीला पैसे टाकण्यासाठी चिल्लर जमा करणे,त्यावेळी मला आठवतंय खाऊच्या पैशातून  दोन दोन रुपयांचे नाणे जमा करायचे व ती ओवाळणी बहिणींना द्यायची.सर्वात मोठी ताई  विजयमाला अक्का नंतर सुरेखा ताई नंतर मुन्नी ताई,उज्वला ताई,पपा ताई व संगीता दिदि अशा सहा बहिणींनी बांधलेल्या राख्यांने छोटासा हात भरून जायचा व खूप छान वाटायचं.मग काय नंतर दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना हात भरून राख्या बांधून घेऊन जायचो व शाळेत मित्रांसोबत कोणाच्या हातात जास्त राख्या असा खेळ खेळायचो असे करून 4 ते 5 दिवस रक्षाबंधन सण साजरा करायला खूप मजा यायची.जसे जसे वर्ष उलटत गेले तसे बहिणींचे लग्न होत गेले व त्या सासरी रमत गेल्या. त्यानंतर ज्या प्रमाणे एकत्रित रक्षाबंधन साजरा केला जायचा तसे क्षण दुर्मिळ होत गेले. कालांतराने मग कधी एका ताईकडे एक वर्ष तर दुसरं वर्ष दुसऱ्या ताईकडे तर तिसर वर्ष तिसऱ्या ताईकडे असं चालू राहील.पुढे शाळा, कॉलेजचा व्याप वाढला व येणे जाणे  ही कमी होत गेले पण रक्षाबंधनाची ओढ कायम तशीच राहिली. जेंव्हा नोकरीच्या निमित्ताने गावापासून 500 km दूर कोकणात आलो तेव्हां पासून 13 वर्षात  फक्त 4 ते 5 वर्ष बहिणींकडे जाता आले पण या सणाची ओढ,आवड,त्यातील जिव्हाळा प्रेम कांही कमी झालं नाही. आज तर प्रत्येक जण आपापल्या संसारात ,नोकरीत,व्यवसायात रमून गेले आहेत 6 बहिणी  वेगवेगळ्या गावी व आम्ही सर्व भाऊ नोकरी निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आहोत पण एकमेकांचा एकमेकांबद्दल जिव्हाळा मात्र कायम आहे. रक्षाबंधन सण आला की ते बालपणीचे रक्षाबंधन आठवते,सर्व एकत्रित येणे,गप्पा, गोष्टी,हसी मजाक ,त्या मोठ्या मोठ्या चित्राच्या राख्या,ते दोन दोन रुपयांचे ओवाळणीचे नाणे,शाळेला जाताना हात भरून  बांधलेल्या राख्या हे सर्व आता आठवणींच्या हिंदोळ्यात राहिले आहेत.कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं व बालपणीच्या रक्षाबंधनाचा मनमुरादआनंद घ्यावा........

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

बकरी ईद विशेष

आज बकरी ईद सण साजरा होत आहे या सणा विषयी थोडी माहिती.
'रमजान'च्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर जवळपास ७० दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम आपला मुलगा हजरत इस्माईल याला याच दिवशी इश्वराच्या आदेशानुसार 'कुर्बान' करण्यासाठी घेऊन निघालेे होते. तेव्हा अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.
          'ईद उल अजहा' किंवा 'ईदे- अजहा' हा सण प्रामुख्याने 'बकरी ईद' म्हणून ओळखला जातो. हा सण मुस्लिम धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. मुस्लिम धर्मियांमध्ये एकूण तीन प्रकारे ईद साजरी केली जाते. त्यातील इतर दोन प्रकार म्हणजे ईदुलफित्र किंवा रमजान ईद आणि मिलादुन्नबी ईद. हे तीन्ही सण बंधुभाव, त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देतात.
          'ईद उल अजहा' ला अनेक नावांनी ओळखले जाते. या ईदला 'नमकीन ईद' किंवा 'ईदे कुरबां' असेही म्हटले जाते. या दिवशी चटपटीत खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने 'नमकीन ईद' तसेच या सणाचा 'कुर्बानी'शी संबंध असल्याने ईदे कुरबां' म्हटले जाते.
                  सर्वसामान्यपणे या सणाचा संबंध बकऱ्याशी लावला जातो, पण प्रत्यक्षात तसे नाही. 'बकर' या शब्दाचा अर्थ 'मोठा प्राणी' ज्याचा 'जिबह' म्हणजेच बळी दिला जातो, असा आहे. यातून 'बलिदान' अर्थात 'त्यागा'ची भावना अधोरेखीत केली जाते. अरबी भाषेत 'कर्ब' या शब्दाचा अर्थ अत्यंत जवळ असा होतो. म्हणजेच यावेळी ईश्वर व्यक्तीच्या सर्वात जवळ असतो. परंतु भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात या शब्दाचा अपभ्रंश झाल्याने या सणाला 'बकरा ईद' असे म्हटले जाते.
या दिवशी कुर्बानीचा एक हिस्सा कुटुंबीयांसाठी, दुसरा हिस्सा नातेवाईकांसाठी आणि तिसरा हिस्सा गोरगरिबांसाठी देण्याची प्रथा आहे.
हिंदूधर्मीयांच्या दिनदर्शिकेत दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. त्यामुळे मुस्लिमधर्मीयांचा एक महिना अगोदर येतो. या वर्षी २०१८ मध्ये  श्रावण महिन्यात बकरी ईद आली आहे.
अशा या बकरी ईद सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवाना खूप खूप शुभेच्छा.

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

कहाणी संतोषनगर डिजिटल शाळेची.....


*रा.जि.प शाळा संतोषनगर शाळा डिजिटल कशी झाली त्याची कहाणी*
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मिडियाकडे पाहत असतो.याच मीडियामुळे माझ्या जि प शाळा संतोषनगरच्या शाळेचा कसा बदल झाला थोडक्यात सांगावस वाटत.कांही महिन्यांपूर्वी सोशेल मीडियावर माझ्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलींच्या व त्यांच्या आजीच्या संघर्षाची कथा पोस्ट केली होती व ती बातमी *झी 24 तास* व इतर प्रसारमाध्यमांनी दाखवली व याची दखल घेत अलिबागच्या *श्री राजाभाऊ ठाकूर* या दानशूर सामाजिक कार्यकर्त्याने मुलींच्या शिक्षणासाठी *100000 रु.* मदत केली.तसेच ती बातमी नाशिक येथील *श्री गोविंद चौधरी* या दानशूर उद्योजकाने पहिली व संतोषनगर शाळा दत्तक घेतली तसेच प्रत्येक मुलाला वर्षाला *6000 रुपये* शिष्यवृत्ती सुरवात केली व स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला संतोषनगर शाळेला *51000 रु.* देणगी देऊन शाळा डिजिटल केली. आज हे सर्व मीडियामुळे प्रसिद्धी मिळाल्याने व शाळेच्या विकासासाठी दानशूर व्यक्तीने मदत केल्यामुळे शाळेचे रूप बदलत आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻




एक अटल पर्व....




*एक अटल पर्व...*
(1924-2018)
मेरे प्रभू!
मुझे इतनी ऊंचाई
कभी मत देना
गैरों को गले न लगा सकूं
इतनी रुखाई कभी मत देना

माझे सर्वात आवडते पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने काल निधन झाले. महाविद्यालयीन जीवनातच एखाद्या नेत्यांचा प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यात पडत असतो कारण ते वयच विचारप्रवण बनण्याचे असते 1999 ते 2004 या माझ्या दहावी ते महाविद्यालयीत जीवनात अटलजींचे विचार खूप प्रभावित करून गेले.
अटलजींचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर येथे झाला. वयाच्या 15व्या वर्षी 1939 साली अटलजीने रा.स्व.संघात प्रवेश केला.पुढे स्वतंत्र भारतात 1951 साली जनसंघाची स्थापना झाली व अटलजीने सरचिटणीस म्हणून काम केले.1957साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटलजीला मथुरा लोकसभा मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला पण बलरामपूर मधून ते निवडून आले.1957 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर जनसंघाची जबाबदारी अटलजी वर आली व ते सर्वात तरुण अध्यक्ष बनले.1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली व त्यात बड्या बड्या नेत्यांना जेलमध्ये घातले त्यात अटलजीनाही तुरुंगवास घडला.पुढे इंदिरा गांधींच्या विरोधात जनता पक्षात जनसंघाचे विलीनीकरण झाले व 1977 च्या निवडणुकीत मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले व त्या सरकार मध्ये अटलजींना परराष्ट्र मंत्रालयाचे काम करण्याची संधी मिळाली.पुढे चालून 1980 मध्ये अटलजीने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली व ते पहिले अध्यक्ष बनले.1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली व नंतरच्या काळात झालेल्या निवडणुकीत भाजप चे फक्त 2 खासदार निवडून आले त्या नंतर अटलजीने व अडवाणीने आपल्या पक्षाचा विस्तार केला व 1996 च्या निवडणुकीत अटलजींचे सरकार सत्तेत आले पण ते फक्त 13 दिवस टिकले यांचे सरकार 1 मताने पडले.पण अटलजीने जिद्द सोडली नाही नंतर झालेल्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षासह सत्तेत आले व19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान राहिले. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या भारत देश प्रगतीपथावर कसा येईल यासाठी प्रयत्न केले. परराष्ट्र धोरणाला जास्त प्राधान्य दिले.पाकिस्तान सोबत कधी रोखठोक तर कधी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून काश्मीर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.कारगिल युद्ध असो या दिल्ली लाहोर बससेवा असो की धाडसी परमाणू अणुचाचणी असो वेळोवेळी जगाला अटलजींच्या नेतृत्वाखाली एक चुणूक दिसली.दिल्ली-मुंबई-चन्नई-कोलकता हा त्यांचा रस्तेबांधणीतील महत्वपूर्ण  सुवर्ण चोकोन प्रकल्प खूपच देशाच्या विकासाला चालना देणारा ठरला.2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अटलजींच्या सरकारला पराभवाचा सामना करावा लागला व त्यानंतर अटलजी सकल राजकारणा पासून दूर गेले व पुढे अनेक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागले.शेवटी 16 ऑगस्ट 2018 रोजी अटलजींची प्राणज्योत मावळली.अशा या प्रभावी माजी पंतप्रधानाला भावपुर्ण श्रद्धांजली.
💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
✍🏻...
*श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*

कातकरी बोलीभाषा अध्ययन साहित्य शिक्षक मार्गदर्शिका.

कातकरी बोलीभाषा पुस्तक

 
➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤   download here
 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...